चेहऱ्यावर लावणारे चेहरे करतात शिमगा!

मायबोलीवरील सुप्रसिद्ध, व्यासंगी, गझलअभ्यासक व गझलअभ्यस्त आदरणीय श्री. प्रसादपंत यांच्या  आग्रहाखातर ही "शिमग्याची गझल" खास, त्यांना आमचेकडून विनम्रपणे अर्पण........
 गझल

चेहऱ्यावर लावणारे चेहरे करतात शिमगा!
कोणताही सण असू द्या, साजरे करतात शिमगा!!

ईद, होळी, वा दिवाळी, वा असो ख्रिस्मस कुणाचा.....
राज्यकर्ते मात्र सारे साजरे करतात शिमगा!

हा कसा गोतावळा? अन् कोणती नाती म्हणवी?
पाठ फिरली की, अचानक सोयरे करतात शिमगा!

ही घरे की, कोंडवाडे? माणसे की, मूक ढोरे?
स्वस्तघरकुल योजनांचे पिंजरे करतात शिमगा!

चार दिवसांची दिवाळी, थाटलेली रोषणाई.....
एरव्ही अंधारलेले कोपरे करतात शिमगा!

स्वप्न घर बांधावयाचे पाहताना प्राण गेले....
आजही पश्चात त्यांच्या चौथरे करतात शिमगा!

पोट गेलेले खपाटी....आड ते ओसाड पडले!
पावसाचे चिन्ह नाही...पोहरे करतात शिमगा!!

आज बोंबाबोंब नाही अन्नवस्त्राचीच नुसती;
राहण्याची सोय नाही, आसरे करतात शिमगा!

संकुलांची जंगले शहरामधे या फार झाली....
आज वनराई न कोठे, पाखरे करतात शिमगा!

वेषभूषा, केशभूषा या पिढीची और आहे!
कोण घेतो आज गजरे? मोगरे करतात शिमगा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१