आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू!

आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू!

आस्तिक आणि नास्तिक... दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू. वरवर दिसायला विरोधपूर्ण वाटतात आणि म्हणून तर ह्यांमध्ये एवढे विवाद आणि संघर्ष. आस्तिक आणि नास्तिकामधील भांडण हे असे.... पाहा…
दोन लहान मुली छानपैकी भातुकली खेळत आहेत आणि अचानक दोघींमध्ये भांडण सुरू झाले... 
भांडण आणि रडारड ऐकून आई धावत आली. म्हणाली अगं काय झाले, का भांडत आहात? एक मुलगी म्हणाली दुसरीने माझ्या बाहुलीला थप्पड मारली. दुसरी मुलगी तात्काळ म्हणाली की हो मी थप्पड मारली कारण ही माझ्या बाहुलीला दुष्ट म्हणाली. आई ह्या दोघींकडे पाहतं राहिली आणि म्हणाली अगं पण तुमच्या दोघींच्या हातामध्ये तर काहीच नाहीये... कोठे आहेत तुमच्या दोघींच्या बाहुल्या? दोन्ही मुलीने आप-आपल्या हातात धरलेल्या 'काल्पनिक' बाहुल्या आईला दाखवल्या. आईने हसून दोघींच्या बाहुल्यांना 'काल्पनिक' चॉकलेट्स दिली आणि दोन्ही मुली खूश होऊन पुन्हा एकदा भातुकली खेळायला लागल्या.Lol जसे हे भातुकलीमधली भांडण म्हणजे लहान मुलांचा लहानपणीचा खेळ तसाच मोठ्या मुलांचा मोठ्यापणीचा 'आस्तिक-नास्तिक' भांडणाचा खेळ आहे की काय!? :-)

आस्तिक आणि नास्तिक... एकाच नाण्याच्या दोन बाजू. आस्तिकाची 'देवा'वर श्रद्धा आहे तर नास्तिकाची 'मी'वर (स्वतःच्या मन-बुद्धीवर). म्हणजे एकूणच कशावर तरी श्रद्धा आहेच ना? दुसर्‍या अंगाने पाहिले तर आस्तिकाचा 'मी'वर संशय आहे आणि नास्तिकाचा 'देवा'वर. म्हणजे कशावर तरी संशय आहेच ना? पण ही श्रद्धा किंवा हा संशय ज्याच्या-त्याच्या 'मी' आणि 'देव' ह्यांच्या व्याख्यांवर अवलंबून आहे ना??? मग ह्या दोन्हीच्या मानलेल्या व्याख्या तरी काय आहेत? सामान्यतः दिसून येते ती 'मी'ची व्याख्या म्हणजे 'मन-बुद्धी-देहरूपी आकार म्हणजे मी' आणि देवाची व्याख्या म्हणजे 'साकार व्यक्तिरेखा'  (उदा.: जीसस, राम, कृष्ण, महावीर, बुद्ध इत्यादी). पण 'मी' आणि 'देव' ह्या दोन संज्ञा म्हणजे खरोखरीच मी किंवा देव आहेत का आणि त्या एकमेकांपासून खरंच भिन्न/वेगळ्या आहेत का?? 

'मी' आणि 'देव' हे दोन शब्दप्रयोग म्हणजे १६ तासाच्या जागेपणीच्या स्वप्नामधील दोन 'उपयुक्त' मान्यता, कल्पना, आधार ... गृहीतक (हैपॉथेसिस). जसे पहिलीमधील मुलाला 'ग' शिकवण्यासाठी 'ग'णपतीचे चित्र दाखवतात ना तसे. पण मग ह्या दोन्हीही मान्यता कशा काय?? मान्यता म्हणजे मानलेल्या... मानलेल्या म्हणजे मनावर आधारीत... मन आहे म्हणून मान्यता... पण हे 'मन' निर्मीत कधी झाले ते तरी पहा. जन्म झाल्या-झाल्या हे 'मन' उपस्थित होते का?? दोन-तीन वर्षांपर्यंत मनाची निर्मिती झालेली नव्हती ना आणि म्हणूनच ह्या दोन्ही (मी किंवा देव) मान्यतांची/आधारांची निर्मितीही झालेली नव्हती कारण त्यांची तोपर्यंत गरजही नव्हती. आणि तरीही ह्या दोन्ही मान्यतांच्या अनुपस्थितीमध्येही त्या दोन-तीन वर्षांच्या देहाला आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पुरवठा आपसूक होत होताच ना... का नाही?? :-)

कोठलीही कल्पना...गृहीतक वापरून 'बंधनाच्या मूळ कल्पनेचा' समूळ नाश होणे महत्त्वाचे. स्वतःला स्वतःची ओळख होणे महत्त्वाचे. स्वतःची मानलेली खोटी ओळख मिटून खरी ओळख होणे महत्त्वाचे. 'मी' कोण आहे हे जाणणे महत्त्वाचे. कारण मनुष्याचे सर्व वाद-विवाद, दुखः, चिंता, भय त्याच्या स्वतःबद्दलच्या मानलेल्या कल्पनेवर आधारित आहेत. म्हणूनच कोठलेही धारणा वापरून "आपल्याच निर्गुण, निराकार, निराधार, अद्वैत स्वरूपाची ओळख झाली" की झालेना काम!! ज्याची-त्याची आवड, नैसर्गिक रुची, ओढ इतकेच! ८ तासाच्या झोपेमध्ये ह्या दोन्हीही कल्पनांचा नुसताच अभाव नसतो तर त्यांची आठवण किंवा गरज पण भासत नाही आणि तरीही हेच झोपेचे ८ तास प्रत्येकाला जागेपणीच्या १६ तासांपेक्षाही हवेहवेसे वाटतात का नाही? हा आस्तिकाचा आणि नास्तिकाचाही रोजचा अनुभव आहे ना? :-)

"तुमची देवावर श्रद्धा आहे का?" ह्या प्रश्नाला तत्क्षण आस्तिक 'हो' उत्तर देतो तर नास्तिक 'नाही' म्हणतो. पण ह्या दोघांचीही ही उत्तरे आप-आपल्या वैयक्तिक व्याख्यांवर/मान्यतांवर अवलंबून आहेत ना हो!!!! मग दोघांमध्ये खरंच गुणात्मक काही फरक आहे का?? कारण दोघांचीही आपल्या 'वेगळेपणावर'/ द्वैतावर श्रद्धा आहे. आपण समग्र अस्तित्वाच्यापेक्षा (Existential Reality/ Non-dual Existence/ God) 'वेगळे' आहोत, आपण फक्त ‘मन-बुद्धी-'देह' रुपी आकार आहोत ह्यावर श्रद्धा आहे आणि म्हणून तर दोघेही सुरुवातीला बंधनातच आहेत. सुख-दुःखाच्या भोवर्‍यातच अडकले आहेत कारण दोघेही 'वेळ आणि अवकाश' (Concept of Time & Space) ह्या संकल्पनांच्या बंधनातच आहेत.:-)

मात्र ज्याला आपण भोवर्‍यात अडकलेले आहोत हे कळायला लागते तेव्हा खरा शोध आणि प्रवास सुरू होतो. ज्याच्याकडे नैसर्गिकरीत्या जे-जे भांडवल असते ते उपयोगाला आणले जाते. "श्रद्धा किंवा संशय" ही दोन प्रमुख भांडवले. ह्या दोन भांडवलांमध्ये भांडण असण्याचे खरे तर काही कारणच नाही. एक नक्की की हा आस्तिक-नास्तिकामधील ह्या दोघांमधला बाह्य संघर्ष नसून तो ह्या प्रत्येकाच्या अंतरंगात उपस्थित द्वैतभावाशी असलेला संघर्ष आहे म्हणजे स्वतःच्याच कल्पनेशी संघर्ष आहे ना! जो पर्यंत ह्या दोघामध्येही द्वैतभावावर श्रद्धा आहे तो पर्यंत संघर्षहीन सहज, सरल, अद्वैत-बोध होणे शक्य नाही... हे नक्की. :-)

आस्तिक आणि नास्तिक... एक जण पूर्वेकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करू पाहतं आहे तर दुसरा पश्चिमेकडून...! पोचणार दोघेही... फक्त स्वतःकडे आत्यंतिक प्रामाणिकता आणि कळकळ हवी. "श्रद्धा आणि संशय" हे जसे जपाच्या एकाच माळेतील एका मागे एक फिरणारे दोन मणी आहेत. कोठला मणी कशाच्या मागे फिरला तरी जपामध्ये काय फरक पडतो ??? कधीतरी दोन्ही मण्यांच्यामधून ओवला गेलेल्या स्तब्ध दोर्‍याकडे (अद्वैत तत्त्वाकडे) लक्ष जाईलच ना! "श्रद्धा आणि संशय" ह्या जणू नोटांच्या बंडलामधील दोन नोटा आहेत ज्या त्या वेळेपुरत्या कामचलाऊ आहेत पण सद्वस्तूची (बोध) खरेदी होणे महत्त्वाची मग कोठल्या नोटेने सद्वस्तू प्राप्त झाली हे गौण आहे. "श्रद्धा आणि संशय" म्हणजे जणू दोन जुळी भावंडे आहेत ज्यांचे 'आई-वडील' "एकच" आहेत. पाण्यातील नाव/होडी एकाच वल्ह्याने पुढे जाईल का... कधी किनारा पार करेल का? तिला कदाचित पुढे जाण्याचा भास होऊन ती जागच्या जागीच गोल-गोल फिरत बसेल ना? :-)

नदीचे जसे दोन किनारे तसे "श्रद्धा आणि संशय" हे दोन घाट जे वर-वर दिसायला परस्पर विरोधी दिसतात पण खरे तर परस्पर-पूरक आहेत. नदीचे सर्व पाणी जेव्हा ओसरून जाते तेव्हा 'हा काठ' आणि 'तो काठ' ह्या कल्पनाही ओसरून जातात ना... का नाही? नदीमध्ये पाणी नसताना 'दोन' हा विषयच उरत नाही आणि 'एक' ह्या कल्पेनेचीही आवश्यकता भासत नाही. कोठल्याही घाटावरून नदीमध्ये उतरता येतेच ना...? नक्कीच येते पण सुरुवात कोठल्याही घाटावरून झाली तरी काठ (कल्पना) सुटल्याशिवाय नदीमध्ये मुक्तपणे पोहता येईल का...? काठ (कल्पना) स्थिर आहेत तर नदी (जीवन) प्रवाहीत आहे.... कोठलाही काठावरील हात सुटल्याशिवाय पोहता येणे शक्य नाही. काठावरचा आपला हात घट्ट पकडून नदीच्या पाण्यामध्ये पाय मारत बसणे ह्याला अभ्यास म्हणतात.... आधारीत अभ्यास. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत हा आवश्यकच आहे. 

ज्याला खरंच पोहायला शिकायचे आहे त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार, निष्णात पोहणारा मार्गदर्शक (सद्गुरू) नक्कीच भेटतो. पण पुन्हा व्याख्येच्या गोंधळापायी जर कोणाला त्याची (गुरु शब्दाची) ऍलर्जी असेल तर, "अध्यात्मामध्ये गुरुची बिलकूल गरज नाही" असे सांगणारा तरी कोणी गुरु नक्कीच भेटतो. सर्व गोंधळ शब्दांचा आणि त्यामध्ये मनाने भरलेल्या शब्दार्थांच्या मसाल्याचा (व्याख्येचा)... आपल्या मनात जे आहे, आपले लक्ष जेथे आहे ते आपल्याला दिसणार हे निश्चित. Lol

अभ्यास/ साधना म्हणजे बोधापर्यंत पोचण्याची पूर्व तयारी आहे. पण जन्मभर फक्त अभ्यासच करत बसणार का हो का काठावरचा हात सुटून बोधप्राप्ती करून घेणार??? अभ्यास पूर्ण झाला की आधारांची गरज लागत नाही ना! रांगणार्‍या बाळाला चालायला शिकवण्यासाठी 'पांगूळगाडा' (Walker) दिला जातो. चालायला लागल्यावर तो पुन्हा वापरला जातो का?? पोहायला शिकताना कंबरेला हवा भरलेली ट्यूब बांधली जाते. पोहायला आल्यावर तीच ट्यूब निरर्थक होते ना! मग उरते मुक्त पोहणे... सुख-दुखा विरहित मुक्त जीवन! पण जेव्हा पोहता यायला लागते (आपल्याच निराधार स्वरूपच सत्य-नित्य बोध होतो) तेव्हा काठावरचा हात सहज सुटून जातो (वेगळेपणाच्या कल्पनेचा र्‍हास होतो) तेव्हा 'उमजते' की काठांविषयीची भांडणे हा केवळ पोरखेळ होता आणि पोरखेळातच बरेच आयुष्य उगीच वाया गेले.

श्रद्धा असो वा संशय दोन्हीपैकी कोठलेही जर १००% उपस्थित असतील तर 'बोध' तात्काळ आहे परंतु आजच्या काळात तुकारामांसारखा अढळ श्रद्धा असणारा भक्त किंवा शंकराचार्यांसारखा अती-तीक्ष्ण ज्ञानी साधक मिळणे जरा दुर्लभच आहे. म्हणूनच श्रद्धा आणि संशय हे जणू आपले दोन पाय किंवा दोन डोळे असे लक्षात घेतले तर दोन्हींचा उपयोग होऊ शकतो. आपल्याकडे दोन पाय उपलब्ध असताना उगीचच एकाच पायाने लंगडी घालत का वेळ घालवायचा??? उगीचच दोन पायांची आपापसात लढाई कशासाठी??? Lol लक्ष हवे साध्यावर जसे अर्जुनाचे पक्षाच्या डोळ्यावर होते म्हणतात तसे. लक्ष हवे रोग मिटण्यावर... कोणते औषध काम करेल काय फरक पडतो का? :-)

श्रद्धाळू साधकामधील 'वेगळेपणाचा भास' जसा शेवटी विवेक साधल्यावर (साधल्यावर नव्हे) नाहीसा होतो तसाच संशयी (बुद्धीआधारित/ ज्ञानमार्गी) साधकासाठी त्याच्यामधील "संशय घेणार्‍यावरच जर संशय' घेतला गेल्यास (Doubt the Doubter@) हाच 'वेगळेपणाचा भास' नक्कीच नाहीसा होऊ शकतो.... 'बोध'' म्हणजे श्रद्धा आणि संशय अश्या दोन बाजू असलेल्या नाण्याचे कायमचे विसर्जन! 

"श्रद्धा आणि संशय" ह्या जणू दुधारी तलवारीच्या दोन बाजू. ज्याला खरंच सुख-दुःखाच्या भोवर्‍यातून मोकळे व्ह्यायचे आहे... ज्याची मरायची खरंच तयारी आहे (म्हणजे 'मी' ही कल्पना, जी नाहीये तीच मरणार आहे... स्वतःबद्दलचे गैरसमज/कल्पना नष्ट होणार आहेत) आणि तशी तळमळ आहे त्याच्यासाठी कोठल्याही एकाच धारदार बाजूचा आग्रह कशासाठी??? Lol

शून्याचा पाढा कधी कोणी पाठ करतो...? शून्य एके शून्य ... ह्यावर कोणीही श्रद्धा ठेवतो अथवा संशय घेतो??? सूर्य आहे ह्यावर कोणी श्रद्धा ठेवतो किंवा त्याबाबत संशय घेतो???? "मी आहे" ह्या प्रत्येकामध्ये उपस्थित जाणिवेवर कधी कोणी श्रद्धा ठेवतो अथवा संशय घेतो??? "तू जिवंत आहेस का?" हा प्रश्न कोणालाही विचारला गेल्यास तात्काळ "हो" असेच उत्तर येते ना.... का विचार (मन-बुद्धी वापरून) करून सांगतो असे उत्तरे येते??? "जे आहे ते आहेच" ही प्रत्यक्ष स्वानुभूती म्हणजेच आत्मबोध, जो श्रद्धा आणि संशय ह्यांच्या अलीकडला आणि पलीकडला. आपल्या सत्य-नित्य 'असण्याला' अस्तित्वाच्या चौकटीची/देहाआकाराची किंवा तात्पुरत्या 'असणेपणाच्या भासाची/ जाणिवेची' कदापिही आवश्यकता नाही.

‘आत्मबोध’ म्हणजे आस्तिकतेचे आणि नास्तिकतेचेही संपूर्ण विसर्जन आहे.... कारण आस्तिकता किंवा नास्तिकता हे दोन्हीही आग्रह आहेत जे 'वेगळेपणाच्या ग्रहावर (कल्पनेवर)' अवलंबून आहेत. ग्रह मिटला की कसला आग्रह!? ग्रह मिटला म्हणजेच बंधनाचे ग्रहण सुटले! ग्रह मिटला म्हणजे 'मी' आणि 'देव'* ह्यांमधील काल्पनिक अंतर मिटले. (* अद्वैत स्व:-स्वरूप/ समग्रता/ समष्टी/ अस्तित्व/ प्रेम/ परमसत्य)

स्वरूपावरील लागलेल्या ग्रहणालाच ज्यांनी "ग्रहण" लावले... त्या सद्गुरूंना शतशः नमन! त्यांचेच त्यांनाच नमन! जय गुरु

सप्रेम शुभेच्छा...

नीतीन राम
०४ नोव्हेंबर २०१३

दुवा क्र. १

Original blog link: दुवा क्र. २
*हा ब्लॉग मन-मोकळ्या चर्चा आणि सुसंवादासाठी खुला आहे. 

Tags: Nisargadatta Maharaj, Faith, Atheism, Non-Duality.