सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने!

गझल
वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा
    *****************************************   

सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने!
कळली अवीट गोडी, राणी तुझ्या मिठीने!!

परिपक्व प्रेम असते चवदार फळ खरोखर......
मी चाखल्यात फोडी, राणी तुझ्या मिठीने!

आला जणू किनारा, हातात आज माझ्या........
मी जाहलोच होडी, राणी तुझ्या मिठीने!

स्पर्शात पळभराच्या, मज लागली कळाया.......
लडिवाळ लाडिगोडी, राणी तुझ्या मिठीने!

बाराखडी शिकवली प्रेमातली मला तू........
मी वाचतोय मोडी, राणी तुझ्या मिठीने!

मी एक सरळमार्गी, सहसा न बोलणारा.........
पण, काढलीच खोडी, राणी तुझ्या मिठीने!

आता कळेल मजला, रेशीमस्पर्शबोली.......
भाषा शिकेन थोडी, राणी तुझ्या मिठीने!

होती किती निरागस, साधीसुधी नि भोळी.......
झालीच प्रीत घोडी, राणी तुझ्या मिठीने!

विरहातल्या कळा त्या, होत्याच जीवघेण्या.......
शमल्यात ऊरफोडी, राणी तुझ्या मिठीने!

माझ्या-तुझ्यात होते अस्पष्ट एक नाते!
झाली अतूट जोडी, राणी तुझ्या मिठीने!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१