नाटाचे अभंग... भाग ५४

५३. विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी ।
 विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानासीं उदार ॥१॥
 विठ्ठल स्मरणा कोंवळा । विठ्ठल गौरवी आगळा ।
 आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥धृ॥
 उभाचि परि न मनी शीण । नाही उद्धरितां भिन्न ।
 समर्थांचे घरीं एकचि अन्न । आर्तभूता क्षणोक्षणां सांभाळी ॥३॥
 रुचीचें प्रकार । आणिताती आदरें ।
 कोठेंही न पडे अंतर । थोरासी थोर धाकुट्या धाकुटा ॥४॥
 करतां बळ धरितां नये । झोंबतां डोळां मनच होय ।
 आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥५॥
 पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें ।
 करितों सेवन आइतें । तुका म्हणे चित्ते चित्त मेळवूनी ॥६॥
 तुकोबारायांना आत्मप्रचिती आली. मन अत्यंत समाधानाने भरले. आपल्या उपास्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात कोणताही संदेह राहिला नाही. हा पांडुरंग त्याच्या रूपा-गुणासह त्यांना जसा प्रत्ययाला आला, तसे त्याचे वर्णन तन्मय होऊन त्यांनी या अभंगात केलेले दिसत आहे. त्याचा रहिवास, त्याचे स्वरूप, अलौकिक कार्य आणि त्याचे कर्तृत्व-महिमान तुकोबाराय क्रमाक्रमाने वर्णितात. या वर्णनातूनच साधकामध्ये अशा अवस्थेत होणारा बदलही तुकोबाराय अप्रत्यक्षरित्या निवेदन करतात.
 एखाद्याचा पत्ता सांगताना आपण ज्याप्रमाणे इलाखा, तालुका, मुक्काम-पोस्ट, घराजवळची खूण असा तपशील नमूद करतो, त्याप्रमाणेच तुकोबाराय आपले उपास्य विठ्ठल याचा ठावठिकाणा सांगतात. तो भीमातीरवासी आहे. भीमा नदीच्या तीरावर अनेक गावे आहेत. त्यातील पंढरी नगरीत हा विठ्ठल राहणारा आहे आणि पुंडलिकापाशी हा उदारपणे कृपादान देण्यासाठी उभा आहे. कृपा आणि औदार्य हा विठ्ठलाचा संयुक्त गुण तुकोबाराय येथे नमूद करताना कृपादान तो करीत असल्याचे सांगतात. येथे ‘कृपादान’ या शब्दावर काही विचार करता येईल.
 व्यवहारात बोलताना साधारणतः ‘कृपा, करुणा, दया’ हे शब्द आपण जवळजवळ समानार्थाने उपयोगात आणतो. खरे म्हणजे या तीन संवेदनांमध्ये थोडा थोडा फरक आहे. ‘करुणा’ ही प्रसंग पाहून, आपत्तीचे गांभीर्य लक्षात येताच तत्क्षणी अंतःकरणात निर्माण होते आणि त्यात दयाभावाचा अंश असतो. अंतःकरणात करुणभावाच्या निर्मितीसाठी वेळ लागत नाही. ‘दया’ भाव काहीसा वेळखाऊ आहे. एखाद्यावर आलेली आपत्ती पाहून मन लगेच द्रवते खरे, परंतु काही काळ वाट पाहून, ज्याच्यावर आपत्ती आली आहे, त्या व्यक्तीला त्या आपत्तीचा सामना करण्यास लागणारी योग्यता प्राप्त होत नाही, असे जेव्हा लक्षात येते, तेव्हा आपल्या अंतःकरणात ‘दयाभाव’ जागृत होतो. असे पाहा की, काही कामासाठी तुम्ही घाईघाईने निघाला आहात. जात असताना तुमच्या लक्षात येते की, समोरील व्यक्ती भोवंडत आहे. ती पडू नये म्हणून तुम्ही लगबगीने पुढे होता, त्या व्यक्तीला आधार देता, त्याला पाणी वगैरे देता. आवश्यकता असेल तर दुसर्‍याची मदत घेऊन त्या व्यक्तीला आवश्यक ते सारे साहाय्य करता आणि ती व्यक्ती स्थिर झाल्यावर त्वरा करीत आपल्या कामासाठी मार्गस्थ होता. या प्रसंगात तुमच्या अंतःकरणात जी संवेदना जागी झाली ती करुणा असते. एखाद्या व्यक्तीची नौकरी सुटलेली आहे. पैशाअभावी तो आपल्या अपत्याला वा कुटुंबातील कुणा जवळच्या व्यक्तीला अत्यावश्यक ते वैद्यकीय उपचार करू शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही शक्य तेव्हढे पैशाचे सहाय्य करता किंवा आवश्यक त्या मदतीसाठी हात पुढे करता. अशा प्रकारची संवेदना ‘दया’ असते. ‘कृपा’ ही संवेदना आणखीन् वेगळी आहे. ती एक प्रकारचे दान असते. भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात दानाची व्याख्या करताना भगवंताने म्हटले आहे, सात्विक दानासाठी देश-काल-पात्र यांचा विचार केला जातो. ‘सर्वांभूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन ॥’ असे तुकोबारायांनी अन्यत्र म्हटलेले आहे. सापाला दूध पाजून उपयोग नाही. तेथे केवळ अभयदान योग्य ठरणारे असते. थोडक्यात, करुणा येते; तिथे सहजता आहे. दया दाखविली जाते; तेथे व्यवहार आहे आणि कृपा केली जाते; तिथे सदसद्विवेक जागा असतो.
 विठ्ठल हा कृपा करणारा आहे, असे म्हणताना तेथे पात्रता असणे, कृपेसाठी काल-परिपक्वता असणे, अभिप्रेत आहे. तथापि, विठ्ठल हा उदार आहे, कारण ज्याच्यावर कृपा करावयाची आहे, त्याच्या ठिकाणी आवश्यक ती पात्रता तोच देत असतो आणि तेच त्याच्या औदार्याचे गुह्य आहे. कालसापेक्षता ही मात्र तेथे पाहावयास मिळते. कुणाला इच्छिताची प्राप्ती अल्प काळात होते तर कुणाला कालांतराने. ही कालसापेक्षता काहीशी संबंधित व्यक्तीच्या प्रारब्धावर अवलंबून असते, असे म्हणता येईल. परंतु तो जेव्हा दान देतो, भरभरून देतो अन् ज्याला दिले त्याला तृप्त करतो. दुसरे एक वैशिष्ट्य असे की, हा पंढरी क्षेत्री एकटाच उभा आहे. त्याची पत्नी असलेली रुक्मिणी अर्थात लक्ष्मी रुसलेली आहे, दूर आहे. तिच्या शोधार्थ आपले वैभव सोडून हा वैकुंठाहून आला आहे. अन्य देवांप्रमाणे याचा कर वरदमुद्रेत नाही. त्यामुळे तो ऐश्वर्यदान देत नाही, तर प्रथम त्याच्या कृपेची याचना करणार्‍याला (धन-जन-विषय यांपासून) निस्संग करून सोडतो आणि मग जे दान देतो, ते केवळ पारमार्थिक असते, अखण्ड समाधान देणारे, सच्चिदानंद अवस्था देणारे असते.
    तुकोबाराय पुढे वर्णन करतात की, हा विठ्ठल ‘स्मरणा कोंवळा’ आणि ‘गौरवी आगळा’ आहे. कोवळेपणात मृदुता, टवटवीतपणा जसा आहे, त्याचबरोबर आकर्षकता आणि विकसनशीलताही आहे. आपण पेरलेल्या बियाणाला आलेले कोंब पाहून मन हरखून जाते. छोट्याशा कोवळ्या कोंबाचा पुढे सुवासिक सुमने देणारा किंवा मधुर फळे देणारा वृक्ष होतो. विठ्ठलाचे रूप असेच मृदु आहे, त्याच्या हाती कोणतेही शस्त्र नाही, त्याच्या मुखावरील मंदस्मित त्याला टवटवीतपणा देणारे आहे, तो आकर्षक आहे आणि एकदा त्याची आठवण मनात रुजली की, तो वारंवार आठवला जातो. मनाचा ताबा घेतो, मनाला आपल्याप्रमाणेच टवटवीत करतो. त्याचे स्मरण, जे पुढे निदिध्यासात परिवर्तित होते, ते कुठल्याही साधकाला सहजसाध्य होणारे आहे. ‘गौरव’ म्हणजे महानता. विठ्ठलाचा गौरव आगळा-वेगळा आहे. त्याच्या गौरवाचे वर्णन करावयास वेद-शास्त्रे-पुराणेही तोकडी पडतात. उलट, साधा-भोळा, अज्ञानी साधकदेखील त्याचे स्वतःचे समाधान होईल, त्याप्रकारे त्याची स्तुती करतो. त्यासाठी त्या साधकाला शास्त्रज्ञानाची काहीही आवश्यकता नाही. आणि हा भगवंत अशा स्तुतीनेही आनंदित होतो. खरे म्हणजे त्याची महानता शब्दातीत, केवळ अनुभूतीनेच आकळणारी आहे. याचे मुख्य कारण किंवा स्पष्टीकरण देताना तुकोबाराय पुढे म्हणतात की, हा केवळ जीवमात्रांचाच नव्हे तर सकळ चराचरासह सार्‍या ब्रह्मांडाचा आधार आहे. तो ‘लीळाविग्रही’ आहे. तो निर्गुण-निराकार जसा आहे, तसा एकमेव कर्ता-करविताही तोच आहे. जे कार्य करावयाचे त्याअनुसार हा विग्रह धारण करतो. कच्छ-मत्स्य-वराह-नृसिंहादी अनेक रूपात हा अवतीर्ण होतो आणि लोकोत्तर लीला करतो. कृष्णावतारी त्याने ज्या लीला केल्या, त्या अनुषंगाने या भगवंताला ‘लीलापुरुषोत्तम’ हे नामाभिधान दिले गेले आहे.
 हा पंढरीनिवासी असणारा विठ्ठल ‘उभा’ आहे आणि तो त्याचा शीण मानीत नाही, असे तुकोबाराय वर्णन करतात. ‘उभा असणे’ म्हणजे वाट पाहणे, कार्यासाठी तत्पर असणे, अस्वस्थता दूर करणे आणि आश्वस्तता देणे. ‘युगे अठ्ठाविस’ हा एकाच स्थितीत, समचरणांवर उभा असूनही याच्या मुखावर शिणवट्याचा लवलेशही नाही. हा तितकाच आनंदी, प्रसन्न दिसतो आहे. असा तिष्ठत उभा राहून हा निरंतर भक्तांची प्रतीक्षा करीत आहे. ‘उभा असलेल्या’ या विठ्ठलाचे दुसरे कार्य तुकोबाराय सांगतात की, आलेल्याचा उद्धार करताना हा पक्षपातीपणा करीत नाही. कोणताही भेद मानीत नाही. किंबहुना, ज्याचा उद्धार केला त्याला आपल्यापासून भिन्न ठेवत नाही, आपलासा करून ठेवतो. इथे तुकोबाराय एक दृष्टांत देतात. ‘समर्थ’ म्हणजे सर्वांसाठी सम असणारा, सर्वांकडे सम दृष्टीने पाहणारा (समः + थ), बहु प्रमाणात धन असणारा (सम् + अर्थ) अर्थात् धनिक. अशा सात्त्विक व्यक्तीच्या घरी एकाच प्रकारचे अन्न असते आणि जो भुकेला (-आर्तभूत) त्याच्याकडे येईल, मग तो कधीही येवो, त्याला तेच अन्न भेदभाव न करता त्या धनिकाच्या घरी मिळते. मोक्षाविषयी सांगताना श्रीज्ञानेश्वर माऊलींनी हाच दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात, ‘समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरिल्या एक पक्वान्नें । तेंवी श्रवणें, अर्थें, पठणें । मोक्षुचि लाभे ॥ (ज्ञा. १८\४८)’. हा विठ्ठल असाच समर्थ आहे. जीवाच्या ठिकाणची आर्तता कोणताही भेदभाव न करता लक्षात घेऊन विठ्ठल प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगी, त्या आर्ततेचे समाधान करून देतो. (साधकाच्या चार श्रेणी सांगितलेल्या असून आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चौघांच्याही ठिकाणी आर्तता ही असतेच.)
 वरील दृष्टांतात तुकोबाराय समर्थ असलेल्या विठ्ठलाच्या घरच्या ज्या अन्नाचा उल्लेख करतात, ते अन्न म्हणजे श्रीज्ञानेश्वर माऊली जो मोक्ष म्हणतात, त्यालाच तुकोबाराय भक्ती मानतात. भक्तिमार्गाने उपासना करीत असताना प्रत्येकाची आवड (व क्षमता) किंवा रुचि एकसारखी असेलच असे नाही. साधनमार्गातील रुचिच्या वैचित्र्याचे वर्णन पुष्पदन्त विरचित शिवमहिम्नस्तोत्रात पाहावयास मिळते. तेथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, सांख्यशास्त्र, योगमार्ग, पाशुपतशास्त्र, पंचरात्रादी वैष्णव सांप्रदायिक पद्धती वगैरे सरळ, वाकडे, भिन्न भिन्न मार्ग लोक अवलंबितात, असे म्हटलेले आहे. त्या सर्वांचे अंतिम प्राप्तव्य एकच असते, ते म्हणजे भगवंत. त्यामुळे मार्ग गौण ठरतात. तुकोबारायांनाही हेच सांगावयाचे असून भगवंताचे सेवक असलेले संत त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक आर्ताला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आणि सामर्थ्यानुसार (- थोरासी थोर, धाकुट्या धाकुटा) भक्तीच्या नऊ प्रकारांपैकी (श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन) कोणताही एक प्रकार किंवा अनेक प्रकार अत्यंत आदराने ग्रहण करवितात. असे जरी असले तरी फलप्राप्तीमध्ये कोणतीही भिन्नता राहात नाही (- कोठेंही न पडे अंतर). आकाशातून पडणारे पाणी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाने वाहात येऊन सागरालाच मिळते, त्याचप्रकारे भक्तीचा मार्ग कोणताही असो, एकाच भगवंताच्या चरणाशी ते पोहोचवीत असतात.  
 साधकास सावध करीत तुकोबाराय पुढे विठ्ठलाचे वैशिष्ट्य वर्णन करतात की, ‘करता बळ’ म्हणजे केवळ अट्टहासाने केलेल्या साधनाच्या योगे किंवा केवळ कोणत्याही साधनाच्या बळाच्या योगे या विठ्ठलाला प्राप्त करून घेता येणे शक्य होत नाही. असे असण्याचे कारण असे सांगता येते की, साधन किंवा साधनाचे बळ परमेश्वराच्या प्राप्तीस पुरे पडत असेल तर त्या साधनासच महत्त्व प्राप्त होईल व साध्य गौण ठरेल. म्हणून बळाने हा विठ्ठल प्राप्त होत नाही तर तो कृपासाध्य आहे. त्याची कृपा झाली की, साधन गौण ठरते. साधन-बळापेक्षा साधकाच्या अंतःकरणातील भावबळ भगवंताला प्रिय आहे. भगवंताच्या अथवा संतांच्या कृपाप्रसादाने साधकाची दृष्टी भगवंताच्या ठायी जडली की, मग साधकाचे मन भगवंतमय होऊन जाते आणि डोळ्यांच्या मार्गे हा भगवंत साधकाच्या अंतःकरणात उतरतो. तो हृदयनिवासी होतो. ‘आपुला उद्देश’ म्हणजे साधकाच्या मनातील ऊर्मी. भगवंतच मनाला व्याप्त करून हृदयनिवासी झाला असल्याने तो त्या ऊर्मी जाणत असणे स्वाभाविकच असते. तुकोबाराय इथे ‘झोंबता डोळां’ असे शब्द योजतात. डोळे जेव्हा झोंबू लागतात, तेव्हा त्यात पाणी तरळते. हे अश्रू आनंदाश्रू असतात. त्या ठिकाणी सात्त्विकतेचे प्राधान्य असल्याने दृष्टी आणि डोळ्यातील भाव दोन्हीही पावन होतात, शुद्ध होतात. अशा पावन मार्गाने भगवंताला निर्वेधपणे साधकाच्या हृदयात उतरणे सोपे होते. भगवंत एकदा साधकाच्या हृदयात अवतीर्ण झाला की, तो साधकाची सोय जाणून तदनुकूल परिणाम घडवून आणतो.
 अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय मातेला फुटणार्‍या पान्ह्याचा दृष्टांत देतात. मातेच्या ठिकाणी पान्हा फुटतो तो केवळ वात्सल्यापोटी. बाळ भुकेले आहे किंवा नाही (- भरिलें रितें) हा तेथे प्रश्न नसतो. तद्वत्, भगवंत हा स्वभावतः भक्तवत्सल आहे. त्यामुळे भक्ताच्यासाठी त्याच्या स्नेहाचा पाझर (पान्हा) अनवरत स्त्रवत असतो. एकदा सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र सारखाच पसरतो. सूर्याच्या ठिकाणी प्रकाशदान देण्यासाठी कोणताही भेदभाव (-अंतर) नसतो. तसेच, एखाद्या ठिकाणी हजार वॅटचा बल्ब तेवत आहे, म्हणून त्या भागात आपला प्रकाश सूर्य देत नाही, असे होत नाही. विठ्ठलाचा स्नेह अशाच प्रकारे अखंड पाझरत राहणारा आहे. स्तनपानाचे सुख बालक जसे एकाग्रचित्ताने करीत असते, त्याप्रमाणे भक्त हे प्रेमरसामृत प्राशन करीत असतात. तुकोबाराय अत्यंत समाधानाने उद्गारतात की, ‘भगवंताच्या ठिकाणी अखण्ड पाझरणारे हे प्रेमपीयूष मला आयतेच मिळाले आहे. मी ते ‘चित्ते चित्त मेळवून’ सेवन करतो.’ ‘चित्ते चित्त मिळवून’ या शब्दांतून असाही अर्थ ध्वनित होत आहे की, भगवंत हृदयनिवासी असल्याने त्याचे आणि साधकाचे दोघांचेही चित्त एक झाले आहे. तेथे द्वैत राहिलेले नाही. एकचित्त झालेल्या दोघांनाही, या अलौकिक प्रेमरसामृतदानातून आणि प्रेमरसामृतपानातून, सारख्याच आत्मसुखाची अनुभूती येत आहे.  
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)