प्रयास

त्याचे खरे नाव वैभव आम्ही त्याला प्रेमाने 'सोन्टुल' म्हणतो. गोड निरगस चेहर्‍याचा सदा हसतमुख छोकरा, पण दुर्दैवाने जन्मतः मुकबधिर. वैभव आमचे दुसरे आणिशेवटचे अपत्य. मोठा मुलगा सर्वसामान्य अव्यंग. आम्हा उभय्ता पती पत्नीच्या तिसर्‍या पिढीपर्यंत कुणी मुकबधीर नव्हते. त्यामुळी अनुवंशिकता म्हणता येणार नाही. मात्र तो गर्भात असताना त्याच्या आईने दोन मुलांत अंतर असावे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने  गर्भपात करण्यासाठी अ‍ॅलोपॅथिक गोळ्या घेतल्या होत्या. औषधीस दाद न देता तो आमच्या कुटुंबात दाखल झाला. बाळंतपण सुलभतेने न होता विलंबामुळे सिझेरीन पद्धतीने करण्यात आले. ६ महिनेपर्यंत त्याच्या बहेरेपणाची जाणीव झाली नाही. त्यानंतर मात्र आवाजाला प्रतिसाद न देण्यामुळे त्याच्या श्रवणशक्ती विषयी शंका वाटू लागली. स्थानिक कान, नाक, घसा तज्ञाकडे त्याच्या कानाची तपासणी केली असता त्याला ऐकू येत नसल्याचे त्यांनी निदान केले. काही औषधी लिहून दिली. एका डॉक्टरचे निदान चुकीचे असू शकते म्हणून आणखी दुसर्‍या नामवंत डॉक्टरकडे धाव घेण्याचे प्रकार सुरू झाले. एकदा नागपूरच्या न्युरोसर्जनकडे देखील तपासणी करून घेतली. तेथेही काही निष्पन्न झाले नाही. त्यंच्यच सल्ल्याने मुंबईच्या जसलोक इस्पितळात तो अडिच वर्षांचा असताना त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. तेथे त्याच्या बहिरेपणावर पक्के शिक्कामोर्तब झाले. आम्हा उभयतांवर तो एक वज्राघातच होता. देवाने कोणत्या कर्माची शिक्षा म्हणून असे मूल आपल्या पोटी जन्माला घातले असे म्हणून मन आक्रंदून उठले. फुटके नशीब आणि दैवाला दोष देण्यापलिकडे असहाय माणूस काय करू शकतो? घरातील कुणी आप्त स्वर्गवासी झाले म्हणजे त्याच शोका काही दिवसांनी ओसरतो परंतु आपल्या लहानग्या मुलाचे उभे आयुष्य एका व्यंगाने ग्रासण्याचे दु:ख क्षणोक्षणी त्याच्या मात पित्याचा जीवजाळत असते. जसलोक इस्पितळात वाक्उपचार तज्ञाचा सल्ला घेऊन श्रवण यंत्र लावण्याचा आणि मूकबधीर शाळेत नाव दाखल करण्याचा हितोपदेश मिळाला.

आमच्या खेडेगावात सुतारकाम करणारा असाच एक एसम होता. तो हवेत बोटे नाचवायचा व तोंडाने मॅ मॅ मॅ मॅ करयचा. त्याला गावातील लोक मुक्यावाडी या नावानेच ओळखयचे. आणखी एका कुअटुअंबातील लागोपाठ ३ मुले अशीच होती. आपला मुअलगा देखील आयुष्यभर असाच मॅ मॅ मॅ मॅ करीत रहाणार हा विचार मनाला छळू लागला की अस्वस्थ व्हायचे. कोणताही व्यवसाय करणारी अशी व्यक्ती असली तर त्याच्या नावाबरोबर मुका-मुकी हे संबोधन हमखास ठरलेले असते. बालपणी अशा मुलांना त्याचे सवंगडी देखील नावा ऐवजी या संबोधनाचा वापर करतात. त्यामागील हिणकस हेतू त्याच्या व्यंगाची जाणीव करून चिडविण्याचा असतो. गंमत अशी की जन्मतः बहिरेपणामुळे ते त्यांच्या गाविही नसते. आपल्या मुलास नियतीने प्रदान केलेले हे विशेषण मातापित्यांना मात्र शिवीसारखे सलते.

एखदा चमत्कार होऊन आपले मुल बोलू लागेल या अभिलाषेपोटी गंडेदोरे, घरगुती सल्ले, देवधर्माचे विधी करण्यात आले परंतु कशालाही यश आले नाही. अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेदिक या तिनही चिकित्सा प्रणालींचे औषधी प्रयोग झाले परंतु गुण आला नाही. अलिकडे कानाचे मागील भगात शल्यक्रियेद्वारे कॉक्लियर इंप्लांट अर्थात एलेक्ट्र्नीक कानाचे रोपण करण्याच्य विदेशी डॉक्टरांच्या प्रयत्नास देखील ५२% यश आल्यची कबुली वृत्तपत्रातून वाचण्यात आली. अर्थात ४-५ लाख रूपये आवाक्या बाहेरचा खर्च करायचा मात्र १००% यशस्वी होण्याची खत्री नाही अस बेभरवशाचा वैद्यकेय इलाज. आजच्या वैज्ञानिक युगात मानवाने चंद्रावर पदार्पण केले. कंप्युटर टी. व्ही. सारख्या इलेक्ट्रॉनीक माध्यमांनी संपूर्ण जगात क्रांती घडवून आणली परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने कर्णबधिरास ध्वनिवर्धन करणार्‍या श्रवण यंत्राशिवाय कोणतीही देणगी दिलेली नाही. याला घोर उपेक्षाच म्हणावी लागेल. सामान्यासारखी उघडी बुबूळे असलेल्या जन्मांधाला दृष्टीसंवेदनावाहक मज्जप्रणाली बिघडल्यामुळी कितीही वरच्या नंबरचा चश्मा लावला तरी त्याचा उपयोग शुन्यवत होतो. तसेच जन्मजात तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलास श्रवणयंत्राचा उअपयोग व्यर्थ ठरतो हे या क्षेत्रातील तज्ञांच्या पचनी न पडलेले कटु सत्य आहे. एकिकडे काहीच न बोलणारे आपले मोल मोडके तोडके का होईना, थोडेफार बोलावे ही प्रत्येक पालकाची वेडी आशा तर दुसरीकडे ऐकल्याविना बोलणे नाही, बोलल्याविना समजणे नाही आणि समजल्याविना भाषा आणि ज्ञानाची खिडक्या कवाडे बंद. अशी ही विचित्र कोंडी!

या कोंडीतून एक नवा विचार मनात रूजला. भाषा विकासासाठी श्रवण आणी वाचा यंत्रणेचा समान सहभाग आवश्यक असतो. यापैकी श्रवण यंत्रणेत दोष असला आणि वाचा यंत्रणा चांगली असली तर केवळ याच यंत्रणेचा उअपयोग करून जुजबी स्वरूपाचा वाणी विकास करता आला तरी काय वाईट आहे? काहीच नसण्या पेक्षा थोडेफार असण्यात काय हरकत आहे? एकदा माझे एक स्नेही श्री पद्माकर अंबुलकर घरी आले असता वैभवची तल्लख बुद्धी आणि नजरेच्या सुक्ष्म हालचाली पाहून त्याला जवळ बोलावले आणि आपल्या चेहर्‍याकडे पहायला सांगून 'भात' शब्द पुन्हा पुन्हा उच्चरण्यास सांगू लागले. ८-१० वेळा उच्चरून दाखविल्यानंतर वैभवने अनुकरणाचा प्रयत्न करून 'पात' असा अस्पष्ट उच्चार केला. त्यवेळी तो सुमारे ४ वर्षांचा असावा त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की श्रवणयंत्र न लावता देखील दृश्य आणि स्पर्शाच्या संवेदना द्वारे आणि आवश्य तिथे बोटांच्या हालचालींचा खुणासारखा वापर करून अक्षरांचे उच्चर शिकविले जाऊ शकतील.

या प्रकारानंर विचारांना चालना मिळत गेली. घरातील आरसा चेहर्‍यापुढे घेऊन प्रत्येक अक्षराचा उच्चर करताना ओठाची व जिभेची हालचाल कशी होते, जीभ मुखतील कोणत्या भागाला स्पर्श करून हवा अडविते, हवा बाहेर पडताना मुखावाटे बाहेर पडते की नाकावाटे, हळू की जोरात एत्यादी बारकावे कळू लागले. उदा. बंद ओठतून मुखावाटे हवा हळू बाहेर पडली तर 'प' चा उच्चार होतो आणि त्यच स्थितीत जोरात बाहेर पडली तर 'फ' चा उच्चार होतो. याउलट मुखाऐवजी नाकावाटे हवाबाहेर पडून ओठ उघडले तर 'म' चा उच्चार होतो. यावरून अक्षरांचेअ उच्चार ही केवळ एक 'तांत्रीक क्रिया' आहे हे स्पष्ट होते. मुलास शिकवण्यापूर्वी प्रथम पालकांनी उच्चारातील बारकावे समजून घेतले तर मुलाकडून त्याचे अनुकरणकरून घेणे सुलभ होईल. त्याच बरोबर प्रथम्दर्शनी क्लिश्ट वाटणार्‍या आगळ्या वेगळ्या पद्धतीची हळूहळू उकल होत जाईल.

सकाळी संध्याकाळी जसा वेळ मिळाला तसे वैभवला सोबत घेऊन बसावे, आधी शिकविलेल्या उच्चारांची उजळणी घ्यावी, उच्चार सदोश असतील तर ते सुधारण्याचा प्रयत्न करावा, चुकिबद्दल राग वा नापसंती चेहर्‍यवर दिसू नये एव्हडे पथ्य पाळले. हे सर्व असले तरी शेजारातील मुलांबरोबर खेळण्याच्या वेळात पप्पा रोज घेऊन बसतात म्हणून त्याची आईकडे कूरकूर, कधी चिडावे तर कधी जवळ घेऊन बसल्यावर असहकार पुकारावा अशा त्याच्या बालसुलभ लिला! मग त्याला विश्वासात घेऊन प्रेमानी कुरवाळत एक गोष्ट त्यच्या मनावर बिंबवावी लागायची की 'बघ मी, आई, दादा आणि तुझे मित्र या सर्वांना ऐकू येते म्हणून ते बोलतात. तुला ऐकू यत नसल्याने असं शिकवावं लागतं तु दररोज बोलायला शिकला म्हणजे तुला पण बोलता येईल'. अर्थातच हे सर्व खुअणांनीच. कधी प्रेमाने, सम्जुतीने तर कधी चॉकलेट किअंवा बक्षिसाचे प्रलोभन अशा विविध प्रकारे प्रोत्साहीत करून आणि क्वचीत रागवून त्याला समजून घेऊन सम्जावून द्यावे लागे.

वैभव ४ वर्षांचा झाल्यावर त्याला वर्धेच्या जगदंबा मुकबधीर विद्यालयात दाखल करण्यात आले. वैभवची अक्षराअक्षराने वाढ होताना त्याच्या शाळेतील शिक्षकवृअंद या सर्वांशी या विषयावर वेळोवेळी चर्चा उपयुक्त ठरली. प्रथम सोपी अक्षरे, सोबत त्यांची बाराखडी मग जोडाक्षारे अशी शब्दाकडे वाटचाल करताना श्रीमती प्रभाताई घाटे यांच्या चित्रमय शब्दसंग्रहाचा शब्द स्मरणासाठी फार उपयोग झाला. वैभवचा शब्दसंग्रह वाढू लागला तसा तो खुणांऐवजी शब्दांचा वापर करू लागला. शब्दांचे उच्चार येऊ लागल्यानंतर टि.व्ही. बघताना सिनेमा, मालिकांची नावे, त्यातील अभिनेत्यांची नावे तो बोलून वाचू लागला. शेजारच्या मित्रांना नावाने हाक मारू लागला. त्याची जिज्ञासा जागी झाली पुधे तो स्वतः कशाला काय म्हणतात तुमची कशाबाबत चर्चा सुरू आहे असे चौकस प्रश्न विचारू लागला. त्यच्या प्रश्नाला उत्तरादाखल बोलून सांगणे आणि तळहातावर बोटाने किंवा कागदावर पेनने लिहून देणे अशी त्याची कुटुअंबाच्या सानिध्यात शाळा सुरू झाली. विशेष म्हणजे हे सर्व दोन अडिच वर्षात कानाला श्रवणयंत्र न लावता घडून आल> वैभवची मुअंबईच्या अअलीयावर जंग राष्ट्रिय श्रवण दिकलांग संस्था येथे ८ वर्षाचा असताना पुन्हा सर्वंकश तपासणी केली असता श्रवण र्‍हास ९०-९५ डेसिबल्स अर्थात तीव्र श्रवणदोषात मोडणारा होता.

गेल्या ३ वर्षांपासून वैभव नागपूरच्या शंकरनगर स्थित मुकबधीर औद्योगीक शिक्षण संस्थेत वसतीगृहात ८ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याला बर्‍यापैकी वाचता येऊ लागले आहे. बोलताना तो सुटे शब्ड आणि छोटी  वाक्ये यांचा वापर करतो. वाक्यरचना करता येणे हा दुसरा टप्पा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी आपली मायबोली असले तरी भाषेच्या व्याकरणानुसार शब्दांची निवडक वाक्य तयार करायला कर्णबधिरांना शिकवणे हा  अत्यंत अवघड विषय आहे. आजवर केलेल्या प्रयत्नांच्या वाटचालीच्या अल्पशा यशात पूर्ण समाधान नाही, कारण भाषा विकासाचा लांब पल्ला गाठायचे बाकी आहे. शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहू लागल्यापासून त्याची घरची शाळा बंद झाली आहे.

येथे नम्रपणे एक सुचवावेसे वाटते की माता पित्यापैकी एकाने जरी आपल्या मुलासाठी रोज अर्धा तासाचा वेळ देऊन सोशिकतेने, नाउमेद न होता चिकाटीने प्रयत्नांची पराकष्टा केली तर 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे अक्षराअक्षराने मुलाचे शब्दभंडार वाढ्वीत नेले तर आपल्या मुलास 'मूकं करोती वचलम्' हा चम्तकार मनात आणल्यास कुणीही पालक करू शकेल. मोकबधीर शाळातील शिक्षकांच्या प्रयत्नास पालकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळल्यास सध्याची स्थिती पालटून कर्णबधिरांच्या जिवनात आनंद खेळू लागेल यात शंका नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता.....
**************************************************************
**************************************************************
माझे वडील श्री पंजाब शिरभाते यांनी लिहिलेल्या 'आणि वैभव बोलू लागला' या पुस्तकातील हे एक प्रकरण. हे पुस्तक १९९८ मधे प्रकाशित केलं गेल. बाबांनी या पुस्तकाच्या मोफत प्रती महाराष्ट्रातील सर्व शाळांना पाठविल्या. शिक्षणपद्धती, शरीरशास्त्र, मानसशास्त्र या विषयांचा काहिही पूर्वानुभव नसताना केवळ स्वतःच्या मुलाला जर मी बोलतं केल तर इतरांनापण त्याचा लाभ व्ह्यावा हा हेतू. या नविन 'प्रयास' पध्हतीवर आधिरीत या पुस्तकाला बर्‍याच जणांचा विरोध होता पण मिळालेलं घवघवित यश कुणिही नाकारू शकलं नाही. या पद्धतीवर संशोधन करून निरंतर त्यात प्रगती करून माझ्या वडिलांनी कित्तेक कर्णबधीर मुलांना(श्रवणयंत्राशिवाय) बोलतं केलेलं मी बघितलेलं आहे. याच पुस्तकात सुधारणा करून 'मुकबधीर वाणी विकास' हे स्वतः हिन्दीत लिहिलेलं पुस्तक २००८ मधे त्यांनी प्रकाशित केलं. या दोन्ही पुस्तकांवर विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांच्या स्तुतीचा अक्षरशः पाऊस पडला. महाराष्ट्रातील बर्‍याच शाळात बाबांनी मुकबधीर मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी शाळाच्या निमंत्रणावरून कार्यशाळा पण केल्यात. गेल्याच वर्षी 'नॅशनल बुक ट्रस्ट, दील्ली' नी या पुस्तकाचे ८ भारतीय भाषांत भाषांतर करून प्रकाशित करण्याचे ठर्विले आहे. पैकी मराठी आवृत्ती प्रकाशित सुद्धा झाली. या कार्या साठी  बाबांनामहाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमीच्या 'डॉ. होमी भाभा' प्रथम पुरस्कार गेल्या वर्षी देण्यात आला.

नुकतंच कर्करोगावर मात करून जीवघेणी केमोथेरपी संपवून बाबा परत आपल्या कार्याला लागले आहेत.
गेल्या २० वर्षात केवळ या एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन कार्य करताना बघताना कधी कधी घराकडे होणार्‍या दुर्लक्षामुळी चीड यायची पण क्षणीकच. येत्या जुलै महिन्यात माझे वडील श्री पंजाब शिरभाते ६१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ही गोष्ट मी कधी बोलून दाखवीली नाही आणि कदाचीत बोलू शकणारही नाही पण आज इथे लिहितो मला माझ्या वडिलांच्या कार्याचा आणि वैभवचा मोठा भाऊ असल्याचा सार्थ अभिमान आहे!'