कितीतरी अनुत्तरित प्रश्न

                     शेती हा माझा मूळ व्यवसाय असल्यानं तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे रोजच्या वर्तमानपत्रात शेतीविषयी जे काही येते ते मी आवर्जून वाचतो. असेच एकदा वर्तमानपत्रात झाडांच्या कलमांविषयी माहिती आलेली होती. त्यात पाचर कलम, गुटी कलम, भेट कलम इ. प्रकारांची माहिती होती, त्यापैकी भेट कलमाची माहिती विशेष वाटली. थोडक्यात ती अशी. दोन वेगवेगळ्या पिशव्यांत दोन वेगवेगळी रोपं वाढवली जातात. त्यापैकी ज्या रोपाची मुळं खोलवर जाणारी व कसदार असतात अशा रोपाला निवडून व आपल्याला वाढवायचं रोप, दोन्हींच्या काड्यांची वरची थोडीशी साल काढून एकमेकाला चिकटवून ( भेट करून) बांधली जातात व मूळ रोपाचा शेंडा खुडला जातो जेणेकरून त्याची पूर्णं ताकद आपल्याला वाढवायच्या रोपाला मिळावी. मग आपल्याला हव्या असणाऱ्या रोपाने चांगलं बाळसं धरल्यावर व वाढीला लागल्यावर त्याला मूळ रोपापासून वेगळं केलं जातं व मग शेतात लावलं जातं अशी काहीशी त्याची माहिती होती. शेतीविषयक सर्व वाचून झाल्यावर मी इतर बातम्यांकडे वळलो. खालीच एक बातमी होती, ' आणखी एक सरोगेट मदर '.

      ती बातमी मी वाचू लागलो. जसजशी मी ती वाचू लागलो तसतसं मला भेट कलमाच्या व सरोगेट मदरच्या प्रकारात काहीतरी साम्य आहे असं जाणवू लागलं. तसंच मनात असाही प्रश्न उभा राहिला की जितक्या सहजतेनं आपण कलम करून ते जोपासतो तितकं सहज-सोपं आहे का सरोगेट मदर होणं आणि ते मुलं दुसऱ्याकडे सोपवणं ? त्या दृष्टीने विचार करताना मला अस्वस्थ व बेचैन वाटायला लागलं, मी आणखी खोलवर जाऊन विचार करू लागलो तेव्हा माझ्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ घोंगावू लागलं.

      सरोगेट मदर ही अलीकडची संकल्पना असली तरी ती कॉम्प्युटर युगामुळे जनसामान्यांनासुद्धा सर्व शास्त्रीय व तांत्रिक बाबींसह माहीत झालेली आहे. या तंत्रामुळे अनेक निपुत्रिकांना त्यांच्या बिजाचे मुलं मिळून आनंद मिळणार आहे हे जरी खरं असलं तरी माझ्या मनात अनेक प्रश्नांचा कल्लोळ माजला होता. माझं मन सारखं ' मातृत्व ' या संकल्पनेवर विचार करण्यात गुंतलं होतं. याचा मी जितका अधिक विचार करीत होतो तितका मी अस्वस्थ होत होतो कारण ' मातृत्वाचा ' केवळ शास्त्रीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्याही मी त्याचा विचार करीत होतो. माझं असं मत होत होतं की ' मातृत्व ' जीवशास्त्रीयदृष्ट्या नर-मादीच्या मिलनातून जीव जन्माला येतो एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर त्यात ९९ टक्के भावनेचा, संवेदनांचा, जाणिवांचा गुंतावळा असतो, म्हणून तर ज्यांना भावना, संवेदना, जाणिवा नाहीत, ज्यांना मर्यादित बुद्धी आहे असे आपण ज्या पशूंबाबत म्हणतो, ते जेव्हा बछड्याला जन्म देतात तेव्हा विल्यानंतर लगेच ते त्याला जिभेने चाटून चाटून गोंजारतात, ते जरा जरी नजरेआड झालं तरी हंबरतात, त्याच्याजवळ जर कोणी जाऊ लागलं तर अंगावर धावून येतात. हे कशाचं द्योतक आहे ? भावनिक गुंतावयाचाच ना ? मग माणूस तर पशूंपेक्षाही उच्चकोटीचा संवेदनशील, विचारशील, जाणिवा जपणारा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याच्या बाबतीत भावनिक पातळीवर जाऊन जेव्हा ' मातृत्वाचा ' विचार येतो तेव्हा हा गुंता अधिकच वाढत जातो.

      एखाद्या स्त्रीला जेव्हा गर्भधारणेची जाणीव होते त्याक्षणी तिचा आनंद इतका पराकोटीचा असतो आणि तिची ती तरल संवेदना इतकी प्रखर होते की पुढे गर्भाला नऊ महिने पोसताना व प्रसववेदनांची जाण असूनही त्या क्षणापासूनच ती त्याला सामोरं जाण्यासाठी सज्ज होते. गर्भारपणाची जाणीव तरल असली तरी इतकी प्रखर असते की वेदनांची सुरीही तिला छेद देऊ शकत नाही. त्या दिवसापासूनच ती एका वेगळ्या विश्वात, भूमिकेत रममाण होते. तिला सतत जाहिरातीतल्या बाळासारखं बाळ डोळ्यासमोर दिसत असतं. आणि तसंच ते असावं त्या दृष्टीने ती तयारीला लागते त्यासाठी वाट्टेल ते करायला ती तयार असते.

    गर्भ जेव्हा वाढीला लागतो तसतशा वेगवेगळ्या संवेदना तिला जाणवू लागतात. मग ते डोहाळे असोत, गर्भस्थ बाळाच्या हालचाली असोत या जाणिवा इतक्या तरल, मृदुल गोड असूनही इतक्या तीव्र असतात की गर्भारपणाच्या काळात तिला होणारे शारीरिक कष्ट, थकवा याकडे तिचं लक्षच जात नाही उलट ते तिला हवंहवंसं वाटतं. या सर्वांतून पार होऊन, प्रसववेदना सोसून ती जेव्हा बाळंत होते आणि बाळाचा पहिला हुंकार जेव्हा तिच्या कानी पडतो तेव्हा ती सारे जग विसरते, तिचे नऊ महिन्यांचे कष्ट क्षणभंगुर ठरतात, आणि तिच्या उरात ममतेचा, वात्सल्याचा सागरच उचंबळतो, म्हणूनच तिला पान्हा फुटतो. बाळाच्या मृदुल जिवणीचा पहिला उबदार स्पर्श तिच्या स्तनाला होतो, ते तर केवळ अवर्णनीयच, तो क्षण तिला तिच्या जीवनाच्या सार्थकतेचा असतो. अगदी गर्भधारणेपासून ते मुलं एक-दीड वर्षांचं होईपर्यंत त्या मातेचं प्रत्येक गात्रनगात्रं इतकं ममतेनं, वात्सल्यानं ओथंबलेलं असतं की त्यापुढे तिला सारं जगच फिकं वाटतं आणि ती स्वतःला झोकून देते त्या बाळात.

      गर्भधारणेनंतर गर्भाचं शारीरिक भरणपोषण हे मातेच्या आहारातून,औषधांद्वारे होत असतं परंतु मानसिक, भावनिक बौद्धिक जडणघडण मातेच्या वत्सल संवेदनांतून, तिच्या विचार करण्याच्या पद्धतीतून, प्रसन्नतेतून आणि तरल जाणिवेतून होत असतं. म्हणूनच अशा महिलांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला जातो. आध्यात्मिक, निरामय लेख वाचायला सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन हल्ली गर्भावर सुसंस्कार व्हावेत म्हणून ' गर्भसंस्कार ' या नावाने ऑडिओ सिडी उपलब्ध आहे. गर्भधारणेपासून ते मुलं एक दीड वर्षांचं होईपर्यंत त्या मातेचं त्याच्यासाठी म्हणून जे जगणं असतं ते सारंसारं ' मातृत्व ' या संकल्पनेत मोडतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं या उक्तीप्रमाणे ' गर्भारपण' ते ' बाळंतीणपण ' व नंतरचे ' आईपण ' जी जगते तिलाच ते कळणार, इतरांना काय कळणार त्यातलं ' मर्म ' म्हणून ' मातृत्वाचा ' भावनिक पातळीवर जाऊन विचार करावा लागतो.

      मातृत्वाच्या या पार्श्वभूमीवर मी जेव्हा सरोगेट मदरचा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की खचीतच एखादी स्त्री स्वेच्छेने या प्रकाराला तयार होते. मग अशा महिला शोधल्या जातात की ज्या परिस्थितीने गांजलेल्या आहेत, आर्थिक विवंचनेत आहेत, त्याही मग पैसा मिळतो म्हणून तयार होतात नि देतात आपलं गर्भाशय भाड्याने ! केले जातात करारमदार लादली जातात बंधने. मुळातच आई होण्याची जिला मनापासून इच्छाच नसते, केवळ नाईलाज म्हणून लादलं जातं व लादून घेतलं जातं गर्भारपण नि आईपण त्यात भर पडते बंधनांची, कराराची त्याचबरोबर प्रसूतीनंतर ताटातुटीची , ही भुतं गर्भधारणेपासून मानगुटीवर बसलेली असतात शिवाय मिळणाऱ्या पैशांची झापडंही त्या महिलेच्या जाणिवांवर असतात तेव्हा मातृत्वाची जी संकल्पना आहे ते ' मातृत्व ' गर्भधारणेपासूनच अख्खंचीअख्खं काळवंडलेलं, करपलेलं, गोठलेलं व कोरडं कोरडं असणार आहे. मग प्रश्न गर्भाच्या मानसिक, भावनिक, बौद्धिक जडणघडणीचा येतो कसं होणार ते ? दुसरा प्रश्न येतो तो बाळ जन्मल्यानंतर बाहेर त्याला जो पहिला मानसिक, वत्सल आधार हवा असतो जो मातेच्या ममत्वाच्या स्पर्शातून, वात्सल्यपूर्ण पान्ह्याने युक्त दुधातून मिळतो, कसा मिळणार त्याला तो आधार ? हे झालं बाळाचं. मग त्या मातेचं काय ? अशा बंधनयुक्त वातावरणात ती गर्भाला व नंतर बाळाला काय न्याय देणार ? आणि समजा गर्भाच्या जाणिवांनी उचंबळलंच जर तिच मातृत्व, केलंच जर तिनं गर्भाचं व बाळाचं जिवापाड जपून मग जेव्हा ते बाळ ज्यांचं आहे त्यांना सोपवताना तिला घोटावा लागणार नाही का आईपणाचा गळा ? आणि ते आयुष्यभराच असणार आहे, मग तिनं पुढचं आयुष्य घुसमटीतच काढायचं का ? असं झालं तर ते अमानुषपणाचं नाही का ? हि झाली त्या मातेची अवस्था, दुसरीकडे ते मुलं ज्यांचं आहे ते आपल्या बीजाचं आहे म्हणून वात्सल्यानं, ममतेनं करतीलही संगोपन परंतु अनाथ मुलं दत्तक घेऊन त्याचं संगोपन करण्याइतकं ते साधारण असणार नाही कशावरून ? कारण हल्ली बहुसंख्य मातांनी स्वतः जन्म देऊनही आपलं मुलं स्पर्धेत टिकावं, शिस्तीच्या नावाखाली बेगडी झगमगाटाला भुलून, त्यांच्या अंगी एटिकेटस , मॅनर्स भिनावेत म्हणून आपलं आईपण गोठवून घेतल्याचं दिसतं. अशा या युगात जरी ते मुलं त्यांच्या बिजाव्हं असलं, जरी त्यांच्यात वात्सल्य असलं तरी गर्भारपणाच्या संवेदना जगून जे मातृत्व अंगात भिनतं त्याची सर त्याला येईल का ? एकूण काय ते मुलं जन्म देणारी कडून आणि ज्यांच्याकडे ते वाढणार आहे तिथे त्याला वात्सल्याच्या सागराऐवजी एखाद्या पाझरावर समाधान मानावं लागणार आहे, त्याचं नशीब कृष्णासारखंही नाही आणि कर्णासारखंही नाही कारण इथे नाहीत यशोदा, देवकी आणि कर्णाची राधाई. यात त्या बाळाचा काय दोष ?

      वैद्यकीय, व्यावहारिक व मानवतेच्या दृष्टीने जर विचार केलातर असं वाटतं की, जेव्हा अशी गर्भधारणा करायची ठरते तेव्हा वर्षभर आधीपासूनच त्या महिलेला गर्भधारणेसाठी तयार करण्याकरता वेगवेगळ्या चाचण्यांतून जावं लागतं,टॉनिक्स, हार्मोन्सची इंजेक्शन्स, गोळ्या इ. सोपस्कार पार करावे लागतात, त्याचे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात, कधीकधी ते आयुष्यभरासाठीही असू शकतात. जिथे आत्महत्या करणे हा जर गुन्हा आहे तिथं जाणूनबुजून आपलं शरीर व जीव धोक्यात घालण्याचा काय अधिकार आहे ? आणि तिला आमिष दाखवून, भुलवून किंवा तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिला धोक्यात आणणारेही मानवतेच्या दृष्टीने गुन्हेगार नाहीत का ? इथं कोणी असंही म्हणेल की यानिमित्ताने गरजू महिलांची गरज भागवली जाते, पण त्याकरता तिचा जीव, शरीर व मानसिक आरोग्याचा बळी देणं कितपत योग्य आहे ? हे अमानवीय नाही का? या तंत्राचा गैरवापर होऊ नये, अशा महिलांना आरोग्याच्या दृष्टीने काही त्रास होऊ नये, त्यांची फसवणूक, शोषण होऊ नये यासाठी जरूर काही कायदे आहेत पण, कायद्यांचा आजवरचा इतिहास पाहता कायद्यांमध्ये तरतुदींपेक्षा पळवाटाच जास्त असतात शिवाय अंमलबजावणीच्या दृष्टीने बोंबच असते त्यांमुळे कायदे असून नसून सारखेच. कायद्याने माणसावर अंकुश ठेवता येईल पण माणसाचे मन व मनभुत भावना, घुसमट याला कायदा काय करील त्यासाठी नैतिक मूल्यांचं कवच पाहिजे ज्याची कधीच वाट लागलीय. या सगळ्या प्रश्नांनी डोक्यात थैमान घातलं असतानाच चिंतेच अजून एक वादळ मनात घोंगावत होतं की ममता, वात्सल्य या कोमल भावनांनी प्रेरित होऊन माणूस आज पारधही करायला लागलाय का !?

      प्रश्नांचे हे भुंगे डोकं पोखरीत असतानाच, वर्तमानपत्र चाळताना चौकटीतल्या एका बातमीनं माझं लक्ष वेधलं. बातमी होती अनाथांची माता सिंधुताई सपकाळ यांच्या सत्काराची. बातमी छोटी असली तरी ती मला आशेचा किरणापेक्षा आशेच्या सूर्यासारखी वाटली. व अजून एक विचार मनात आला की सरोगेट मदरपेक्षा हा पर्याय श्रेष्ठ नाही का ? सध्यातरी मला हे सारे प्रश्न अनुत्तरितच वाटत आहेत, येणारा काळ देईलही याची उत्तरं कदाचित.

      प्रश्नांच्या या भोवऱ्यानं माझं डोकं भणभणायला लागलं होतं. बेचैनी घालवण्यासाठी भटकायला म्हणून बाहेर पडलो, तिन्हीसांजेची वेळ होती, गायीगुरं, पक्षी, रानात गेलेली माणसं घरी परतत होती. अशाच काही माणसांमध्ये एक मध्यमवयीन बाई होती. तिच्या डोक्यावर गवताचा भारा होता, एका हातात रानभाजी व पाण्याचा हंडा तर दुसऱ्या बाजूने कमरेवर वर्षभराचं वय असलेलं मुलं धरलेलं होतं, ते कधी तिच्या बटांशी खेळ तर कधी नाक ओरबाड असे काहीबाही चाळे करीत होतं पण ती मात्र एवढी दमलेली, डोक्यावर मरणाचं ओझं, दोन्ही हात गुंतलेले तरीही त्याच्याशी बोबडबोलीत बोलत होती, जमेल तसं मुके घेत होती आणि उत्साहाने तरातरा चालत होती. ते दृश्य पाहून का कुणास ठाऊक मला थोडं हायसं वाटलं, बेचैनी कमी झाली. मी भान हरपून तिला पाहत होतो, अधाश्यासारखं ते दृश्य मी ती नजरेआड होईपर्यंत उरात साठवून घेतलं भविष्यात पुन्हा असलं काही पाहायला भेटेल का नाही या आविर्भावात !

कुठून तरी किशोरकुमारच जुनं हिंदी गाणं कानावर येत होतं...

                                          हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया.........!!!!!

                                                              - उद्धव कराड, ( मो. नं. ९८५०६८३०४५)

                                                                मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.