तो मी नव्हेच !!

"काय दुष्टपणा आहे हा ? माझ्यासमोरून आत्ताच्या आत्ता ४ गाडीवाले सिग्नल तोडून गेले, मलाच बरे पकडता  आणि सिग्नल पिवळा होत होत लाल होईपर्यंत मी आले पण होते पुढे.... माझी चूक की तुमच्या अंगावर गाडी घालून पुढे न जाता तुम्हाला सहकार्य करून गाडी बाजूला घेतली.. एवढ्या लोकांमधून मीच का......" ??

"...मीच का ??"...सिग्नलला बस  थांबलेली असताना मला हे उद्गार ऐकू आले. एक बाई तावातावाने बोलत होत्या,

आधीच दुपारचे ऊन भाजून काढत होते, त्यात हे लुटारू उगीच लायसन्स दाखवा, पियुसी दाखवा करत संध्याकाळच्या पार्टीची सोय करताना पाहून मी बसमध्ये होतो तो खाली उतरलो, माझ्याकडे कायम एक रुलबुक आणि कंपाउंडींग फी ची प्रिंट आऊट असते, ती त्या बाईंच्या हातात शांतपणे ठेवली आणि म्हणालो,  " मॅडम - ह्यानुसार तुम्हाला दंडाची योग्य रक्कम कळेल, तुमची चूक होती की नव्हती ते मी सांगत नाही पण १०० रु दंड असूनही ४००-५०० काहीही मागितले जातात... आणी मग आपण गयावया केली की त्याचे २०० होतात... म्हणजे खाया पिया कुछ नही आणि लाचारी दिखाया सौ आना ! मला फक्त ती परिस्थिती येऊ नये असे वाटते... तुम्ही काय... मी काय....कोणावरही...!" -

ह्या एका वाक्यामुळे त्या बाई एकदम शांत झाल्या, प्रिंट आऊट उघडली आणि ती पाहत त्यांनी पर्स ला हात घातला, आणि माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहणाऱ्या टोळभैरवाकडे पावतीची विचारणा केली -- त्याची चरफड पाहून मला वाटले तो देखिल नक्की मनात म्हणाला असेल ".... माझ्यासोबतच का ? " !!

बाकी वेगळ्या लाख गोष्टी असोत, पण ह्या एक प्रश्न मला अत्यंत जवळचा वाटतो....हा शब्द कदाचित माझ्याबाबतीत अतिपरिचित आहे, आणि म्हणूनच मला त्याचे महत्त्व पण जास्त वाटते....  अनेकदा असे होते की आपल्यासोबतची एखादी वाईट घटना घडते --की एवढं सगळं करून सुद्धा माझ्या वाट्याला चिंचोके...   किंवा दुसऱ्यासाठीची चांगली बातमी कुठेतरी मनाला बोच लावून जाते...अर्थात पॉझिटिवली.. की मी सुद्धा हे सगळे करतो... तरी मला हे का मिळत नाही ? !

ह्याला जळफळाट मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही, नक्कीच नाही ! माझे इंग्रजीतले एक आवडते वाक्य आहे -Everybody needs affection & attention -- !  हां आता सारखेच बोटे मोडणाऱ्यांच्या बाबतीत "स्वभावाला औषध नाही" हेच खरं.. पण बहुतांश लोक संधीच्या शोधार्थ असतात... जे जे चांगले त्यासी करावेसे आपुले, ह्या हिशेबाने प्रत्येकजण जीव तोडून मेहनत घेत असतो.... पण काहींना फळे लवकर मिळतात तर काहींना गीतासार वाचल्याचा अनुभव मिळतो... (कर्म करते रहो.. )

मी का नाही ? - ह्या प्रश्नाला अंत नाहीच.... पगारवाढ असो, प्रमोशन असो, लकी ड्रॉ असो, सगळीकडे हाच प्रश्न उभा राहतो  --  ह्यावर माझा एक कायमचा उपाय म्हणजे 'भगवान के घर देर है अंधेर नही' ह्या उक्तीवर विश्वास ठेवणे !

प्रत्येकाची वेळ येते, इंग्रजी म्हणीप्रमाणे "Every dog has his day"...  त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न विचारावासा वाटतो, आणि कधी कधी आपल्यामुळे लोकांना हा प्रश्न पडतो. "आतले आणि बाहेरचे"  कधी आपण आत तर कधी बाहेर... पण त्याशिवाय मजा नाही...

थोडक्यात काय, तर मेहनतीची जोड दिली तरी परिस्थिती आणि नशीब जेव्हा बदलायचे तेव्हाच बदलते, तोपर्यंत आम्ही राज कपूर चे गाणे गुणगुणत राहू -"या गर्दिश मे हूं आसमान का तारा हूं....".... !!

--

आशुतोष दीक्षित.