भारत - अमेरिका...किती फरक, किती साम्य!

                 मनोगत वरील बरेच उत्तम साहित्य वाचता वाचता एका लेखाकडे लक्ष गेले. अतिशय सुंदर असे प्रवास वर्णन होते. त्यात परत खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये त्यासारखेच काही गद्य साहित्य होते. त्यातले बरेच लेख वाचले आणि अचानक डोक्यात एक विचार आला आणि तोच मी इकडे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण पहिले, ते वाचलेले सर्व लेख उत्तम होते आणि आपणही ते वाचावेत अशी इच्छा.  
 

                  तर मनात आलेला तो विचार म्हणजेच भारत आणि इतर देश.माझा जन्म १९८९ चा त्यामुळे अगदी पूर्वीच्या भारतावर मला काही बोलता नाही येणार पण मला आठवणारा आपला देश हा तसा फारच प्रगत किंवा तो मला तितका प्रगत वाटण्याचं कारण असेल लहानपणापासून माझ्या भोवती असलेलं वातावरण आणि माझं कुटुंब (आई, बाबा,ताई आणि इतर सगळे नातेवाईक). मी अगदी ५वी किंवा ६वीत असीन आणि तेव्हा माझा दादा (मावस भाऊ) आमच्यातला पहिला इकडे अमेरिकेत आला आणि तेव्हापासून हा एक विचार नेहमी डोक्यात की कसा असेल हा देश? कसे असतील इकडचे लोक?काय फरक असेल आपल्या देशात आणि ह्या देशात? एकूणच सगळे ठराविक प्रश्न. त्याची उत्तर दादाकडून मिळायची आणि फार अप्रूप वाटायचं की किती मस्त ह्या सगळ्या गोष्टी. एवढ्या मोठ्या विमानातून जायचं, त्या प्रवासाची तयारी, प्रवासातलं नावीन्य..... काय मजा. प्रवास करताना ३२ किलोच्या २च बॅगा आणि १० किलोची एक जवळ ठेवायची बॅग (त्या वेळेस सामानाच्या दृष्टीने विमान प्रवास सुसह्य होता ), तो पासपोर्ट विसा ते चेक बुक सारखं तिकीट बापरे काय काय सगळं एक एक. इतका अभिमान वाटायचा की आपलं कोणीतरी आहे असा प्रवास करणारं आणि अमेरिकेत राहणारं. कधी विमानतळावर सोडायला किंवा घ्यायला गेलो तर दुसऱ्या दिवशी शाळेत कॉलर टाईट. अजूनही आठवलं तरी मस्त वाटतं. करता करता माझी आत्ये बहीण पण लग्न करून इकडे आली आणि नंतर तर चक्क माझी ताईच आली इकडे आणि मग तर काय सगळ्याच गोष्टीचा हळूहळू उलगडा होऊ लागला. 

                    ताई इकडे आली तो पर्यंत मी कॉलेजमध्ये होतो. इकडचे रस्ते, गाड्या, वॉशर-ड्रायर, पेपर टॉवेल, वातावरण, बर्फ, थंडी, वेगवेगळ्या देशातले पदार्थ वगैर सगळंच कळतं गेलं. नाही म्हटलं तरी उत्सुकता जबरदस्त वाढली होती. सगळे सोपस्कार पूर्ण करून आता माझीच वेळ आली होती ह्या देशात यायची. आई इकडे आलेली होती आणि बाबा आणि मी एकत्र येत होतो. घर सोडताना असह्य झालं होत पण विमानतळावर येऊन प्रवासाच्या ओघात (आणि बाबा बरोबर होता म्हणून) सगळं विसरून गेलो. लॉस-ऍंजलिस ला पोहोचलो तर विमानतळ मोठं होतं पण खुपा वेगळं असं नाही वाटलं. घरी जाताना एका फ्रीवे (हायवे) वरून जात होतो, स्वच्छ होता तो रस्ता पण बऱ्यापैकी आपल्या मुंबई - पुणे द्रुतगती मार्गासारखाच वाटला. असं करत तिकडे मोठे मोठे मॉल पाहिले. फिनिक्स मिल सारखेच ते सुद्धा मोठे होते. ते शहर म्हणजे एकदम फोटोतल्या अमेरिकेसारखं होतं. तिथून न्यू यॉर्क ला आलो आणि मोठ्या मुंबईत आलो असं वाटलं. घाम, गर्दी, खड्डे, गाड्या सगळं तेच. जरा आश्चर्यच वाटलं. का माहीत नाही पण फार काही फरक जाणवला नाही. इकडच्या लोकांचे दैनंदिन जीवनातले इश्यू बरेच सेम आहेत हे जाणवलं. एखादवेळेस भारताने केलेल्या प्रगतीमुळे मला जास्तीत जास्त साम्य दिसतं होतं. माझ्या पुढे मागे २ वर्ष आलेल्या लोकांनाही तोच अनुभव आला. म्हणजे एकुणंच परिस्थितीचा विचार केल्यास, अमेरिकेचं देखाव्याचं बाह्य रूप हे तसं माझ्या जनरेशनच्या लोकांना भारताशी साधर्म्य असणारंच वाटलं.

                    ह्या सगळ्यात मात्र एक सर्प्राइस होतं ते म्हणजे ह्या देशाच आतलं रूप म्हणजेच इकडची लोकं. आपल्याला फार असं वाटतं की भारतीयांनाच कुटुंब असण्याचं जास्त महत्त्व आहे आणि काही अंशी ते खरं हि आहे. पण आपल्याला वाटतं तितकं ते ह्या लोकांत कमीही नाही. इटली देशातले लोकही कौटुंबिक बाबतीत आपल्यासारखेच फार इमोशनल असतात. आई-वडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटणारं प्रेम, कौतुक तसंच मुलांनाही त्यांच्याबद्दल वाटणारा अभिमान हा इथेसुद्धा तसाच आहे. एखाद्या सणाच सेलिब्रेशन फॅमिली बरोबर करण्याचं महत्त्व हे ह्या लोकांनाही ठाऊक आहे. हे झालं कौटुंबिक पण ह्यांचा एखाद्या नवीन गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तितकाच कौतुकास्पद आहे. फार पटकन आपलंसं करतात हे लोक कोणत्याही गोष्टीला. जे काम आवडतं तेच करायचं आणि लाईफ एन्जॉय करायचं असा फंडा असतो ह्यांचा आणि त्यामुळेच हे लोक एखादवेळेस लाईफ मध्ये फार खूश असतात. 

                      चांगले लोक, उत्तम सुखसोयी, भरपूर विविधता, असंख्य अपॉर्चुनिटीस असलेला हा देश बऱ्याच भारतीय मनांना भुरळ घालतो. पण सगळ्यांनाच नाही आणि त्यातलाच मी एक. अप्रूप वाटणाऱ्या ह्या देशात २वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेतले पण मनाने अजूनही भारतातच आहे आणि राहीनही. हा देश अजिबात वाईट नाही उलट प्रत्येकाने हा देश पाहावा आणि भारताला प्रचंड गरज असणाऱ्या  "ऍक्सेप्टन्स ऍबिलीटी " हा गुण इकडून घ्यावा. फक्त एकंच कोडं आहे, ह्या देशाची भुरळ पडलेल्या लोकांना ते असं काय सरप्राइस मिळालं? पाहूयात, एखादवेळेस उलगडा होईल. आय होप, माझा हा भारत अमेरिका साम्य आणि फरकाचा उतारा तुम्हाला काही अंशी चकित करेल.