मनाचिये गुंफी

" वैशाली आणि मी खूप दिवसांनी भेटलो. "
"  छान."
" मस्त गप्पा झाल्या."
" छान." 
"  म्हणाली की तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला संदेश दिला आहे....".
   शशीकलेने रात्री जेवता जेवता मंदारला सांगितले. 
" कसला संदेश ?"
" फावला वेळ काहीतरी चांगले करण्यासाठी कारणी लावा. 
" मी तर सुशांतला असे काहीच सांगितलेले नाही."
" पण वैशाली  तर म्हणत होती."
" गेल्या अनेक दिवसांत तो मला भेटलेलाही नाही. 
 "  वैशाली तर म्हणत होती."
 "  अरे हो, तो माझ्या इमेलमधला संदेश आहे. सिग्नेचरचा भाग. मी त्याला खूप दिवसांनी एक मेल लिहिली होती. त्याला कदाचित् वाटले असेल की, ते त्यालाच उद्देशून आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळे संदेश लिहितात तसा मीही लिहिला. लोक लिहितात ना – ‘ थँक्स अँड रिगार्डस्’, फक्त ‘ रिगार्डस्’ किंवा काही गंमतीदार ओळी – ‘ लाईफ इज लाईक ऍन आईसक्रीम, एन्जॉय इट बिफोर इट मेल्टस् ‘ वगैरे वगैरे. मीही लिहिलं ‘ यूज पासटाईम फॉर डूइंग समथिंग गुड  ’. सर्वांना तोच संदेश आहे. सिग्नेचर सगळ्यांसाठी असते. स्वतंत्रपणे त्याला काहीही लिहिलेले नाही."
     मंदार सकाळी उठला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपल्या मनात अजून तोच विषय आहे. 
‘ काल आपण म्हणालो खरं की, सगळ्यांना तीच सिग्नेचर आहे पण सुशांतला ते कळले नसेल तर? खरे तर कळायला पाहिजे. आतापर्यंत कोणीच मला असे काही सांगितलेले नाही. आपला मेलमजकूर आणि सिग्नेचर इतके जवळजवळ आले की मेल वाचणाऱ्याला वाटावे की आपल्यालाच उद्देशून लिहिले आहे ? आपण जरा विचार करायला पाहिजे होता मेल पाठवताना. सिग्नेचर तयार करताना वाटलंही नव्हतं की असं काही होईल. पण कशाला विचार करायचा? सिग्नेचर सगळ्यांना असते. सुशांतने फारच मनाला लावून घेतलेलं दिसतं… 
 छे, किती छोटा मुद्दा पण मेंदूचा भोवरा झाला आहे....’
     छोट्या टोकावरच भोवरा गरगर फिरत असतो. 
     ऑफिसला पोचताक्षणी त्याने आपली सिग्नेचर वाचली. पुन्हा पुन्हा वाचली.  
Use pass time for doing something good. 
Mandar  Khatu.
‘ सुशांतला शंका आली असेल तर त्याने याआधीच्या जुन्या मेल्स तरी उघडून पहायच्या. तिथेही तीच सिग्नेचर आहे. जो कोणी आपली मेल वाचतो त्याला ही सिग्नेचर दिसते. सुशांतला स्वतंत्रपणे काहीही --   
     कधी एकदा सुशांत भेटतोय आणि त्याला आपण समजावतोय, असे मंदारला झाले. मंदारला खात्रीच होती की, सुशांत त्याच्या ठरलेल्या हॉटेलमध्ये भेटणार. त्यामुळे सलग तीन दिवस तो तिथे जाऊन उभा राहिला आणि तिसऱ्या दिवशी सुशांत दिसलाच. 
"  सुशांत.."
"  हाय मंदार."
  दोघांचीही कॉफी पिऊन झाली. इकडचे तिकडच्या गप्पा झाल्या. मंदारने विषय काढला.
" परवा आपले खूप दिवसांनी मेलमधून बोलणे झाले. "
 " हो. खरंच खूप दिवसांनी." 
"  अरे, ते जे लिहिलंय ना ती सिग्नेचर आहे. जो कोणी मेल वाचतो त्याला ती दिसते."
बोलल्यावर मंदारला हायसे वाटले.
" हो. माहीत आहे." सुशांत.
" मग ठीक आहे. जर झालाच असेल गैरसमज तर सांगून ठेवलं."
" कसला गैरसमज? 
" तो..युज पास टाईम...वगैरे. खास तुला काहीही सांगितलेलं नाही. सगळ्यांसाठीच ती सिग्नेचर आहे.
" छे,छे.माझा कुठलाच गैरसमज झालेला नाही. मला काहीच तसं वाटलं नाही."
     
    दोन-चार इकडच्या तिकड्या गप्पा मारून सुशांत गेला. 
     मंदारला आणखी एकदा हायसं वाटलं. 
     ‘पण मग वैशालीने शशीकलेला का सांगितलं तसं ? सुशांतने सांगितल्याशिवाय का वैशाली बोलेल?’ मंदारला वाटत राहिलं.
    रात्री जेवताना मंदारने शशीकलेला सांगितलं की, सुशांतला मी ती फक्त सिग्नेचर असल्याचं सांगितलं तेव्हा तो म्हणाला की त्याचा कोणताही गैरसमज झालेला नाही. 
" लगेच त्याला जाऊन सांगायची गरज काय होती तुला?" शशीच्या मुखचंद्राचा सूर्य झाला. 
" मी कोणालाही जाऊन सांगत नाही. मी डोसा खायला गेलो होतो. सुशांत नेमका तिथे आला. 
" हो पण लगेच सांगायची काय गरज होती? किती छोटी गोष्ट होती ती. तू काहीतरी चमत्कारिकपणे वागतोस आणि मग…
"आम्ही नेहमी भेटत नाही तसे. तरीही, लांबच्या का होईना, एका मित्राचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करणे कामच आहे माझे. चमत्कारिकपणा काय आहे त्यात ? माझ्याकडूनही छोटीशी चूक होऊ शकते आणि त्यामुळे मोठा गैरसमज होऊ शकतो. त्याबद्दल सबंधित माणसाशी चर्चा करायला पाहिजे."
" लगेच हा विषय काढायची गरजच काय होती तुला? "
" मग, काय वर्षभराने काढायला पाहिजे होता का? "
     दोघांची डोकी तापली. 
    शशीकलेला ' कुठून मंदारला सांगितलं ' असं झालं. ' आता सुशांतने हे वैशालीला सांगितलं तर ती मला म्हणेल, मी सहजच सांगितलं होतं. तू नवऱ्याला कशाला सांगितलंस ? मंदारला उगीच वाटेल की त्याने केवढी मोठी चूक केली.  खरंच, मीही उगीच हे मंदारला सांगितलं. पण सांगताना काहीच वाटले नाही. सांगताना कधीच काही वाटत नाही. नंतरच वाटतं. मी सांगते आणि मंदार त्या माणसाशी चर्चा करतो. उगीच सांगितले.  मुद्दा बारीकसाच होता... '
     
     मंदार सिगारेट ओढायला गेला. त्याला नुसता विचार करता येत नसे. सोबतीला सिगारेट लागायची. त्याचा भोवरा पुन्हा फिरू लागला...
’आपण सुशांतला सांगितले हे योग्य केले नाही वाटते. पण नसते सांगितले तर मानसिक शांतीही नसती मिळाली. सिग्नेचरचा विषय प्रथमच निघाला. या मुद्यावर आतापर्यंत कोणी आक्षेप घेतला नाही. सिग्नेचर इज ऍक्सेप्टेड थिंग. सुशांतचाही झाला असेल गैरसमज. पण तो तर म्हणत होता, त्याचा गैरसमज झालेला नाही. असो. बरे झाले सांगितले ते पण आपण घरी येऊन शशीला उगीच सांगितले. मित्रामित्रांचा विषय होता, तिथेच मिटत होता. ते घरी येऊन सांगायची गरज नव्हती. मुद्दा तसा छोटा होता.’ 
     मंदारला फार पश्चात्ताप झाला. 
    
    " काय गं, तू सगळ्या गोष्टी मैत्रिणींना सांगतेस का? "
सुशांतचा प्रश्न वैशालीला कळलाच नाही. पण तिचे मॅगी करणारे हात दोन मिनिटे थांबले. या दोन मिनिटांत मॅगी झाली असती. 
" सगळ्या म्हणजे?"
" मी सांगितलेल्या सगळ्या. मी सहज म्हणालो की मंदारच्या मेलमध्ये ‘ यूज पासटाईम फॉर डुइंग समथिंग गुड’  असे लिहिले होते तर ते तू लगेच शशीकलेला सांगितलेस."
" अर्धवट माहिती देऊ नकोस. मंदारची खूप दिवसांनी मेल आली. मेलमध्ये ‘ यूज पासटाईम फॉर डुइंग समथिंग गुड ’ असे लिहिले होते, असे तूच म्हणालास. सांगितलं होतंस की नाही?"
" सांगितलं होतं. मग?
" मी काही मुद्दाम शशीला सांगितलेलं नाही. बोलता बोलता सहज आठवलं म्हणून सांगितलं. आमचे होतात फोन बरेचदा." 
" हो पण त्यातला तो सिग्नेचरचा भाग मोठा करून सांगायची गरज नव्हती. तिला वाटलेले असेल की, आपला नवरा दुसऱ्याला सूचना देतो म्हणून. मी तुला सहजच सांगितलं होतं त्याबद्दल."
" अच्छा ? हे माहीत नव्हतं मला. सिग्नेचर वगैरे मला आजच कळत आहे तुझ्याकडून. मला वाटलं, की त्या मेलमध्ये असेच एक वाक्य लिहिले आहे. मी काही ती मेल पाहिलेली नाही. तू म्हणालास म्हणून पुढचे झाले."
     दोघांनाही झालेली कल्हई पाठ टेकेपर्यंत तशीच होती. 
सुशांत खूप विचार करत बसला, ’छे! सहज सांगितलं वैशालीला तर तिने बातमी प्रसारीत केली. मला खरं तर त्या सिग्नेचरचा वेगळेपणा वैशालीला दाखवून द्यायचा होता पण वैशालीच्या ते लक्षातच आलं नाही की काय कोणास ठाऊक. मित्रामित्रांचा विषय होता. घरात सांगितला हेच चुकलं.  स्पष्टीकरण द्यायला मी कमी पडलो की काय कोण जाणे. पण स्पष्टीकरण कशाला द्यायला पाहिजे होते ?  मुद्दा तसा फार मोठा नव्हता.’ 
     सुशांतची झोप खाऊन टाकली गेली.
     दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत वैशाली विचार करत होती… 
    ‘शशीकलेला वाटलं असेल की मी तिच्या नवऱ्याची तक्रार करत आहे म्हणून. उगीच सांगितलं तिला. मला काय माहीत की ती लगेच सांगेल मंदारला. तक्रार करण्याचा अजिबात हेतू नव्हता. आमच्या रोजच्या गप्पांत तोंडून गेलं. मला काय माहीत ते इतकं पुढे जाईल हे. सुशांत जे म्हणाला ते सांगितलं. पण, उगीच सांगितलं. जरा विचार करायला पाहिजे होता मी. चुकलेच. तसं पाहायला गेलं तर किती फालतू मुद्दा होता....’
 
     
                                                                    - केदार पाटणकर