ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....


सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ||१५|| गीता - अध्याय १५ ||

सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस
हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥ गीताई||

"एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं| मी अमुका आहें ऐसी| जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं| ते वस्तु गा मी ||४२१||"
अशी अतिशय सुरेख सुरुवात करुन परमात्माच कसा सर्वांच्या अंतरात "मी मी" असा अहर्निश स्फुरत असतो हे माऊली विवरुन सांगताहेत.

हे सगळं खरं तर मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

मग या श्लोकावरचे निरुपण संपल्यावर पुढच्या श्लोकावर जाण्यापूर्वी त्या श्लोकासंबंधी माऊली काही सांगत आहेत -
त्यातील या शेवटच्या ५-६ ओव्या आहेत -

वरील कोंडियाचा गुंडाळा| झाडूनि केलिया वेगळा| कणु घेतां विरंगोळा| असे काई ? ||४६६||
तैसा उपाधि उपहितां| शेवटु जेथ विचारितां| तें कोणातेंही न पुसतां| निरुपाधिक ||४६७||
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ||४६८||
पैं सांगणेया जोगें नव्हे| तेथींचें सांगणें ऐसें आहे| म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे| बोलिजे आदीं ||४६९||

यातील ही जी ओवी आहे - जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ||
ही माऊलींनी इतकी सुरेख व आशयपूर्ण लिहिली आहे की अर्थ समजल्यावर नकळतच
आपल्या तोंडी येते - वा ऽ काय सुंदररित्या उलगडले आहे हे आणि तेही अगदी
साधा दृष्टांत देऊन ...
तर - जैसें न सांगणेंवरी| बाळा पतीसी रूप करी| बोल निमालेपणें विवरी| अचर्चातें ||४६८|| ही ती ओवी....

फार फार जुन्या काळी (म्हणजे माऊलींच्याच काळातली गोष्ट) - अगदी नवीनच लग्न झालेली एक मुलगी तिच्या मैत्रीणींबरोबर
बसली आहे घरामधे. बाहेर ओसरीवर मित्रांबरोबर तिचा नवरा गप्पा मारतोय. या
सगळ्या सख्या खिडकीच्या बारीक फटीतून पहात आहेत आणि या नववधूला चिडवताहेत,
विचारताहेत ऱ्या सर्व मंडळीतील तुझा नवरा कोणता गं ?

"अगं, तो अंगरख्याच्या बाह्या दुमडलेला - तो आहे का तुझा नवरा ?" - ती नववधू मानेनेच नाही म्हणतीये..

"मग, तो दोन्ही हात डोक्यामागे बांधलेला तो आहे का ???" - पुन्हा मान हलवत नकार....

...

...

असं करता करता जेव्हा तिच्या नवर्‍याचेच नेमके वर्णन करुन विचारल्यावर ही
नववधू फक्त लाजून मान खाली घालून बसलीये - आता ती नाहीदेखील म्हणत नाहीये
का हो ही म्हणत नाहीये..

पण ....
आता त्या सख्यांना तर कळले हिचा नवरा कोण ते - पण ते कसे तर हिने काहीही न बोलताच, न सांगताच कळले.... जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । ....

ब्रम्ह, परब्रह्माचे वर्णन करताना जगाच्या उपाधीपेक्षा जो वेगळा आहे "तोच तो" -
हे सांगताना माऊलींनी जी कम्माल केलीये त्याला तोडच नाहीये.... बोल
निमालेपणे विवरी | अचर्चाते || हेच परमात्म्याचे वर्णन - जिथे बोल, वाणी,
विचार निमतात, संपतात तोच तो - ज्याची चर्चा करता येत नाही तोच तो .......

माऊलींची ही जी ज्ञानेश्वरी आहे ती इतकी गोड, मधुर, रसिकतेने परिपूर्ण का
याचे हे तर एक छोटेसे उदाहरण- अशी अनंत सौंदर्य स्थळे ज्ञानेश्वरीत सापडतील
- पण कोणाला - तर जो ज्ञानेश्वरीचा अंतरंग अधिकारी आहे त्याला, ज्याचे
ज्ञानेश्वरीवर नितांत, निर्व्याज, निखळ प्रेम आहे त्यालाच - जो माऊलींनीच
म्हटल्याप्रमाणे -
- जैसें शारदीचिये चंद्रकळे| माजि अमृतकण कोंवळे| ते वेंचिती मनें मवाळें| चकोरतलगें ||५६- अ. १||
तियापरी श्रोतां| अनुभवावी हे कथा| अतिहळुवारपण चित्ता| आणूनियां ||५७||
अशा अतिहळुवार अंतःकरणाने वाचेल त्यालाच ही ज्ञानेश्वरी कळेल... हे
अतिहळुवार अंतःकरण होणार कसे - ज्ञानेश्वरी वाचता वाचताच, माऊलींची करुणा
भाकतच कळेल ज्ञानेश्वरीतील गोडी...

ज्ञानेश्वरीचा एक अभ्यास म्हणून  कोणा जाणकाराकडून अशी ज्ञानेश्वरी समजावून घेणे वेगळे आणि   ज्ञानेश्वरीत ज्या परमात्म तत्त्वाचे विवरण केले आहे त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करणे वेगळे.  ज्याला  उदाहरण म्हणून आरशाचे दिले जाते - १) आरशाला पहायचे म्हणून त्याकडे पाहणे आणि

२) आपला चेहरा पाहण्याकरता आरशात पहायचे .

ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा त्यातील साहित्यिक ( वाङ्मयीन ) मूल्ये वा सौंदर्यस्थळे पाहण्याकरता करणे हे पहिल्या प्रकारात येते तर त्यात सांगितलेल्या साधना करून आत्मरुप होण्याचा प्रयत्न करणे हे दुसऱ्या प्रकारात येते.

या दुसऱ्या प्रकारातच - अतिशय प्रेमाने देवाची पूजा - अर्चा , अतिशय प्रेमाने नामस्मरण, अतिशय प्रेमाने
व अर्थ समजावून घेत केलेले सद्ग्रंथांचे वाचन व मनन  या सर्वांचा अंतर्भाव करता येईल - पण हे सगळे सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली....

कारण, सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे सद्गुरु कृपा - जे ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आहेत त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वरी समजाऊन घेतली तर ज्ञानेश्वरी "कळण्याची" शक्यता अधिक आहे. कारण अशा आत्मानुभवी सद्गुरुंनी - नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी | एक तरी ओवी
अनुभवावी || - असा अनुभव घेतलेला असतो.  - कारण इथे शब्दांचे काम नाही - अनुभवण्याचीच
गोष्ट आहे ... जो कोणी खरा भक्त असेल त्यालाच जमेल हे अनुभवणे वगैरे -
व ज्याने अनुभवले तोच शिष्यांना ते नीट समजावून देऊ शकेल - हे येरा गबाळाचे काम नोहे...

इति ॥