रुबिकचा घन

         वयाच्या आठव्या वर्षी शाळेत प्रवेश केल्यावर शिष्याची भूमिका बरेच दिवस पार पाडली त्यानंतर बरेच दिवस शैक्षणिक क्षेत्रात घालवली.त्यावेळी मी शिकवत होतो व समोर विद्यार्थी (मनात असो वा नसो) मुकाट्याने ऐकत असत. आता तिसऱ्या पर्वात माझी भूमिका पुन्हा एकदा बदलली आहे व आता पुन्हा शिष्याची भूमिका पार पाडावी लागत आहे व गुॠ आहेत आमची तिसरी पिढी.सध्या मोठ्या नातवाकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत, त्यात सध्याचा विषय आहे रुबिक क्यूब.
     रुबिक क्यूब तो अमेरिकेत असतानाच त्याच्याकडे आला होता पण बरेच दिवस घरातच लोळत पडला होता.त्यानेही फारसा त्याला हात लावला बव्हता कारण त्यावेळी पोकेमान, बेब्लेड असे विषय चर्चेत होते.अमेरिकेतून परत आलयावर त्याने चेसमध्ये डोके घातले होते व त्याविषयी माझ्या ज्ञानात भर पडत होती ,अचानक त्याला रुबिक क्यूब सापडला व त्यावर मेहनत करण्याची एकदम त्याला बुद्धी झाली आणि आता सध्या रुबिक क्यूब फकत जेवताना त्याच्या हातात बसतो.
      रुबिक क्यूब म्हणजे केवळ वेळ (वाया)घालवण्याचे साधन असा माझा समज होता. प्रत्यक्षात गुरूंनी माझ्या ज्ञानात जी भर घातली त्यानुसार रुबिक क्यूब एर्नो रुबिक या हंगेरियन प्राध्यापकाने तयार केला. त्रिमिती भूमिती शिकविण्यास योग्य प्रतिकृती त्याला हवी होती.  वास्तुरचनाशास्त्र (architecture and Design) हा त्याचा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना अवकाश संबंधांची (special relations) देण्यासाठी ते त्याने तयार केले आणि त्याला स्वत:ला ते कोडे सोडवायला जवळ जवळ एक महिना झगडावे लागले. आपण शोधलेल्या या खेळाचे अंगभूत सामर्थ्य समजायला रुबिक्सलाही थोड वेळच लागला.कारण पहिला जादूचा घन या बावाने विकला गेला तो तब्बल तीन वर्षांनी म्हणजे १९७७ मध्ये ब्युडापेस्ट येथे. आयडियल टॉय कार्पोरेशनने त्याचे हक्क मिळवून १९७९ मध्ये त्याचे उत्पादन करायला सुरवात केल्यावर त्याचे रुबिक्स क्यूब असे नामकरण करण्यात आले तरी स्वत: रुबिकला मात्र ते पटले नसावे कारण Newyork Times ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो "आपल्याच तोंडाने त्याला रुबिक्स क्यूब म्हणणे मला कसेतरीच वाटते.उदा माझ्या मुलाला नी थोडेच रुबिक्स बॉय किंवा रुबिक्स गर्ल म्हणणार आहे? अर्थात आता चाळीस वर्षानंतरही त्याच्याशी माझे नाते अतिशय जिव्हाळ्याचे आहे "
     हिरवा, पिवळा,पांढरा.निळा,लाल व नारिंगी हे रंग  सहा पृष्ठभागांसाठी वापरले जातात.प्रत्येक पृष्ठभागावर तीन चौरस असणारा म्हणजे ३ बाय ३ चा घन विशेषत: प्रचारात असला तरी २ बाय २ पासून अगदी ११ बाय ११ इतक्या मोठ्या आकाराचेही घन असतात.या कोड्याची उकल म्हणजे प्रत्येक पृष्ठ्भागावर एकच रंग आणणे.
     अशा प्रकारे कोड्याची उकल करण्याची पहिली स्पर्धा १९८२ मध्ये घेण्यात आली.तीही ब्युडापेस्ट येथेच. आणि ती जिंकली मिन्ह थाइ या अमेरिकन नागरिकाने.त्यावेळी त्यासाठी त्याने घेतलेली वेळ होती.२२.९५ सेकंद. रुबिक्स क्यूबची रचनाही उकल लवकर होण्याच्या दृष्टीने विकसित करून २००३ मध्ये ती वेळ १६.७१ सेकंद इत्की कमी झाली. नंतर प्रत्येक दोन वर्षानंतर स्पर्धा आयोजित करण्यात आली व अधिक गतिमान घनाची निर्मिती व अधिक वेगवान उकल पद्धती शिवाय अधिक चांगल्या वंगणाचा वापर या तिन्हीमुळे अगदी अलीकडे ही वेळ ६ सेकंदाच्याही खाली आणणे शक्य झाले आहे. ही सर्व आकडेवारी ३ बाय ३ च्या घनाची आहे. २ बाय २ चा घन तर एका सेकंदाच्या आतच सोडवनारे लोक आहेत.इतकेच काय डोळे मिटून या घनाची उकल करणे,दोन हातात दोन घन घेऊन ते वर उडवत ते झेलत झेलत त्यांची उकल करणे,एका हातातच घब घेऊन त्याची उकल करणे असे वेगवेगळे प्रयोग करणारे महाभागही आहेत. आज या शोधास ४० वर्षे होत आहेत