चेहरा भलताच माझा बोलका!

गझल
चेहरा भलताच माझा बोलका!
त्यामुळे ठेचाळतो मी नेमका!!

कान भिंतींना असे लावू नका....
यायाचा ऐकू न माझा हुंदका!

मीच माझी साथ जेव्हा सोडली.....
त्याच वेळी जाहलो मी पोरका!

हे असे कुठवर, किती शिवणार तू?
मी असा हा जागजागी फाटका!

ते मला धरुनीच होते या मुळे....
वाटलो त्यांना जणू मी ओंडका!

वेदना जळण्यातली कळते  चिते!
पोळलो मीही न थोडा थोडका!!

ते खडा समजून मजला फेकती....
मी हिरा साक्षात होतो वेचका!

याचसाठी मी नकोसा जाहलो....
मीच त्यांच्यातील होतो नेटका!

व्हायला सावध इशाऱ्यांनी मुक्या;
मी तुझ्या इतका कुठे रे बेरका?

थांग गझलेचा मला लागायला....
कैक जन्मे तू मला देशील का?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१