आपणास माहीत आहे का ?

          इंधन वायू नळकांड्यांचा अपघात झाल्यास नुकसान भरपाईसाठी ४० लाखाचा अपघाती विमा उतरवलेला असतो हे आपणास माहीत आहे का?
     प्रत्येक वर्षी भारतात इधन नळकांड्यांचे अनेक अपघात होतात व अनेकवेळा जीवित व मोठ्या प्रमाणात वित्त हानी होते.असे अपघात कसे टाळावे याविषयी आपल्याला बरीच माहिती असते पण अशा अपघाताचा ४० लाखाचा विमा उतरवलेला असतो ही गोष्ट मात्र आपल्यापैकी कित्येकांना माहीत नसते.निदान मला तरी माहीत नव्हती.देशातील निरनिराळ्या भागात या नळकांड्यांच्या स्फोटाचे अगर वायुगळतीमुळे अंदाजे १०,००० अपघात दरवर्षी  होतात. त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी मालमत्ता व घराच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते व मनुष्यहानी झाली नाही तरी जवळपासच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते.असे प्रमुख आग अधिकारी ईश्वरलाल जाट यांचे निवेदन आहे व त्यांच्या माहितीप्रमाणे फारच थोडे लोक या विमा संरक्षणाचा लाभ घेतात किंवा घेतच नाही म्हटले तरी चालेल..
         इंधन पुरवठा कंपन्यांपैकी  बव्हंश कंपन्यांनी असा एकही नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला नाही असे मान्य केले आहे.. थोडक्यात इंधन वायु ग्राहक या तरतुदीविषय़ी जागरुक नाहीतच म्हटले तरी चालेल.या तरतुदीविषयी सांगण्यात आल्यावर वर्षा सिंग या महिलेने "अश्या प्रकारे नुकसान भरपाई मिळू शकते याची मला मुळीच कल्पना नव्हती" हे मान्य केले .दर वर्षी राष्ट्रीयीकृत वायु पुरवठा कंपन्या विम्याच्या हप्त्याच्या स्वरूपात कोट्यावधी रुपये मिळवतात व ग्राहकांच्या अज्ञानामुळे ती सर्व रक्कम त्यांच्याच घशात जाते.ओरिएंटल इन्शुअरन्स कंपनीतर्फे प्रत्येक ग्राहकास हे विमा संरक्षण देण्यात येते."जयपूरमधील फक्त एका गॅस कंपनीसाठी महिन्याला २६ लाख रु.विमा हप्ता प्राप्त होतो. व अश्या ४०० हून जास्त कंपन्या एका जयपूर शहरात आहेत." एका एजन्सी अधिकाऱ्याने सांगितले. आणि तरीही गेल्या वीस वर्षात अनेक अपघात होऊन एकाही ग्राहकाने या विमा संरक्षणाचा लाभ घेतला नाही असेही त्याने पुढे नमूद केले.
   विम्याची रक्कम एजन्सीने जमा केलेल्या हप्त्यावर अवलंबून असते.त्याचप्रमाणे अपघात नळकांड्याच्या स्फोटामुळे झाला व त्यास लावण्यात आलेली उपकरणे (म्हणजे रबरी नळी झडप इ.) मूळ कंपनीने दिलेलीच वापरण्यात आलेली असली तर ग्राहकास नुकसान भरपाई मिळते.असे शासन पुरस्कृत विमा कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याकडून कळते.आपली उपकरणे योग्य आहेत की नाहीत हे एजन्सीकडून तपासून घेता येते व त्यासाठी ७० रु.दोन वर्षाचे जपणूक (मेन्टेनन्स)मूल्य द्यावे लागते.
       स्थानिक गॅस एजन्सीकडून ही तपासणी करून घेता येते.व ती उपकरणे योग्य प्रकारचीच आहेत हे सिद्ध झाले की नुकसान भरपाईची मागणी करता येते.वायु दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास न्यायालयात नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा लागतो.मृताचे वय,त्यास मिळणारा पगार वगैरे बाबींचा विचार करून नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयाकडून ठरवण्यात येते.
जबाबदारी टाळणे
        आपल्या अज्ञानाचा फायदा शासन,विमा कंपनी व वायु कंपन्यांना होतो हे उघडच आहे.एका गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीने ही माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध असायला हवी हे मान्य केले व त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर ती माहिती लावलेली आहे असा दावा केला पण प्रत्यक्षात असा सूचना फलकच नाही असे आढळून आले. त्याच्या मते अश्या प्रकारे नुकसान भरपाई देण्यात येते."पण अश्या लक्षणीय घटना कमीच असतात कारण ग्राहकांनेच योग्य दक्षता न घेतल्यामुळे अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे" असे मत त्याने पुढे व्यक्त केले. अर्थात ग्राहक या नात्याने आपण या तरतुदीविषयी जागरुक राहून त्यातील बारकावे ध्यानात घेऊन त्याप्रमाणे योग्य दक्षता घेणे व या तरतुदीचा योग्य फायदा घेणे आवश्यक आहे.त्यासाठीच ही माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. माझ्या एका मित्राने विरोपाद्वारे ही माहिती मला उपलब्ध करून दिली व मी माझ्या मित्रांना ती कळवली. मनोगतींनी आपल्या मित्राना विरोप पाठवून ही माहिती कळवावी या उद्देशाने हे लिखाण येथे केले आहे..