नाच रे पोरा ! (प्रस्तावित आत्मचरित्राची प्रस्तावना )

    अनेक स्त्रीलेखिकांनी लिहिलेली आत्मचरित्रे आमच्या वाचनात आली.त्यातील "रमाबाई रानडे यांच्या "आमच्या आयुष्यातील काही आठवणी" सोडल्यास अगदी लक्ष्मीबाई टिळकांचे "स्मृतिचित्रे"’ काय सुनीताबाईंचे "आहे मनोहर--" काय किंवा  कमल पाध्ये यांचे "बंधअनुबंध" काय  सर्वानी त्यांच्या पुरुषोत्तमांवर अगदी संधी मिळेल तेथे टीका केली आहे असे दिसते.इतकेच काय काही लेखिकांनी तर त्या एकमेव कारणासाठीच आत्मवृत्त लिहिण्याचा घाट घातला असावा असे आमचे प्रामाणिक मत झाले.अगदी अलीकडे "नाच गं घुमा " हे माधवी देसाई यांचे आत्मवृत्त वाचल्यावर तर आता मात्र  आपणही लेखणी हातात धरून त्यांच्या तोडीस तोड असे आमच्या काळातील पुरुषांचे एक प्रातिनिधिक आत्मचरित्र (म्हणजेच आमचे स्वत:चे)आपण का लिहू नये असे वाटलेच व " नाच ग घुमा "च्याच चालीत बसेल असे  "नाच रे पोरा " असे शीर्षकही त्याबरोबर सुचले.कारण पुरुषाच्या जन्माला आल्यापासून " ऊठ रे पोरा बस रे पोरा "असेच शब्द ऐकण्याची आमच्या पिढीला संवय. मात्र लग्न झाल्यावर तरी आपण कुणाला तरी हुकूम फर्मावू शकू अशा गोड स्वप्नात राहिलेल्या आमची खरी दुर्दशा गळ्यात माळ पडल्यापासूनच सुरू झाली याची जाणीव व्हायला लागली आणि आपल्या लग्ना अगोदरच्या "नाच रे पोरा " या अवस्थेत फारसा बदल झाला आहे असे वाटले नाही, उलट लहानपणी हात पाय आपटून, त्रागा करून सांगितलेले न ऐकण्याची थोडीफार असलेली मुभाही आता राहिली नाही अशी जाणीव झाल्यामुळे त्याच तालावर या प्रातिनिधिक आत्मचरित्रास " नाच रे पोरा (की पोऱ्या?)" (त्यातले बायकोच्या तालावर हे अध्याहृत), असे नाव शोभून दिसेल असे आम्हाला वाटते. तसेही पोरगा कितीही आईची आज्ञा पाळत असला तरी लग्न झाले की "लागला नाचायला आपल्या बायकोच्या तालावर" हा ताशेरा त्याला ऐकावा लागतोच आणि तेही जिने त्याच्याच बापाला आपल्या तालावर नाचवलेले असते त्याच आईकडून ! त्याही दृष्टीने हे नाव समर्पक राहील असे वाटते. 
     आजच्या म्हणजे आमच्या  पुढच्या पिढीतल्या पुरुषांच्या बाबतीत लग्नाअगोदरच्या आत्मवृत्तात थोडाबहुत बदल असेलही कारण अगदी दोनच पोरे असल्यावर, फार नसली तरी थोड्यातरी लाडाची असल्यामुळे अगदीच ऊठ रे पोरा  किंवा बस रे पोरा  म्हणण्याइतके त्यांचे अवमूल्यन झालेले नसते.(उलट आजकाल कधीकधी बापालाच ती ऊठ रे बाबा, बस रे बाबा असे  म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही).पण लग्नानंतर मात्र त्यांची अवस्था आमच्याही पेक्षा बदतर होत असते म्हणजे आमच्या काळात  "अहो " हे बहुमानात्मक पण ज्याच्या उच्चारणात मानापेक्षा अवमानाचाच अधिक समावेश असतो असे संबोधन तरी वापरले जात होते तेही आता गायब झाले आहे.कोठे ते माधवराव रानड्यांच्या काळातील अगदी नाजुक आणि ऐकू येईल न येईल इतक्या हलक्या आवाजात उच्चारलेले  "स्वत:"  आणि कोठे अंगावर काटा येईल अश्या स्वरात मारलेली आजची एकेरी हाक !
    मुलगी पहायला जातानाच मला मित्रांनी बजावून सांगितले होते ,की जरा खडसावून प्रश्न विचार. काय प्रश्न विचारायचे ते नव्हते सांगितले, पण त्यांना वाटले की याला आयत्या वेळी सुचेल काही तरी म्हणून.कारण नाही म्हटले तरी विद्यार्थ्यांच्या  मौखिक परीक्षेत प्रश्न  विचारण्याचा  आमचा दांडगाच अनुभव, तो थोडाच असा वाया जाणार? पण कसले काय मौखिक परीक्षेत मुले जशी उत्तर  न देता गप्पच बसतात तोच  अनुभव येथेही आला पण कारण मात्र वेगळे. कारण मुलीचा बाप असला खट की मुलीला कोणताही प्रश्न विचारला की मधल्यामध्ये  झेलायचा आणि उत्तर तोच द्यायचा आणि ती मात्र गालातल्या गालात हसून आमची होणारी फजिती पहायची.त्यामुळे मुलगी पहायचा सोहळा तिच्या तोंडून आम्ही काहीही उत्तर न ऐकताच पार पडला. बरं बरोबर आलेला स्थानिक मित्रही इतका शहाणा की तिच्या त्या हसण्याला उद्देशून "तुझ्याकडे पाहून मुलगी अगदी गोड हसत होती " असे माझ्या मनात भरवू लागला.म्हणजे माझ्या होणाऱ्या फजितीला ती हसत होती, तर हा शहाणा म्हणतोय,की ती माझ्याकडे पाहून गोड हसत होती.आता आम्हीही इतके बुद्धू की त्याचेच म्हणणे खरे मानून अरे,खरच गोड हसत होती की, म्हणून त्या गोड हास्यालाच"सुहास्य तुझे मनास मोही"म्हणत अशी गोड हसणारी मुलगी कुणाला आवडणार नाही ?" असा प्रश्नार्थी होकार तिच्या बापाला देऊन बसलो. त्यावर आमच्या होऊ घातलेल्या सासऱ्यांनीही "तशी आणखी बऱ्याच जणांना  आवडली होती पण तिचं भाग्य थोर (इथं खरं तर तुमचं भाग्य असं त्यांना म्हणायचं असावं) म्हणून तुमच्या पदरात पडली (की मी तिच्या पदरात?)असे आमच्या कानावर घालून आमच्या होकाराचे सार्थक केले.  तिचे ते गोड हसणे नंतर कधीच मला पहायला मिळाले नाही. उलट त्या गोड हसण्याचा अर्थ मी तिला आवडलो असा जो मी घेतला होता तोमात्र  तद्दन चुकीचा होता हेच ती मला पुढे आयुष्यभर बजावत राहिली. 
      थोडक्यात काय माझा स्वप्नाळूपणाच मला नडला आणि "नवरंग" मध्ये कविराज आपल्या बायकोसच जसा मोहिनी समजत होता तसे समजण्याचा मी अट्टाहास करत होतो.तर ती मात्र हवेत तरंगणारे माझे विमान  लगोलग खाली आणत होती. आमचे लग्न टिकण्याचे ते एक महत्त्वाचे कारण असावे. आता ते विमान तरंगण्याचे दिवस गेले, आता ते लॅंड होऊन खुरडत खुरडत चालले आहे, Opposite poles attract each other असे म्हणतात आता attract राहिले, निदान attach तरी म्हणता येईल असे वाटले होते पण ते चक्क attack मध्ये रूपांतरित कसे झाले कळत नाही.
        खरे तर मुलगी पहायला जाताना असलेला ,निदान त्यावेळी तरी असलेला, नकाराधिकाराचा पर्याय एकदा तरी मी वापरून बघायला हवा होता असे सर्वांचेच मत पडले.आमच्या मातोश्रीही म्हणाल्या "कसला आमचा बंड्या, बघितली पहिलीच मुलगी आणि बसला तिलाच होकार देऊन." आमच्या बहिणींनी तर किती मनोरथ केले होते की येणाऱ्या मुलीला असे प्रश्न विचारीन,आणि तसे प्रश्न विचारीन आणि झाले  भलतेच म्हणजे त्यांचा भाऊराया मुलीच्याच गावी जाऊन मुलगी बघून काय आला आणि वर होकारही काय दिला.अरेरे  ठरवलेले सगळे मुसळ अगदी केरात गेले. त्याना म्हणे डॉक्टर मुलगी हवी होती (कशाला ?लग्न म्हणजे काय ऑपरेशन वगैरे वाटले की काय?).आणि गोरीपान ,लांबसडक केस असलेले वगैरे वगैरे वर्णनाची आणि मीतर या वर्णनापैकी कोठल्याच गोष्टीकडे लक्ष न दिलेले. यावर ही गोष्ट मी तिला सांगण्याचा मूर्खपणा केल्यावर ती म्हणते"अगोदर आरशात पहा आणि मग माझ्यासारखी तरी मिळाली हे नशीब समजा."
     मी तिला पसंत करण्याचे  एकमेव कारण म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नास उत्तर न देता गप्प बसली हेच.अशी गप्प बसणारी मुलगी लग्नानंतरही तशीच राहील आणि मी जे काय बोलेन ते मला उलट न बोलता ऐकून घेईल,म्हणजे थोडक्यात माझ्या तालावर नाचेल अशी त्यावेळी झालेली खुळी कल्पना ,पण कसचे काय तिला पसंत करून निघाल्यावर बसस्टँडवर आमचे भावी सासरेबुवा,सासूमाय आणि आमचे भावी कलत्र आम्हाला सोडायला आलेले.मी बसस्टॅंडवरच्या (त्यावेळी कळकट्ट बाक असत) बाकावर जरा आरामात पाय पसरून बसलो तर एकदम समोरून सूचना आली,"अहो जरा नीट बसाना " आम्हाला शिस्त लावायला आतापासूनच सुरवात झाली होती तर.
     लग्न ठरून प्रत्यक्ष होण्यापूर्वीच तिनं अशी दादागिरी सुरू केली की, लग्न होण्यापूर्वीच मला घटस्फोट घ्यावा लागून या बाबतीत माझी पी.जी.वुडहाउसच्या बर्टी (बर्ट्रॅम वुस्टर ) सारखीच गत  होते की काय असे मला वाटू लागले .पण या बर्टीला bachelorच रहाण्याचीच हौस होती आणि त्यामुळे तो स्वत:स confirmed bachelor म्हणवून घेई. अनेक वेळा त्याला एकाद्या मुलीने गंडवले असे पी.जी.ने दाखवल्यावर वाचक मनातल्या मनात "अरे हा गटला रे गटला" असे म्हणेपर्यंत काहीतरी हास्यास्पद भानगड होऊन त्या दोघांचे फाटते. या बर्टीला त्याचा डोकेबाज बटलर जीवज् इतके सल्ले किंवा सूचना देत असतो की त्यामुळेच बर्टीला सल्ले घेण्यासाठी आणखी एका व्यक्तीची जरुरी नाही, याची खात्री असल्याने  लग्नाची जरुरी वाटत नसते. मलाही खरे तर सल्ले देण्यासाठी आई व बहीण ही जोडगोळी उपस्थित होती पण त्यांच्याच मते त्या काय मला जन्मभर थोड्याच पुरणार आहेत, म्हणून मी लग्न करून घ्यावे हा त्यांचा एकमेव सल्ला मला जन्मभर नडला  
        माझे एक अगदी जवळचे मित्र होते (गेले बिचारे) त्यांच्याकडे मी एकदा म्हटले,"काय रे तुझी ऐट, घरात एकाद्या राजासारखे वागतोस. अगदी चहाचा पेला उचलत नाहीस की पाण्याचा पेला सुद्धा बायकोनेच हातात आणून द्यायचा,त्यावर तो म्हणाला "अरे त्याच्यासाठी लग्नानंतर लगेच मांजर मारावे लागते" "ही मांजर मारायची काय भानगड आहे ?" मी कुतूहलाने  विचारले."अरे त्याची एक गोष्ट आहे."आमच्या मित्राने सुरवात केली,"एका राजाची एक भयंकर तापट मुलगी होती.ज्याच्यात्याच्यावर गुरगुरायची,राजाला काळजी पडली हिचं लग्न कसं होणार.तिची ही कीर्ती ऐकून एक राजपुत्र त्या राजाकडे आला आणि म्हणाला ’मला तुमच्या मुलीशी लग्न करायचेय’ राजाने अगोदरच सांगितले,"बघ बुवा ही पोरगी फारच तापट आहे कधी चिडेल आणि ओरडेल काही सांगता येत नाही.हो उगीच मागून तक्रार नको.तशी ती राजकन्या दिसायला वगैरे बरी होती त्यामुळे हा पठ्ठ्या म्हणाला,करू आपण सरळ तिला.आणि राजाला म्हणाला "आहे माहीत सगळे मला, तरी लग्न तिच्याशीच करायचे ठरवले आहे मी." राजाला काय बरेच झाले. आयता जावई घरी चालून् आला आणि लग्न ठरले आणि झालेसुद्धा.
     त्या काळाप्रमाणे सर्व विधी झाल्यावर पहिल्या रात्रीसाठी जोडपे शयनगृहात शिरले.त्याच्यापाठोपाठ एक मांजरही आत शिरले,त्याबरोबर मोठ्यांदा आवाज करून तो राजपुत्र त्य्च्याव्र ओरडला,"’अरे काळ्या बेट्या,आता आलास ते आलास पण आणखी काही करशील तर खैर नाही तुझी’" पण मांजरास ते कसले कळायला, ते लाडीगोडी लावून बिछान्यातच लागले शिरायला.त्याबरोबर हा राजपुत्र ओरडला,"एकदा सांगून कळत नाही? थांब तुझी खोड मोडतो"म्हणून कमरेची तरवार काढून खाडकन त्या मांजराच्या पाठीत घालून त्याने त्याचे दोन तुकडे करून टाकले,आणि राजकन्येकडं पाहून म्हणतो,"आपलं हे असं आहे सगळं काम,कोणी माझं ऐकलं नाही आणि मला राग आला तर लगेच एक घाव दोन तुकडेच"राजकन्या मनातल्या मनात हबकली आणि तिनं मनात विचार केला, या माणसाचे काही खरे नाही आपण जर काही आगळिक केली आणि हा रागावला तर हा आपलेपण दोन तुकडे करायला मागेपुढे पहाणार नाही.आणि त्यामुळे ती अगदी निमूटपणे त्याच्या तालावर नाचायला लागली.तर अशी आहे ही पहिल्या रात्री मांजर मारण्याची गोष्ट.पहिल्यांदाच बायकोला अशी दहशत घालून ठेवायची की मग पुढे तिनं आपल्या तालावर नाचायलाच पाहिजे."मित्राने समारोप करत म्हटले..
     मित्राने दिलेला हा धडा गिरवण्याचा मी प्रयत्न केला पण झाले मात्र भलतेच. त्याचे काय झाले,माझे वडील भयंकर संतापी म्हणून आम्ही सगळे त्यांच्या धाकात वाढलेलो आणि आई तर काय बिचारी गरीब गाय.वडिलांच्या मनाविरुद्ध काही गोष्ट झाली की ते लगेच जानवे कानाला अडकवून ,तांब्या घेऊन व डोक्याला टापशी गुंडाळून घराबाहेर पडणार.मग आई आम्हा सगळ्यांना म्हणणार "अरे बघा रे जाऊन कोठे गेलेत ते. त्या ह्यांच्याकडे गेले असतील नाहीतर त्या ठिकाणी असतील आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या शोधार्थ बाहेर पडणार.
     दुर्दैवाने आमचे लग्न काही त्यांच्या नजरेसमोर घडायचे नव्हते त्यामुळेच आपल्या लग्नाचा निर्णय आम्हालाच घ्यायला लागला.पण मित्राने सांगितलेली गोष्ट ऐकून वडिलांचा कित्ता तरी आपण गिरवावा म्हणून एकदा माझ्या मनाविरुद्ध बायको वागल्यावर मी घराबाहेर पडून असाच गायब झालो.आई बिचारी, वडिलांचा अनुभव असल्यामुळे माझ्या धाकट्या भावाला म्हणू लागली,"अरे बघ रे तो अण्णा (आता बंड्याचा अण्णा झाला होता) कुठं गेलाय तो" भाऊ बिचारा, आईची आज्ञा पाळण्याच्या तयारीने बाहेर  निघाला तर आमची बायको आपल्या दीराला काय म्हणतेय,"काही कुठ्ठ बघायला जाऊ नकोस, भूक लागली की आपोआप येतील घरी,जाताहेत कुठं" आणि आईला म्हणतीय, 'तुम्हाला काय वाटतेय ते घर सोडून जातील , तसे काही होत नाही " आणि आई आपली बिचारी  "बर बाई, तुझच खरं, आमचं काय राहिलंय आता, आम्हाला  आपलं  वाटलं ते सांगितलं" म्हणून गप्प. आणि खरेच की आम्ही थोडावेळ इकडे तिकडे भटकून शेवटी आलोच घरी.जाणार कुठे आणि किती वेळ ?मग काय "शेवटी आलातच ना घरी जाताय कुठे ?" हे तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला काही फार मोठ्या अनुभवाची जरुरी होती अश्यातला भाग नव्हता. म्हणजे मांजर बिचारं फुकटातच मेल आणि जरब मात्र आमच्या बायकोचीच बसली. अश्या प्रकारे   आमच्या आयुष्यातील समरप्रसंगांचे म्हणजे त्यातील आमच्या पराभवांचे निवेदन म्हणजेच आमचे हे पुस्तक,"नाच रे पोरा (बायकोच्या तालावर)"त्याचीच ही प्रस्तावना, यात आभारप्रदर्शनास वावच नाही आणि अर्पणपत्रिकेविषयी वाचकांना सांगणे आवश्यक आहे का?