एक होती बाय - कल्पनात्मक सत्य वा सत्यात्मक कल्पना

 'एक होती बाय' हा सुरेन आपटे यांच्या Bai of Hatonde या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद.
दहाएक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी पाहता आपटे म्हणजे कुणी नव्या फळीतले इंग्रजीतून लेखन करणारे भारतीय असावेत असा ग्रह होणे शक्य आहे. तसे नाही. लेखक (हयात असल्यास) पंचाहत्तरी पार केलेले नि हॉलंडला स्थायिक झालेले आहेत.
आणि तेवढेच नव्हे. ही 'सत्य घटनांवर आधारित' कादंबरी आहे. तसा स्पष्ट उल्लेखच आहे.
नायिका पेणजवळच्या हातोंडे नावाच्या एका खेड्यातली ज्यू मुलगी. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत भारतात ज्यू माणसे सहज दिसणे अशक्य नव्हते. हिंदीतले नट डेव्हिड (पूर्ण नाव डेव्हिड अब्राहम चेउलकर), भाऊ पाध्येंची पत्नी शोषन्ना माजगांवकर ही आठवणारी दोन नावे.
या मुलीने (नायिकेने) सोळाव्या वर्षांपर्यंत हातोंड्याखेरीज जग पाहिलेले नसते. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर ती कामधंदा शोधायला आई आणि दोन बहिणींना न सांगता मुंबईच्या दिशेने निघते. आगगाडीत भेटलेल्या एका भल्या माणसाच्या घरी तिला आसरा मिळतो. इथून जी सुरुवात होते, ती तिचे कुमारी मातृत्व, नर्सिंगचे शिक्षण घेऊन बक्कळ पैसा (त्या काळी पन्नास हजारांच्या घरात) कमावणे, मग सिनेमात काम करण्यासाठी तो व्यवसाय सोडून देणे, सिनेमात आणि नाटकात कामे करीतच उरलेले जीवन व्यतीत करणे या शेवटापर्यंत जाते.
पण हे एवढेच नव्हे. हे म्हणजे मुंबईहून गोव्याला जाताना वाटेत महाड, रत्नागिरी आणि सावंतवाडी लागते असे म्हणण्यासारखे आहे.
कर्नाळ्याला लगटून गेलेला रस्ता, पेणेस उजवीकडे वळून परत वडखळ नाक्याला डावीकडे झुकांडी मारण्याची रस्त्याची चपळाई, रोह्याच्या जवळून जाताना येणारा रासायनिक दर्प, महाड शहरात न जाता बाहेरच्या बाहेर जाण्यासाठी घ्यावा लागणारा इंग्रजी 'सी' अक्षरासारखा वळसा, उजवीकडे मंडणगड आणि डावीकडे वरंधा या चौकातली द्विधा मनस्थिती (अजूनही मी मंडणगडला गेलेला नाही! ), कशेडीच्या घाटमाथ्यावरून दिसणारे खरे कोंकण, खेडच्या नाक्यावरून दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मोहक वळण, लोटे परशुरामाच्या माळावरून उतरताना उजवीकडे दिसणारी लोभस वासिष्ठी नदी, संगमेश्वर-माभळे द्वैत, हातखंब्याच्या घाटीतून उतरल्यावर हातखंबा गावातून जाणारा निरुंद रस्ता, तिथून पुढे दर वीसपंचवीस किलोमीटर अंतरावर लागणाऱ्या वाकणदार घाट्या (वरती असल्या इटुकल्या घाट्यांना 'घाट' म्हणून नावाजण्याची प्रथा आहे; पुणे नगर रस्त्यावर म्हणे घाट आहे!), कणकवलीला ऐन बाजारातून जाणारा रस्ता, सावंतवाडीच्या तळ्याकाठचे जुने वळण, बांदा ओलांडल्यानंतर दोडामार्ग की पेडणे असा प्रश्न....
एवढे सगळे महाड-रत्नागिरी-सावंतवाडी या रुक्ष ताळेबंदीय भाषेत मांडणे जितके अयोग्य तितकेच या कादंबरीचे धोपट वर्णन अयोग्य.
पण त्यात इतके पेचपाच दडले आहेत, इतकी वळणे नि घाट्या आहेत, इतके बुचकळ्यात टाकणारे संदर्भ आहेत की त्या सगळ्याबद्दल लिहिले तर अख्खे पुस्तक इथे उतरवावे लागेल. त्यापेक्षा वाचकांनीच तो उद्योग केलेला बरा. पश्चात्ताप होण्याची शक्यता बरीच कमी आहे. मला अजिबात झाला नाही.
आता भाषांतरातल्या काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत, नाही असे नाही. पण त्यांसहित जगणे शक्य आहे. आणि त्याही सुरुवातीलाच आहेत. कदाचित एकदा सूर लागल्यानंतर ताल चुकायची वेळ आली नसावी.
त्रासदायक गोष्टी दोन. एक म्हणजे 'सत्य घटनांवर आधारित कादंबरी' अशी फिरवलेली द्वाही आणि कादंबरीतली नावे.
यातल्या इतक्या घटना आणि व्यक्ती सत्यातल्या आहेत की 'सत्य घटना' म्हणजे नक्की किती याचा हिशेब लावताना दमछाक होते.
मुंबईतल्या डॉक्टर लोकांचे १९३० च्या दशकातले वर्णन अगदी खरे वाटते. ती पात्रे कोणत्या खऱ्या व्यक्तींवर आधारलेली आहेत? दादासाहेब तोरण्यांच्या 'राजा संभाजी' मध्ये नायिकेने येसूबाईचे कामे केल्याचा उल्लेख आहे. खरेच तसा काही सिनेमा तोरण्यांनी पुण्यातून काढला होता की काय?
नाट्यमन्वंतर, केशवराव दाते, भोळे दांपत्य, यांचे उल्लेख अगदी स्पष्ट आहेत. पण नारायण म्हणजे 'के नारायण काळे' की काय? प्रभाकर म्हणजे नक्की कोण? अनंत म्हणजे अनंत काणेकरच ना? गजानन आपटे म्हणजे नक्की कोण?
लेखक सुरेन आपटे यांचे नाव सुरेन का ठेवले असेल याचा उलगडा आहे, पण कादंबरीतल्या पात्राचे नाव मात्र देवेन. असे का? लेखकाच्या पत्नीचे खरे नाव कॅरोलीन मॅग्नस. मग कादंबरीत त्याचे 'एलन' असे नामांतर का?
हा केवळ मासला. असे प्रश्न तर नंतर पानोपानी पडतात. एक मात्र खरे, की हे 'नाईस टू हॅव' या श्रेणीतले प्रश्न आहेत.
दुसरी त्रासदायक गोष्ट म्हणजे लेखन शैली ही बरीचशी सरधोपट आहे. खिळवून ठेवते ती कथावस्तू, सादरीकरण नव्हे. पण कथावस्तू दमदार असल्याने या शैलीसहित जगणेही शक्य आहे.
एकंदरीत सत्याधारित कल्पना किती आणि कल्पनाधारित सत्य किती  याचा हिशेब करण्यात वेळ बरा(च) जातो.

एक होती बाय
लेखकः सुरेन आपटे
अनुवादः विनया खडपेकर
प्रकाशकः सुरेन आपटे
3817GT, Amersfort, Netherlands, Holland
आवृत्ती पहिली: जानेवारी २००२
एकमेव वितरकः राजहंस प्रकाशन