दिवाळीचे दिवस

                "दिन दिन दिवाळी । गाईम्हशी ओवाळी॥ गाईम्हशी कोणाच्या ।लक्ष्मणाच्या ।लक्ष्मण कोणाचा आईबापाचा॥"
आणखी अशीच बरीच गाणी म्हणत संध्याकाळच्या दिवेलागणीच्या वेळेस आपली गुरे घेऊन दारात  गुराखी दिसू लागले की दिवाळी सुरू झाल्याची वर्दी मिळत असे. दिवाळीचा खरा आनंद बालवयातच मिळतो हे तर निश्चीतच ! कारण मोठेपणी, निदान सध्याच्या काळात तरी तो उपभोगायला वेळच नसतो. आमच्या लहानपणी त्यामानाने बरीच स्वस्थता असल्याने मोठ्यांनाही त्यात भाग घेणे शक्य असे. 
     .राजाच्या घरी नेहमीच दिवाळी या म्हणीनुसार आजच्या मुलांना लाडू, शेव; करंज्या; चकल्या वर्ष भरात केव्हांही उपलब्ध असतात त्यामुळे त्याना त्यांचे काही अप्रूप नसते. आणि त्याच बरोबर त्यांच्या आवडीही बऱ्याच बदलल्या आहेत त्यांना पिझ्झा,पास्ता व नूडल्स अश्या पदार्थांची अधिक आवड असते  आमच्या लहानपणी मात्र करंज्या,चकल्या,शंकरपाळी आणि कडबोळी हे पदार्थ म्हणजे दिवाळीतच मिळणार हे ठरलेले असायचे.लाडू हा पदार्थ मात्र वर्षातून मधून मधून वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होत असे.
       दिवाळीच्या अगोदर बरेच दिवस तयारी करण्यात आई गुंतलेली असे. अगदी सुरवातीला तर  तयार रवाही मिळत नसे; आणि गहू ओलवून त्याचा रवा तयार करण्याची क्रिया बरीच कष्टदायक व वेळकाढू असे,तशीच चकल्या कडबोळ्यांसाठी भाजणी तयार करण्याची कृतीही ! !.त्यावेळी निदान पिठाच्या चक्क्या तरी नुकत्याच सुरू झाल्या होत्या नाहीतर या सगळ्यांची पिठे जात्यावर दळणे म्हणजे तर किती कष्टाचे काम असेल याची कल्पनाच आजच्या गृहिणींना करणे अशक्य,शिवाय घरात माणसेही कमी नसत.त्यामुळे आमच्याच कुटुंबास लागणारे पदार्थ तयार झाल्यावर ठेवायला सुद्धा पत्र्याचे मोठे  डबे लागत.शिवाय दिवाळी संपण्याच्या सुमारास घरी मित्रमंडळींना फराळाला बोलावण्याची पद्धत असे आणि त्यासाठीही बरेच पदार्थ लागत.
   इतक्या मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ तयार करणे एकट्या आईला शक्य नसे त्यामुळे काही प्रकारात आमच्या मदतीची तिला आवश्यकता असेच.त्याची सुरवात पिठाच्या गिरणीपासून होत असे. दळणाचा पण एक खास डबा असे. .गिरणीत दिवाळीच्या अगोदर सर्वच जणांची गर्दी असे आणि डबा ठेऊन जाण्याची सोय नसे कारण आपला डबा कोणीही गायब करण्याची शक्यता असे त्यामुळे त्यावर लक्ष ठेऊन उभे रहावे लागे.रवा,भाजणी अश्या खास पदार्थांसाठी चक्कीवर काम करणाऱ्या माणसाला खास सूचना देऊन ते भरडायचे आहे किंवा ती भाजणी आहे,.किंवा आपले धान्य टाकण्यापूर्वी व नंतरही त्याच प्रकारचे धान्य असेल म्हणजे गव्हावर गहू किंवा भाजणीवर भाजणीच पडेल याची दक्षता घ्यावी लागे व आपल्या धान्याच्या पिठात दुसऱ्या प्रकारच्या पिठाची  मिसळ होणार नाही याची काळजी घ्यावी लागे.अशी कसरत मला जमत नसली तरी मोठ्या बहिणी बरोबर धान्याचा दुसरा डबा घेऊन जाण्याचे काम मी निमूटपणे करीत असे व योग्य त्या सूचना ओरडून देण्याचे काम ती करत असे.     
   प्रत्यक्ष चकल्या किंवा कडबोळी वा करंज्या करताना.त्यात श्रमविभागणी होत असे.म्हणजे करंज्यांची पाती लाटणे हे काम एकाकडे,त्यात सारण भरणे दुसऱ्याकडे त्यातील करंजीच्या कडा कापणे हे काम माझ्याकडे असे.शेवटचे तळण्याचे काम आईकडे असे.लाडू वळण्यात थोडाफार हातभार मी लावत असे. कामाला हातभार लावताना मधून मधून करंजीचे सारण किंवा नुकत्याच तळलेल्या कडबोळ्याचा घास मटकावणे हाही हेतू असायचा.
   स्वतंत्रपणे करण्यासारखे व ज्यात आम्हा सर्व भावंडांना भाग घेता येई असे काम म्हणजे किल्ला करण्याचे.व तेही पदार्थ करण्यासारखेच दिवाळीपूर्वीच सुरू करावे लागे.त्यासाठी आम्हाला उचलता अथवा ढकलत नेता येईल असे अंगणात पडलेले दगड व असल्यास विटा गोळाकरून त्यावर जुनी पोती टाकून त्यावर जवळच्या सॉ मिलमधून खाली पडलेला भुसा आम्ही गोळा करून आणायचो व अगोदर शेणाचा सडा पोत्यांवर टाकून त्यावर त्या भुशाला हिरवा रंग देऊन त्यावर पसरायचा.किल्ल्याला अर्थातच पायऱ्या असायच्या.किल्ल्याचा भाग तटबंदीसह कार्डबोर्डच्या सहाय्याने बनायचा व आत असल्यास शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला जायचा.किल्ल्याव्रील शिपाई मातीचे विकत घेणे परवडत नसल्याने कार्डबोर्डचेच कापून केले जात व छोटी मोठ्ठी घरे त्याच पद्धतीने बनून किल्ल्याच्या आजूबाजूस प्रस्थापित होत.किल्ल्यासमोरील दिवे अर्थातच छोट्या पणत्यांचे असत.
    आणखी एक आम्हालाच करता येण्यासारखे काम म्हणजे आकाशदिवा बनवण्याचे असे.तेही दिवाळीपूर्वीच सुरू करावे कागे.त्यासाठी बांबूच्या काड्या आणून त्या व्यवस्थित तासून नंतर योग्य तेवड्या लांबीच्या कट करून त्यांचा योग्य प्रकारे बांधून ढाचा तयार करणे व त्यानंतर त्यावर योग्य त्या रंगाचे चुरमुरे अथवा जिलेटिन कागद चिकटवणे.मध्ये खळ तयार करण्यासाठी आईची मदत घ्यावी लागे.शेवटचे काम म्हणजे घराच्या पत्र्यावर चढून तो आकाशदिवा योग्य ठिकाणी अडकवणे. घरातील इलेक्ट्रिक पोइंट्पासून त्या आकाशदिव्यात सोडण्यासाठी योग्य त्या लांबीची वायर शोधून त्यात इलेक्ट्रिक बल्ब सोडला व घरातून बटण दाबल्यावर तो लागला की जीव भांड्यात पडायचा.कारण इतक्या लांबीची सलग वायर घरात कोठली असायला त्यामुळे दिवा लागला नाही की बरेच तुकडे जोडून केलेल्या त्या तारेच्या गुंडाळीतून जोड कुठे ढिला आहे हे शोधत बसायचे मोठेच काम असे.      
      नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे अगदी लवकर उठण्याचा प्रयत्न असे.आई तर रात्री झोपत तरी असे की नाही कोणास ठाउक.कारण सर्व मुलांना व वडिलांना भरपूर मिळेल इतके पाणी तापवणे हा मोठाच कार्यक्रम असे.त्यातही नळाचे पाणी घरात नव्हते व सगळे पाणी आडावरूनच ओढावे लागे त्यावेळी तर तिची मोठी कसोटीच असे.थॉडीफार मदत मोठ्या बहिणींची व वडिलांची होतही असेल. स्वयंपाकघरात पाट मांडून त्याभोवती रांगोळी घालूनच ठेवलेली असे त्यावर मला बसवून सुगंधी तेल अंगाला आई लावून देणार.मी अंग कितीही चोळून घ्यायला तयार असे त्यामुळे आई खूष असे.पण पुढे मात्र जरी तेल लावण्याची तिची हौस गेली नसली तरी "आता जोर लावता येत नाहीरे" असे उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडत. अंगणात तट्याचा आडोसा करून अंघोळीची जागा तयार केलेली.त्यात त्या वेळी दिवाळीत थंडीही चांगलीच कडक पडत असे त्यामुळे अगदी कडकडीत पाणी आईने वापरले तरी पहिला तांब्या डोज्यावर पडल्यावर ओवाळण्याची तिने कितीही घाई केली तरी थंडीने अगदी हुडहुडी भरून दात थडथड वाजू लागत.तिचे ओवाळणे झाल्यावर मग एकदम कढत पाणी अंगावर घ्यायला मजा येई.पहिली बादली संपली की लगेच दुसरी बादली भरायची तिची तयारी असायचीच.उटणे व सुगंधी साबणाने स्नान झाल्यावर मग नव्या कपड्य़ांची घडी मोडण्याची घाई असायची कारण नवे कपडे त्यावेळी फक्त दिवाळीतच मिळणार.
    शोभेची दारू उडवण्याची हौस तर असायचीच पण त्यासाठी लागणाऱ्या पैशाचा घरात ठणठणाटच असायचा.पण अंघोळ झाल्यावर हातात पावलीचे एक नाणे पडायचे, त्यातून रंगीत उजेड पाडणाऱ्या काड्यांची एक पेटी,एक टिकल्यांची डबी व एक फुलबाजाची पेटी एवढी दारू आणून मग धाकट्या भावंडाच्या अंघोळीच्या वेळी उडवायची.त्यावेळी त्रिकोणी आकाराचा एक उडवायच्या दारूचा प्रकार असे,त्याला कनकावळा म्हणत. तसे चारपाच कनकावळे आणले तर ते लगेचच संपून जायचे.पण आवाज काढण्याची हौस तेवढ्यावर न भागल्यामुळे माझ्याहून मोठ्या बहिणीने कागदाची विशिष्ट प्रकारे घडी करून हवेत फिरवून फटाक्यासारखा आवाज काढण्याची युक्ती शोधली होती.आणलेले कनकावळे संपल्यानंतर तसले फटाके करून त्यांचा आवाज काढत ती अगदी मोठ्यांदा ,"हं हे घे फटाके आणि उडव " म्हणून त्या कागदी फटाक्याचा आवाज काढीत असे ज्यामुळे शेजाऱ्यांना वाटावे यांच्याकडे बरेच फटाके आणले आहेत.अर्थात शेजाऱ्यांना आम्ही किती फटाके उडवले याची काहीच फिकीर नसायची ती गोष्ट वेगळी.
    त्यानंतर गावातील देवीच्या देवळात जाऊन यायचे व मग त्यानंतर लाडू करंज्यांचा फराळ व त्यानंतर वाचनालयात जाऊन काही दिवाळी अंकांचे वाचन !.आमचे एक शेजारी त्यादिवशी बरीच पुस्तके आणून वाचायला आम्हाला बोलावत व लाडू करंज्या किंवा फटाक्यापेक्षा त्यांचेच आकर्षण अधिक वाटे.
   आमच्या गावात कलाकार मंडळी बरीच होती त्यातील काही राजदरबारी हजेरी लावत पण आमच्याकडे मात्र एक कलाकार हजेरी लावे तो म्हणजे टोमदेव घडशी म्हणजे वाद्ये घडवणारा.त्याला बहुतेक जण टोम्याच म्हणत.वाद्ये घडवणे फावल्या वेळात करून तो अंबाबाईया देवळात पहारा देण्याचे व तासाचे टोल देण्याचे काम करीत असे..आमच्या घरातील वाद्य बिघडले की त्याची दुरुस्ती तोच करणार.म्हणजे तबल्याला पूड चढवणे अथवा वाद्या घालणे वगैरे तसेच हार्मोनियम दुरुस्तीचे कामही त्याला जमे.त्याच्याकडून आमची वाद्यॅ बरेचदा दुरुस्त केली  जात त्यामुळे आम्ही संगीतप्रेमी आहोत हे त्याला माहीत असल्याने बहुधा दिवाळीतील एका दिवशी तो सनई ,पेटी व तबला या वाद्यासह आमच्या घरी हजेरी लावत असे. आमच्या गावातील एकमेव ब्रास बॅंड मौला खलिफा या क्लेरोनेट वादकाने काढला होता.त्याचा मुलगा आताउल्ला आमच्याच शाळेत होता.एकाद्या दिवाळीत माझे वडील त्यालाही हजेरी द्यायला बोलावत.या वादकांना अर्थातच वडील आपल्या कुवतीनुसार मानधन देतच शिवाय दिवाळीच्या फराळाचे पदार्थही त्याना देत.
     याशिवाय आणखी एक उपक्रम मीच स्वत:ला लावून घेतला होता.भाउबीजेला वडिलांनी हातावर ठेवलेला रुपाया भाऊबीजेस ओवाळणी म्हणून बहिणींनी ओवाळल्यावर तबकात टाकावा लागे.पण मला आपण स्वत: काहीतरी द्यायला हवे असे वाटायचे.त्यासाठी मी मधून मधून काहीतरी खरडत असतो हे माहीत झाल्यामुळे माझ्या एका बहिणीने मला उपाय सुचवला की तू स्वत: लेख वगैरे लिहून छोटे मासिक तयार करून आम्हाला ओवाळणी म्हणून देत जा.हा विचार आवडल्यामुळे तीन बहिणींना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार वेगवेगळ्या आकाराची मासिके तेही त्यात लेख, कथा व कविता स्वत:च लिहून व त्याला रंगीत कागदाने सजवून त्यांना भाउबीजेच्या दिवशी देण्यात एक वेगळीच खुमारी असे.ओवाळण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर त्या मासिकांच्या वाचनाचा कार्यक्रम पार पडायचा. माझ्या त्या बहिणीला नृत्य अभिनय यांची आवड व अंग असल्याने आमच्या घरातील व वाड्यातीलही मुले गोळा करून ती त्यांचे काहीतरी कार्यक्रम बसवी व त्यांचे प्रयोगही शेवटच्या दिवशी वाड्यातील सर्व प्रेक्षकवृंदासमोर केले जात असे..
.     दिवाळीसाठी लागणाऱ्या पैशाची व करावयास लागणाऱ्या श्रमाची चिंता आम्हाला करायचे कारण नव्हते.त्यामुळे दिवाळीत नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन किंवा पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आल्यामुळे दिवाळीचा एक दिवस कमी झाल्याचे फारच दु:ख होई उलट मध्ये एकादा भाकड दिवस आल्यामुळे दिवाळी एक दिवस लांबली की मात्र आनंद होई.त्याचबरोबर दिवाळी संपल्यावर आता पुढची दिवाळी यायला एक वर्ष राहिले अशी दु:खद जाणीव पण व्हायची.त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आता दिवाळीला एक वर्षाला एक  दिवस कमी अशी कालगणना काही दिवस चालायची पण मग काही दिवसांनी ती बंद पडे कारण मग अभ्यासादी इतर बरेच व्याप मागे असत.अशी मध्ये ती बंद पडायची आणि मग एकदमपुढची दिवाळी आल्याची सुज्गद जाणीव व्हायची  ती दिन दिन दिवाळी हे शब्द कानी पडल्यावरच !  .