चूल पेटते तरी! तृप्त हे खरे दिवस!

गझल
वृत्त: सुकामिनी x २
लगावली: गालगाल/गालगा/गालगाल/गालगा
************************************

चूल पेटते तरी! तृप्त हे खरे दिवस!
मास्तरांस सांप्रती, पातले बरे दिवस!!

भरभराट ना अरे, लाभली फुकाफुकी......
रात्र रात्र जागुनी तो करे तिचा दिवस!

वाटतो उजेडही, आज बाटगा जणू.......
दार मीच लावतो, काय गुदमरे दिवस!

दाटतात रात्रभर आसवे जगा तुझी.......
अन् उजाडल्यावरी, उरात पाझरे दिवस!

काय वाढुनी पुढे ठेवले असेल रे?
का बरे, पुन्हा पुन्हा आज थरथरे दिवस?

काय जाहले असे, वाकला कसा दिवस?
सरपटे कसाबसा, शेवटी सरे दिवस!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१