अतीशाहणे अन् शहाणे किती?

गझल
वृत्त: सौदामिनी
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगा
************************************

अतीशाहणे अन् शहाणे किती?
खरे शाहणे कोण जाणे किती?

मला मूर्ख वेड्यात काढायला......
शहाण्यांकडे हे बहाणे किती!

मला हिंट काही तरी दे सखे.......
मला घालशी हे उखाणे किती!

तिन्हीकाळ गझलेमधे डुंबतो........
असे ठार वेडे, दिवाणे किती?

किती बार, गुत्ते, नि अड्डे किती!
पिण्याची तुझ्या रे, ठिकाणे किती!!

अताशाच खातोय मिष्टान्न मी.......
अरे, खायचे मी फुटाणे किती?

घरंदाज कोणीच ना वाटले.......
अरे, पाहिली मी घराणे किती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१