मार्च १७ २०१४

शब्द, शब्द

आम्ही कोंकणातले म्हणजे रत्नागिरी (उच्चार रत्नांग्री वा रत्नायरी) जिल्ह्यातले. जन्म आणि आयुष्य जरी घाटावर गेले असले तरी वर्षातला सरासरी एक महिना तरी कोंकणात काढल्याने, आणि मुख्य म्हणजे मातापित्यांच्या जिभेचे वळण अस्सल तिरके असल्याने घरी बोलली जाणारी भाषा ही गुहागर - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा या पाच तालुक्यांतली बोलीभाषा होती.
शिक्षणासाठी आणि नंतर पोटापाण्यासाठी घर सोडून दशके लोटली. पण आपसांत बोलताना भाषा तीच राहिली. मधून अधून जाणवत राहिले की हे शब्द चुकून इतर कुणाशी बोलताना वापरले गेले तर त्या व्यक्तीचा चेहरा पूर्ण प्रश्नार्थक होतो. पण हे शब्द कुठे नोंदवून ठेवावेत असे वाटले नाही.
परवा तळेगांवला गेल्यावर 'विस्मरणात गेलेले खाद्यपदार्थ' यावर स्मरणरंजनाचा कार्यक्रम झडला. तेव्हा खाद्यपदार्थच नव्हेत, तर कित्येक शब्दही आता वापराबाहेर फेकले जात असल्याचे जाणवले.
ते शब्द नोंदवून ठेवण्याचा हा प्रयत्न. इथे कुणी व्यक्ती आमची गाववाली निघाली, आणि या यादीत दुरुस्ती झाली वा भर घातली गेली तर वाहवा.
ही यादी वरच्या पाच तालुक्यांपुरती आहे. वरती मंडणगड वा खाली राजापूर ('ज'चा उच्चार 'जसे'प्रमाणे, 'जग' वा 'जय'प्रमाणे नव्हे) इथले ठावे नाही. यातील काही शब्द तिथेही वापरले जात असतील ही शक्यता नाकारता येत नाही. असो.

स्वयंपाकघरापासून सुरू करू.
तव्याखाली ठेवायची छोटी लोखंडी ताटली म्हणजे तळकूट.
फुटलेला (भेग पडलेला) तवा वापरायचा असेल तर त्या भेगेवर मातीचा लेप लावून वापरता येई. त्या लेपाला म्हणतात लेवण.
छोटी गोल पत्रावळ म्हणजे ठिकोळे.
ज्यातून पाण्याने भरलेले शहाळे निघेल असा अख्खा न सोललेला नारळ म्हणजे अडसर वा आडसर.
ज्यातून शहाळ्याच्या पुढचा पण स्वयंपाकाच्या नारळाच्या मागचा अशा स्थितीतली नारळ निघेल तो मोदक्या वा चटण्या. या नारळाचे मोदक आणि चटणी हे पदार्थ चांगले होतात.
ज्यातून स्वयंपाकाचा नारळ निघेल असा अख्खा न सोललेला नारळ म्हणजे सुकड.
ही सुकड कोयत्याने सोलली की बाहेरच्या कवचाचे जे तुकडे निघतात त्यातला एक तुकडा घ्यायचा, त्याची एक बाजू भिजवून आणि ठेचून त्याचे तंतू मोकळे करायचे आणि त्याचा एक मोठा कुंचला करायचा. त्याला म्हणतात सोडण. पुरणपोळी करताना जास्तीचे पीठ अलवार हाताने काढण्यासाठी हे सोडण वापरतात.
सुपात धान्य वा दाणे घालून एका ठेक्यात वरखाली करणे म्हणजे पाखडणे.  सूप डावी-उजवीकडे हलवणे म्हणजे घोळणे. आणि सुपाचा एक कोपरा/टोक पुढे येईल अशा रीतीने पाखडणे म्हणजे ओयचणे.
काकडी उभी धरून विळीवर गोलगोल फिरवीत ठोकणे आणि मग आडवी धरून बारीक तुकडे कापणे म्हणजे चोचवणे.
कोयत्याला वा विळीला धार लावायचा दगड म्हणजे निसणा.
भाजी पटापट हलवत परतून घेणे (इंग्रजीत 'स्टर फ्राय') म्हणजे अवसडणे.
उकळी आलेल्या पाण्यात भात करण्यासाठी तांदूळ घालणे म्हणजे तांदूळ ओईरणे / ओयरणे.
सुपारी (पोफळी) झाडावरून उतरवल्यावर विळीवर त्याची बाजूची साले थोडीशी काढणे म्हणजे सुपाऱ्या पष्टाळणे.

देवघरातली तीर्थ देण्याची झारी म्हणजे अमृती.

आता खाद्यपदार्थ.
पुरीच्या आकाराची लहान भाकरी म्हणजे पोपी.
आंबील याला अजून एक शब्द माडगे.
मोदक करताना मोदकाच्या पारीत मीठ, जिरे, ओवा आदी घालून त्याची लहान दिवली करून तीही मोदकांसोबत उकडून काढायची. ती निवगरी. गोड मोदक खाऊन तोंडाला मिठी बसली की दोनचार निवगऱ्या चाबलायच्या की परत मोदकांकडे मोर्चा.
पावटे तव्यावर भाजून मिठाच्या पाण्यात टाकायचे की झाले मिठाणे. सकाळच्या पेजेला तोंडीलावणे म्हणून पुरतात.
तांदुळाचे जाडसर पीठ काकडीच्या रसात गूळ घालून भिजवायचे आणि हळदीच्या पानांवर थापून उकडायचे की झाले पातोळे.
तांदळाचा रवा बरक्या फणसाच्या रसात भिजवायचा आणि त्याची जाड थालिपीठे करून मोदकपात्रातून उकडून काढायची की झाली सांदणे.
सुक्या खोबऱ्याची खिरापत म्हणजे शेरडी.
मध्यम आकाराच्या कैऱ्या मिठाच्या पाण्यात उकडायच्या आणि फेटलेल्या मोहरीत घालून मुरवायच्या की झाला उकडांबा.
कोकमाचे फळ म्हणजे रातांबा. याची कोवळी पानेही खायला सुरेख लागतात. आंबटसर.
नीट न शिजलेला, अर्धवट पिठूळ झालेला भात म्हणजे कारविंजलेला भात.
फणसात गऱ्यांशेजारी असलेला, खाण्याला बिनकामाचा, उभट गवताच्या पात्यांसारखा चिकट भाग म्हणजे कोशीटा.
गरे धरण्याआधीच्या कोवळ्या फणसाची केलेली भाजी ती साकट भाजी.
गरे धरून मोठे झाल्यावर, पण पिकायच्या आधी, उकडून केलेले ते उकडगरे.
आणि गरे अर्धवट धरल्यावरही तशीच रेटून केलेली भाजी ती तोंडमिचकी भाजी. त्यात ज्याला कोशीटा लागेल तो तोंड वेडेवाकडे करीत (मिचकावीत) ती खाणार म्हणून तोंडमिचकी.
एखादे पातेले (दुधाचे वा पिठल्याचे) नीट निगुतीने साफ करणे म्हणजे नखानिपटून घेणे.

आता जरा बाहेर.
विहीर म्हणजे बाव.
पाण्याचा झरा वा ओढा म्हणजे पऱ्ह्या, वहाळ वा व्हाळ.
तिथून पाणी बागेपर्यंत नेण्यासाठी फूटभर रुंदीचा चार इंच खोल कालवा म्हणजे पाट.
त्या पाटाचे पाणी आणण्यासाठी अर्धगोलाकार खापऱ्यांची केलेली वाट म्हणजे पन्हळी.
त्या पन्हळीतून पाणी ज्या मोठ्या दगडी हौदात आणायचे तो हौद म्हणजे डोण.
छोट्याशा धबधब्यात पाणी खाली पडूनपडून झालेला खळगा, ज्यात बुडकुली बुडवून पाणी घेता येईल असा, म्हणजे डुरा.
नदीत ज्याच्यावर बसून नीट आंघोळ करता येईल असा दगड म्हणजे पाथर.
नदीवरचा बांबूंचा हाती बांधलेला पूल म्हणजे साकव.
पावसाळ्यापुरता कातळातून वा जमिनीतून उगवणारा, अगदी मुळूमुळू धारेचा जलस्त्रोत म्हणजे उपळट.
कुडाची, हाती बांधलेली पण बिनसारवलेली भिंत म्हणजे कावण. ही गोठ्याला भिंत म्हणून वापरतात.
घराभोवती दगड रचून केलेले कुंपण तो गडगा. त्या भिंतीतून जाये करण्यासाठी काढलेली वाट दोन्ही बाजूच्या दगडांमध्ये आडवे बांबू खोचून बंद करता येते. ते म्हणजे बेडे. हाताने मधला एकच बांबू काढून (बेड्यात साधारणपणे तीन बांबू असतात) त्यातून घुसून जाणे हे माणसांना जमते, जनावर बाहेर राहतात.
घरातला कचरा, शेण हे टाकण्यासाठी केलेला खड्डा म्हणजे शेणकी.

आता इतर शब्द.
झिजून अतीबारीक झालेला साबणाचा तुकडा म्हणजे साबणाची झीण.
मांजराचे (उच्चार माजराचे) गळणारे केस म्हणजे माजराची भीस.
गुंड वा टग्या म्हणजे झोंड. टगेगिरी म्हणजे झोंडगिरी.
काम नीट मार्गी लावणे म्हणजे कामाची पाथा लावणे.
अत्यंत अस्ताव्यस्त, विस्कळीत काम करणे म्हणजे धवड काम करणे.
अजिबात धीर नसणे म्हणजे धाया नसणे.
मुद्दामहून म्हणजे अदरेखून.
पोकळ, बिनकामाचा म्हणजे फोकीस. पत्ते खेळताना आपल्या भिडूकडेही हुकूम नाही हे कळाल्यावर "तूपण फोकीस? " असे वैतागाने म्हणायचे असते. आपल्याकडे नसलेले हुकूम कुणाच्या ध्यानात यायच्याआधी हा संवाद म्हणायचा असतो.
लाकडाचा मोठा ओंडका म्हणजे ढोणकूर. लोळत पडलेल्या आळशी (म्हणजे स्वतःखेरीज इतर) व्यक्तीला "असा काय ढोणकुरासारखा पडलाहेस" असे म्हणायचे असते.
तऱ्हेवाईक पद्धतीने वागणे म्हणजे मंत्रचळेपणा करणे.

आठवले तेवढे शब्द नोंदवून ठेवले. कुणाच्या उपयोगी पडले तर आनंदच. विस्मरणात गेलेल्या खाद्यपदार्थांवर लिहिण्याआधी एकदा कोंकणात जाऊन यायला हवे.

Post to Feedरंजक
हो
आणखी काही
पानगी
अडकण = अटकण = वटकन ?
पुन्हा थोडे.
दोनतीनच शब्द
थोडक्यात
कोकणात
झीनत अमन आणि झीण ... एक आठवण
वारंगोळे, सवई, टवळे इ.
वा!
चित्पावनी बोलीतील क्रियापदे, क्रियाविशेषणे वगैरे
जबराट!

Typing help hide