आठवते का तुला?

आठवते का प्रिये तुला? कोणे एके काळी आपण शाळेत एकत्र शिकत होतो आणि प्रयोगशाळेत कंटाळवाणे प्रयोग करता करता आपली एकमेकांशी ओळख पक्की होत गेली. तुझे कुटुंब आमच्या शहरात नवीनच राहायला आले होते; मला हे पण कळले की तुझे घराणे फार मोठे होते आणि तुझे वडिल मोठे सरकारी अधिकारी होते. मला वडिल नव्हते आणि मी आईसोबत एका जुनाट गल्लीत राहात होतो. आम्ही आमचे अर्धे घर भाड्याने दिले होते आणि माझी आई शहरातीलच उच्चभ्रू लोकांसाठी काजं-बटनं करायची. ती हे सारे मान ताठ ठेऊन अगदी अभिमानाने करायची पण तुला त्याची काहीच कल्पना नव्हती. तुला इतकेच माहित होते की मी एक शिवणकाम करणारीचा मुलगा होतो.  

पण मला तुझ्या मित्रमंडळींच्यात घेतले गेले कारण मी फुटबॉल टीमचा कर्णधार होतो आणि सगळ्यांत चांगल्या तुकडीत पहिला येत होतो. जेव्हा मी माझ्या आईला तू माझ्याबरोबर शाळेत नृत्य करणार आहेस असे सांगितले तेव्हा तिचे क्लांत डोळे भरून आले. तिला माहित होते की माझी सारी दिवास्वप्ने तुझ्याविषयीच होती पण तिला हे पण माहित होते की आपल्या कौटुंबिक स्थितीतील दरी सांधली जाणे सोपे नाही. तरीही तिने मला ते सांगितले नाही, ती फक्त मला म्हणाली की तिला दुःख आहे की माझ्याकडे घालायला निळा कोट नाही. मी तिला खात्री दिली की माझा करडा कोट अगदी चांगला आहे.
     
जेव्हा मी तुझ्या घरी तुला नृत्यासाठी घेऊन जायला आलो तेव्हा तू खांद्यापर्यंत मोठी झालर असलेला गळाबंद नवा सुंदर निळा झगा घालून खाली आलीस. तुझा चेहरा फुलांप्रमाणे टवटवीत होता, गाल गुलाबी होते आणि तुझ्या केसांत सोनेरी फुले माळलेली होती. तू तळाच्या पायरीवर उभी राहून माझ्याकडे पाहिलेस, माझ्या स्वस्त कोटाची दखल न घेता. तू नक्कीच माझ्या डोळ्यांत असे काहीतरी पाहिले असशील जे माणूस आपल्या खास क्षणांसाठी जपून ठेवतो.    
मग तुझी आई आत आली, त्यावेळेपर्यंत मला जितकी आपुलकीची जाणीव होती तितकी नापसंतीची नव्हती. तिचा माझ्याविषयीच्या आणि तुझ्या इतर मित्र-मैत्रिणींच्या विषयीच्या दृष्टिकोणात एक सूक्ष्म भेद होता, ते तिच्याच वर्तुळात मोडणारे होते आणि मी एक बाहेरची व्यक्ती होतो. तिच्या उपस्थितीने माझी अवस्था अवघडल्यासारखी आणि काहीशी विचित्र झाली होती. 
त्यावेळी आपण रात्रभर एकत्र नाचलो आणि जेव्हा शेवटची धून संपली तेव्हा तुझ्या डोळ्यांत एक सोनेरी चमक होती. जणू काही आपण ताऱ्यांचेच संगीत ऐकले होते.
तुला तो समुद्र किनाऱ्यावरचा छोटा धाबा आठवतो? ती अशी जागा होती जिथे शिंप्यांची मुले आणि शिपायांच्या मुली उन्हाळ्यातल्या संध्याकाळी नृत्य करायला जात आणि तिथे एक गोदी होती जिथे ते चंद्रप्रकाशात भिजत चालायला जात. पण जो पर्यंत तुझ्या मित्रमैत्रिणींनी जूनमधल्या एका संध्याकाळी तिथे तळ ठोकून मस्ती करायची ठरवले नाही तो पर्यंत तुझ्यासारख्या (श्रीमंत) मुलीसाठी तो धाबा केवळ सांगोवांगीची गोष्ट होता. 
दुसऱ्या दिवशी तू तुझ्या घरच्यांसोबत उन्हाळी सुट्टीत तुझ्या गावाला जाणार होतीस आणि परत आल्यावर तुला लगेच कॉलेजला जायचे होते. मग मी केवळ तुला सार्वजनिक सुट्ट्यांमध्येच पाहू शकत होतो. मला ह्या दुःखाचा सामना करायचा होता. धाब्यावर त्या संध्याकाळी आपण एकत्र नाचलो आणि गोदीच्या दुसऱ्या टोकापर्यंत चालत गेलो. आपल्याकडे सोबत घालवण्यासाठी अगदी थोडा वेळ होता कारण आपल्या सर्वांना साडेनवाच्या गाडीने घरी परतायचे होते. पंधराच मिनिटे, संपूर्ण उन्हाळ्याची भरपाई करायला आपल्याकडे जणू पंधराच मिनिटेच होती.   
 "उद्या, ह्या वेळेस तू गेलेली असशील", मी म्हटले. 
"मला खरेतर इथेच तुझ्यासोबत राहायचे आहे, जिम!" 
 "पुढच्या आठवड्यापासून माझी नवी नोकरी चालू होत आहे", मी बोलत गेलो. "एक सुरूवात म्हणून ही नोकरी म्हणजे खास नाही पण मला उत्तम काम मिळण्याची संधी आहे. मी नक्कीच ती संधी मिळवेन. नव्हे नव्हे, मला ती मिळवावीच लागेल."  
"तू ती नक्कीच मिळवशील", तू म्हणालीस. मग जवळ सरकून ती हळूवारपणे म्हणालीस, "मला वाटते की पुढच्या वर्षीच्या कॉलेजच्या नृत्यमहोत्सवात तू यावेस. तू येशील ना?" 
"हो," मी तुला वचन दिले.
मी तुझे हात हातांत घेतले आणि तू मला कवेत घेतलेस. तू तुझा चेहरा वर केलास आणि त्या चंद्रप्रकाशात तुझ्या ओठांनी, ज्यांना मी कधीच स्पर्श केला नव्हता, त्यांनी हलकेच माझ्या गालाला स्पर्श केला. तारकादलांनी खाली उतरून आपल्याला वेढून टाकले. तू म्हणालीस, "ही रात्र मी कधीच विसरणार नाही".
तुला हे सारे आठवते का? त्या रात्री नंतर अनेकानेक गोष्टी घडल्या. आपले शहर बदलले. आता तिथे जुनी कोळशाची इंजिने नाहीत आणि आपली लहानशी शाळा आता ओस पडली आहे. तिच्या खिडक्या समोरच्या रस्त्यावरील नव्या शाळेकडे शून्य दृष्टिने पाहतात. कोणीतरी आपल्याला शाळेत नृत्यासाठी न्यायला घरी येईल ह्याची आता मुली वाटत पाहात नाहीत, त्या नाक्यावर फेरफटका मारतात जिथे मस्तीखोर मुले मुद्दाम कमावलेल्या उद्दामपणाने त्यांचे स्वागत करण्यासाठी उतावीळ झालेली असतात.     
जुलैच्या अंतास तू मला पत्र लिहिलेस आणि कळवलेस की तुझ्या आईला वाटते की आपण एकमेकांना इतकी पत्रे पाठवणे योग्य नाही. त्यानंतर मी तुला आठवड्याला केवळ दोनच पत्र पाठवायला लागलो.
त्यावेळी मी जरी फार कमावत नसलो तरी मी तेव्हा मोठ्या पदोन्नतीची संधी जवळच पाहात होतो आणि म्हणूनच मी नेहेमीच तुझा विचार मनात आणत अपार कष्ट केले.
नंतर तू लिहिलेस की तुझ्या बहिणीने, तारूण्यसुलभ अविचाराने, तुझ्या वडिलांना सांगितले की तू माझ्या प्रेमात पडली आहेस आणि तू दिवसभर रिकामा वेळ घालवतेस आणि मला पत्र लिहायचे म्हणून कधी कधी पोहायला सुद्धा जात नाहीस. त्यानंतर एका आठवड्याने जेव्हा तू गावाहून घरी परत यायचा एक एक दिवस मी मोजत होतो तेव्हा तुझी पत्र आले की तू परत येत नाही आहेस. तुझ्या वडिलांनी तुला कॉलेज असलेल्या मोठ्या शहरात परस्पर पाठवले आहे.   
त्यानंतर मी तुला रोज पत्र पाठवली पण तू नेहेमी उत्तरे दिली नाहीत. मला आशा देणारा केवळ तो कॉलेजचा नृत्यमहोत्सवच होता. तू मला त्यासाठी बोलावलेस ह्याविषयी त्रागा करणाऱ्या तुझ्या आईची मी कल्पना करू शकत होतो पण तरीही तू नक्कीच त्याविषयी वचनबद्ध होतीस. मी कसेही करून आलो, मेजवानीसाठी एक खास जाकिट उधार घेऊन.  
आपण ठरवले होते की मी शुक्रवारी संध्याकाळची चारची गाडी पकडून येईन जी तुझ्या कॉलेजच्या ठिकाणी सहा पर्यंत येईल. मग मला ह़ॉटेलची एक खोली भाड्याने घ्यावी लागेल आणि मग तिथे सामान ठेऊन, तयार होऊन रात्रीच्या जेवणासाठी उपस्थित राहावे लागेल. रात्री नृत्यानंतर मला दोन वाजताची गाडी पकडून परतावे लागेल कारण माझ्या मालकांनी शनिवारी कामावर माझी गरज आहे असे म्हटले आहे.
तिथे स्वस्तातल्या स्वस्त हॉटेलची खोली पण माझ्यासाठी फारच महाग होती. म्हणून मी मला परवडेल अशी धर्मशाळा शोधण्यासाठी रस्ते पालथे घातले.   
जेवणाच्या वेळी तू तुझ्या मित्रांना माझी ओळख करून दिलीस पण त्यांच्याशी बोलण्यासाठी मी योग्य शब्द शोधू शकत नव्हतो. तू माझ्या जवळच बसलीस पण तू गप्प गप्प होतीस. माझ्या लक्षात आले की माझे ते खास जाकीट जुनाट पद्धतीचे होते, त्याच्याबरोबरच माझे करडे बुट तर अजिबात मेळ खात नव्हते. कसाबसा चुळबुळत मी एक तास घालवला. नंतर साऱ्या मुली नवा ड्रेस घालण्यासाठी निघून गेल्या, पुरूषांनी काळा कोट परिधान केला आणि पांढरे हातमोजे चढवले. ह्या सर्वांमध्ये माझे मांजरपाटाचे जुने जाकीट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.    
तू चांदीचे तंतू विणलेला पांढरा झगा घालून आलीस आणि त्यावेळी मला तू जितकी सुंदर दिसलीस तितकी सुंदर तू पूर्वी कधीच दिसली नव्हतीस.
 "काही मुली टॅक्सी पकडत आहेत पण मी चालतच जाईन, जिम! चालेल ना?"  तू म्हणालीस. मी पण आधीच टॅक्सी मागवली असती पण मला त्याबद्दल कोणीस काही बोलले नव्हते.
ज्या सभागृहात हा नाच आयोजित केला होता ते काही फारसे दूर नव्हते आणि आपण त्या रात्री चंद्रप्रकाशात चालत गेलो, तू माझा दण्ड घट्ट पकडलास होता. पहिल्या नाचाच्या दरम्यान मला जाणवले की इतर सर्व मुलींनी केसांत फुले गुंफली आहेत. खरेतर मी पण तुझ्यासाठी फुले आणणे अपेक्षित होते पण मी आणली मात्र नव्हती. 
 "मला माफ कर, मी फुले आणली नाहीत", मी म्हणालो. तू माझ्याकडे भरल्या डोळ्याने पाहिलेस.
"फुले महत्त्वाची नाहीत", तू म्हणालीस.
तू माझ्या खांद्यावर डोके ठेवलेस. मी तुला जवळ घेतले पण मनातल्या मनात मला सर्व काही संपल्याचे जाणवायला लागले होते. पण त्या रात्री मी जमेल तितके उत्तम वागायचा प्रयत्न केला. तुझ्या मित्रांशी त्यांच्या आवडीच्या गोष्टी बोलायचा प्रयत्न सुद्धा केला पण तो साफ फसला. कारण माझे प्रयत्न प्रामाणिक असले तरी अशा गप्पा मारण्याची मला अजिबात सवय नव्हती.
तू आणि मी एकत्र नाचलो पण संगीताच्या सूरांवर नाही. जेव्हा ते सारे संपले, तू म्हणालीस की तू मला गाडीवर सोडायला येते आहेस. रस्त्यात चालता चालता मी तुला सांगितले की आपली ही भेट माझ्यासाठी इतकी महत्त्वाची होती की मला हॉटेलचे भाडे परवडले नाही म्हणून मी धर्मशाळेत राहिलो, माझे जाकीट पण उधार आणलेले होते आणि बाकी बरेच काही.  
माझे बोलणे जेव्हा संपले तेव्हा तू इतकेच म्हणालीस, "जिम!, मला वाटले की तू ह्या सगळ्याचा आनंद घेऊ शकशील पण तसे काही झाले नाही". त्यावर मी म्हटले, "नाही, मी इथे असणे ही फार मोठी चूक होती. मी इथे उपरा आहे".
आपण पोहोचलो तेव्हा गाडी यायला थोडाच वेळ बाकी होता, दूरवर गाडीचे दिवे लुकलुकत होते. मी माझा हात तुझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणालो, "येणाऱ्या वर्षांमध्ये तुला जर कधी माझी आठवण आली तर मी तुझ्यावर अत्यंतिक प्रेम करतो हे तू लक्षात ठेवशील का?" 
त्यावर तू तुझे डोळे मिटलेस आणि माझ्याकडे झुकून म्हणालीस, "जिम! असे म्हणू नकोस रे..."
मला वाटले की तुला माझे प्रेम व्यक्त करणे रूचले नाही. पण तू माझ्या बाहुपाशांत आलीस आणि मी तुझे चुंबन घेतले. भरल्या डोळ्यांनी तू माझ्याकडे पाहून स्मित केलेस. 
रविवारी मी तुला एक औपचारिक पत्र लिहिले. मी त्यात नृत्यमहोत्सवाला बोलावल्याबद्दल तुझे आभार मानले आणि त्यात असेही लिहिले की तू जर ह्या पत्राला उत्तर दिले नाहीस तर मी समजून जाईन. तो संपूर्ण आठवडा मी उत्तराची वाट पाहिली पण ते आले नाही. आठवड्यांमागून आठवडे गेले आणि माझ्यापाशी तुझ्या आठवणीच राहिल्या.
माझ्या कंपनीने मला पदोन्नती देऊन शहराबाहेर पाठवले. माझ्या आईने शिलाईकाम बंद केले आणि ती माझ्या सोबत राहायला आली. 
"आठवते का प्रिये तुला?" बरीच वर्ष लोटली ह्या साऱ्याला, तब्बल २६ वर्षे आणि उद्या आपण आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करणार आहोत. कारण तू कॉलेज सोडल्यावर लवकरच मी तुला शोधत आलो. योगायोगानेच आपण भेटलो आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा ती सोनेरी चमक दिसायला लागली होती. रस्त्यातच गुढघे टेकून त्या नृत्याच्या रात्री गाडीची प्रतीक्षा करताना जी वाक्ये म्हणालो होतो त्यांचा पुनरुच्चार करू लागलो, "येणाऱ्या वर्षांमध्ये तुला जर...."   
मला मध्येच थांबवत तू तुझे हात पसरलेस (आजुबाजूचे सारे थक्क होऊन पाहात असताना) आणि म्हणालीस, "मला सारे काही लक्षात आहे आणि मी पण तुझ्यावर प्रेम करते".
आपण एकमेकांचे चुंबन घेतले आणि कोपऱ्यावरील ढोलताशांचा ठणठणाट पण त्यादिवशी आपल्याला सुरेल वाटत होता.
प्रिये! एकेकाळी जशी तुझी आई तुझ्याविषयी काळजी करत होती तशी आज तू आपल्या लेकीविषयी चिंतातूर आहेस. ती अठरा वर्षांची आहे आणि तिला वाटते की ती प्रेमात पडली आहे. माझ्या मते तू त्या अनोळखी तरूणाला एक संधी द्यावीस. हा जो आपली प्रेमकहाणी पुन्हा तुझ्यासमोर मांडण्याचा मी एक ओबडधोबड प्रयत्न केला आहे तो वाचल्यावर तू तुझा निर्णय घेऊ शकशील. हीच माझी तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसासाठीची भेट आहे.
कदाचित् आपण त्या तरूणाला आपल्या मंडळामध्ये जेवायला निमंत्रित करू शकतो. शक्यता आहे की तो तरूण एक सुप्रसिद्ध लेखक, एक सनदी अधिकारी आणि इतर मान्यवर पाहुण्यांच्या मध्ये अवघडून जाईल. संभव आहे की त्या संध्याकाळसाठी त्याने कपडे उधार घेतले असतील आणि त्याला माहितही नसेल की अशा प्रसंगी काय बोलावे.   
पण असेच कोणे एकेकाळी तू एका गरीब मुलाला तू कॉलेजच्या नृत्यमहोत्सवाला निमंत्रित केले होतेस. आठवते का ते तुला?

मूळ कथा – अर्ल रीड सिल्व्हर्स - दुवा क्र. १