"पोल स्टार ऑफ द स्टेज ऍंड सिनेमा...."

श्री. विक्रम चंद्रकांत गोखले....

असे एक नाव की जे उच्चारताना वा लिहिताना वा ऐकताना अशी भावना होते की
जणू काही आपण काहीतरी विलक्षण आणि हवेहवेसे चित्र नजरेसमोर आणीत आहोत.
आजच्या तारखेला जवळपास चाळीस वर्षे पूर्ण होतील विक्रमजींच्या नाट्य आणि
सिनेप्रवासाला. इतक्या प्रदीर्घ प्रवासाने साकारलेले ते व्यक्तिमत्त्व किती
अनुभवसंपन्न असेल याची सहजी कल्पना या राज्यातील प्रत्येक मराठी माणूस करू
शकेल. "लोकप्रिय अभिनेता, अभिनेत्री" हे बिरुद मिरविणारी डझनांनी
आढळतात....आणि कालौघात लोपही पावतात, पण या क्षेत्रात ज्याला सर्वार्थाने
'आदरणीय' म्हटले जाईल अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे समोर येतील.
पैकी प्रामुख्याने घेतले जाईल ते विक्रम गोखले यांचेच यात दुमत नाही. केवळ
'लिजंडरी अ‍ॅक्टर' अशी त्यांची ओळख करून देणे त्यांच्यावर अन्याय
केल्यासारखे होईल, कारण रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील
'नॉलेजेबल पर्सन' असा त्यांचा उचित उल्लेख केला जातो ते सार्थच आहे.
"हिंदू" या दक्षिणेकडील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या एका अंकात विक्रम
गोखले यांची "पोल स्टार ऑफ द स्टेज अ‍ॅन्ड सिनेमा" असा समर्पक उल्लेख झाला
होता.... [मराठीतील कोणत्याच माध्यमाने त्यांना अशा रीतीने गौरविले
नसेल....इतकी दरिद्रता आमच्याकडे निश्चितच आहे म्हणा.]

कै.चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या घरी जन्माला
आलेल्या विक्रमजींनी जशी वडिलांच्या कारकीर्दीची स्फूर्ती घेतली तद्वतच
विजया मेहता यांचेही त्यांनी शिष्यत्व पत्करले होते. या लेखात विक्रम गोखले
यांच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील वाटचालीचा किंवा रंगभूमीवरील
भूमिकांचा उल्लेख करण्याची आवश्यकता बिलकूल नाही, कारण इथल्या प्रत्येक
सदस्याला 'विक्रम गोखले' यांची ती वाटचाल नक्कीच माहीत आहे, इतके हे नाव
"घरचे" झाले आहे.

"मी भला आणि माझे काम भले...." ही भूमिका कधीच विक्रमजीनी घेतलेली नाही.
रंगभूमी असो वा चित्रपट वा टेलिव्हिजनचे विश्व....नवख्या मुलामुलींना तसेच
या क्षेत्रात पडद्यामागे धडपड करणार्‍या तंत्रज्ञांसाठी विक्रम गोखले
म्हणजे एक इन्स्टिट्यूटच बनले आहे. या सर्व उदयोन्मुख कलाकारांसाठी ते 'सर'
झाले आहेत. मार्गदर्शनाचा हा वारसा विक्रमजींना जसा कै.चंद्रकांत गोखले
यांच्याकडून मिळाला तसाच 'गोखले' घराण्याचे चित्रपट माध्यमाशी असलेल्या
अजोड नात्याकडूनही. विक्रमजी यांच्या आजी कमलाबाई गोखले तर
चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालकलाकार या नात्याने चित्रपट इतिहासात नोंदल्या
गेल्या आहेत. दादासाहेब फाळके यानी ते कार्य केले होते....तोच वारसा
चंद्रकांत गोखले आणि त्यानंतर विक्रमजीना लाभला आहे हे नक्की.

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील 'संसार' सांभाळून विक्रमजी सामाजिक
कार्यापासूनही कधीच दूर राहिलेले नाहीत. वडिलांनी अपंग सैनिकांसाठी
चालविलेल्या मदतनिधीचे कार्य असो वा कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी तसेच अनाथ
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असो.... गोखले कुटुंबियांनी स्थापन केलेल्या
घरगुती निधीतून गेली २५ वर्षे मदत जात आहे, अन् तेही कसलाही गाजावाजा न
करता.

आज या लेखाचे प्रयोजन म्हणजे काल जाहीर झालेल्या ६० व्या राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कारात श्री.विक्रम गोखले याना 'अनुमती' या गजेन्द्र अहिरे
दिग्दर्शित चित्रपटातील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या' चा पुरस्कार
प्राप्त झाला आहे.....

मनःपूर्वक अभिनंदन विक्रमजी.

[यंदा मराठी कलाकारांनी पुरस्कारात आघाडी मारलेली दिसत्ये हादेखील एक
आगळा आनंद आहेच..... सुदैव म्हणावे लागेल आमचे की हे चित्रपट आम्हाला
पाहायला मिळतील.]