प्रीतीची पारंबी

प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा
झिंगून पिंगा घाली 'अभय' येरझारा
ऊर्मीच्या उन्नतीने उमेदी उसळते ॥

                                         - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
("उद्धव" छंदावर आधारित कविता)