नाटाचे अभंग... भाग ५०

४९. काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी ।
 अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपीं गंधीं ॥१॥
 कैसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण ।
 काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥धृ॥
 काय डोळे झांकूनियां पाहो । मंत्र जप काय घ्यावो ।
 कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥
 काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा ।
 काय तूं नव्हेसी नकळे ऐसा । काय मीं कैसा पाहों आतां ॥४॥
 तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ ।
 धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । वाहूं पुष्पांजुळ तुका म्हणे ॥५॥

 तुकोबारायांचे नानाविध विषयांवरील अनेक अभंग हे त्या त्या वेळी अंतःकरणात स्फुरलेल्या वृत्तींनुसार बाहेर पडलेले आहेत. तुकोबारायांचे चरित्र पाहू गेल्यास अथपासून इतिपर्यंत साधकाला ज्या ज्या स्थितीमधून जावे लागते, अशा सर्व प्रकारच्या अवस्थांमधून त्यांचे मार्गक्रमण झालेले आहे. विशेष हे की हे मार्गक्रमण असामान्यपणे शीघ्र झालेले आहे. एकाच अवस्थेत दीर्घ काळ राहण्याची त्यांची मनोवृत्ती नव्हती, तर जे हवे ते शीघ्रातिशीघ्र प्राप्त करून घेण्याची उत्कट इच्छा आणि त्यासाठीचे सायास झेलण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात दिसून येते. त्यांनी अन्यत्र म्हटले आहे, ‘करणें केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥’ त्यांच्या मनाने जे घेतले, त्यासाठी त्यांनी लाज बाळगली नाही किंवा काळाला आड घातलेले नाही. ‘कोण काय म्हणेल’ किंवा ‘नंतर पाहू’ असल्या कारणांना त्यांच्याकडे स्थान नव्हते. आपण नीच असल्याचे भगवंताला निवेदन करताना ते परिहार देतात की ‘मीं चांडाळ चांडाळ’ किंवा ‘मीं अवगुणी अन्यायी’ आणि हे तुकोबाराय पुढे ‘तुका झाला पांडुरंग’ या अवस्थेला पोहोचतात. म्हणजे त्यांच्या जीवनात संसारी विषयी गृहस्थ, जिज्ञासू, साधक, मुमुक्षु आदींपासून सिद्धावस्थेपर्यंतचा जो प्रवास झाला तो पंचवीस-एक वर्षात. त्यातली पहिली एकवीस वर्षे तर संसारी जीवनाची आहेत. त्यांचे लौकिक आयुष्य जवळपास एकोणपन्नास वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. म्हणजे त्यांचे ४०९२ (किंवा त्यापेक्षा बरेच अधिक) अभंग पंचवीस-एक वर्षांच्या कालावधीतील असल्याचे दिसते. या अभंगातून तुकोबारायांनी त्यांच्या अंतःकरणातील भाव कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त केले आहेत. त्यांच्या विषयांचा आवाका पाहता, त्यांच्या गाथेला ‘पंचमवेद’ म्हटले जाते, ते सार्थ आहे याची प्रचिती येते.
 या अभंगाच्या प्रारंभी किंकर्तव्यमूढ अशा साधकाचे मनोगत तुकोबाराय व्यक्त करतात. परंतु समारोपाच्या चरणाअगोदर अभंगात ‘आतां’ हे पद योजून ज्ञानोत्तर अवस्थेनंतर त्यांच्या किंकर्तव्यमूढ भावाचे निराकरण झाल्याचे नमूद करतात. ‘आतां’ या पदाने असा भाव व्यक्त होत आहे की, संतांच्या आशिर्वादाने आणि भगवंताच्या कृपेने तुकोबारायांच्या अंतःकरणात सर्व प्रकारच्या शास्त्रांचे अर्थ प्रकट झाले आहेत. हे घडणे तर स्वाभाविकच आहे की, जीवनास अशी अर्थरूपता प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक अवस्थेतील प्रश्न ‘मृगांबु’प्रमाणे व्यर्थ ठरतात.
 मानवदेह प्राप्त झाल्यानंतर त्या देहाचे एकमेव प्रयोजन स्व-स्वरूपाची प्राप्ती करून घेणे, हेच असल्याचे शास्त्रांचे सांगणे आहे. त्यासाठी करावयाच्या नानाविध साधनांमध्ये परमोच्च साधन म्हणजे देवाची भक्ती किंवा भावपूर्ण सेवा हेच असल्याचा उल्लेख भागवतात मिळतो (स्कंध ११, अ.२). सेवा आणि भजन हे समानार्थी शब्द आहेत, असे मान्य करावे लागते. त्याचप्रमाणे जन्य-जनक भावाने भक्ती ही भावाशिवाय प्रगट होऊ शकत नाही. मानवदेह हा केवळ भक्ती करून आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारा आहे आणि त्यासाठीच प्रत्येक युगातील पुरुष कलियुगात मानवजन्म आणि तोही या भारतवर्षात लाभावा, अशी इच्छा करीत असतो. ईश्वरप्राप्तीचे कोणतेही साधन असो, त्यात अंतःकरण चतुष्टयाचा, ज्याला ‘मन’ म्हणून आपण सामान्यपणे संबोधतो, त्याचा सहभाग अटळ असतो. त्याशिवाय कोणतेही साधन करता येत नाही. हे मन भगवंताचीच विभूती आहे (भ.गी. अ.१०). म्हणून प्रारंभी अट्टहासाने व सायासाने साधनाचरण केले, तरी साधकाला अशी अनुभूती येते की, त्याने हे साधन ‘केलेले’ नसून (भगवंताच्याच कृपेने) ते ‘झालेले’ आहे. तिथे साधकाचा कर्तृत्वभाव मावळतो.
  तुकोबाराय अंतःकरणातील विमूढ भाव प्रकट करताना म्हणतात, भक्ती तर करावयाची, हे खरे, पण ती करावी कशी? काही काळ संतसंग व त्यांच्या मुखाद्वारे श्रवण घडलेले सत्शास्त्र, त्याविषयी चिंतन-मनन करताना साधकाच्या मनात काही भाव उद्‍भवत असतात. भक्तीच्या अपर्यायीत्वाविषयी शास्त्र सांगते खरे, परंतु  ‘भक्ती म्हणजे नेमके काय? भगवत्प्राप्ती हे भक्तीचे ध्येय सांगितले जाते आणि त्यासाठी विविध साधनांचा उल्लेख शास्त्रे करतात. मग भक्तीचे साधन करण्यासाठीचा निषेधरहित विधी तो कोणता? तुकोबाराय या विचारांनीच प्रथम सगुण पूजेचा प्रश्न मांडतात. अर्पणभाव हा पाया असेल तर या भगवंताला काय अर्पावे (काय एक वाहावे तुम्हांसी) असा जो किंचित् प्रश्न तुकोबाराय उपस्थित करतात, त्याचे कारण ते हे सांगतात की, सर्वत्र हा भगवंतच भरून उरलेला आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याच्यापासून वेगळी अशी नाहीच. त्यासाठी पदरचे असे काही वेचावे लागत नाही. शास्त्र असे सांगते की, हा भगवंत स्वयं जगताचे ‘अभिन्न निमित्त-उपादान कारण’ आहे. (मातीपासून कुंभ बनविताना माती हे उपादान कारण असते आणि कुंभार हा निमित्त कारण असतो.) तुकोबाराय अधिक स्पष्ट करतात की, हा भगवंत पाच तन्मात्रांच्या स्वरूपात वाणी, खाणी, रस, रूप आणि गंध या सार्‍यातच भरून राहिलेला आहे. (‘वाणी’तून शब्दाची उत्पत्ती होत असते, ज्यांच्या संयोगाने मंत्रादी उच्चारले जातात, ‘खाण’ म्हणजे पृथ्वी किंवा भूमी. तिच्यापासून काष्ठ, धातू आदी घनरूप पदार्थ (खनिज) उत्पादित होतात, ज्यापासून मूर्ती घडविल्या जातात, दक्षिणा देण्यासाठी सुवर्णादी धातूंची नाणी बनविली जातात. तुकोबाराय अन्यत्र एका अशाच अभंगातही म्हणतात- ‘दक्षिणा तरी धातु नारायण।’), ‘रसा’द्वारे द्रवपदार्थ व्यक्त केले जातात जे स्नान-अभिषेक, पेय पान, नैवेद्य आदीसाठी उपयोगात आणले जातात. ‘रूपा’द्वारे अग्नी वा ज्योतीचे तेज किंवा कांती व्यक्त होते. उदा. मुखकांती, यज्ञयागादींसाठी होमाग्नी, आरतीसाठी नीरांजन ज्योत आदी. ‘गंध’ हा भूमीजन्य पुष्पे, अत्तर, धूपादी सुगंधित द्रव्ये आदींद्वारे व्यक्त होतो आणि वायु त्याचे वहन करतो.) सारांशातः, यच्चयावत् सर्व पदार्थातून भगवंत भरून उरलेला असल्याने जी काही द्रव्ये भगवंताला अर्पावयाची ती सारे त्याचीच रूपे जर आहेत आणि त्यांची निर्मितीही त्याचीच आहे, तर ती द्रव्ये आपली म्हणून अर्पण करण्याचे प्रयोजन शिल्लक राहात नाही.
 बाह्य अंगाने भगवंताच्या पूजेविषयीचा विचार व्यक्त केल्यानंतर तुकोबाराय अंतरंग पूजनाचा विचार सांगतात. कर्माचा कर्ता असणारा जीव आणि त्याला प्राप्त झालेला देह, जो इंद्रियांचा मेळा आहे, त्यात भगवंताचाच अंश आहे. या ईश्वरदत्त देहाचा विचार करता असे दिसते की, प्रत्येक इंद्रियाची एक-एक अधिष्ठाती देवता असून या देवता भगवंताच्या प्रतिनिधीरूपाने देहात वास करीत असतात. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे बल हे सर्व काही ईश्वराचेच देणे आहे. या सार्‍या देवतांवर एका भगवंताचीच सत्ता आहे. या भगवंताला प्राप्त करून घ्यायचे तर पाप आणि पुण्य या दोन्हींच्या खंडणाला पर्याय नाही, हा एक भाग तर इंद्रियांना विषयांपासून मुक्त करून निष्कर्म अवस्था प्राप्त होणे हा दुसरा भाग. जीव हा निरंतर कर्माला बांधलेला आहे, तो दुबळा आहे, तो परावलंबी आहे, त्याच्यावर ईश्वराची सत्ता आहे. अशा परिस्थितीत इंद्रियांवर बंधन घालणे जीवाला शक्य कसे व्हावे? या इंद्रियांना बंधन घालावे, तर ईश्वराच्या कार्यात ढवळाढवळ केली असे तर होणार नाही? अशी आशंका निर्माण होते. व्रताचरणाद्वारे देहाला कष्टविणे, हा मार्गही पर्यायाने ईश्वरालाच क्लेष पोहोचविणारा आहे. दानादीच्या योगे साधना करावी, तर अभंगाच्या धृपदाद्वारे विचारलेला तोच प्रश्न पुन्हा समोर येतो की, या भगवंतापासून वेगळे असे आहे काय, ज्यासाठी आपल्याला काही खर्चावे लागेल, मिळवावे लागेल व नंतर ज्याचे दान करता येईल. सारांशतः, इंद्रियांना आकळणे आणि योग्य प्रकारे साधन साधणे, ज्यामुळे पाप-पुण्याचे खंडन होईल, ते सामर्थ्यदेखील भगवंताच्या कृपेशिवाय शक्य होणारे नाही.  
 जप-ध्यान-धारणा हा अंतरंग साधनाचा जो दुसरा भाग आहे, त्याविषयी तुकोबाराय पुढे निवेदन करतात. नामरूपात्मक जे काही या विश्वात आहे, त्यातून ईश्वराचेच स्वरूप व्यक्त होत राहते. डोळे उघडे असताना क्षणिक अशा भौतिक पदार्थांचे दर्शन होत राहते आणि तिथे मन निरंतर गुंतून राहत नाही. चित्तावर ठसणारे असे कोणते रूप आहे, जे ध्यान धरण्यासाठी डोळे मिटल्यावर अंतःपटलावर साकारेल, याचा उलगडा होत नाही. अनंत नामांनी वर्णिलेला भगवंत निर्गुण निराकार असल्याचे जर शास्त्र प्रतिपादन करते, तर अनेकानेक देवतांना उद्देशून साधनमार्ग सांगणारे विधी संभ्रमित करतात. जपाकरिता या अनेकानेक देवतांच्या नामातून कोणते नाम निवडावे, याचा निर्णय करता येत नाही. मंत्राचा विचार करताना त्याची दुर्बोधता आणि विधिनिषेध भावजागृतीला अडसर ठरतात. सारांशतः, मनातला भाव दृढ व्हावा, यासाठी रूप, नाम वा मंत्र सारेच संभ्रमित करणारे वाटतात. जर भगवंताच्या सत्तेचा तेथे प्रत्यय येत नसेल, तर ते सर्व काही वायफळ ठरणारेच आहे, असे तुकोबाराय म्हणतात.
 बहिरंग साधनाचा एक भाग म्हणून तीर्थयात्रा करण्यास सांगितले जाते. त्यासाठी भ्रमण करावयाचे ठरवावे, तरीदेखील इंद्रिये, त्यांच्यातील सामर्थ्य हे भगवंतानेच दिलेले आहे. दुसरा भाग असा की, हा भगवंत अणु-रेणूत भरलेला आहे. तो नाही असे कोणतेही स्थान नाही. भ्रमण करताना पाऊल टाकावे, तर भगवंत नसलेली जागाच नाही, जिथे पाय ठेवता येईल. त्याला शोधण्यासाठी भ्रमावे, तर ईश्वराला एकदेशीय केल्यासारखे होते आणि तो शास्त्रापराध ठरतो. तुकोबाराय त्यांच्या अंतःकरणातील विचार निवेदन केल्यानंतर भगवंताला अतिशय विनयाने विचारतात की, ‘हे भगवंता, तू कुणालाही कळणार नाही, असा नाहीस का?’ आणि ते मग निवेदन करतात की, ‘तुझ्या या अनाकलनीय स्वरूपाचे चिंतन करून मी काय निष्कर्ष काढू? माझी मती कुंठीत झालेली आहे (कैसा पाहों).’
 मति कुंठित झालेल्या साधकापुढे प्रश्न शिल्लक राहतो, तो त्याने अकर्म्यण्यतेचा, काहीच न करता स्वस्थ बसण्याचा, अवलंब करावा काय? याचे स्पष्टीकरण तुकोबाराय या अभंगाचा समारोप करताना देतात. प्राप्त झालेल्या विमूढावस्थेतून ते बाहेर आल्याचे आणि त्यांचे अंतःकरण एका निर्णयाप्रत आल्याचे तुकोबाराय ‘आतां’ हे पद वापरून स्पष्ट करतात. त्यांच्या सार्‍या आशंका दूर झाल्या आहेत. बाह्य अंगाने करावयाचे पूजन असो वा अंतरंगाने करावयाचे अर्चन असो, सकळ पूजन-अर्चन, त्यासाठीचे मंत्र-माळा किंवा धूप, दीप, नैवेद्य, फळे, मुखशुद्धीसाठीचा तांबूल (पंचोपचार) आणि शेवटी अर्पावयाची पुष्पांजली हे सारे विधी भगवंताच्या नामाद्वारेच साधावयाचे. याचे कारण सांगायचे तर हे की, भगवंताचे अवतारादिक प्रगट होणे आणि स्वधामी परतणे याला आदी-अंत आहे. परंतु, आद्यंतरहित असणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भगवंताचे नाम. ते न आटणारे आहे. ते निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. या नामाद्वारेच भगवंताचे बहिरंग तसेच अंतरंग पूजन अर्चन करता येते. हा मार्ग तुकोबारायांच्या मनाचे समाधान करणारा आहे, कारण भगवंताचे नाम आणि त्याचे रूप हे संतांनी, भक्तांनी भगवंताला बहाल केलेले आहे. ते त्यांना संतांकडूनच प्राप्त झालेले आहे. या नामासाठी त्यांना त्यांचा भाव कारणी लावता येणार आहे. ‘तुका म्हणे मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥’ या तुकोबारायांच्या उक्ती अनुसार व्यवहारातील पंचोपचार पूजादेखील नामाच्या योगेच करता येते.
 श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी सांगितलेली परापूजा ही अशीच भगवंताचे सर्वसमावेशक विराट् स्वरूप वर्णन करते आणि त्यामुळे ते ते उपचार कसे करावेत, असा प्रश्न मांडते. परापूजेचा समारोप करताना परमेश्वराला जाणण्याचे कार्य आचार्यांनी बुद्धीवर सोडले आहे (एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमैः।). तुकोबारायांनी मात्र अत्यंत सोप्या आणि सर्वांना सुलभ मार्गाने भगवंताला प्रिय होणारा नाम-मार्ग दाखविलेला आहे.
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)