सर्वोच्च झेप

काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते.

अशीच माणसे सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट च्या शिखरावर पोचू शकतात, इंग्लिश किंवा तत्सम खाडी पोहून जाऊ शकतात, उत्तर व दक्षिण धृवावर झेंडा फडकवू शकतात, मारियाना गर्त्याच्या तळाशी पोचू शकतात. असाच एक माणूस आहे फेलिक्स बॉमगार्टनर. ऑस्ट्रियाचा रहिवासी असलेला फेलिक्स ४३ वर्षे वयाचा आहे व काही तासांतच त्याच्या आजवरच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वितेसाठी तो झेपावणार आहे. त्याला पाठबळ आहे विज्ञानातील विविध शाखांच्या तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या त्याच्या टीम चे.

तर हि मोहीम आहे भूपृष्ठापासून १ लक्ष २० हजार फूट (३६.५ किमी) उंची वरून स्काय डाइव्ह करणे. मौजमजेसाठी स्कायडाइव्ह करणारे अंदाजे १०-११ हजार फुटांवरून उडी मारतात व ५ हजार फुटांच्या आसपास पॅराशूट उघडतात. या उंचीच्या जवळ जवळ १२ पट उंचीवरून फेलिक्स जमिनीकडे झेपावणार आहे. हा प्रश्न केवळ पटींचा नाहीये कारण भूपृष्ठापासून जितके उंच जाल तितके तापमान कमी व वातावरणाचा अधिक दाब असे गुणोत्तर असते. एवढ्या उंचीवरून आजवर कुठल्याही मानवाने उडी मारलेली नाहीये. याअगोदरचा सर्वोच्च विक्रम आहे जोसेफ किट्टिंजर यांच्या नावावर - १ लक्ष २ हजार ८०० फूट (३१.३३ किमी). अन हा विक्रम १९६० साली करण्यात आला होता.

स्ट्रॅटोस

अगोदरच्या चाचणीच्या वेळी काढण्यात आलेले छायाचित्र

फेलिक्सच्या या प्रकल्पाचे नाव आहे स्ट्रॅटोस. एनर्जी ड्रिंक बनवणारी रेड बुल ही कंपनी याची प्रायोजक आहे. यामध्ये वापरली जाणारी महत्त्वाची संसाधने म्हणजे एक कुपी जी हिलियम वायू भरलेल्या बलूनच्या साहाय्याने फेलिक्सला आकाशात नेईल. या मोहिमेसाठी विशेष बनविला गेलेला स्पेस सूट, पॅराशूट व इतर अनेक तांत्रिक उपकरणे. स्थळ असणार आहे, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील रॉसवेल. तेथील स्थानिक वेळेनुसार ९ ऑक्टोबर च्या सकाळी ६ वाजता मोहिमेला सुरुवात होईल. अर्थात हवामानात प्रतिकूल बदल न झाल्यास.

उपकरणे

या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेलिक्सचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक असणार आहे. अंदाजे अकराशे दहा किमी / तास. आंतरखंडीय प्रवासी विमाने या वेगापेक्षा अधिक वेगाने सहसा चालविली जात नाही. हि मोहीम यशस्वी झाल्यास नवा विक्रम तर बनेलच पण कितीतरी महत्त्वाची शास्त्रीय माहिती हाती लागेल. त्याचा उपयोग अवकाश मोहिमांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी करता येईल.

पण या सर्व बाबी कितीही आकर्षक वाटत असल्या तरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हि मोहीम यशस्वी होईलच याची संपूर्ण खात्री कोणीच देऊ शकत नाही. कुठलाही बिघाड, फेलिक्सच्या हातून घडलेली चूक वा अनपेक्षित आव्हान याची परिणिती सरळ फेलिक्स च्या मृत्यूमध्ये होवू शकते. उदा. वातावरणाचा दाब वा फ्रीफॉल चा वेग फेलिक्सच्या स्पेस सूटला सहन न झाल्यास फेलिक्सच्या शरीरातील रक्त व इतर द्रव्यात अत्यंत धोकादायक बुडबुडे निर्माण होवू शकतात किंवा मेंदूचाही स्फोट होवू शकतो. अर्थात असे होवू नये म्हणून फेलिक्स व त्याच्या टीमने जवळ जवळ तीन वर्षे राबून मोहिमेची आखणी केली आहे व कमी उंचीच्या दोन चाचण्याही केल्या आहेत. पण एवढ्या उंचीवरून हि पहिलीच उडी असणार असल्याने सर्वच बाबी अचूक असतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही.

प्रोजेक्ट स्ट्रॅटोस

फेलिक्स ने आजवर पार पाडलेल्या मोहिमांपैकी काही मोहिमा पाहिल्यास आपल्यालाही या मोहिमेच्या आश्वासकतेबाबत अधिक विश्वास वाटेल.

१. पेट्रोनस टॉवर्स, कौलालंपूर व तायपेयी १०१, तैवान अश्या अती - उंच इमारतींवरून यशस्वी बेस जंपिंग

२. ओमान मधील एक कमी व्यासाची दरी व ब्राझील मधील ख्रिस्ताच्या पुतळ्यावरून बेस जंपिंग

३. विमानातून उडी मारून ब्रिटिश खाडीवरून कार्बन फायबर विंग्ज (हे पॉवर विंग्ज नाहियेत) च्या साहाय्याने ३५ किमीची ब्रिटिश खाडी पार करणे.

४. सध्याच्या मोहिमेसाठीच्या चाचण्यांसाठी प्रथम ७१,५८१ व नंतर ९६,६४० फूट उंचीवरून यशस्वी स्काय डाइव्ह केले आहे. त्यात आज वापरली जाणारीच उपकरणे वापरली गेली होती.

या मोहिमेमागे वर्षानुवर्षांची अवघड तपस्या आहे. फेलिक्स व त्याच्या टीमचे अनेक महिन्यांपासून दिवस रात्र सुरू असलेले परिश्रम आहेत. अन जगभरातील चाहत्यांचा सदिच्छा आहेत. चला तर मग आपणही या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करूया.

या मोहिमेचे आंतरजालावर व जगातील अनेक देशांतील वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

स्रोत - प्रोजेक्ट स्ट्रॅटोस चे संस्थळ, विकी व जालावरील बातम्या.

सर्व माहिती व चित्रे जालावरून साभार.

प्रोजेक्ट स्ट्रॅटोसचा दुवा - रेड बुल स्ट्रॅटोस;  यावर उलटगणतीचे घड्याळ सुरू आहे.

बातम्या - , ,

चित्रफीत - फेलिक्सचे निवडक कारनामे.

अवांतर -

१) हॉट एअर बलूनने सर्वोच्च उंची गाठण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर आहे. रेमंड कंपनीचे संस्थापक श्री विजयपत सिंघानिया यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये ६९००० फुटांची उंची गाठली होती.

२) शीतल महाजन यांनी उत्तर व दक्षिण धृवावर यशस्वी पॅरा जंपिंग करण्याचा विक्रम केला आहे. गैर-व्यावसायिक गटात मोडणाऱ्या एकाच स्त्रीने या दोन्ही मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडणे हाही एक विक्रम आहे.

टिप: या मोहिमेस भारतीय प्रसारमाध्यमांनी विशेष प्रतिसाद न दिल्याने मराठी आंतरजालाच्या वाचकांसाठी हा लेखनप्रपंच ऐन वेळी हाती घेतलाय. वर लिहिलेली सर्व माहिती व तिचे विश्लेषण अचूक असेलच याची खात्री प्रस्तुत लेखक देऊ शकत नाही.