चालले ते ठीक आहे! छान आहे!

गझल
चालले ते ठीक आहे! छान आहे!
आज जगण्याचे तरी मज भान आहे!!

पावती अध्यापनाची हीच आहे!
आज विद्यार्थ्यांत माझा मान आहे!!

हे न विद्यार्थी, अरे, माझी मुले ही....
जाणतो मी काय माझे स्थान आहे!

एवढी टीका, टवाळी ऐकली की,
जाहला तैय्यार माझा कान आहे!

थोर जे होते खरे ते गप्प होते.....
थोर लोकांचा कुठे सन्मान आहे?

लोकहो! बसवू नका मखरात मजला;
एक मी तुमच्यातला इन्सान आहे!

हा भले सत्तेत...तो आता विरोधी....
आतुनी त्यांचे जुने संधान आहे!

व्याप पाठीशी तरी लिहितोच गझला!
छंद जपण्याचे मला व्यवधान आहे!!

ही प्रशंसा ना कुण्याही कामिनीची;
ईश्वराचे हे सरळ गुणगान आहे!

दाखवू कोठून आता स्वामिनिष्ठा?
दाखवाया फक्त येथे श्वान आहे!

खायला उठते महागाई अम्हाला!
दोन वेळा जेवणे आव्हान आहे!!

कोणत्याही पिंजऱ्याचे भय न मजला;
मज भरारी घ्यायचे वरदान आहे!

आजवर मी फक्त डोळेझाक केली!
पाहिले ना मान की, अवमान आहे!

कोण मी? कोठून आलो? अन् कसा मी?
एक मी अद्यापही अनुमान आहे!

माझियासम फक्त येथे मीच आहे!
मीच उपमा, मीच अन् उपमान आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
 भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
  नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
  फोन नंबर: ९८२२७८४९६१