मुगाचे लाडू

          वेळ जात नव्हता म्हणून खायला काही मिळतंय का ते बघण्यासाठी फ्रीज उघडला. समोर एक पिशवी दिसली, त्यात ५-६ लाडू अगदी दाटीवाटीने ठासून ठेवले होते. त्यामुळे त्या  लाडवांचा गोलाकार नाहीसा झाला होता.
जास्ती विचार न करता पिशवी उघडली आणि एका लाडूचा तुकडा पाडून तोंडात टाकला. तो मुगाचा लाडू इतका कोरडा होता, की चावून गिळणं मुश्कील झालं. त्यात बहुतेक तूप कमी होतं किंवा जवळजवळ नव्हतंच. दुसऱ्या घासाला त्या लाडवात लपलेला एक पांढरा शुभ्र केस माझ्या जिभेवर विराजमान झाला, आणि असह्य होऊन मी मोर्चा मोरीकडे वळवला.
हे लाडू नक्की आजीनेच केले असणार. मी आईला हाक मारली. आजीवर ओरडा आरडा करता येत नाही म्हणून मी आईवर चिडचिड सुरू केली.
"आई, तुला माहीत आहे, तिनी काही पदार्थ केला तर मला तो फारसा  आवडत नाही. कशाला करते ती इतकी खटपट ?"
"अरे तिला वाटतं नातवासाठी करावं... म्हणून करते ती "
" अगं मान्य आहे, पण म्हणून मग आम्ही असलं काहीतरी खायचं का ? किती कोरडे झालेत ते लाडू.. तूप वगैरे काही घातलंय की नाही त्यात ? एक घास सुद्धा नीट गिळता येत नाहीये .... आणि केस.....दुसऱ्या घासालाच ! तो पण खायचा की काय ?
नशीब, मलाच केस लागला, दुसऱ्या कोणाला हा लाडू दिला असता  तर किती पंचाईत झाली असती ...तिला सांग बाई तू... नको करत जाऊ माझ्यासाठी काही. मला अजिबात आवडत नाही... आणि ह्या वयात कशाला इतकी खटपट करावी? आधीसारखी चव नाही येणार म्हणव हाताला"
"ठीक आहे, सांगते तिला " इतकं म्हणून आई समोरून निघून गेली.
एक दिवस आजीकडे निवांत बसलो होतो. नाना त्यांच्या जुन्या आठवणी रंगवून सांगत होते. मी सुद्धा उत्साहानं ऐकत बसलो होतो.
आजी खाली बसून दही  घुसळत होती. भांड्यात दही इतकं कमी होतं, त्यामुळे रवीचा भांड्यावर घासून खूप आवाज होत होता.
"काय गं आजी, इतक्या कमी दह्यात काय लोणी निघणार, त्यापेक्षा ते दही खाऊन टाका पोळी बरोबर"
"तेच म्हणतीये मी तिला, माझं ऐकत नाही. इतक्या कमी दह्यात किती लोणी निघणार, त्यातून ह्या उन्हाळाच्या दिवसात लोणी पातळ येतं. कोणाच्या नाकाला पुरणार त्याचं तूप" मावशी म्हणाली.
खूप शांतपणे दही घुसळत असलेली आजी आमचे सल्ले ऐकून अखेर वैतागली, आणि स्वत:शीच काहीतरी पुटपुटायला लागली. तिला वाटलं आपली बडबड कोणाला ऐकू जाणार नाही. मी मात्र तिचं ते पुटपुटणं कान  देऊन ऐकलं.
"परवा लाडू दिले, तर म्हणे तूप कमी आहे. कोरडे झाले. लोणी काढायला गेलं की म्हणायचं की इतक्या कमी दह्याचं किती लोणी येणार... लोणी नाही काढलं तर तूप कुठून येणार ? मग आमच्या नातवाला छान छान लाडू कसे मिळणार ?"
तिचे हे विचार ऐकून आपण तिच्यासमोर किती क्षुद्र आहोत त्याची मला कल्पना आली. मी निःशब्द झालो.
आज फ्रीज मध्ये पुन्हा मुगाचे लाडू दिसले. मी तुकडा तोडून तोंडात टाकला ... आणि आश्चर्य म्हणजे तो जिभेवरच विरघळला, इतके सुंदर मुगाचे लाडू ... मी ताव मारायला सुरुवात केली. त्या लाडू मधला गोडवा पोटात आणि त्याचबरोबर मनामध्ये  साठवण्यात गुंग झालो.
आज मला तुपाची कमी जाणवली नाही आणि केस पण लागला नाही.