नाटाचे अभंग... भाग ५२

५१. इतुलें करी भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
 सांडूनी अभि-लाश अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥
 न करीं दंभाचा सायास । शांती राहे बहुवस ।
 जिव्हें सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥धृ॥
 जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ।
 संग न धरावा दुर्जनांचा । करीं संतांचा सायास ॥३॥
 करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
 तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
 धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हाचि निर्धार ।
 तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे ॥५॥

 तुकोबारायांनी केलेली साधना फळाला आली. परीणामी शास्त्र-संतवचनांवर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी अनेक मार्ग चोखाळल्यानंतर आणि त्यातून हाती काहीच न आल्याने, सरते शेवटी संतसंगाद्वारे उमगलेला नामजपाचा मार्ग त्यांनी अवलंबिला. त्यातून त्यांना इच्छिताची प्राप्ती झाली. त्यांना आलेली अनुभूती त्यांनी साधकाच्या हिताचा विचार म्हणून या अभंगाद्वारे मांडली आहे. यामधे ओघाने सांगावयाचे हे की, अहिताचे टाळण्यासाठी आणि हिताचे तेच आणि तेव्हढेच आचरण्यासाठी त्यांनी मनापासून श्रद्धाळू जनांना उपदेशात्मक शब्दात समजाविले आहे. थोडे शास्त्रीय भाषेत सांगायचे तर विधि-निषेध, कुपथ्य आणि पथ्य, टाळावयाचे आणि पाळावयाचे असे दोन्ही प्रकारचे, वागणे आणि विचार (अंतरंग आणि बहिरंग आचार) ते मांडतात. यामागे तुकोबारायांचा उद्देश इतकाच आहे की, अध्यात्माचा पाया चित्तशुद्धी असल्याने साधकाच्या अंतःकरणात हित-अहिताविषयीचा विवेक जागृत व्हावा आणि त्यायोगे साधक योग्य अशा सन्मार्गाचे अवलंबन करून आपले आत्यंतिक हित करून घेण्यास समर्थ व्हावा.
 सामान्यतः माणसास असे वाटते की, त्याच्या अपेक्षांची पूर्तता झाली की सुखाने जगता येईल. परंतु अनेक जन्म गेले तरी अपेक्षापूर्ती होत नसते. बेचैनीत माणूस हैराण होत राहतो. तो सुखाला वंचित राहत असतो. जीवाच्या पूर्वकर्मानुरूप प्रारब्ध योगाने त्याला जे मिळावयाचे आहे किंवा, त्याला मिळालेले जे जायचे आहे, ते टळत नाही. ‘कर्तुम्-अकर्तुम्-अन्यथा कर्तुम्’ सामर्थ्य असणारा भगवंत अशा भोगापासून कुणाला वंचित ठेवीत नाही. तसे असले तरी माणूस मायेच्या पगड्याखाली खचून चित्ताची शुद्धता घालवून बसतो आणि ओढाळ जनावराप्रमाणे जे नको तेच करीत राहतो. विषयाची त्याला लागणारी हाव संपत नाही. त्या मृगजळामागे धावत, स्वतःची उरफोड करीत, तो आयुष्य वाया घालवतो. एव्हढेच नव्हे तर पुन्हा पुन्हा जन्म घेत तीच सांसारिक दुःखे भोगत राहतो.
 चित्तशुद्धीशिवाय खरे सुख लाभत नसते. चित्तशुद्धीला मारक असलेल्या, नाडणार्‍या सात वृत्ती तुकोबाराय या अभंगात सांगतात आणि ‘इतुलें करीं’ असे म्हणून या अवांछित वृत्तींवा क्रमाक्रमाने उल्लेख करीत त्यापासून दूर राहण्यास सांगतात. ‘इतुलें करीं’ या शब्दांना ते ‘भलत्या परी’ या शब्दांची जोड देतात. यातून दोन अर्थ दर्शविले जात आहेत. एक तर ‘सायासाने; प्रयत्नपूर्वक’ असा अर्थ, तर ‘ज्यातून भलेच होईल, त्या प्रकारे’ हा दुसरा अर्थ.
 चित्तक्षोभास कारण होणारे सर्वात महत्त्वाचे दोन शत्रू म्हणजे लोभ आणि मोह. सद्विवेकाच्या अभावी चित्तशुद्धी बिघडविणारे हे दोन दोष अनेक दोषाना जन्म देत असतात. अभिलाषा किंवा आसक्ती, काम किंवा वासना, दंभ, आळस, द्वेष, दुर्जनांचा संग, विषयतृष्णा आदी सारे या लोभ आणि मोहाची पिल्ले ठरतात.
 माणसाला सुखाची तहान आहे. सामान्यतः माणूस संसारात ज्या सुखाची अपेक्षा करीत असतो, ते सुख क्षणिक, भ्रामक असे असले तरी त्या सुखाचे मोठे शत्रू ठरणार्‍या दोन दुष्प्रवृत्ती म्हणजे दुसर्‍याच्या धनाची आणि परस्त्रीची अभिलाषा. चित्तवृत्तींच्या क्षोभाला हे दोषही कारण होत असतात. तुकोबाराय या आसक्तीचा प्रथम उल्लेख करतात. परद्रव्याची अभिलाषा ही ‘लोभा’ची तर परस्त्रीची अभिलाषा ही ‘कामा’ची द्योतक आहे. अशी अभिलाषा सांडून म्हणजे त्यागून शुद्ध अंतःकरणाने (-सुखरूप) व्यवहार आचरला जावयास हवा.
 तुकोबाराय पुढे ‘दंभा’चा उल्लेख करतात. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत्, हे दाखविण्याचा यात हेतु असतो. असा खोटा दिखावा श्रीमंतीचा असेल वा विद्वत्तेचा वा सामर्थ्याचा. दंभाचे मूळ त्रयेषणांमध्ये ( म्हणजेच संतती-संपत्ती-कीर्ती यांच्या लोभात) असल्याचे दिसते. असा दंभ बाळगणे हे वास्तविकतः कष्टदायक असते. परत ‘आपले पितळ उघडे पडतेय् का?’ याची चिंता मन पोखरत असतेच. त्यामुळे दंभात सुख-शांती लाभणे शक्य नसते. दंभापोटी होणार्‍या बदनामीची जाणीव ठेवून अंतःकरणात ‘जे जसे आहे, ते स्वीकारले तर अंतःकरण फार शांत राहते. (शांती राहे बहुवस). दंभाचा एक भाग असा असतो की, स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी कित्येकदा दुसर्‍यास हिणकस, कडवट बोलले जाते. त्यामुळे मने विनाकारण दुखावली जातात. तुकोबाराय यासाठी उपदेशितात की, ‘जिव्हें सेवी सुगंधरस’. जिव्हा हे माणसाला दिलेले एकच इंद्रीय असे आहे की, जे वाक्-इंद्रिय आहे तसेच ते रसेंद्रीयही आहे. तुकोबाराय इथे जिव्हेने सुगंध आणि रस यांचे सेवन करावे, असे म्हणतात. इथे सुगंध हा प्रसन्नता दाखविणारा आहे आणि रस हा माधुर्य दाखविणारा आहे. सुगंध मनाला प्रसन्न करणारा असतो, तर गोड बोलणारा साखर पेरत असतो. ज्यायोगे सर्वांना प्रसन्न वाटेल असे गोड बोलण्याच्या कामी जिव्हेचा नित्य वापर करावा, असे तुकोबाराय येथे सांगत आहेत. इथे एका अन्य दुर्गुणाचा उल्लेख करताना तुकोबाराय माणूस हा सामान्यतः वायफळ बोलण्यातच आपण जिभेला गुंतवून ठेवत असतो, दिवसाचे काही क्षण फार तर माणूस भगवंताच्या स्मरणात घालवितो. त्याचा बहुतांश वेळ इतर विषयांवर बोलण्यातच वाया जातो. भगवंताच्या नामाची गोडी ही वास्तविक जिव्हेला हवीहवीशी वाटली पाहिजे. त्यासाठी मात्र माणूस आळस, अनास्था दाखवितो.  असे करणे हितावह नाही, असे तुकोबारायांना सांगावयाचे आहे. माणूस कितीही महत्त्वाचे बोलला तरी त्यातून होणारा लाभ चिरकाल टिकणारा नसतो. भगवंताच्या नामाचा होणारा परिणाम अंतःकरणावर, स्वतःच्या आणि ऐकणार्‍याच्याही, चिरकाल टिकणारा असतो, हे मात्र माणूस विसरतो. असे होणे साधकाच्या हिताचे ठरणारे नाही. इथे हे लक्षात घ्यावयाचे आहे की, ‘न करीं आळस रामनामीं’ हे या अभंगाचे धृपद आहे आणि अभंगाचा विस्तार याच विचाराभोवती गुंफलेला आहे.
 भगवंतांनी गीतेत त्याला आवडणार्‍या भक्तांचे गुण सांगताना ‘अद्वेष्टा सर्वभूतानाम् मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ ( ज्याच्या अंतःकरणात सर्व भूतमात्रांविषयी द्वेषभाव नाही, जो स्वार्थरहित आहे, सर्वांवर सारखेच प्रेम करणारा आणि करुणा दाखविणारा आहे, जो ममत्व आणि अहंकार न बाळगणारा, निरपेक्ष असा आहे, जो सुख वा दुःख मिळाल्याने विचलित होत नाही आणि जो क्षमाशील आहे... असा भक्त मला प्रिय आहे)’ असे म्हटलेले आहे. वेदातील शांतिमंत्रात ‘मा विद्विषा वहै  । (कुणाचाही द्वेष करू नकोस्)’ अशी आज्ञामूलक सूचना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एका म्हणीत म्हटल्याप्रमाणे ‘आपल्याचेनी होईना, दुसर्‍याचे साहेना’ असा काही माणसांचा स्वभाव असतो. द्वेषाचे दुसरे रूप म्हणजे मत्सर व हेवा. दुसर्‍याचे काही चांगले पाहिले की, त्यांच्या मनात मत्सर, हेवा पेटून उठतो. दुसर्‍याचा नावलौकिक, संपत्ती, भलेपणा त्यांना सहन होत नाही. यातून केवळ हैराणीच वाट्याला येते. कधी कधी दुसर्‍याचे नुकसान पाहून काही जणांना संतोष होत असतो. या दोन्ही वृत्ती माणूसपणाला घातक ठरणार्‍या असतात. हाच भाव थोडक्यात सांगताना, सर्वांशी गोड बोलावे, या विषयाचा विस्तार करीत, तुकोबाराय अद्वेष आणि सत्संग याबाबत सांगतात. आपण समाजाला धरून राहावयास हवे. जनांशी वागताना अजातशत्रूप्रमाणे सर्वच जनांशी मैत्रीचे संबंध ठेवावयास तुकोबाराय सांगतात. जनमित्र होण्यासाठी मनःपूर्वक आणि बाह्यांगाने कुठल्याही प्रसंगी आपल्या वाचेद्वारे अशुभ, अमंगलाचा उच्चार होणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी. शस्त्राच्या घातापेक्षा शब्दाचा आघात अधिक दुःखदायी असतो, हे नेहमी लक्षात ठेवण्यास सांगितले जाते. 
 दुर्गुणांचे वैशिष्ट्य असे की, ‘ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’ या न्यायाने असंगाच्या संगातून दुर्गुणांची लागण शीघ्र होत असते. त्यासाठी ‘दुःसंगः सर्वथैव त्याज्यः।’ किंवा मित्र पारखून घ्यावेत, असा संकेत आहे. देवपणाच्या प्राप्तीसाठी दुसर्‍याचे गुण-दोषवर्णन टाळणे हा सुलभ उपाय असतो. येथे गुणवर्णनही टाळावे, असे सांगितले जाते ते एव्हढ्याचसाठी की, गुण हा सापेक्ष असतो. एखाद्याचा गुण हा दुसर्‍यासाठी अवगुण ठरण्याची शक्यता असते. त्यासाठी केवळ भगवंताचे गुणवर्णन करावयास शास्त्र सांगते. तेच गुणवर्णन निर्दोष ठरणारे आहे. मनुष्यजीवनाचे आत्यंतिक कल्याण साधून देणारा खात्रीचा संग म्हणजे सत्संग होय. कारण, सत्संगासाठी पदरचे नुकसान सोसूनदेखील सत्संग धरावा, असे शास्त्रवचन आहे. प्रभु रामचंद्रांनी शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश करताना असे स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘प्रथम भगति ते करी सत्संगा ।’ यासाठीच तुकोबाराय निश्चयपूर्वक, सायासाने केवळ संतांचा संग धरण्यासाठी या अभंगात सांगत आहेत. 
 तीन चरणात तुकोबारायांनी विधि-निषेधाचा, हिताहिताचा साकल्याने विचार मांडून माणसाच्या ठिकाणी जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.  पुढील दोन चरणातून ते करणीय अशा विधींचा उपदेश करून व्यतिरेकाने साधकास त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवितात. आशा आणि तृष्णा याचा विचार करू गेल्यास दिसते की, याच वृत्तींनी देवापासून जीवापर्यंत सारेच व्याप्त झालेले आहेत. देवाला भक्तांची आशा असते. त्यासाठीच भीमातीरी तो अठ्ठावीस युगे उभा आहे. जीवाला नाना विषयांची आशा सतावत असते. त्यासाठी तो देवाला बिनदिक्कत साकडे घालतो. मात्र त्यानंतर ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा वृत्तीचे तो प्रदर्शन करीत राहतो. परंतु भगवंताने अशी मेख मारून ठेवली आहे की, माणसाची आशा कधीच तृप्त होत नाही. एक संपली की दुसरी आशा तयार होत असते. ती तहान भागविण्यासाठी तो पुन्हा पुन्हा भगवंताकडे आशाळभूत होऊन पाहू लागतो. तुकोबारायांचे सांगणे आहे की, अशा प्रकारे अमर्याद (बहुवस) तृष्णा वाढत राहिली तर कधीच सुखाचा लाभ संभवणार नाही. तुकोबारायांच्या कथनामागील भाव असा आहे की, ‘देवाकडे आशाळभूत होऊन पाहत राहण्यापेक्षा देवाला तुझी आस लागू दे. किंबहुना, देवाशिवाय अन्य कुणाचीही, कशाचीही आस मनात उद्‍भवू देऊ नये. अन्यथा निराशेशिवाय पदरी काही पडत नाही आणि हवे ते न मिळाल्याने दुःख होणे संपत नाही.’
 अभंगाचा समारोप करताना निर्वाणीचा उपदेश म्हणून तुकोबाराय साररूप असे तत्त्व सांगतात की, ‘धरूनि विश्वास करीं धीर’. प्रथमतः भगवंताच्या सामर्थ्याविषयी विश्वास धारण करायचा आणि प्राप्तघडी येईपर्यंत धीर धरायचा. ‘श्रद्धा आणि सबूरी’ हा भक्तीचा पाया आहे. ’मीपणा’चा म्हणजे अहंकाराचा पूर्णत्वाने त्याग करून आपला सारा भार एकदा भगवंतावर निष्ठापूर्वक टाकला म्हणजे आपला योगक्षेम तोच पाहत असतो. ‘योगक्षेमम् वहाम्यहम्’ असे भगवंताचे वचन आहे. खरे तर, ‘योगक्षेम’ या शब्दाचा, जीवाच्या दृष्टीकोनातून, हयातभर भरण-पोषण-रक्षण असा व्यावहारिक दिसणारा अर्थ फार संकुचित आहे. हा व्यवहार प्रत्येक जीवाच्या प्रारब्धानुसार सुरूच राहणारा असतो. तसाही हा भगवंतच यच्चयावत जीवांचे भरण-पोषण-रक्षण करणारा आहे. सर्व कर्ता-धर्ता एकमेव भगवंतच असून तो कुठल्याही जीवावर अन्याय करीत नाही. भगवंत योगक्षेम चालवितो, यामागील भाव असा आहे की, योगक्षेम यातील ‘योग’ म्हणजे ‘भगवंताला जो भावला, त्याला अप्राप्ताची प्राप्ती होणे’ आणि ‘क्षेम’ म्हणजे ‘आत्मा-परमात्म्याची एकता साधणे’. म्हणून योगक्षेम चालविणे यातून असे दर्शविले जाते की, हा भगवंत जीवाला अप्राप्ताची प्राप्ती करून देऊन (-‘योग’ साधून देऊन), म्हणजेच  भक्तीचे दान देतो आणि त्याचे ‘क्षेम’ म्हणजे मृत्युपश्चात् पुढील जीवनात आत्मा-परमात्मा ऐक्य देऊन हा भगवंत अखंड परमसुखानंदाचा लाभ करुन देण्यास तत्पर असतो. शेवटी तुकोबाराय आत्मविश्वासाने सांगतात की, या माझ्या सांगण्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका अथवा अवास्तवता नाही. अन्य अर्थाने असे म्हणता येते की, एकदा साधकाने भगवंतावर निष्ठायुक्त भाव धारण केला म्हणजे भगवंत साधकापासून अंतर ठेवत नाही; तो त्याला आपलासा करतो.
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)