झटपट ज्योतिषी बना!

आपल्या मित्रपरिवारात, ऑफिसमध्ये,   बसमध्ये, ट्रेन मध्ये,
कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसच्या कॅंटीन मध्ये, कोठेही  झटपट
लोकप्रिय व्हा! ग्रंथ जमवायला नको, अभ्यास करायला नको, कुंडली मांडायची
तर अजिबात गरज नाही, फक्त पाच मिनिटात तुम्हीही १०० % अचूक सांगणारा,
झटपट ज्योतिषी बनू शकता, ते सुद्धा अगदी खात्रीने!

विश्वास नाही ना बसत? तर मग वाचा पुढे……

साहित्य आणि कृती

साधारण  पस्तीस वा
जास्त वय असलेली व्यक्ती निवडा.

प्रथम इकडचे तिकडचे
बोलून त्या व्यक्तीला (सावज! ) आपल्या जाळ्यात ओढा. इथे ती व्यक्ती
‘स्त्री’ असेल तर मात्र जरा सांभाळून, निदान सुरवातीच्या काळात, पुरेसा
अनुभव येत नाही तो पर्यंत तरी अशी सावजे टाळा नाहीतर जोडे खायची वेळ
येईल!

सावज जाळ्यात आले की चेहरा गंभीर करा. उगाचच
आकाशाकडे बघून काहीतरी पुटपुटण्याचे नाटक करा, सावजाला वाटले पाहिजे की
जणुकाही आकाशस्थ दैवी शक्तींना तुम्ही आवाहन करता आहात.

एक दीर्घ श्वास घ्या. (हा कसा घ्यायचा ते जाणण्यासाठी रामदेव बाबांचा
कोणताही कार्यक्रम बघा).
सुरवातीला काहीही फालतू प्रश्न विचारा
जसेः "तुमचा आवडता पक्षी, फुल, फळ, गाव, रंग, सिनेमा नट / नटी,
संख्या, कार" इ. काहीही उत्तरे मिळतील पण प्रत्येक उत्तरा नंतर " हम्म",
"आलं लक्षात माझ्या", "मला वाटलंच होते", "माझा अंदाज चुकणार नाही" अशा
प्रतिक्रिया दया.

आता आणखी जास्त गंभीर दिसण्याचे
नाटक करा, (मनमोहन सिंगांसारखा) आणि प्रश्न विचारा  "हरीण,
कासव, ससा, साळिंदर यापैकी कोणता प्राणी पाळायला आवडेल", सावज काहीतरी
उत्तर देईलच, ते महत्त्वाचे नाही, त्यावर पुन्हा एकदा गंभीर दिसण्याचे
नाटक करा, बोटांवर थोडी आकडेमोड केल्याचे नाटक करा, पुन्हा एकदा आकाशाकडे
बघून आकाशस्थ दैवी शक्तींना आवाहन करता आहात असे दाखवा.

आता सावज तुमच्या पूर्ण टप्प्यात आले आहे, बार टाकायला हरकत
नाही.

आता सुरवात करा………..

"तुम्ही फार काळजी करता, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी उगाचच मनाला
लावून घेता.. "
(हा ओपनिंग पंच स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत
प्रभावी ठरतो असा माझा अनुभव आहे! )

"तुम्ही
सर्वांसाठी झिजता, पदरमोड करता पण लोकांना त्याची किंमत नाही. "
(हा तर खरे म्हणजे मास्टरपीस आहे, अजमल कसाब सुद्धा याला नाही
म्हणाला नसता! )

"तुम्ही जरूरी पेक्षा जास्तच विचार
करता.   काही वेळा चिकित्सा करण्यातच आपण इतकी वेळ दवडला आहे की
त्यामुळे हातातोंडाशी आलेली संधी निसटून जाण्याचे बरेच अनुभव आपल्याला आले
असणार. "
(अत्यंत  प्रभावी परिणाम होणारी सावजे
स्त्रिया, बँकवाले, सरकारी कर्मचारी, सी. ए. )

"दुसऱ्यांच्या  इच्छा आकांक्षा व अपेक्षांचे ओझं विनाकारण
खाद्यांवर घ्यायचा आपला स्वभाव आहे"
"इतरांच्या मताचे दडपण
आपल्याला सतत असते, तुम्हाला नाही म्हणणे जमत नाही त्यामुळेच लोकांनी
विशेषतः जवळच्या नातेवाईक, कुटुंबातल्या व्यक्तींनी केलेल्या
भावनिक  आवाहनांना आपण चटकन बळी पडता. "

"स्वतःचीच कारण नसताना, नको इतकी चिकित्सा करण्याचा तुमचा स्वभाव आहे.
त्यामुळेच काही गोष्टी तुम्ही फारच मनाला लावून घेता, लोकांना त्याची
काहीच पर्वा नसते पण तुम्हाला मात्र त्याचा त्रास होत असतो. "

" वरकरणी जरी "मला जगाची पर्वा नाही" असे जरी तुम्ही
दाखवत असला तरी ‘लोकांनी आपले कौतुक करावे, आपण प्रसिद्ध व्हावे’ अशी
आत्यंतिक तळमळ तुमच्यात आहे. "

(अत्यंत प्रभावी
परिणाम होणारी सावजे कारखानदार, राजकारणी, मार्केटिंग वाले, आय. टी
वाले. )

"वरकरणी तुम्ही कर्मकठोर, न्याय निष्ठुर,
कडक वाटत असलात तरी आपण मुळात कनवाळू आहात, पण ही बाजू लोकांच्या लक्षातच
येत नसल्याने  तुमच्या बद्दल निष्कारण गैरसमज निर्माण होत राहतात व
त्याचा त्रास तुम्हाला वेळोवेळी होत असतो. "
(अत्यंत प्रभावी
परिणाम होणारी सावजे कारखानदार, बडे हाफीसर. )

"
क्षुल्लक गोष्टीत कारण नसताना गुंतून पडल्याने, आपल्या ध्येयावर लक्ष
केंद्रित न करता आल्याने, तुम्हाला तुमच्यात असलेल्या अनेक चांगल्या
गुणांचा वापरच करता आला नाही. "

"आपल्या नातेवाईक व
मित्रपरिवारात असे एक तरी व्यक्ती असेल की जिच्याशी तुमचे संबंध जरा
ताणलेले आहेत आणि याचे कारण निव्वळ गैरसमज! पण काळजी करू नका, लौकरच हे
गैरसमज दूर होतील"
  (हा सर्व वयाच्या व आकाराच्या
स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत प्रभावी ठरतो असा माझा अनुभव आहे! )

"वरकरणी तुम्ही दाखवत नसलात तरी कोणत्यातरी गोष्टी बद्दल
अनामिक भीती, कोणत्यातरी गोष्टी बद्दल  खंत, कोणत्यातरी गोष्टी
बद्दल कमालीची निराशा तुमच्या मनात सतत घर करून आहे. "

"तुमच्यात  असलेल्या अनेक चांगल्या गुणांचा वापर तुम्ही कधी
केलाच नाही, संधीच्या कोणत्याच लाटे वर स्वार होता न आल्याने पायाखालची
वाळू सरकावी तसे आयुष्या हातातून निसटून गेल्याची मोठी  टोचणी
आपल्याला आहे. "
(ही खास ठेवणीतला पंच ज्यांच्या वयाची ५० पूर्ण
झालेली आहेत, त्यांच्या साठी खास)

"तुम्ही जरी
वरकरणी दाखवत नसलात तरी आता ह्या क्षणी सुद्धा आपल्या मनात कोणत्यातरी बाबी
वरूण  जबरदस्त वैचारिक संघर्ष चालू आहे. "

"अपेक्षांचे ओझे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संघर्ष हयात
आपली  मोठी मानसिक फरपट होताना मला दिसत आहे.   मनात
मोठा वैचारिक गुंता निर्माण झालेला मला दिसत आहे. "

"वयाच्या ३ ऱ्या वा ४ थ्या वर्षी आग, पाणी वा तीक्ष्ण शस्त्र या
द्वारे तुम्हाला लहानशी दुखापत झाली होती, खरेतर मोठी दुर्घटनाच व्हायची
पण एका वडिलधाऱ्या व्यक्तीच्या सतर्कतेमुळे ती वेळ टळली. "
(ही
टोपी ज्यांच्या वयाची ५० पूर्ण झालेली आहेत, त्यांना फिट बसते, कारण
इतक्या लहानपणाचे काही आठवत नाही आणि असे काही झाले होते का ते विचारायला
कोणी वडिलधाऱ्या व्यक्ती आता हयात नसतात)

"सध्याच्या ग्रहमानांचा विचार करता, पुढचा काही कालावधीत आपल्याला
आर्थिक फसवणुकी चा धोका दिसतो, एखादी वस्तू खरेदी करताना बाजारभावा पेक्षा
जास्त किंमत देणे, पुरेपूर दाम मोजून खरेदी केलेल्या वस्तूत वा सेवेत
त्रुटी असल्याने आर्थिक नुकसान व मानसिक त्रास, आर्थिक गुंतवणुकी च्या
बाबतीत चुकीचा सल्ला  वा विश्वासघात,   अशा घटना
घडण्याची शक्यता"
(हा पंच साधारण दसरा दिवाळीच्या आधी व
फेब्रुवारी मार्च महिन्यात जास्त प्रभावी ठरतो! )

"आपल्याच दाट परिचयाची वा जवळच्या नात्यातली व्यक्ती गोड बोलून, भुरळ
पाडून पैसे उधार घेऊन  जाईल  अर्थात ते पैसे कधीच परत
मिळणार नाहीत, मिळालेच तर कमालीच्या विलंबाने वा खूप त्रास होऊन मिळतील.
"

"आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या असत्या आणि
ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या न करता आल्याची  मोठी टोचणी
तुमच्या मनात आहे. "

भविष्यकथन किंवा
सायकोअनॅलायसिस पूर्ण. आता तुमच्या सावजाचे काय करायचे ते तुम्हीच
ठरवा!

शुभं भवतू

सुहास
माझ्या या
संकेतस्थळावर
गेल्याच आठवड्यात प्रकाशित.