पहा प्राण गेला पहाडाप्रमाणे........

गझल
वृत्त: भुजंगप्रयात
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगागा
************************************

पहा प्राण गेला पहाडाप्रमाणे........
अता लोक जमले गिधाडाप्रमाणे!

कधी बंद करतो, कधीही उघडतो.......
मला रोज वारा कवाडाप्रमाणे!

बटांशी तिच्या खेळतो सारखा तो........
लडीवाळ वारा लबाडाप्रमाणे!

जसे नेटवर मी लिहू लागलेलो........
जगाला मिळालो घबाडाप्रमाणे!

लटांबर बरोबर सदा घेउनी मी.......
खुराडे बदलतो बिऱ्हाडाप्रमाणे!

सदा पाठमोरेच ते वार करती.......
सदा वागती लोक भ्याडाप्रमाणे!

मुले दूर गेलीत पक्षांप्रमाणे.........
उभा आज मी खिन्न झाडाप्रमाणे!

रसास्वाद माझाच ते घेत होते......
मला पाहती ते चिपाडाप्रमाणे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१