नाटाचे अभंग... भाग ५५

५४. ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगाऐसें दुःख ।
 अवलोकितां उपजें सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥
 न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी ।
 स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधि ॥धृ॥
 रामकृष्ण ध्यान वामननरसिंही । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं ।
 सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥३॥
 गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण ।
 व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥४॥
 ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार ।
 अनंत आणि अपरंपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥५॥
 जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा ।
 अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक ॥६॥
 {गेल्या वर्षी गुरुवार, चैत्र शुध्द प्रतिपदा, शके १९३५. दिनांक ११-०४-२०१३ या शुभदिनी जगद्‍गुरु श्रीतुकाराम महाराज यांच्या अभंगांतील
 ‘नाटाचे अभंग’ या विषयावरील चिंतनाला प्रारंभ केला होता आणि त्या चिंतनावर आधारित पहिला लेख दिनांक १२ एप्रिल २०१३
 रोजी ‘मनोगतीं’ना सादर केला गेला. त्यानंतर गेले वर्षभर हा क्रम सुरू  राहिला. प्रस्तुतचा अभंग हा या लेखमालेतील ५४वा
 समारोपाचा अभंग. (तुकाराम तात्या पडवळ यांच्या समग्र गाथेत अकरा नाटाचे अभंग अतिरिक्त दिले आहेत. ते जिज्ञासूंसाठी
 परिशिष्टात दिले आहेत. कराडकर संपादित गाथा-संग्रहातून जे अभंग ‘नाटाचे अभंग’ म्हणून दिले गेले आहेत, ते या लेखमालेत
 समाविष्ट केले आहेत.) या समारोपाच्या अभंगावर चिंतन करीत असताना अकारण एका प्रकारे संपलेपणाची हुरहुर वाटते. तथापि, सागराचा कुठलाही भाग
 असो किंवा सोन्याचा कण असो वा  अग्नीची ठिणगी असो, त्यामध्ये मूळ रूपाचे सर्व गुण समाविष्ट असतातच. त्यामुळे या संपलेपणाला
 फारसे महत्त्व न देणेच योग्य.}
तुकोबाराय काया-वाचा-मने पांडुरंगाची सेवा करू लागले. त्या अवस्थेत असताना एक वेळ अशी आली होती की, अत्यंत उद्वेगाने त्यांनी भगवंतापुढे आपली निराशा प्रगट करताना म्हटले -
 जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
 काय समाधान केलें कोणें वेळे । कोणें माझें लळे पाळियेले ॥२॥
 आभासही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥३॥
 आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसें जगामाजी झालें ॥४॥
 तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥५॥
 - तुकोबारायांचे अंतःकरण आतुरतेपोटी तळमळत असताना पांडुरंगाने त्यांच्या सेवेची दखलही घेतली नाही. त्याने स्वप्नात येऊन आभासी दर्शन-संवादसुखही मिळू दिले नाही. तुकोबारायांना या सार्‍याची लाज वाटते आणि हा भगवंत आपल्याला मोकलेल, सोडून जाईल, म्हणून या अभंगावाटे ते दुःख प्रगट करतात.
 तुकोबारायांची अशी अवस्था जाणून भगवंताने तुकोबारायांच्या सेवेची पावती दिली. नवस फळाला आला. जे प्रारब्ध आड येत होते, नाट लावत होते, त्याने काढता पाय घेतला. तो मंगल क्षण उगवला-.
 ‘जोडी ते नारायणा ऐसी । आवीट ज्यासी नाश नाहीं ॥’
 नामदेवराय पांडुरंगाला घेऊन आले. स्वप्नात येऊन त्यांनी दृष्टांत दिला. ते तुकोबारायांशी मधुर वाणीने बोलले ! होय... ते तुकोबारायांची बोलले !!. त्यांनी तुकोबारायांची दृष्टी उघडली, वाणी अळंकारिली. ‘तुका चरणीं लोळतुसे’ अशी अत्यानंदाची अवस्था तुकोबारायांना प्राप्त झाली.
 या पार्श्वभूमीवर देवाचे रूप बाह्यांतर अवलोकन करीत असताना मनात उठणार्‍या नानाविध ऊर्मींचे तरंग प्रस्तुतच्या अभंगाद्वारे प्रगट करताना तुकोबाराय म्हणतात, ‘ताप हें हरण श्रीमुख’. या ठिकाणी कार्यकारणभावाचा विचार केला तर ‘ताप हरण’ हे कार्य होय आणि ‘श्रीमुख दर्शन’ हे कारण होय. या दोहोत कार्य हे श्रेष्ठ ठरणारे असले तरी कारणालाही अप्रत्यक्षपणे महत्त्व प्रस्थापित झालेले आहे. जीवदशेस प्राप्त झालेले यच्चयावत् जीवमात्र अनंत जन्माचे फेरे घेऊनदेखील तापत्रयापासून ( आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक या तीन प्रकारच्या तापापासून) सुटका करून घेऊ शकत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती ही की, यात हे तापत्रय नष्ट होत नाहीत, तर त्यांपासून जो ताप होत होता, तो आता वाटत नाही. ही काहीशी देहातीत अवस्था असते, असे म्हणता येईल. ताप या शब्दाने दुःखरूपात आलेली प्रचिती दाखविले जाते. हे दुःख जन्माला येणार्‍या प्रत्येक जीवाच्या पाठी (जीवाची इच्छा असो वा नसो) लागलेले असते. त्यापासून जीवाला कायमस्वरूपी सुटका करून घेता येत नाही. जन्माला येणे-विकार पावणे-मृत्युच्या दुःखाला सामोरे जाणे हाच एक रोग मानला जातो. यालाच अध्यात्मात भवरोग (भव - पुन्हा पुन्हा जन्मा येणे) म्हटलेले आहे. हे दुःख श्रीमुख दर्शनाने हरले जाते, असे तुकोबाराय म्हणतात. याचाच अर्थ असा की, जीवाचे पुन्हा पुन्हा तापत्रयाला तोंड देत जन्माला येणे व दुःखदायक जिणे संपते. मीराबाई त्यांच्या एका भजनात ‘हा भवसागर सुकून गेला आहे, आता मला तो तरून जाण्याची फिकिर वाटत नाही’ असे म्हणतात. अध्यात्माचा विचार करता, केवळ दुःखाचा आत्यंतिक नाश होऊन कृतार्थता प्राप्त होत नसते तर, त्यापुढे निखळ, शुद्ध, दोषरहित असे अनंत सुख प्राप्त होण्यातच कृतार्थता असते. तुकोबाराय हेच गुह्य स्पष्ट करताना म्हणतात, ‘अवलोकितां उपजे सुख’. भगवंताचे ते साग्रस्वरूप अवलोकन केल्याचा हा अलौकिक परिणाम आहे. ‘उभें सन्मुख दृष्टीपुढें’ या चरणखण्डातून असा भावार्थ प्रगट होत आहे की, तुकोबाराय आणि भगवंत दोघेही एकमेकांना सन्मुख उभे आहेत आणि परस्परांना हा सुखाचा अनुभव येत आहे.
 भगवंताचे रूप न्याहाळताना प्राप्त झालेली अलौकिक आत्मप्रचिती निवेदन करताना तुकोबाराय पुढे म्हणतात, ‘न पुरे डोळियांची धणी’. डोळ्यांची काहीही करून तृप्ती होत नाही. नजर त्या रूपावर खिळून राहते. तुकोबारायांनी या स्थितीचे अन्य एका अभंगात सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥’ तेथे सुखाची परमावधी गाठली जाते. दर्शनाची तहान तहानलेलीच राहते. डोळ्याची भूक भुकेलीच राहते. श्रीमुख पाहताना ही जी अवस्था होते, त्याला कारणही हा भगवंतच आहे. त्याच्या दर्शनाने मनाचा मळ आपोआपच दूर होतो. मनाची स्वाभाविक ओढ अनावृत्त होते. ते मग आपल्या मूळ स्वरूपाशी, ते ज्या भगवंताची विभूती आहे त्या भगवंतापासून विलग होऊ इच्छित नाही. या भगवंताचे आणखी एक लक्षण सांगताना तुकोबाराय म्हणतात, हा भगवंत ‘कृपेचीच खाणी’ आहे. येथे ‘च’कारात्मक उल्लेख केलेला आहे. याच्या ठिकाणी अवकृपेला यत्किंचितही स्थान नाही. हा भगवंत ‘सखोल कृपेची खाण’ आहे. ही खाण ‘सखोल’ आहे, तेथे कृपा ठासून भरलेली आहे. त्याचप्रमाणे, हा भगवंत ‘सखोल कृपा’ करणारा आहे. जीवाचे केवळ निरतिशय कल्याण करणारा तो आहे. त्याच्या कृपेचे मोजमाप, खोली, परिमाण नाही. याच्या कृपेचे गोडवे गाताना वेदवाणीही तोकडी पडते, असे म्हटले आहे. वास्तविक वेद हे या भगवंताचेच उच्छ्‍्‌‌‌‍वास आहेत. किंबहुना ‘वेदो नारायणो हरिः’ असेही म्हटले जाते. स्वतःचे गुण, महती ही ज्याची त्याला जोखता येत नाही. ज्याच्या अनुभूतीला ती येते, तोच त्याच्या कुवतीप्रमाणे ते गुण, महती वर्णन करू शकतो. तुकोबाराय म्हणूनच अन्यत्र म्हणतात, ‘तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ॥’ इथे, ‘तुझ्या रूपाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ॥’ असा तुकोबारायांचा भाव आहे. तुकोबाराय भगवंताला कृपेची सखोल खाण, सखोल कृपा करणारा म्हणून वेदांच्या मर्यादित सामर्थ्याचा उल्लेख करतात. परंतु, त्यांना जाणवते की, खाण म्हणावी तर तेथे खनन अपेक्षित आहे आणि खणून जे हाती येते, ते शुद्ध स्वरूपात नसते. त्यावर संस्कार करून शुद्ध रूप द्यावे लागते. ते या विचाराने भगवंताला ‘कृपानिधी’ किंवा कृपेचा सागर संबोधतात. सागराचे एक वैशिष्ट्य लक्षात घेतले तर तुकोबारायांच्या या उक्तीचा अर्थ उमगतो. सागर मेघांचे रूप धारण करून अमृतवृष्टी करतो आणि जीवांना जीवनदान देतो. त्याप्रकारे हा भगवंत विठ्ठलाचे हे लोभस रूप घेऊन कृपेचा वर्षाव करतो. हा विठ्ठल ‘समचरणी’ आहे. कृपेचा वर्षाव करताना कुणासाठी हा विषम होत नाही. सार्‍यांना अमित कृपादान देणारा हा भगवंत म्हणूनच भक्तांची ‘धणी पुरी होऊ न देणारा’ ठरतो. 
 देवाचे स्वरूपवर्णन करून पुढे तुकोबाराय देवाचे तटस्थ लक्षणही वर्णन करतात. त्याच्या रूपातील विविधता पाहताना काही प्रसंगी ते रूप सौम्य, लोभस, गोड, मनोहर असे वाटते तर काही प्रसंगी ते रौद्र, उग्र, भयप्रद असल्याचे पुराणांतरी वर्णन केलेले आहे. याचे उदाहरण देताना तुकोबाराय राम, कृष्ण, वामन, नरसिंह या चार रूपांचा उल्लेख करतात. जीव जेव्हा आपल्या सीमित बुद्धीने विचार करतो, तेव्हा त्याला भगवंताचे कार्य कधी सुखदायी तर कधी दुःखदायी वाटते, कधी ते न्यायाचे तर कधी अन्यायाचे भासते. यातील द्वैताचा कार्यकारणभावही जीवाला उमगत नाही. तुकोबारायांचे सांगणे आहे की, विवेकबुद्धीने आगम-निगमादिकांचे अवलोकन केल्यास भगवंताला सौम्य-उग्र, चांगला-वाईट, न्यायी-अन्यायी वगैरे द्वंद्वांमध्ये अडकवता येत नाही किंवा त्याप्रकारे त्याचे वर्णन करता येणारे नाही. हा यथार्थपणे नक्की आहे कसा, हे अनुभवायचे झाल्यास अंतःकरणातील अतिशय शुद्ध भाव भरून ओसंडत वाहत असताना याचे अवलोकन करावयास हवे (वाही शुद्ध भाव पाहीं). तरच आणि तरच याचे तटस्थ तसेच स्वरूप लक्षण उमगेल. याचे कारण तुकोबाराय सांगतात ते हे की, सगुण स्वरूपात आलेल्या या भगवंताला भक्ताच्या अंतःकरणातील शुद्ध भाव प्रिय आहे. तेच  त्याचे ‘भातुके’ म्हणजे आवडते सेव्य आहे. हे भातुके सेवन करून भगवंत आपले यथार्थ ज्ञान भक्तास करून देतो. शबरीच्या मनातील शुद्ध भाव त्याला भावतो, तिला तो साक्षात् दर्शन देतो, तिची उष्टी बोरे तो खातो आणि तिला भक्तीचे वर्म कथन करतो. 
 आपल्या सन्मुख असलेल्या विठोबाचे वर्णन करताना तुकोबाराय काही विशेषणांनी त्याला गौरवितात. हे गुण असे - गुणगंभीर, चतुर, सुजाण, शूर, धीर आणि उदार. गुणगंभीरत्व म्हणजे याच्या गुणांचा तळ कुणालाच कुठल्याही साधनाने गाठता येणारा नाही. हा चतुर आहे. ज्या प्रश्नांमध्ये अथवा ज्या गुंत्यामध्ये कुठलाही मार्ग सापडत नाही, तेथे त्या त्या वेळी हा भगवंत बिनबोभाटपणे मार्ग काढून स्वसामर्थ्याने गुंता सोडवितो. त्यात याच्या अद्वितीय चातुर्याचे दर्शन होते. म्हणूनच तुकोबारायांनी अन्यत्र या भगवंतास ‘चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी ॥’  असे वर्णिले आहे. याच्या सुजाणत्वाबाबत पाहता असे लक्षात येते की, जीवाने वा उपासकाने वा भक्ताने कुठल्याही प्रकारची केलेली मागणी ही जर त्याच्या अंतिम हिताची ठरणारी नसेल, तर त्याला योग्य अशी जाण देऊन ‘येन केन प्रकारेण’ हा भगवंत मागणी करणार्‍याला परावृत्त करतो आणि योग्य मार्ग निवडायचे स्वातंत्र्य देतो. याविषयी एका सुजाण व्यक्तीने भगवंताचे केलेले वर्णन विचार करावयास लावते. ती व्यक्ती म्हणते, -  
 ‘मी शक्ती मागितली : मला संकटे मिळाली : मी बलवान् व्हावे म्हणून !
 मी शहाणपण मागितले : मला समस्या मिळाल्या : सोडविण्यासाठी !
 मी ऐश्वर्य मागितले : मला बुद्धीमत्ता आणि बळ मिळाले : काम करण्यासाठी !
 मी धाडस मागितले : मला अडथळे मिळाले : पार करण्यासाठी !
 मी प्रेम मागितले : मला संकटग्रस्त माणसे भेटली : त्यांना मदत करण्यासाठी !
 मी कृपा मागितली : मला संधी उपलब्ध झाल्या : योग्य विनियोग करण्यासाठी !
 मी जे मागितले ते मला मिळाले नाही, पण ज्याची गरज होती, असे सारे काही मला मिळाले !!’
- भगवंताचे सुजाणत्व स्पष्ट करणारी ही वाक्ये खूप काही सांगून जातात. ‘ऊठ आणि युद्ध कर’ असे सुरुवातीस अर्जुनाला सांगणारा श्रीकृष्ण त्याला यथार्थ ज्ञान देतो आणि शेवटी ‘तुला योग्य वाटेल ते आता तूं कर’ असे म्हणतो. भगवंताकडून ज्ञान प्राप्त झालेला अर्जुन मग आपल्या कर्तव्याला सामोरा जातो. त्यात श्रीकृष्ण भक्कमपणे त्याच्या पाठीशी राहतो आणि यश देतो. तुकोबाराय पुढे हा भगवंत शूर-धीर-उदार असल्याचे सांगतात. हे तिन्ही गुण एकत्रित असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा शूराच्या ठिकाणी क्रोधाचे आधिक्य आणि धीराच्या ठिकाणी विलंब आणि उदारत्वात अस्थानी दातृत्व (misplaced generosity) हे दोष संभवत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे म्हटलेले आहे. शूर-धीर-उदार असलेलाच अभयदान देण्यास समर्थ असतो. असे उदारत्व असणे हे भगवंताच्या षडैश्वर्यापैकी तिसर्‍या क्रमांकाचे ऐश्वर्य असल्याचे शास्त्रात सांगितलेले आहे.
 अशा या विशेष गुणमंडित भगवंताला तुकोबाराय ‘नारायण’ संबोधतात आणि ‘व्यापक तरी त्रिभुवन’ अशी पुष्टी जोडतात. ‘नारायण’ हे भगवंताचे प्रथम सगुण रूप असले तरी ते ‘नार (-पाणी)+अयन (निवासस्थान)’ असल्याने काहीसे एकदेशीय वाटणारे आहे. म्हणून हा भगवंत ‘नारायण’ असला तरी तो स्वर्ग-मृत्यु-पाताळ व्यापून राहणारा ‘त्रिभुवन’ आहे, असे तुकोबाराय स्पष्ट करतात. पुढे ते आणखी एक विषेशता उल्लेखितात की, अशा या भगवंताचे नितांत सुंदर रूप म्हणजे ‘लावण्य’ हे ‘मनमोहन’, म्हणजे कमालीचे चंचल असणार्‍या मनाला भुरळ घालून स्तब्ध करणारे आहे.
 तुकोबाराय या भगवंताचे मुखावलोकन करीत त्याचे विविधांगांनी वर्णन करीत असताना, त्यांच्या अंतःकरणातील ऊर्मी शांत होत नाहीत. जे दिसते ते भगवंताचे स्वरूप-लक्षण इतकीच त्याची ओळख नसून, त्याचे तटस्थ लक्षण वेगळेच आहे. हा तटस्थ परमात्मा मोहक रूप घेऊन ‘कटीं कर धरून’ उभा असल्याचे ते वर्णन करतात. पाहणार्‍याचे मन हरण करणारी ही मूर्ती पाहिल्यास आणि अंतःकरणात याच्या सगुण साक्षात्काराचा प्रत्यय आल्यास ते दर्शन एव्हढे सुंदर व सुखदायी होते की, त्याचे वर्णन शब्दांद्वारे करणे शक्य होत नाही. जाणिव तेथे प्रवेश करू शकत नाही, विचार मागे फिरतात आणि  वाचा निवृत्त होते. याचे नाम आणि रूप हे कधीही विनाश न पावणारे आणि कुठलाही विकार नसणारे आहे. याच्या स्वरूपाचे वर्णन करावयाचे झाल्यास त्याला कुठल्याही प्रकारे शेवट नसल्याने ते अनंत आहे, अंतरहित आहे. तसेच याचे स्वरूप अंतर्बाह्य इंद्रियांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने अपरंपार आहे. मन-बुद्धी-इंद्रियांना, आगम-निगमांना, ब्रह्मादी देवांना अकळ असणारा असा हा परमात्मा भक्तांच्या संतोषार्थ कमरेवर कर ठेवून उभा आहे, असे सांगताना तुकोबाराय त्याची भक्तजनकल्याणासाठीची तत्परता दाखविण्यासाठी हा भगवंत कटीं कर ‘धरीत आहे’ असे वर्णन करतात.
 सुरुवातीच्या मुमुक्षु अवस्थेत ‘आभासही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥’ असे अतीव दुःखोद्गार काढणारे तुकोबाराय या अभंगाच्या प्रसंगी नमूद करतात की, ‘जयाची वाणी सुमनमाळा’. यातून असा अर्थ ध्वनित होत आहे की, भगवंत तुकोबारायांशी प्रत्यक्ष बोलले. त्यांच्या वाणीने तुकोबारायांना परमसुख दिले. आता निःशंकपणे ‘देव बोलतो आणि त्याच्या वाणीत परमामृत जिव्हाळा असल्या’चे ते जनांना सांगत आहेत. तसे पाहता, श्रीमद् भगवद्गीता ही ‘भगवान् उवाच’ या प्रमाणाने भगवंताची वाणी म्हणविली जाते. जीवाच्या अखंड हिताच्या धाग्यात भगवंतांनी वैचित्र्यपूर्ण विविध शब्दरूपी सुमनांची गुंफलेली माळ, ती भगवद्गीता. ही माळ त्याने भक्ताच्या गळ्यात घातली आहे. अर्जुनाच्या सख्यभक्तीचा तिथे परिपोष आहे. जीवाचे एकमेव कर्तव्य आहे की, मस्तक नमवून ती माला आपल्या गळ्यात धारण करावयास हवी. किंबहुना, मनुष्यजीवनरूपी यज्ञ अंगिकारण्यासाठीचे हे यज्ञोपवीत आहे, असे म्हणता येईल. चौर्‍याऐंशी लक्ष योनींमध्ये केवळ मनुष्यदेहालाच प्रसाद रूपात वाणी दिलेली आहे. ही वाणी दुधारी शस्त्र आहे. या वाणीच्या योगे अनेकांनी आपला हित-घात करून घेतला आहे. तुकोबारायांच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की, या वाणीद्वारे समोरच्याला देता येईल, तेव्हढे समाधान देण्यासाठी जिव्हेचा जिव्हाळा, सोज्वळता, मृदुता, सौंदर्य आदी अनेक गुणांची उधळण करता येते. भगवंताला मनुष्याकडून असेच वर्तन अभिप्रेत आहे. भगवंताने विविध अंगांनी अठरा अध्यायाद्वारे आपल्या वाणीने गुणांची उधळण करून जीवाने आपले हित साधून घेण्याचा मार्ग आखून दिला आहे. अशा या अनंताच्या अंगी अनंत कळा -कौशल्ये- आहेत नि अशा सर्वसमर्थ भगवंताचा चरणसेवक होण्याचा अधिकार आता भगवंताने तुकोबारायांना बहाल केला आहे. तुकोबारायांच्या मुखातून अभंगरूपाने या भगवंतानेच गाथारूपी सुमनपुष्पमाला गुंफली आहे, असे म्हणता येते. त्यातून भगवंताच्या परमामृतजिव्हाळ्याचे सेवन जनांना करता येते.
 ...... आणि, मग तुकोबारायांच्या परिपक्व झालेल्या भक्तीने त्यांना निवविले. भगवंताच्या सेवेसाठी जीवदेखील त्यांनी अर्पण केलेला. भगवंताने त्यांना आपल्या चरणाशी आश्रय दिला आहे. आता त्यांना काहीच कर्तव्य उरले नाही. मनुष्यजीवनाची सार्थकता झाली आहे. ते अशा अवस्थेत उद्‍गारतात -
 माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
 गोष्ट न करीं नांव नेघे । गेलों दोघे खंडोनी ॥२॥
 स्तुती समवेत निंदा । केला धंदा उदंड ॥३॥
 तुका म्हणे निवांत ठेलों । वेंचित आलों जीवित्व॥४॥
(इति शम्) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)