कॉलनीत चोरी

रविवारी दार उघडल्या उघडल्या नाडकर्णींना इस्त्रीवाल्याने बातमी दिली,
" रात्री कॉलनीत चोरी झाली."
    बातम्या सांगण्यासाठी त्याची नेमणूक कॉलनीच्या व्यवस्थापनाने केली नव्हती पण एखादी गोष्ट सर्वात आधी आपल्याला कळली आहे, यात जो थरार असतो त्याच्यावर या इस्त्रीवाल्याचे   फार प्रेम होते. किरकोळ बातम्यांसाठी कॉलनीतील छोटी पोरे व मोठ्या बायका होत्या. दणकेबाज बातमीसाठी इस्त्रीवाला स्वयंघोषित बातमीदार होता. इस्त्री कडक करून देता देता तो बातमीही नेमकी करून सांगायचा. 
"कॉलनीच्या ऑफिसमध्ये चोरी झाली. सर्वांना धक्का बसला. तपास सुरु आहे." 
     कॉलनीत चोरी झाली, ही खरोखरीच ब्रेकिंग न्यूज होती. आतापर्यंत असे कधी घडलेच नव्हते. कॉलनी गर्द झाडीत वसलेली होती  त्यामुळे बेकायदा आत शिरणे अवघडच होते. नुकतीच नव्या इमारतीसाठी कॉलनीने जवळची काही जमीन घेतली होती आणि त्यात काही झाडांची छटाई झाली. बंदिस्त कॉलनी मोकळी मोकळी दिसू लागल्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला असावा, असा तर्क होता. 
     सोमवारी ऑफिसमधून येता क्षणी चोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्य सभागृहात संपूर्ण कॉलनी सभासदांची सभा आहे, अशी वर्दी नाडकर्णींना मिळाली. चहा घेऊन ते तिथे पोचले. जोशी, जाधव आणि कांबळे हे तिघे सभासद आधीच हजर झाले होते. हे तिघेही एकाच समस्येसाठी एकत्र आलेले पाहून नाडकर्णींना सखोल समाधान वाटले.
"या नाडकर्णी."
"अजून कोणीच आलेले दिसत नाही."
"बोलवा सगळ्यांना. म्हणावं चोरीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर मते मांडायला काहीच हरकत नाही." जोशी.
" तोवर मी बोलतो. तर मित्रहो..."
" नाडकर्णी, थांबा. तुम्हाला अध्यक्ष व्हायला वेळ आहे अजून." 
"थांबा रे, राजेसाहेब येऊ देत."
सगळ्यांची वचवच सुरु झाली. तेवढ्यात इतर काही सभासदही हजर झाले.
"आले, आले."
 सगळ्यांच्या माना सभागृहाच्या दाराकडे वळल्या. श्री.किनरे कॉलनीत नवीनच आले होते. ‘राजेसाहेब’ शब्दामुळे उठून त्रिवार मुजरा करावा लागतो की काय, असे वाटून ते उभे राहिले. त्यांना जाधवांनी दाबून खाली बसवले.
"उठायची गरज नाही. तोही एक माणूस आहे."
     अध्यक्षमहाराज श्री. इंद्रनील राजे सिंहासनावर विराजमान झाले. मुळातच तुंदिलतनू राजे सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर दुप्पट तुंदिलतनू झालेले होते. ते बसण्यापूर्वी  खुर्ची पूर्ण दिसत असे, बसल्यावर फक्त त्यांची तनूच दिसत असे. राजे हवेतच बसले आहेत की काय, अशी शंका येत असे. त्यांच्यासह सचिव प्रधानही होते. 
     राजेसाहेबांनी आपल्या कॉलनीसाम्राज्याचा आढावा मागील भागापासून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कॉलनीच्या मागील भागापासून. 
     "सभासदहो, अत्यंत धक्कादायक अशी घटना आपल्या सुविचारी कॉलनीत घडलेली आहे. चोरी होईल आणि त्यातही चोरटे असे येतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते."
           अध्यक्षांनी प्रस्तावनेची लवंगी फोडली आणि सगळ्यांचे फटाके फुटू लागले. 
     "पुढून येणार कसे साहेब? तिथे सिक्युरिटी फुल टाईट असते."
     "काय सांगता ? ऑन ड्यूटी ?"
     "अहो, बंदोबस्त चांगला असतो, असे म्हणायचे आहे. पानचटपणा नको."  
     "ठीक आहे. चौकीत तक्रार नोंदवली आहे ना आपण?" 
     "होय साहेब. पोलीस भरपूर चौकशी करत आहेत." प्रधान.
     "कुठे ? 
     "कॉलनीतच."
     " वॉचमनचा जबाब घेतला? काय म्हणतो तो? 
     " तो म्हणतोय, त्याला किंचित आवाज ऐकू आला होता पण नेहमीच असे किंचित आवाज कॉलनीत ऐकू येत असतात."
     " म्हणून त्याने किंचित दुर्लक्ष केले आणि मोठी चोरी झाली.त्याला तंबी देऊन ठेवा. यापुढे असला हलगर्जीपणा झाला तर नोकरीवरून कमी करण्यात येईल. काय काय गेले आहे आपले?"
      " पाच हजाराची कॅश. चार फाईल्स. तीन छोट्या पेट्या. दोन कुलुपे. एक चावी. अर्धे पेन."  
      " अर्धे?" 
      " फक्त रिफिल."   
       "सभासदहो, पोलिसांना आपले काम करतीलच. आपण आपले करूया. यापुढे दक्षता घेतलीच पाहिजे. कॉलनीत प्रथमच चोरी झाल्याने एक इतिहासच घडलेला आहे. या इतिहासाची आपण सुवर्णाक्षरांनी नोंद केली पाहिजे. अशा घटना यापुढे टाळण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पर्यायांवर मी खूप विचार केला. काल संध्याकाळपासून विचार करू लागलो. रात्री  विचारांना वेग आला. सकाळी काही पर्याय नक्की झाले." राजे. 
     " पण साहेब, आमच्याप्रमाणे सकाळीच कळलं होतं ना तुम्हाला चोरीबद्दल ? सकाळपासूनच केला असतात तर आतापर्यंत आणखी विचार झाला असता." 
     "अध्यक्षांचे सगळे काम पध्दतशीर असते. सकाळी त्यांना कळलं. दुपारी रीतीप्रमाणे झोप घेतली. संध्याकाळी विचारांना सुरुवात झाली. रात्रभर विचार पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सभेला हजर."  प्रधान. 
     " अगदी बरोबर. कॉलनीत बॉम्बस्फोट झाला तरी दुपारची झोप झालीच पाहिजे. पध्दतशीर. आपण नाही झोप घेतली तरी पडलेला बॉम्ब काही उलटा परत जाणार नाही." जोशी. 
     " ऐका, ऐका. मधे मधे व्यत्यय नको." देव म्हणाले. 
     " बोला साहेब." स्वर्गे म्हणाले.
     "...तर पर्याय क्र.एक - मागेसुरक्षा व्यवस्था उभी करणे, क्र.दोन - भिंत बांधणे,  
      क्र.तीन - तारेचे कुंपण बांधणे, क्र.चार - पुन्हा झाडे लावणे. 
      पाचवा पर्याय आहे. त्यावर नंतर चर्चा करू.  बोलण्याची संधीच मिळत नाही, अशा तक्रारी मागील सभेत आल्या होत्या. त्यामुळे मी या पर्यायांवर बोलण्यासाठी एकेकाला सांगतो. त्यावर इतरांनी मते द्यावीत. चोरीच्या निमित्ताने कॉलनीत वक्तृत्व फुलत असेल, तर याहून स्वागतार्ह गोष्ट नाही.  पहिला पर्याय कसा वाटतो, सांगा अमृते."          
     " पहिला पर्याय तसा सुयोग्य वाटतो. पण हल्ली हे रखवालदारही भरपूर पगार घेऊ लागले आहेत. त्याचा मुख्य विचार व्हायला पाहिजे. शिवाय, त्यांना भत्ते, सुखसोई हव्या असतात. मी म्हणतो, का घेऊ नयेत ? तीही माणसंच आहेत. त्यांना रखवालदार, गुरखा या नावाने हाक मारलेली चालत नाही, असं मी एक नवीनच ऐकलं आहे. त्यांना ‘सिक्युरिटी’ म्हणावे लागते म्हणे. साहेब, या पर्यायात एक अदृष्य त्रास आहे. अधूनमधून अशा लोकांना डुलक्या लागतात. त्यामुळे ते चांगली कामगिरी करत आहेत की नाहीत, हे पाहायला आणखी एक माणूस नेमायला लागेल. या माणसाच्या पगाराचा निराळा खर्च आहे." 
      " त्या माणसाला तिथे ठेवून नोंदी करायच्या. एक मिनिटाच्या डुलकीला दहा रुपये या दराने पगार कापायचा." किनरे. 
      अध्यक्ष म्हणाले, 
   " समजले. अमृते म्हणतात त्याप्रमाणे, नवीन सुरक्षारक्षकांसाठी कॉलनीकडे बजेट आहे की नाही, पाहावे लागेल. दुसरा पर्याय कॉलनीभोवताली भिंत बांधण्याचा आहे. देवसाहेब, तुम्ही बोला."
   " भिंतीचा पर्याय उत्तम. पण हल्ली बांधायचा खर्च खूप येतो. विटा, सिमेंट फारच महागले आहे. चोर भिंतीवरून उड्या मारूनही येऊ शकतात. त्यामुळे भिंत बांधलीच तर ती भरपूर उंच करणे, हाच उपाय आहे. इतकी उंच की, कॉलनीच दिसेनाशी झाली पाहिजे. त्या भिंतीला त्रिकोनी आकाराच्या काचा अगदी खेटून बसवायच्या. माझ्या मित्राच्या कॉलनीत दोन काचांमध्ये किंचित अंतर राहिले होते तर चोर त्यात पाऊल ठेवून आत घुसले." 
     " देव, भिंती उंच करायच्या ठीक आहे. पण श्वासोच्छवास सुरु राहील ना? " कोणीतरी म्हणाले.
         देव जरा बावचळले.
     " बरं. ठीक ठीक. तिसरा पर्याय तारेचे कुंपण. तुम्ही काय म्हणता स्वर्गे?
     " कुंपण तसं आहेच आपल्या कॉलनीला पण सगळ्या तारा मऊ आहेत. प्रत्येक तारेला टोकं असणं गरजेचं आहे. टोकांमुळेच कुंपण हे कुंपण वाटतं. हवाही खेळती राहील. कोणाला सहजी प्रवेशही मिळणार नाही. भिंतीप्रमाणे चोर कुंपणावरूनही येऊ शकतात. खरं म्हणजे कुंपणावरून नाही; ते दोन तारांच्या मधून घुसतील. भिंत ओलांडण्यापेक्षा तारा वाकवणं कमी त्रासाचं असतं. टोकं इतकी मोठी असली पाहिजेत की टोकं टोकं न वाटता बाण वाटले पाहिजेत.  .....लहानपणी आपणही दुसऱ्यांच्या बंगल्यात असेच तारांमधून जायचो, नाही का?
           सभेत खसखस पिकली. 
     " इथेही खर्चाचा मुद्दा आहेच. भिंत व सिक्युरिटीच्या  तुलनेत जरा कमी खर्च आहे, एवढेच. चौथा पर्याय म्हणजे पुन्हा एकदा भरपूर झाडे लावणे. तुम्ही सांगा जोशी."राजे म्हणाले.
          " एक झाड लावून वाढायला खूप वेळ लागतो. आत्ता लावली तर दोन वर्षांनी उंच आणि मोठी होतील. तोपर्यंत काय? शिवाय, झाडांच्या नुसत्या फांद्या बाजूला केल्या की कोणालाही आत येता येईल. फांद्यांना  टोके नसतात. चोरांना अटकाव करण्यासाठी झाडाबिडांचा उपयोग नाही. लावायचीच असतील तर दक्षिण आफ्रिकेतील जंगलाचा अभ्यास करायला हवा. कोणती झाडे घनदाट होतात, हे त्याच अभ्यासावरून समजेल. तिथल्या काही वेली म्हणे कोणी त्या जंगलात आले की, मुलगी जशी गळ्यात हात टाकते तशा गळ्यात पडतात आणि नंतर गळा आवळतात. एकदम जबरी."
     " काल्पनिक इंग्रजी चित्रपटांचा अभ्यास भारतात उपयोगी नाही, जोशी साहेब. खरोखरी तशी झाडं आहेत का? राजेसाहेब, हा पर्याय काही जबरी होऊ शकत नाही. " श्री.रसाळ म्हणाले.
      " त्यापेक्षा गस्तीचा पर्याय कसा वाटतो?  प्रत्येक कुटुंबातल्या एकेकाने बाहेर पडायचे. महिनाभराची ड्यूटी लावायची. एका गल्लीतल्या आठ जणांनी प्रत्येकी तासभर ड्यूटी केली तरी पुरेसे आहे. रात्री दहापासून सुरुवात करायची. पण मी माझ्या गल्लीत रात्री अकरानंतर उपलब्ध असेन बरं का ! काही झालं तरी मी दहाची क्राईम सीरीअल चुकवत नाही." प्रधान. 
     " कांबळे, तुम्ही या रसाळांच्या सोल्यूशनमध्ये फिट बसता. तसेही तुम्ही रात्री फिरत असता." कोणीतरी सुचवले. 
     " तो मुद्दा निराळा आहे. मला झोपेत चालण्याची सवय आहे."कांबळे.
     " तेच म्हणतोय मी. पूर्ण प्रशिक्षित माणूस मिळेल."
     " गस्त पूर्ण आठ तासांची घालायची गरज नाही. रात्री बारा ते तीन या वेळात घालावी. चोरांनी हाच टाईम फिक्स केलेला आहे." 
     " सुरुवातीला उत्साह असतो. नंतर काही होत नाही. सुरुवातीला आठ आठ जण दिसतात फिरताना. नंतर एखाद दुसरा दिसतो. तोही एकदाच काठी आपटतो आणि नंतर घरी जातो. म्हणून मी हा उपाय सुचवलाच नव्हता. " राजेसाहेब म्हणाले.     
         सगळ्यांचे खी: खी: सुरु झाले. काही जण दुसऱ्याच्या कानाला लागले. काही नुसतेच राजेसाहेबांकडे पाहात बसले.    
     "साहेब, तो पाचवा पर्याय राहिलाच आहे अजून." नाडकर्णींनी आठवण केली. 
     "हो, हो. राहिला आहे." सगळ्यांनी  कल्ला केला.  
     "थांबा.थांबा.साहेबांना तयारी करू देत."प्रधान.   
     राजेंनी धीरगंभीर आवाज लावला. 
     " सांगतो. ऐका नीट. एकदा चोरी झाली की, पुन्हा  तिथे कमीत कमी पाच वर्षे तरी चोरी होत नाही. एकदा चोरी झाल्यावर तिथले सगळे लोक दक्ष होतात. वर्षभर आलटून पालटून गस्त घालतात. शिवाय, पोलीसांना बोलावतात. त्यांच्या चौकश्या होतात. पेपरमध्येही बातम्या येतात. वातावरण एकूण सतर्क असते. हे सगळे चालू असताना चोर पुन्हा तिथे येण्याची शक्यताच नसते. पेपरमध्ये वाचले आहे का कधी असे झाल्याचे ? जवळपासच्या परिसरात झाली तर होते चोरी. पण पुन्हा त्याच कॉलनीत होत नाही. असं असताना लगेचच फार धावपळ करण्याची गरज नाही. आपण पोलिसांकडे तक्रार केलीच आहे. ते दोन हवालदार पाठविणार आहेत दोन आठवड्यांसाठी. आपला पुढच्या बाजूचा एक सिक्युरिटी आपण मागे पाठवू. जवळपासच्या सोसायट्यांनाही सांगितले आहे. किमान दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या उपाययोजनांवर ताबडतोब भरमसाठ खर्च करण्याची गरज नाही. मागे एकदा एका सोसायटीत चोर आणि आमदार एकाच दिवशी आले होते. बरोबर पाच वर्षांनी."
         अध्यक्षांचा अनुभव दांडगा होता. सभासदांनी एकमेकांकडे पाहिले. माना डोलावल्या. 
    " ठीक आहे तर मग. यंदाचा खर्च वाचला, असे समजून मी ती रक्कम कॅरी फॉरवर्ड करायला सांगतो. पुढच्या वर्षी उपयोगी पडेल कदाचित." 
    इंद्रसेन राजेंनी सभा संपविली. सगळे सभासद सगळे पटले आहे, असे वाटून घरी गेले. सभासदांना सोल्युशन मिळाले. राजेसाहेबांना दुपारची झोप.