ऑक्टोबर २५ २०१२

संवेदना ज्योत

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, नाव कमवावे असे वाटत असते आणि असे सामान्यतः घडतही असते. पण ज्योतीताईंच्या बाबतीत उलटे झाले. दीपाने आपली आई, ज्योतीताईंना शिकविले ते मोठे होण्यासाठी किंवा नाव कमाविण्यासाठी नाहीतर त्यांना त्यांच्या नातवाला योग्य प्रकारे शिकविता येण्यासाठी. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या वेळेला त्या वयाच्या अश्या टप्प्यावर होत्या की पूर्वीच्या बायकांप्रमाणे हातात जपमाळ ओढत रामराम करत बसण्याच्या किंवा आजच्या काळाप्रमाणे भिशी पार्ट्या, महिला मंडळ किंवा आपले छंद जोपासण्याच्या. ज्योतीताईंचे सुखी चौकोनी कुटुंब. सचिन व दिपा अपत्ये. दिपा शिकली यथावकाश तिचे लग्न झाले अन अमेरिकेला गेली. सचिनही शिकला त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याचेही लग्न झाले. गोड, गुणी सून मुलीची उणीव भरून काढायला घरी आली. ज्योतीताईंना व रमेशकाकांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा सुखद निःश्वास सोडला. दोघही आपापले छंद जोपासायला मोकळे झाले होते. ज्योतीताई ग्राहक पंचायतीच्या कामात सक्रिय होत्या. गाण्याची आवडही होती, त्यातही त्यांचे मन रमत होतं. काका दासबोध परीक्षेच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे एकटेपण, रितेपण जाणवायला दोघांजवळ वेळच नव्हता. त्यातच नवीन पाहुण्याची चाहूलही लागली. सगळं कसं दृष्ट लागेल असं.... आणि खरंच दृष्ट लागली. कांचनाला आठवा महिना लागला सोनोग्राफी केली त्यात त्याला ट्युबोरक्योरासिस आजार असल्याचं कळलं. अपंग नातू स्वीकारायची तयारी त्यांनी केली होती पण नंतर तो आजार मेंदूपर्यंत गेल्याचंही कळलं. जे वाट्याला येईल ते स्वीकारायचं ठरवलं म्हणण्या पेक्षा दुसरा पर्यायही नव्हता. १३ फेब्रुवारी १९९९रोजी यशचा जन्म झाला. तज्ज्ञ डॉक्टर मंडळी पालथी घालून झाली. ठोस इलाज नव्हता. लहानग्या जीवाला भरमसाठ अँटीबॉयाटिक्स, स्टीरॉईड्सचा मारा होत होता. सात महिन्यांचा यश औषधांमुळे झोपलेलाच असायचा. प्रगती शून्य. शेवटी अ‍ॅलोपॅथीचे उपचार थांबवले व आयुर्वेदाचा आसरा घेतला. नागपुरातले नामवंत आयुर्वेदाचार्य दादा धर्माधिकारींचे उपचार सुरू केले. बरीच सुधारणा दिसू लागली होती अन एक दिवस चमत्कारच झाला, अचानक दीड वर्षाचा यश अंथरुणातून उठला आणि धावायलाच लागला. आशेला नवी पालवी फुटली. पण... वयोवृद्ध दादा निवर्तले. उपचार व प्रगती थांबली. आज जी काय यशमध्ये प्रगती आहे त्याचे श्रेय दादांनाच. यश चार वर्षाचा झाल्यावर तो स्वमग्न असल्याचं लक्षात आलं. ज्योतीताई स्वतः पंचेचाळीस वर्षापूर्वीच्या मानसशास्त्रातल्या पदवीधर असून सुद्धा ह्या विकाराविषयी अनभिज्ञ होत्या. ऑटीझममधलं 'अ' माहीत नव्हतं. त्यानंतर सुरू झालं स्वमग्नतेबद्दलची माहिती गोळा करणं, वाचन व उपचार. वेगवेगळ्या उपचारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जावं लागायचं; त्यासाठी वेळ, श्रम व बराच खर्च लागायचा. समुपदेशन, व्यायाम, शिक्षण अश्या सगळ्या सोयी एकाच ठिकाणी मिळाल्या तर मुलांच्या आणि पालकांच्या दृष्टीने सोयीचं होतं. जश्या नागपुरात मतिमंद, अंध, कर्णबधिर मुलांसाठी शाळा आहे तश्या प्रकारची स्वमग्न मुलांसाठी संपूर्ण विदर्भात एकही शाळा नाही. स्वतः काढायची हिंमत होत नव्हती. एवढी मोठी जबाबदारी झेपेल की नाही शंका होती. जवळ जागा, पैसा, शिक्षण काहीच नव्हते. यशला मतिमंद शाळेत घातलं. तीन तास मतिमंद शाळेत नेऊन आणले की काम संपले. पण ह्या मुलांसाठी वेगळ्या शाळेची गरज तीव्रतेने जाणवत होती.

दीपाच्या बाळंतपणासाठी त्या अमेरिकेला गेल्या होत्या. दीपाने सुचवलं की सहा महिने इथे राहणार आहेस तर पत्राद्वारे हा अभ्यासक्रम शिकून घे. ह्या वयात शिकणे कठीण वाटत होते तसेच खर्चिकही होते. पण नातवाबरोबर अश्या इतरही मुलांसाठी शास्त्रशुद्ध शिक्षणाचा उपयोग होईल असा विचार करून त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना तिथल्या स्वमग्न मुलांसाठीच्या शाळा बघता आल्या. अमेरिकेतल्या शाळा सर्व सोयींयुक्त अश्या सुसज्ज शाळा आहेत. अमेरिकेत सरकार ह्या शाळा चालवतात. तज्ज्ञ मंडळी सर्व चाचण्या घेऊन मुलांसाठी योग्य शाळा ठरवतात. काही स्वमग्न मुलं सामान्य शाळेतही शिकतात किंवा काही दिवस खास शाळेत शिकून, त्यांची प्रगती बघून सामान्य शाळेतही शिकतात. शेवटी अमेरिका ती अमेरिकाच! हे सगळं तिथल्या पध्द्तीचं नाही पण काही प्रमाणात इथे करता येईल असा विश्वास त्यांना वाटायला लागला. वाटणं ते कृती ह्यामध्ये दोन वर्षं गेली. मुलांमध्ये स्वमग्नते बरोबरच इतरही काही व्यंग, व्याधिग्रस्तता असते. एका मुलाच्या पाठी एक शिक्षक लागतो. त्यांना शिकवण्यासाठी भरपूर साधन-सामुग्री लागते. खास प्रशिक्षित शिक्षक लागतात. ही सगळी जुळवा जुळव करणे अवघड वाटत होते पण अशक्यही नव्हते. शेवटी दोनहजार सहामध्ये ज्योतीताईंनी आपले मेहुणे, हवाई दलातील निवृत्त अधिकारी श्री जोशींच्या मदतीने स्वखर्चाने 'संवेदना - स्वमग्न मुलांची शाळा' सुरू केली. एक वर्षाकरिता अंध विद्यालयाने जागा दिली. सुरुवातीला सोळा मुले होती. वर्ष निभावून नेलं. दुसर्‍या वर्षी पांडे लेआऊटला एका बालवाडीमध्ये शाळा सुरू केली. जागा अपुरी व अडचणीची असल्यामुळे तिही जागा सोडावी लागली. शेवटी महानगरपालिकेने ही रामदापेठेतील जागा सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिली. सुरवातीला तर फक्त दोनच खोल्या दिल्या होत्या आता पाच खोल्या आहेत पण काही खोल्या शिकवणी वर्गाला दिल्यामुळे दररोज शाळा सुटल्यानंतर सामानाची हलवाहलव करावी लागते. आज चार ते सोळा वयोगटातील मुलांची संख्या पस्तीस आहे. संभाषण तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, मनोविकार तज्ज्ञ अक्युपेशनल थेरपिस्ट अशी तज्ज्ञ मंडळी मदतीला आहेत. कांचनानेही (यशची आई) पत्राद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ती मुलांना संगणक शिकवते व व्यावसायिक शिक्षणही देते.

इथे प्रत्येक मुलासाठी वेगळा अभ्यासक्रम असतो. प्रत्येकासाठी वेगळी उद्द्यीष्ठे, ध्येय असतात. मुख्य उद्द्येश म्हणजे त्यांना स्वावलंबी, शारीरिकरीत्या सक्षम बनवणे. बहुतेक मुलांमध्ये संभाषण क्षमता नसते, विचार करू शकत नाही. पण अपवाद म्हणता येईल तर तो आदित्यचा! तेरा वर्षाचा आदित्य सामान्य शाळेतून ह्या वर्षी इथे आला. तो संभाषण करू शकत असल्यामुळे त्याचं निदान लवकर झालं नाही. तो विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो; त्याचं पाठांतर चांगलं आहे, थोड्याफार प्रमाणात सामान्य ज्ञानही आहे. ह्या मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही त्यांना समजून घेणे कठीण असते. कोणाचं कधी, कशावरून बिनसेल समजत नाही. त्यांची भाषा खूप विकसीत होऊ शकत नाही. वाक्य ही एका शब्दाचीच असावी लागतात. 'चल करूया' असे शिक्षिकेने म्हटले तर मुलं गोंधळून जातात, चालायचं की करायचं हे त्यांना समजत नाही. तीच तीच गोष्ट अनेकवेळा करून घेतली की मात्र ती त्यांच्या डोक्यात इतकी फिट्ट बसते की मग त्यात ते चुका करत नाही. अचूकता ही एक त्यांना मिळालेली देणगीच आहे. मण्यांच्या माळा करायला मणी वाट्यांमध्ये क्रमाने लावून दिले तर उत्तम माळा बनवतात. माळा, कागदी पिशव्या, भेटकार्ड, लिफाफे अश्या काही वस्तू त्यांच्याकडून बनवून घेतात व त्या विक्रीस ठेवतात. जुजबी गणित शिकवतात. कॅलक्युलेटरवर एक अंकी बेरीज वजाबाकी शिकवतात. काही मुलं संगणक शिकू शकतात. यंत्रवत कामे उत्तम प्रकारे करू शकतात. झेरॉक्स काढण्यासारखी काही यंत्रवत कामे त्यांच्याकडून करून घेऊन काही प्रमाणात अर्थाजन करू शकतात पण अर्थात कोणाच्या तरी मदतीनेच. नाच, गाणेही, हस्तकला असे विषयही शिकवतात. वर्षातून एकदा जवळपासच्या ठिकाणी सहल काढतात पण त्यासाठी त्यांची मानसिक तयारी खूप आधीपासून करून घ्यावी लागते; तसेच वार्षिकोत्सवाची पण. नाच-गाण्यासाठी वेगळे कपडे घालायचे असल्यास त्यांना ते अनेकवेळा दाखवून, घालून, सांगून ठेवावं लागतं. त्यांची बदल स्वीकारायची तयारी नसते.

ह्या मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. एकदा जे तुमच्या समोर आलंय ते जर का स्वीकारलं तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात पण 'स्वीकार' करणं हेच मोठं अवघड आहे. आज त्या जे काही करत आहेत ते पालकांच्या मदतीशिवाय शक्य नाही. स्वमदत गट तयार केला आहे. आजकालच्या स्वतंत्र कुटुंबात मुलांना वाढवणं कठीण जातं त्यामुळे स्वमदत गटाचा फायदा होतो. जे शाळेत येऊ शकत किंवा जिथे शाळा नाहीत अश्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्या अभ्यासक्रम बनवून देतात व वेळोवेळी मार्गदर्शनही करतात. ज्योतीताईंच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं सहकार्य असल्यामुळे त्या आज हे करू शकतात. त्यांचे यजमान रमेशकाका हिशोबाचं कामं चोखपणे करत असतात.

ज्या दिवशी शाळा काढली त्या दिवसापासून अडचणी पाठपुरावा करत आहे. त्यावर मात करतच त्या पुढे जात आहोत. भारतात यच्चयावत साधनसामग्री उपलब्ध नाही. भारतीय भाषांमध्ये मार्गदर्शक पुस्तकं उपलब्ध नाही. मुख्य अडचण आहे ती आर्थिकच. मुलांची फी व देणगी ह्यातूनच खर्च भागवावा लागतो. चॅरिटी कमिशनरकडे किंवा समाज कल्याण खात्याकडे अनुदानासाठी अर्ज करावा म्हटलं तर नियम अन कायदेकानूनंच खूप असतात त्याची पूर्तता करायलाही पैसाच (टेबलाखालचा) लागतो, तो अव्वाच्या सव्वा मागतात तो आणायचा कुठून? अन दुसरे म्हणजे मुलांच्या चाचण्या घेऊन जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍याचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं त्यासाठी पालक तयार होत नाहीत. अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता असणे स्वाभाविकच आहे त्यामुळे ते शिक्षणावर इतका पैसा खर्च करू इच्छित नाही. ज्योतीताईंच्या भविष्याच्या खूप काही मोठ्या योजना नाहीयेत पण ह्याच शाळेला सुसज्ज, सर्व सोयींयुक्त बनवण्याची इच्छा आहे.

ज्योतीताईंनी 'संवेदना' ज्योत पेटवली आहे ती तेवत राहो!

'खूप खूप शुभेच्छा'

Post to Feed"ज्योती" कलश छलके!
सलाम!
सहमत आहे
धन्यवाद!
स्फूर्तिदायक
सलाम

Typing help hide