काही अनुभव

     अभियांत्रिकी क्षेत्रात  तंत्रनिकेतन किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकाचे काम  वगळता इतरत्र उच्च शिक्षणापेक्षा अनुभव अधिक महत्वाचा असतो असे माझे अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातच काम केल्यामुळे बनलेले मत आहे. विद्यार्थीदशेत अगदी  काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात नेत्रदीपक काम केल्याचा तर नेहमी प्रथम वर्गात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यामानाने कमी प्रभाव पाडल्याचे आढळले आहे.उच्च शिक्षण हे अभियांत्रिकी माहाविद्यालयात प्राध्यापक होण्याच्याच कामाचे असते.अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्या पाल्याना प्रवेश देताना मुंबईबाहेरच्या पालकांचा आणखी एक दृष्टिकोन असतो तो म्हणजे  आय.आय.टीत प्रवेश मिळाला नाहीतर पुण्याच्याच कॉलेजात प्रवेश द्यायचा.कारण त्यांच्या मते पुण्यात आणखी  बऱ्याच संधी अधिक उपलब्ध  असतात.हे काही अंशी खरे असले तरी संधीचा उपयोग करून घेण्याच्या पाल्याच्या क्षमतेचाही विचार करणे आवश्यक असते. वरील निरीक्षणांसंबंधित  माझे काही अनुभव नमूद करण्यासारखे आहेत.
     मी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना बरेच पालक आपल्या पाल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश देताना माझा सल्ला घेण्यास येत.त्यातील एक पालक माझ्या डॉक्टर बंधूंचे मित्र व तेही डॉक्टरच.पण त्यांच्या मुलास इंजिनिअरिंगला जायचे होते म्हणून ते मला प्रवेशपूर्व सल्ला विचारायला आले.त्यांच्या मुलास उत्तम गुण मिळाले होते त्यामुळे औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला सहज पाहिजे त्या शाखेस प्रवेश मिळेल असे मी त्यांना सांगितल्यावर चेहरा जरा हिरमुसल्यासारखा करत ते म्हणाले,"पण त्याला पुण्याच्याच कॉलेजात जायचे आहे."यावर मी म्हणालो,"पुण्याच्याही कॉलेजात त्याला प्रवेश मिळू शकेल पण शासकीय महाविद्यालयात मिळण्याची शक्यता नाही" यावर ते म्हणाले,"खाजगी महाविद्यालयातही घालायची  ( म्हणजे ज्यादा पैसे खर्च करण्याची) आमची तयारी आहे.""तसे असेल तर काही हरकत नाही "असे म्हणून मी त्याला हव्या असणाऱ्या यंत्रशाखेसाठी कोणत्या कॉलेजात त्याने जावे ते सुचवून पुढे माझे मत व्यक्त केले,"हे सगळे जरी झाले तरी माझे व्यक्तिगत मत विचाराल तर तुम्ही त्याला औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात घालावे असे मला वाटते,कारण त्यामुळे तो तुमच्या व आमच्याही नजरेसमोर राहील"
      माझे हे बोलणे त्यांना पटले  नाही हे उघडच होते  कारण त्यानी "पण त्याच्या मनात पुण्यासच जायचे आहे"हे आपले तुणतुणे पुन्हा वाजवले.  पुण्यासच जायचे  त्याच्या मनाने का ठरवले होते याविषयी त्यांचे उत्तर पुण्यात अधिक संधी उपलब्ध असतात असे त्याला वाटते.अर्थातच त्याने औरंगाबादलाच रहावे हे माझे मत त्याना स्वीकारार्ह वाटले नही आणि त्यानी त्याला पुण्याच्या एका चांगल्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच्या यंत्र अभियांत्रिकीसाठी पुण्यातील दुसरे एक खाजगी अभियांत्रिकी
महाविद्यालय अधिक योग्य आहे असे माझे मत मी व्यक्त केले होते पण तेथे
त्याला प्रवेश मिळाला नव्हता.
      नंतर काही दिवसांनी त्यांची गाठ पडल्यावर मी त्यांना त्यांच्या मुलाच्या प्रगतीविषयी  विचारले.यावेळी त्यांची मुद्रा फारशी प्रसन्न वाटली नाही.आणि कारण त्यांच्या उत्तरातून बाहेर पडले," यंत्र अभियांत्रिकीसाठी ते दुसरेच महाविद्यालय (मी सांगितलेले) जास्त चांगले असल्यामुळे व तेथे प्रवेश न मिळाल्यामुळे तो जरा नाराजच आहे " "पण हेही महाविद्यालय चांगलेच आहे,त्यामुळे तेथे राहून चांगला अभ्यास करायला त्याला सांगा व पुण्यातील उपलब्ध संधींचाही शोध घे म्हणावे"असे मी माझ्यातर्फे सांगितले पण थोड्याच दिवसांनी प्रथम सत्र परीक्षेत काही विषयात त्याला फारच कमी गुण मिळाल्याचे त्यांनी सांगितले"  "पण त्या विषयांना द्वितीय सत्राच्या परीक्षेच्या वेळी पुन्हा बसता येते व त्यावेळी उत्तीर्ण झाल्यास श्रेणीही मिळते त्यामुळे चांगला अभ्यास करून प्रथम श्रेणी मिळवणे आवश्यक आहे असे त्याला सांगा " असे मी त्यांना सांगितले व त्यानी अर्थातच होकारात्मक उत्तर दिले.
    पण दुसऱ्या वर्षाच्या सुरवातीस ते स्वत:च माझ्याकडे आले,त्या वेळी तर त्यांचा चेहरा अधिकच उतरला होता."त्याला औरंगाबादच्या ***** या खाजगी महाविद्याल्यात प्रवेश मिळेल का?" असे त्यांनी मला विचारले.त्यांच्या मुलाला दुसऱ्या सत्रातही सर्व विषयात उत्तीर्ण होणे जमले नव्हते आणि आता त्यांना माझ्या सल्ल्यातील गर्भितार्थ ध्यानात आला होता.***** महाविद्यालयातही बरेच प्राध्यापक माझे मित्र व प्राचार्यही परिचयाचे होते त्यामुळे त्यांच्या मुलाला तेथे प्रवेश मिळाला.अर्थात त्यासाठी बरेच आर्थिक नुकसान त्यांना सोसावे लागले व त्या मुलाचे एक वर्षही वाया गेले..माझा सल्ला योग्य होता ही गोष्ट अश्या प्रकारे सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा मुळीच नव्हती. सुदैवाने नंतर त्याने व्यवस्थित अभ्यास करून प्रथम वर्ग मिळवला व नंतर तो अमेरिकेसही गेला ही पुढची गोष्ट.
       माझा सल्ला योग्य होता हे याच प्रकारे सिद्ध करणारा दुसरा अनुभव ,त्यातही पालकाचा अति उत्साह नडला. यात पालक केवळ माझा मित्रच नाही तर सहकारी प्राध्यापकही होता त्यामुळे या क्षेत्रातील बारकावे त्यालाही माहीत होते. 
       माझ्या मित्राचा मुलगा  प्रथम पदविका घेऊन त्यातील अंतीम परीक्षेस  प्रथम वर्ग मिळवून अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याचा प्रयत्न करत होता. एस.एस.सी नंतर पदविका घेण्यात एक फायदा असे. तो म्हणजे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालाच नाही तर  पदविकेच्या पात्रतेवर योग्य प्रकारची नोकरी मात्र मिळत असे. .माझ्या मित्राच्या मुलाचे असेच झाले म्हणजे त्याला पदविका अंतीम परीक्षेत प्रथम वर्ग मिळूनही त्याच्या गुणापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी बरेच असल्याने पदवी घेण्यासाठी महाविद्यालयात थोड्याच जागा असल्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नाही यामुळे माझ्या मित्राला व त्याच्या मुलालाही दु:ख झालेच.पण पदविका प्राप्त झाल्यामुळे औरंगाबादच्याच चांगल्या कंपनीत त्याला लगेच मुलाखतीस बोलावण्यात आले व त्याची निवड झाली व लगेच तो कामावर रुजूही झाला. कोणत्याही अभियांत्रिकी कारखान्यात पदविकाधारक व पदवीधारक यांच्यात फक्त प्रवेश देतानाच तफावत असते पण त्यानंतर कामाच्या कुशलतेवरच पुढील प्रगती ठरते..बऱ्यच वेळा कारखान्यात चीफ इंजिनिअर पदविकाधारक तर त्याच्या हाताखालील इंजिनिअर पदवीधारक असत.माझ्या मित्राच्या पदविकाधारक मुलाचे काम चांगले होत असल्याने त्याला त्याच्या कारखान्यात चांगला वाव मिळाला.त्याचे वरिष्ठ त्याच्या कामावर खूष होते.त्याला पदोन्नतीही मिळत गेली.
           मधल्या काळात महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती विशेषत: तंत्रशिक्षणाची योग्य दिशेने होत नाही याचा साक्षात्कार बऱ्याच  शिक्षणतज्ञांना  होऊ लागला. महाराष्ट्रात त्यावेळी चार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये होती. शिवाय नागपूरला रीजनल इंजिनिअरींग कॉलेज होते, पण त्यावेळी कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना या कॉलेजात प्रवेश न मिळाल्याने   बेळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात देणगी देऊन  प्रवेश घेता येत असे..त्यावेळी जास्त वाटणारी फी आताच्या मानाने फारच क्षुल्लक म्हणजे १००००रु.होती.माझ्याच दुसऱ्या मित्राच्या मुलाने असा प्रवेश घेतलाही होता. मध्यंतरी काही वर्षे अभियांत्रिकीला फारच कमी विद्यार्थी येत होते.रत्नागिरी शासकीय
पॉलिटेक्निकला तर प्रवेश घेतला तर वसतीगृह मिळण्याची हमी अशी जाहिरात करावी
लागत होती.त्यामुळे ही भाकड गाय आहे असा राज्यकर्त्यांचा समज झाला होता. त्यामुळे खाजगी महाविद्यालय काढण्यात फारसा रस शासनातील कोणाला नव्हता. त्यानंतर  अचानक अभियांत्रिकीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. ही गोष्ट १९८० च्या आसपासची आहे.महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील काही व्यक्तींना आपल्या विद्यर्थ्यांना शेजारील राज्यात जावे लागते याचा ,त्यापेक्षा आपला फायदा शेजारील राज्यास होत आहे याचा अधिक विषाद वाटू लागला व त्यानी खाजगी अभियांत्रिकी काढण्याचा प्रस्ताव शासनाच्या गळी उतरवला.अर्थातच तंत्रशिक्षणमंत्री,संचालक याना त्यात आपला फायदा होण्याची शक्यता आहे याचा वास लागला व औरंगाबादलाही एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फी बरीच कमी म्हणजे सत्राला १००० रु.होती तर खाजगी महाविद्यालयात त्याच्या दहापट होती.पण आता पैसेवाले पण  कमी गुणसंख्या असणारे विद्यार्थी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकल्याने तिकडे आकर्षित होऊ लागले शिवाय उत्तरेकडील व दक्षिणेकडील काही राज्यात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये नसल्याने त्यांचाही लोंढा सुरू झाला.
    माझ्या मित्राच्या ज्या मुलाला पदविका पास झाल्यावर पदवीसाठी प्रवेश मिळाला नव्हता त्याला आता औरंगाबादमधीलच खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली.अगोदर सांगितल्याप्रमाणे तो औरंगाबादमधील एका कारखान्यात चांगला रुळला होता व पगारही चांगला मिळवू लागला होता.तरीही ही संधी दिसल्यावर माझ्या मित्राच्या मनात आपल्या मुलाने नोकरी सोडून या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षास प्रवेश घ्यावा असे आले. मी व आमच्या  आणखी एका मित्राने त्याला एकदा नोकरीत शिरल्यावर यंत्र अभियांत्र्की पदवी व पदविकाधारकात काही फरक नसतो कदाचित तुझ्या मुलाच्या हाताखाली पदवीधर विद्यार्थी काम करायला लागतील  आता तुझा मुलगा चांगला मार्गाला लागला आहे तेव्हां त्याला त्याच्या मार्गापासून उगीच ढळवू नको असा सल्ला दिला.पण त्याला  तो पसंत पडला नाही.त्यावेळी पदवीच्या अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्याने तो रडला होता,आता मला आर्थिक दृष्ट्या शक्य आहे तेव्हां मी त्याला पुढे शिकवण्याचे कर्तव्य पार पाडणार असा त्याने हट्टच धरला.त्याच्या मुलाचा काय विचार होता ते आम्हाला कळले नाही पण तोही बापाच्या आग्रहास बळी पडला व चांगली असलेली नोकरी सोडून त्याने  खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षास प्रवेश घेतला.   
      मध्ये चार वर्षे अभ्यासाची सवय मोडल्यामुळे की काय कॉण जाणे पण त्याचे चित्त नंतर अभ्यासात लागले नाही व त्या वर्षी तो कसा बसा पास झाला.त्यानंतरही त्याला अभ्यासाचा ताण सहन झाला नाही व एक वर्ष नापास होत त्याने पुन्हा पदवी प्राप्त करण्यासाठी चार वर्षे घेतली.त्यातही पहिल्या प्रयत्नात पास न होणे व प्रथम वर्ग न मिळणे यामुळे त्याला नोकरी मिळायलाही त्रासच झाला.म्हणजे त्याने नोकरी सोडून न देता त्याच कंपनीत काम करत राहिला असता तर तेथे उच्च अधिकारी झाला असता कारण त्याच्या पदरी सात आठ वर्षाचा अनुभव जमा झाला असता. किंवा आणखी चांगल्या कंपनीतही आणखी उच्च पदाचा लाभ त्याला झाला असता. आता मात्र  त्याला अगदी खालच्या पदावर पुन्हा सुरवात करावी लागली.त्यानंतर घसरलेली त्याची गाडी पुन्हा कधीच योग्य मार्गास लागली नाही. शेवटी प्रत्यक्ष फॅक्टरीतील कामाचा अनेक वर्षाचा अनुभव असूनही व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही आज तो एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो प्राध्यापक आहे.
           माझा तिसरा अनुभव या अनुभवाच्या बरोबर उलट स्वरुपाचा आहे.यात मला सल्ला विचारणारे माझ्या नुकत्याच परिचयाचे झाले होते.आमच्या एका नातेवाइकाच्या लग्नप्रसंगी त्यांचा परिचय झाला होता.त्यांचा मुलगा त्यावेळी तंत्रनिकेतनात विद्युत शाखेत पदविका शिक्षण घेत होता. त्याला अंतीम वर्षास प्रथम वर्ग मिळाल्यावर मला पेढे देण्यास ते पालक घरी आले व आता पुढे काय करणार असा विषय निघताच आता मुलाने म.रा.विद्युत मंडलात नोकरी करावी असा त्यांचा कल दिसला.व तश्या नोकऱ्या उपलब्ध होत्या.पण आता खाजगी अभियांत्रिकी माहाविद्यालये निघाली होती व अंतीम वर्षात प्रथम वर्ग मिळवणाऱ्या  विद्युत पदविकाधारकांना इलेक्ट्रॉनिक शाखेत पदवी करण्यासाठी प्रवेश मिळत असे.त्यामुळे त्याना आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर त्यानी लगेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेश घ्यावा असा सल्ला मी दिला.त्याला पुस्तकांची मदत मी करेन असेही आश्वासन मी दिले 
    त्या गृहस्थाना माझा सल्ला पटला व त्यानी खरोखरच खाजगी महाविद्यालयात आपल्या मुलाला इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेश दिला व त्या मुलानेही माझ्याकडून पुस्तकांची मदत घेऊन चांगला अभ्यास केला व प्रथम वर्गात इलेक्ट्रॉनिक शाखेचा पदवीधर झाला.लगेचच त्याला सिंगापूरला चांगल्या नोकरीची संधी प्राप्त झाली.ते गृहस्थ पुन्हा केव्हांही भेटले की माझ्या सल्ल्यामुळे आपल्या मुलाचे खरोखरच कसे कल्याण झाले हे मनमोकळेपणे मला व इतरांनाही सांगत.
    हे अनुभव नमूद करण्याचा उद्देश माझा सल्ला कसा बरोबर असतो हे दर्शविण्याचा नसून कोणताही निर्णय घेताना कोणता विचार महत्वाचा ठरतो एवढेच नमूद करण्याचा आहे.त्याचबरोबर जे जे आपणा ठावे ते ते इतरां सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन हाही विचार त्यामागे आहे.