नाटाचे अभंग : भाग ५६ ( समारोप)

समारोप:
 जगद्‍गुरू संत श्रीतुकाराम महाराज यांच्या गाथेतील ‘नामपर अभंगां’चे आणि 'नाटाच्या अभंगां' चिंतन करीत असताना 'शब्दरूप' तुकोबारायांच्या सुखदायी छायेचा लाभ गेली दोन वर्षे उपभोगला. त्या चिंतनाचा आज समारोप करीत असताना मन संकल्पपूर्तीने काहीसे समाधान पावत आहे, पण त्याचबरोबर आता पुन्हा या छायेचा लाभ संचितात लिहिलेला आहे का नाही, या प्रश्नाने काहीशी चिंताही आहे. ‘यथा योग्यं तथा कुरु’ अशी विनंती मात्र करावी, असे मनोमन वाटते.
 या अभंगांचे पुन्हा एकदा सावकाश वाचन केले असताना अकारण मनामध्ये एक विक्षिप्त वाटणारा प्रश्न निर्माण झाला. या चौपन्न अभंगांच्या विषयांचा आढावा घेता असे दिसले की, अशा विषयांचे विविध अभंग गाथेत इतरत्र विखुरलेले आहेत. मग, पुनरुक्तीचा दोष पत्करून त्याच विषयांवर पुन्हा पुन्हा रचना करण्यामागे तुकोबारायांचा आशय काय असावा? चिंतन करीत असताना असे लक्षात आले की, या 'नाटाच्या' अभंग लिखाणामागे एक वेगळा हेतु अवश्य असावा. या अभंगांना 'नाटाचे अभंग' जे म्हटले आहे, त्यातच या प्रश्नाचेही उत्तर सापडावयास हवे, असा विचार मनात आला. त्या दृष्टीने चिंतन करीत असताना लक्षात आले की, जन्मोजन्मींचे संस्कार आणि जोपासलेले व्यासंग, जो खरे तर संचिताचाच एक भाग असतो, त्यामधून अज्ञानजन्य मतीद्वारे जीव प्रपंचाला सन्मुख राहतो तर परमार्थाला विन्मुख होतो. त्याच संचिताचा एक भाग म्हणून जीवाला सत्संग, शास्त्रश्रवण, ईशकृपा आणि संतप्रसादाचा लाभ झाला की, जीवाच्या ठायी विवेकजागृती होते. मग त्यावे दिग्भ्रमित होणे संपते. परिणामी जीव प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थाभिमुख होतो. तुकोबारायांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीही अंगांचा सर्वांगिण विचार करून त्यातले सारतत्त्व तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त झालेल्या साधकास स्वल्प प्रयत्नाने आत्मसात् करता यावे, यासाठी या अभंगांतून मार्ग दाखविला आहे. ज्याप्रमाणे दधिमंथन करून सार असणारे नवनीत आपल्या 'आवडत्या'पुढे ठेवावे (यशोदामातेने स्वयत्नाने असे नवनीत बालकृष्णाला दिले), असाच हा प्रकार आहे. तुकोबारायांनी या अभंगाद्वारे जे कथन केले आहे, ते अशा साधकांसाठी आहे, ज्यांची आवड-निवड विगत झालेली आहे. आपल्या ज्ञानाग्नीने हे नवनीत कढविल्यास, नवनीताला जसे तूपरूप अमृतत्व प्राप्त होते, तद्वत् साधकास अमृतत्वाचा लाभ होईल. तुकोबारायांनी हाती दिलेले हे नवनीत सदा सर्वदा सर्वांसाठी हितकर ठरणारे आहे. अशा प्रकारचे स्वयंसिद्ध असे तत्त्वज्ञान, भाषेच्या अवडंबरात न गुंफता सामान्यातील सामान्य भाषेत तुकोबारायांनी हे अभंग सिद्ध करून ठेवले आहेत. त्यांची ही कृती तीव्र मुमुक्षुत्व पावलेल्या साधकास पथप्रदर्शक ठरेल, एव्हढेच नव्हे तर, मार्गात येणार्‍या अंतरायांचे निराकरण करण्याचे सामर्थ्यही साधकास प्राप्त होईल. श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 'हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं । वरीं कैवल्यरसें वोगरलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥ (ज्ञाने.६.२२)' अशीच मेजवानी तुकोबाराय या नाटांच्या अभंगांद्वारे ‘निष्काम’ साधकांना देत आहेत. 
 नाटाच्या या अभंगांमध्ये प्रपंच आणि परमार्थ यांमधील कोणताही भाव, प्रसंग, विचार स्पर्शरहित ठेवलेला नाही. या अभंगांना 'नाटाचे अभंग' का म्हणायचे, याबद्दल चिंतन करीत असताना आणि विविध शब्दकोशांत दिलेले विविध अर्थ पाहताना एक गोष्ट लक्षात आली की, ते सर्व अर्थ इथे लागू करता येत नाहीत. तथापि, नाट या शब्दाद्वारे व्यक्त होत असणार्‍या अर्थातील 'कार्यात अपशकुन करणे' या अर्थाला 'कार्यास विरोध करणे, अन्यथा मानणे' अशी जोड द्यावयास हवी. या ठिकाणी प्रपंच आणि परमार्थ, लौकिक आणि अलौकिक या द्वंद्वांचा विचार करताना ही द्वंद्वे स्वभावतः परस्परविरोधी असल्याने प्रपंच परमार्थास नाट लावीत असतो, असे स्पष्ट होते. सत्संग, शास्त्रावलोकन, आत्मानात्मविवेक, संत व देव यांची कृपा आदींपैकी कशानेही सार व असार याचा निर्णय करणारा विवेक जागृत होतो. अशा विवेकाच्या योगे साधकाने आपल्या बुद्धीकौशल्याने सार प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यास असा प्रयत्न प्रपंचाला नाट लावणारा ठरतो. वेदांगातील आरण्यके ही याच विषयाचा ऊहापोह करणारी आहेत. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांच्या संवादात मैत्रेयी म्हणते, 'येनाहं नामृता स्यां किमहं तेन कुर्यां' (ज्यापासून मला अमृतत्व लाभणार नाही, ते घेऊन मी काय करू?) (बृ.उ. २.४) किंवा श्रीमद् भगवद्गीतेत मोहाला बळी पडलेला अर्जुन (भासित ज्ञानाधारे अविवेकाने) प्रत्यक्ष भगवंतास म्हणतो,'न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च...'(भ.गी. २.३२). प्रपंचातील मोहाने कर्तव्यास नाट लावण्यासाठी अर्जुन स्पष्टपणे (किंबहुना उद्दामपणे) प्रत्यक्ष भगवंतालादेखील विरोध करतो. तेथे प्रपंचाने परमार्थाला नाट लावलेला आहे. कृष्णार्जुन संवाद पुढे चालत असताना अर्जुनाच्या अंतःकरणात आमूलाग्र बदल होतो, तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो, 'नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥' (भ.गी.१८.७३) (आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आहे आणि मला माझी स्मृती परत लाभली आहे. आता मी संशयरहित झालो आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे करेन.) भगवंताच्या अमृतवाणीने अर्जुनाच्या अंतकरणात आमूलाग्र बदल घडून आल्यानंतर त्याच्या ठिकाणी परमार्थ साधण्यासाठी प्रपंचास भगवत् वचनांनी नाट लागलेला आहे. याच न्यायाने तुकोबारायांनी तीव्र मुमुक्षु साधकास असार प्रपंचाला नाट लावून 'न आटणार्‍या, शाश्वत' अशा परमार्थमार्गाला अभिमुख केलेले आहे.
 वरील विचाराच्या आधारे पाहता अभंगसंग्रहातून दिसणारा 'नाटाच्या अभंगां'चा क्रम विस्कळित वाटला. या चौपन्न अभंगांवर नजर टाकली असता हे अभंग प्रथम 'परमार्थास प्रपंचाने लावलेला नाट' आणि 'परमार्थाने प्रपंचास लावलेला नाट' या दोन प्रकारात विभागता येतील, असे लक्षात आले. नाटाच्या प्रकार लक्षात घेऊन त्या आधारावर अभंगांची विभागणी केल्यानंतर त्या त्या विभागात अभंगांचा अनुक्रम लावण्याचा विचार मनात आला. साधक परमार्थ मार्गावर ज्या अवस्थांतून प्रवास करतो, त्यात उपदेश, जागृती (पश्चात्ताप \ विवेकजागृती), साधना (दैवतनिश्चिती \ साधननिश्चिती), शरणागती (निष्ठा \ प्रार्थना) व कृतार्थता (साधनमहिमा \ संतमहिमा \ देवमहिमा) या अवस्था अंतर्भूत होतात. कृतार्थतेनंतर समाधान लाभलेले असते. या समाधानापोटी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसे करताना संतमहिमा, साधनमहिमा आणि देवमहिमा वर्णिला जातो. या अनुरोधाने विचार करता ‘नाटाच्या अभंगां’चा क्रम पुढीलप्रमाणे लावता येईल.
(अर्थात् हा क्रम आम्हाला आमच्या अल्पमतीप्रमाणे सुचला तसा, किंबहुना तुकोबारायांनी सुचविलेल्या विचारांनी, सादर केलेला आहे.)

.विभाग                                   नाटाचे स्वरूप                            अनुक्रमांक/लेखमालेतील अभंग क्र.
जीवास उपदेश                       परमार्थास नाट                        १/१३, २/३६, ३/१२, ४/४०, ५/५१ 
जागृती\पश्चात्ताप                    परमार्थास नाट                         ६/१८, ७/५२, ८/५०
जागृती\विवेक-उदय              परमार्थास नाट                         ९/६, १०/५, ११/३, १२/२०, १३/९, १४/७, १५/४५, १६/३०
साधना\आराध्यनिश्चिती           प्रपंचास नाट                            १७/११, १८/३७, १९/१, २०/४, २१/१७
साधना\साधननिश्चिती             प्रपंचास नाट                            २२/३१, २३/१५, २४/२५, २५/४९, २६/३५
शरणागती\निष्ठा                   प्रपंचास नाट                             २७/२४, २८/८, २९/१०, ३०/३३, ३१/२२, ३२/१६, ३३/३४, ३४/१४, ३५/२९
शरणागती\प्रार्थना                  प्रपंचास नाट                            ३६/३९, ३७/२८, ३८/४७, ३९/३२, ४०/४२, ४१/२७, ४२/४३
कृतार्थता                                प्रपंचास नाट                            ४३/२३, ४४/२, ४५/२६, ४६/५३, ४७/५४
कृतज्ञता\साधनमहिमा            प्रपंचास नाट                            ४८/१८, ४९/४१
कृतज्ञता\संतमहिमा               प्रपंचास नाट                            ५०/३८, ५१/४६
कृतज्ञता\देवमहिमा                प्रपंचास नाट                            ५२/२१, ५३/४४, ५४/४८.

जय जयाजी सद्‍गुरु तुकया दातारा ।
तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥
॥ श्रीविठ्ठलचरणी वाहिली ही शब्दफुलांची माला ॥

*****

'मनोगत' जालावर 'नाटाचे अभंग' ही लेखमाला सादर केली गेली. या निमित्ताने संतश्रेष्ठ जगद्‍गुरू तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवर चिंतन घडले. त्याला कारण असे झाले की, सार्थ गाथा वाचताना अनेकदा काहीतरी विसंगती जाणवे. संतश्री तुकारामांची गाथा हा डॉ. रामपूरकर यांचा ‘वीक पॉइण्ट’ असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोललो आणि स्वतंत्र सार्थ गाथा तयार करावयाचा प्रयत्न करावा, असा विचार समोर ठेवला. त्यांना बोलण्याचा कंटाळा नाही आणि मला लिहिण्याचा. तथापि, डॉक्टरांनी असे सुचविले की, गाथेतील निवडक विषय घेऊन त्यावर चिंतनात्मक सारांशाने लिखाण करणे, आपली वये लक्षात घेता योग्य होईल. त्याप्रमाणे प्रथम गाथेतील 'नामपर' १०८ अभंगावर लिखाण झाले. रोज साधारण तीन-साडेतीन तास आमची चर्चा चालत असे. या चर्चेअंती लिखाणाचा आराखडा तयार होई. मी मग घरी येऊन त्या लिखाणाच्या आधाराने संगणकावर शोधन-संपादन करीत असे. त्यासाठीही चार-चार तास बसणे चाले. ते लेखन गुढीपाडवा, ४ एप्रिल २०११ ते २२ जानेवारी २०१२ या अवधीत पुरे झाले. हे लिखाण ग्रंथ रूपात 'तुका म्हणे नाम...' या नावाने नुकतेच छापले गेले आहे. (पृष्ठे ४२२, रु.२५०/- मात्र). या अगोदर वर्ष २००४ ते २००७ दरम्यान श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठावरील मुक्तचिंतनात्मक ग्रंथ 'नाम-नवनीत' (तीन भाग, एकूण पृष्ठे ११००, मूल्य रु.३००/- मात्र) प्रकाशित झाले आहे. (या ग्रंथाचे सर्व हक्क डॉ. रामपूरकर आणि मी, दोघांनीही, ‘ज्येष्ट-राज : सिनियर सिटीझन्स कल्चरल ग्रुप (रजि.), मांडा-टिटवाळा, जिल्हा ठाणे’ या संस्थेस अर्पण केलेले आहेत.)
 गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला 'नाटाचे अभंग' हा विषय त्याच पद्धतीने हाती घेतला होता. तो ही भगवंताच्या कृपेने तडीस जात आहे. या निमित्ताने संतसेवा सुरू राहिली, हाच मोठा आनंद. ही दीर्घ लेखमाला 'मनोगतीं'ना कितपत आवडली, हे मात्र गुलदस्त्यातच राहिलेले आहे. असो. डॉक्टरांच्या सहभागासाठी  त्यांचे हार्दिक आभार मानू या.

 मनोगतींना डॉ. रामपूरकरांची संक्षिप्त ओळख करून देत आहे -

   ह.भ.प. (डॉ.) पांडुरंग रंगनाथराव रामपूरकर यांचा अल्प परिचय

 परभणी जिल्ह्यातल्या चारठाणा गांवचे. त्यांचा जन्म आषाढ वद्य प्रतिपदा शके १८६० (१३ जुलै १९३८) चा. त्यांचे घराणे व्यापार-सावकारी पेशाचे. कालौघात पारंपारिक पेशापासून नव्या पिढ्या दूर जाणे स्वाभाविक होते. आयुर्वेद विद्या विशारद झाल्यानंतर महाराष्ट्‍ राज्य सरकारी आरोग्य अधिकारी पदावरील जवळ जवळ पंचवीस वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेली. गेली चाळीस वर्षे टिटवाळा (जिल्हा ठाणे) येथे स्थायिक.
 घरचे सांस्कारिक वातावरण सनातनी. त्यामुळे धार्मिक तसेच पारमार्थिक संस्कार बालपणापासूनच रुजलेले. १९८० पासून त्या संस्कारांचे व्यासंगात रूपांतर झाले. देवाची आळंदी येथे माऊलींच्या छायेत (वै.) आनंदाश्रमस्वामींचा प्रसाद लाभला.
 पंढरपूर-आळंदी-देहूचे निष्ठावंत वारकरी. जगद्‍गुरू श्री तुकाराम महाराजांना आदर्श ठेवून परखड वाणीने कीर्तन-प्रवचनांतून भक्तिमार्गाचा प्रसार. रसाळ, ओघवत्या, भावस्निग्ध निरूपणातून श्रोत्यांच्या मनाची पकड घेण्याचे कसब. कोणत्याही ओवी-अभंगाचे तत्काळ निरूपण करण्याची हातोटी.
 आधी बोलावे मुग्ध जन करावे । असावे सप्रमाण अवघे निरूपण ॥
 स्वामींच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून श्रोतृवृंदास भक्तीच्या मळ्यात विहार घडवून आणण्याची हातोटी. श्री तुकारामगाथा आणि श्रीमद् भागवत हे आवडते विषय. कीर्तने-प्रवचने तसेच तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतात चौफेर प्रवास. अनेक धार्मिक संस्थांना अन्नदानादीसाठी भरीव मदत.
 यांचा मानस हाच की ‘देह पडो या चिंतनी । विठ्ठल नाम संकीर्तनीं ॥’.

संपर्क : ह.भ.प. (डॉ) रामपूरकर : +९१९८२०३७६१७५

परिशिष्ट : अन्य गाथासंग्रहातून आढळणारे तुकोबारायकृत अतिरिक्त 'नाटाचे अभंग'

 कराडकर यांनी संपादित केलेल्या अभंगसंग्रहातून आढळणार्‍या 'नाटाचे अभंग'या शीर्षकाखालील ५४ अभंगांवरील काही चिंतनात्मक विचार आपण पाहिले. (या संग्रहात ‘तुकयाबंधु’ यांच्या नांवे असलेले ९ अतिरिक्त 'नाटाचे अभंग' समाविष्ट केलेले आहेत. ते अभंग विचारात घेतलेले नाहीत.) तुकाराम तात्या पडवळ यांनी संपादित केलेल्या समग्र गाथेत तुकाराम महाराजांचे म्हणून ८,४४१ अभंग समाविष्ट आहेत आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी संपादित केलेल्या गाथेत ४५८३ अभंग आहेत (या गाथेस संयुक्त-गाथा म्हणता येईल कारण त्यात तुकयाबंधु, कान्होबा आदींचेही अभंग समाविष्ट आहेत.) या दोन अभंगसंग्रहात 'नाटाच्या अभंगां'ची संख्या अनुक्रमे ५६ आणि ६५ अशी वेगवेगळी आहे. संस्थानाच्या गाथेत जे दोन अभंग अतिरिक्त दिसतात, ते श्रीगणेशाला उद्देशून आहेत. स्वाभाविकरित्या हे दोन अभंग कराडकर गाथेत समाविष्ट नाहीत.
 तुकाराम तात्या पडवळ यांनी संपादित केलेल्या बृहद् गाथेत जे अतिरिक्त ‘नाटाचे अभंग’ आहेत, ते जिज्ञासू जनांच्या माहितीसाठी या परिशिष्टात उधृत केले आहेत. यातील पहिले दोन अभंग, जे श्रीगणेशाला उद्देशून आहेत, ते श्री संत तुकाराम महाराज संस्थान. देहू यांनी संपादित केलेल्या गाथेतही समाविष्ट आहेत.

१. प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा । मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥ तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें । पावविसी तेथें तूं चि एक ॥२॥ आरंभा आदि (आधीं?) तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ऋषि मुनि आदिकरून । ग्रंथपुराण निर्माणी ॥३॥ काय वर्णूं तुझी गती । एवढी कैची मज मती । दीनानाथ तुज म्हणती । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥४॥ मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भगसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका म्हणे ॥५॥

२. प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥ तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घागर्‍या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥ नटारंभीं थाटियला रंग । भूजा नाचवी हालवी अंग । सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥ जया मानवती देव ऋषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धणी । असुर जयाच्या चरणीं । आदी अवसानीं तो चि एक ॥४॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका म्हणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥

३. अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा । अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥ अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा । अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया । अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा । अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥३॥ अगा उपमन्यसहाकारा । अगा शयनाफणिवरा । अगा काळकृतांतअसुरा । अगा अपारा अलक्षा ॥४॥ अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापती राजहंसा । अगा ये पंढरीनिवासा । अगा सर्वेशा सहजरूपा ॥५॥ अगा परमात्मा परमपुरुषा । अगा अव्यया जगदीशा । अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडी भवपाशा तुका म्हणे ॥६॥

४. कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा । कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशा परी ॥१॥ कर्म भ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान । नाहीं इंद्रियांसी दमन । नव्हे मन एक विध ॥२॥ नेणें यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार । मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥३॥ न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ । न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥४॥ आतां राख कैसें तरी । मज नुपेक्षावें हरी । तुझीं ब्रिदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका म्हणे ॥५॥

५. हरी नारायणा केशवा । गोविंदा गोपाळा माधवा । कृष्णा विष्णु श्रीरामा यादवा । मधुसूदना सर्वेशा ॥१॥ वामना विराटा त्रिविक्रमा । श्रीधरा वैकुंठधामा । भक्तमनोरथपूर्णकामा । परशरामा कृपाळा ॥२॥ पद्‍मनाभा हृषिकेशा । दामोदरा पूर्ण परेशा । संकर्षणा आदि सर्वेशा । परमपुरुषा परमात्मा ॥३॥ प्रद्युम्ना जगदीशा । माझी आजि पुरवावी आशा । तुज प्रार्थितों पुराणपुरुषा । विबुधईशा पाळका ॥४॥ अनिरुद्धा पुरुषोत्तमा । रमारमणा मेघःश्यामा । अधोक्षजा गोकुळ धामा । अच्युता अनंता नरहरी ॥५॥ गोपीव्रजजनसुखकरा । कंसमर्दना वीरयावीरा । कुब्जारत यदुवीरा । दीनोद्धारा दीनबंधु ॥६॥ तुका म्हणे विश्वंभरिता । तुज ऐसा नाहीं दाता । कोठें न दिसे धुंडितां । माझी चिंता करावी ॥७॥

६. विठ्ठल जीवाचा सांगातीं । विठ्ठल वसे सर्वांभूतीं । विठ्ठल दिसतसे सुषुप्ती । स्वप्न जागृती विठ्ठल ॥१॥ विठ्ठल सर्वांचा आधार । विठ्ठल मुक्तीचें माहेर । विठ्ठल साराचें ही सार । विश्वाधार विठ्ठल ॥२॥ विठ्ठल साधन परब्रह्म । विठ्ठल कैवल्याचें धाम । विठ्ठल नाम परम  । हरती श्रम जन्माचे ॥३॥ विठ्ठrल सर्वस्वें उदार । उभारिला अभयकर । रुक्मादेवीस्वामीवर । करुणाकर विठ्ठल ॥४॥ विठ्ठल सकळांचा दाता । विठ्ठल सर्वां अधिष्ठाता । विठ्ठल भर्ता आणि भोक्ता । विठ्ठल दाता दीनाचा ॥५॥ विठ्ठल गुणांचा गुणनिधी । विठ्ठल करुणेचा उदधि । विठ्ठल माझी सर्व सिद्धी । विठ्ठल विधी विधान ॥६॥ विठ्ठल जीवाचा हा जीव । विठ्ठल भावाचाही भाव । तुका म्हणे गुणार्णव । देवादेव विठ्ठल ॥७॥

७. षड्‍गुण ऐश्वर्य संपत्ति । धीर उदार तूं श्रीपती । परम कृपाळ परज्योति । चरित्र कीर्ति काय वाणूं ॥१॥ जन्मोजन्मीं सुकृत राशी । गाई चारी संरक्षणेसी । मयुरपिच्छ मोरविशी । गोपाळांसी दाखवी ॥२॥ वत्सें गोप ब्रह्मयानें । सत्य लोकां नेले चोरून । भक्तवत्सल भगवान । झाला आपण दो ठायीं ॥३॥ वत्सें वत्सप गाई होऊन । आपुलें दाविलें महिमान । ब्रह्मादिकां न कळे खूण । परीपूर्ण पांडुरंगा ॥४॥ शेवटीं नीच काम करिसी । पांडवांचा पक्षपाती होसी । गिळोनी अघासुरासी । बकासुरासी चिरोनी ॥५॥ वत्सासुरासी रगडिलें । तट्टू खेटुनी मारिलें । गाडा दृष्टीनें भंगिलें । विमळार्जुन रांगतां ॥६॥ खाऊनी तांतडी भाजीपान । तृप्त केलें ऋषीजन । तुका म्हणे आतां मी दीन । कांहीं वचन बोलावें ॥७॥

८. विठ्ठल सुखाची मूर्ती । विठ्ठल धाम परंज्योति । विठ्ठलाची अपार कीर्ती । त्रिजगती विस्तर ॥१॥ विठ्ठल अनाथाचा बंधु । विठ्ठल हा करुणासिंधु । विठ्ठल विठ्ठल छंदु । तोडी हा बाधु जन्माचा ॥२॥ विठ्ठल मोक्षसिंधुदाता । विठ्ठल जग उद्धरिता । विठ्ठल सर्वस्व जाणता । विठ्ठल कर्ता सर्वही ॥३॥ विठ्ठल कृपेचा सागर । विठ्ठल अमृतआगर । विठ्ठल निर्गुण निर्विकार । नकळें पार शेषासी ॥४॥ विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेम जीवनकळां । विठ्ठल अनादि सोंवळा । माया विटाळा न लिंपे ॥५॥ विठ्ठल रक्षी निज भक्तां । विठ्ठल कीर्तनासी भोक्ता । तुका म्हणे श्रोता वक्ता । करिता कथा लुब्धक ॥६॥

९. वेद उद्भवे त्रिकांड । कंबुकंठ शोभादंड । आपाद प्रचंड । वैजयंती साजिरी ॥१॥ आयुधमंडित चारी भुजा । दशांगुळें उदार हस्त वोजा । भक्तपाळण गरुडध्वजा । भक्तराजा हें नाम ॥२॥ नाना भूषणें मनगटीं । दंड सरळ चंदन उटी । बाहु सरळ मयूर वेटी । केयूरांगद मिरविती ॥३॥ रम्य हनुवटी साजिरी । दंतपंक्ती विराजे अधरीं । नासीक ओतींव कुसरीं । शुकाचिये परी शोभलें ॥४॥ नेत्र आकर्ण कमळाकार । भोंवया व्यंकटा भाळविस्तार । उटी पिवळी टिळक कस्तुर । शोभा अपार मुगुटाची ॥५॥ माथां धरिला किरीट । मयूरपिच्छ लाविले दाट । हिरे घन एकवट । नीळकंठ मस्तकीं ॥६॥ अनेक भ्रमर सुवास । सेविताती आमोदरस । तुका म्हणे त्या भाग्यास पार नाहीं पाहा त्या ॥७॥

१०. आता  मीं पतीत पतीत । नाहीं पातकासी नीत । परी तुझा शरणागत । झालों अंत न पाही ॥१॥ नाहीं स्वस्थिर पायीं बुद्धि । नसे आठविलें कधीं । वागलों नाहीं संतांमधीं । स्थिर बुद्धि नाहीं हे ॥२॥ कोटी घडले अपराध । नाहीं भाव एकविध । वाचे गाईलें नाहीं शुद्ध । परमानंद कृपाळा ॥३॥ दास ह्मणवी एक चित्तें । सेविलें नाहीं नामामृतातें । जाणितलें नसे अनाथें । पर कायेतें विस्मृती ॥४॥ जो होतो सकळ विचार । पायीं निवेदिला विस्तार । आतां कळेल तो विचार । करी साचार स्वामिया ॥५॥ तुह्मां सांगणें प्रकार । हें तो वाग्‌‌‍जाल साचार । केला करी अंगिकार । बहुत फार न बोलें ॥६॥ तुका आला लोटांगणीं । माझी परिसावी विनवणी । द्यावी प्रेमसुख धणी । चक्रपाणी दीनानाथा ॥७॥

११. अगा ये विठोबा अनामा । अगा ये अरूपा नारायणा । अगा गोपी मनरंजना । मुरमर्दना मुरारी ॥१॥ अगा ये अलक्षा अपारा । अगा ये मत्स्यकत्स्यधरा । अगा ये नृसिंहा शूकरा । अदितीपुत्रा वामना ॥२॥ अगा ये रेणुकानंदना । अगा ये रघुपती लक्षुमणा । यादवदळीं बळी कृष्णा । खगवाहना गोविंदा ॥३॥ बौध्य कलंकीं क्षेत्रकरा । अगा ये असुर संहारा । अगा अपारविश्वाधारा । अगा श्रीधरा विठोबा ॥४॥ अगा सर्वेशा संकर्षणा । असुरमर्दना जनार्दना । अगा कपी मनरंजना । आनंदघना अपारा ॥५॥ अगा ये राम कोदंडपाणी । सिंधुसूदन आनंदशयनी । अगा अभ्यंतरतरणी । सहस्त्र किरणीं प्रकाशा ॥६॥ अगा ये पांडवपाळका । अगा ये ह्मणतसे तुका । अगा अर्जुनपणरक्षका । रमानायका पांडुरंगा ॥७॥

***