नाटाचे अभंग... भाग ४८

४७. आइक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत ।
 आम्हां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥
 उसणें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन ।
 काय गा मिरवूनि भूषण । वायां थोरपण जनामध्यें ॥धृ॥
 अन्न जरी न मिळे तयासी देणें । अगांतुक पात्र उचित दान ।
 उपकार तरी धन्वंतरीपणें । जरी देणें घेणें नाही अशा ॥३॥
 शूर तो तयासी बोलिजे जाणा । पाठीसी घालूनि राखे दीना ।
 पार पुण्या नाहीं त्या भूषणा । ऐक नारायण वचन हे ॥४॥
 आतां पुढे बोलणे ते काई । मज तारिसील तरीच सहि ।
 वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तईं मज कळसी ॥५॥
 
 १६२९ ते १६३१ अशी लागोपाठ तीन वर्षे नैसर्गिक आपत्तींमुळे एकूणच माणसांचे जीवन दुष्कर झालेले असताना, हळव्या स्वभावाच्या तुकोबारायांना केवळ आपल्या कुटुंबातील दुःखद प्रसंगांनी भावव्याकूळ केले असे नाही, तर सार्‍याच जनांना त्याचप्रकारच्या झालेल्या यातनांनी तुकोबारायांच्या मनात कळवळा उद्‍भवला. ‘परदुःख शीतल’ असा न्याय तुकोबारायांसाठी नव्हता. नानाविध त्रितापयुक्त क्लेषांनी होरपळून निघाल्याने तुकोबाराय अंतर्बाह्य विव्हल झाले. सार्‍याच दुःखी जनांची सोडवणुक व्हावी म्हणून देवाला जागे करण्यासाठी त्यांनी प्राण पणाला लावले. तसे पाहिले तर तुकोबारायांचे एकांतातील ‘तप’ जेमतेम वर्षभराचे. इतक्या अल्प अवधीत त्यांनी देवाला जागविले आहे. यातूनच तुकोबारायांच्या असामान्य भावबळाची कल्पना येते. ‘भावाचा भुकेला’ असलेला भगवंत तुकोबारायांच्याकडून मिळालेल्या सकस भावबळाच्या नैवेद्याने प्रसन्न झाला नसता तरच नवल.
 तुकोबारायांच्या तपाचे रहस्य उलगडून दाखविणारा हा अभंग आहे. पांडुरंगाला त्यांनी एकेरीत येऊन साद घातलेली आहे. त्यांना या पांडुरंगाशी एकांतात संवाद करायचा आहे. शास्त्रातून धर्माविषयी ज्या चार प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत, त्या म्हणजे वित्तदान, अन्नदान, परोपकार आणि भूतदया. या तीन गोष्टींच्या आचरणातून पुण्याचा संचय होत असतो. या चारगोष्टींविषयी त्यांच्या मनाला खटकणारी बाब ( -मात) त्यांना भगवंताला ऐकवायची आहे आणि त्याच्याशी काही बोलावयाचे आहे. भगवंताशी हा संवाद एकांतात यासाठी करावयाचा आहे की, त्यांचे बोलणे संत-भक्त जनांना वाह्यात वाटेल, तो अतिक्रम समजतील. तुकोबारायांना हा विश्वास आहे की, जगताचा प्रेमळ पिता असलेल्या या पांडुरंगाला त्यांच्या बोलण्याचा अजिबात त्रास वाटणार नाही. उलट त्याचा स्नेह जागा होणार आहे. अशा विश्वासाने ते देवाला आवाहनात्मक जो पहिला किंचित् प्रश्न विचारतात, तो जीवाच्या संचिताबद्दल. तुकोबारायांना शास्त्रांच्या श्रवणातून कर्मसिद्धांतातील संचित-प्रारब्ध-क्रियमाणाचे महत्त्व ज्ञात झालेले आहे. प्रारब्धातून जे वाट्यास येईल, ते प्रत्येक जीवाला भोगायचेच असते. त्यातून सुटका होत नसते. कर्माचे वर्म असे आहे की, जोपर्यंत कर्म ‘मी केले’ या अहंजन्य भावनेने केले जाते, तेथे ईश्वराचे अधिष्ठान मानलेले नसते, त्या कर्मांचे सुख-दुःखांकित फळ भोगणे अवश्यंभावी होत असते. हे लक्षात ठेऊन तुकोबाराय केवळ संचिताचा उल्लेख करतात. भगवंताची प्राप्ती केवळ संचिताच्या प्रभावाने होत असते, असे शास्त्रांचे सांगणे, तुकोबारायांना एकांगी वाटते. संचितच जर आम्हा जीवांच्या आत्यंतिक कल्याणासाठी प्रमाण मानायचे, तर भगवंताचे कर्तृत्व गौण ठरते. त्याच्या सामर्थ्याबद्दल संदेह निर्माण होतो. त्याचे औचित्य संपुष्टात आल्यासारखे होते. तुकोबाराय म्हणूनच भगवंतासमोर त्यांना खटकणारी ही बाब कथन करतात आणि भगवंताला त्याचे सामर्थ्य दाखविण्यासाठी आवाहन करतात.  
  माणसासाठी शास्त्र ज्या चार पुरुषार्थांचा उद्‍घोष करते, त्यातील पहिला पुरुषार्थ ‘धर्म’ आहे. मनुष्यजीवनाचा हा पाया आहे. यात वित्तदान आणि अन्नदान या दोन गोष्टींना महत्त्व स्वाभाविकतःच आहे. प्रारब्धयोगाने या दोन्हींचा लाभ मनुष्यास होत असतो. माणूस जे सुख-दुःख भोगत असतो, ते त्याच्याच कर्माचे फळ जरी असले, तरी कर्मफल दाता आणि भोक्ता भगवंत असतो, असे शास्त्रांचे सांगणे आहे. तुकोबाराय वंशपरंपरेने सावकारकी करणारे होते. ते व्यावहारिक पातळीवरून या तथ्याकडे पहातात. उसने घेतलेले फेडणे हा व्यवहार आहे. त्याला ‘दान’ म्हणता येत नाही. तसे म्हणणे कोणालाही पटणारे नाही. आमच्या संचितातील कर्माचे फळ घ्यायचे आणि तेच आम्हाला भोगाण्यासाठी जर भगवंत देणारा असेल, तर मग त्याचे थोरपण, त्याने दानशूर हे भूषण मिरविणे सारेच व्यर्थ ठरणारे आहे. जनरिवाजाला ते मान्य होणारे नाही. तुकोबारायांच्या मनात जी खटकणारी बाब आहे, तिचा दुसरा पैलू अशा प्रकारे ते देवासमोर मांडतात.
 धर्माचे अन्य एक अंग असलेल्या अन्नदानाविषयी पुढे तुकोबाराय त्यांचा विचार देवाला निवेदन करतात. अन्न जरी द्यायचे झाले, तर ते ज्याला मिळत नाही, जो भुकेला आहे त्याला ते द्यावे, असा संकेत आहे. न बोलाविता दारी आलेला भुकेने जो व्याकूळ झाला आहे, त्याला उचित ठरेल असे ताट वाढून द्यावयास हवे. असे केले तरच ते उचित दान म्हणता येते. तुकोबाराय नंतर धर्मातील तिसरी बाब ‘उपकार’, याविषयी त्यांचा विचार देवापुढे मांडतात. एका उपनिषदात उपमन्यूचे कथानक येते. भुकेने बेजार झालेल्या उपमन्यूने धोतर्‍याची पाने खाल्ल्याने त्याला अंधत्व आले आणि तो विहिरीत पडला. अश्विनीकुमारांनी त्याला दृष्टी परत मिळवून दिली आणि त्याला सर्व विद्यांचे ज्ञानही दिले. तुकोबारायांचे भगवंताला केलेले निवेदन याचविषयी आहे. धन्वंतरी (वैद्य) त्याला म्हणतात जो आर्त जीवावर निरपेक्ष उपचार करतो. त्यात देणे-घेणे, मोबदला अशा प्रकारची काहीही अपेक्षा तो ठेवत नाही. तुकोबाराय भगवंताला अशा उपकाराची आठवण करुन देतात.
 भगवंताचा अलौकिक पुरुषार्थ व्यक्त करणारे ‘शूर’ हे नाव त्याला दिले जाते. तुकोबाराय देवाला पुढे निवेदन करतात की, जे दुर्बळ, दीन आहेत, त्यांना पाठीशी घालून त्यांचे सर्वथा रक्षण जो करतो, तो शूर म्हणविला जातो. तुकोबारायांना वाटते की, या पांडुरंगाला आपले दीनत्व विदित नाही, असे होणार नाही. आपल्याला पाठीशी घालून त्याने त्याच्या शूरत्वाची प्रचिती द्यावी.
 भगवंताला ‘मूर्तिमंत धर्म’ म्हणून संबोधिले जाते. या धर्माच्या चार अंगांबाबत तसेच भगवंताच्या पुरुषार्थाविषयी तुकोबाराय भगवंताला सांगू इच्छितात की, अशा प्रकारे आचरलेल्या धर्माच्या योगे जो पुण्यसंचय होतो, त्याचा पार लागत नाही, असा पुण्यसंचय निःसंशय भूषणास्पद असा असतो, असे शास्त्रांचे सांगणे आहे. तुकोबाराय पुढे आपले दीनत्व भगवंत जाणतोच असे मानून त्याला म्हणतात, ‘आम्हां भक्तजनांसाठी भूषण असलेल्या हे नारायणा, मला जे खटकते ते कृपा करून तू लक्षात घ्यावेस्. यापेक्षा अधिक मला काहीच बोलायचे नाही. ‘तेषामहम् समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात्’ (शरण आलेल्यांचा मी मृत्युसंसार सागरातून उद्धार करतो) असे जे तुझे वचन आहे, ते आता सिद्धीला नेलेस् तरच माझा तुझ्यावर खरा विश्वास बसेल, तुझ्या बिरुदावलींची सार्थकता मला कळून येईल.’
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)