निर्णय

घरात पाऊल टाकत असतानाच निलिमाचा मोबाईल परत वाजला. 
"राजेश,  मी सांगितलं होतं ना ? परत फोन करु नको आणि कोणाचाही फोन मला देऊ नको."
"पण मॅडम, पचीसियांचा फोन आहे." 
"त्यांना माझं उत्तर माहीत आहे ना?"
"पेमेंटबद्दलच पुन्हा काहीतरी बोलायचं आहे."
"नको देऊ".
निलिमानं फोन कट केला. फ्रीजमधे काही आहे का पाहिलं. तीन सफरचंदं, थोडं दूध, एक बीअरची बाटली. एक सफरचंद घेऊन ती हॉलमध्ये आली. तिची बोटं रिमोटवरून फिरू लागली. चॅनल एक, दोन, तीन, पंधरा, एकवीस…कशावरही ती पाच सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबली नाही. कितीतरी वेळ ती सर्फ करत बसली होती. तिला टीव्ही पाहायचा नव्हता. फक्त बोटांना चाळा हवा होता. डोळ्यांना कोणतीतरी दृष्यं. अचानक तिनं चौकीदाराला फोन लावला.
"कुणी आलं होतं का?"
"एक-दोघं आले होते सही घ्यायला. मी त्यांना हाकललं. तुम्ही नाही घरी म्हणून सांगितलं." 
निलिमानं टीव्ही बंद केला. स्वतःच्या खोलीत जाऊन ड्रेस बदलला. गाऊनमधे स्वतःला खूप वेळ न्याहाळलं. पलंगावर आडवी झाली. उजवा हात ड्रॉवर कडे गेला. एक डायरी काढली गेली. नव्या कादंबरीच्या पानाचा वास घ्यावा, तसा तिने त्या जुन्या डायरीच्या पानांचा वास घेतला आणि स्वतःचीच डायरी तिनं जवळजवळ पाचव्यांदा वाचायला घेतली...
१ जून
     खूप बरं वाटतंय. जेवण पोटभर झालं आहे. राधिकाचंच घर आणि काकूंच्या हातचं जेवण ! लॉजचं प्लॅनिंग होतं पण राधिकानं अगदी आग्रहच केला. आमच्याकडेच उतरायचं म्हणून. तशी मुंबईत यायची माझी ही काही पहिली वेळ नाही. कॉलेजमधली एक बरी मैत्रीण एवढाच तिच्याशी संबंध होता तेव्हा. अशी इतक्या वर्षांनी इतकी उपयोगी पडली. तिचा आणि काकूंचा मोठेपणा आहे. 
     झोपते आता. उद्या पहिलाच दिवस शूटिंगचा. नऊची शिफ्ट आहे. स्वतःलाच शुभेच्छा! मोबाईल तर केव्हाच भरून गेलाय एसएमएसनं. 
२ जून
चांगलं झालं शूटिंग. मला तरी छान वाटलं. शॉटस् देताना थोडी काळजी होतीच मला की, पहिला दिवस कसा जाईल. पण ठीक आहे. पहिला दिवस मी विसरणार नाही कधीच. (असं आत्ता तरी वाटतंय.)मिहीरला काय वाटलं, माहीत नाही.  तो जरा अनुभवी आहे माझ्यापेक्षा. 

७ जुलै
     प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळा दिवस वाया गेला. एकही शॉट झाला नाही. बसून बसून फार कंटाळा आला होता. दुपारी जरा जाऊन लॉजचं पाहून आले. जिगिषा आणि चैतन्यबरोबर नंतर बाहेर गेले होते त्यामुळे संध्याकाळ मस्त गेली. चांगलं काम करतात दोघं. ड्रामा स्कूलचा फायदा असावा. मी काही शिबिरं केली फक्त आणि त्यावर समाधानी राहिले. 
     मी सुध्दा स्कूलला ऍडमिशन घेतली असती तर?
१४ ऑगस्ट
    लॉजवर येऊनही कितीतरी दिवस झाले. दिवस काय, चक्क दोन महिने झाले. आल्यापासून जरा मोकळेपणा मिळालाय. राधिकाकडे माणसं होती. मोकळेपणा वाटला नाही. इथे मी एकटीच. मोकळेपणा खूप. पाहिजे तेव्हा येऊ शकते, जाऊ शकते. लॉजचा हा फायदा. विचारणार कोण मला? सामानाची हलवाहलवी, सगळ्यांना सांगणं, राधिकाचा निरोप घेणं...यात खूप वेळ गेला. किती चांगली माणसं आहेत ती. 
      दररोज लिहायची डायरी म्हणून किती ठरवलं होतं पण लिहिणं झालंच नाही. खूप दिवसांची गॅप पडली. राग येतोय स्वतःचा. खूप. वाईटही वाटतंय.

१६ सप्टेंबर 
सर्वात वाईट दिवस आजचा. ठरलेले पैसे मिळाले नाहीत. कमी मिळाले. आयत्या वेळी हाउसने काहीतरी कारण सांगितलं. ऐकलं होतंच की या फील्डमध्ये पैशांची बुडवाबुडवी असते. आज अनुभव आला. नाटकाचे पैसे मिळायचे अगदी वेळेवर. सीरीयलचा अनुभव आला. सुरुवातीला धक्का बसला  पण हळुहळू सावरले. जिगिषाला सांगितलं पण कोणाला सांगूनही उपयोग नाही. ती म्हणाली, हे असंच असतं. इंडस्ट्रीत प्रत्येकाने हे सोसलंय. 
१ ऑक्टोबर  
मीरा निघून गेली सेटवरुन तरातरा. पहिल्यांदा नखरा बघितला. वेळेत चहा आला नाही म्हणून. रेखा, श्रीदेवीचे वाचले होते नखरे मासिकांमध्ये. हे असं करण्याची माझी अजून दोन वर्षांनीसुध्दा हिम्मत होणार नाही. काय विलक्षण दृष्य होतं ते. सेटवरचे सगळे नुसते पाहात होते.

१ डिसेंबर   
शी ! पूर्ण चित्रपटच रद्द झाला. सेटवर पोचले तेव्हा बॉय वायर गुंडाळत होता. शूट कॅन्सल झाल्याचं समजलं आणि नंतर चित्रपटच बोंबलल्याचं कळलं. बोलणी फिसकटल्याचं कोणीही समजू शकतं. पुन्हा बोलणी केली जाऊ शकतात. सेटवरचे लोक वेगवेगळं बोलत होते. नक्की काय ते माहीत नाही. शशांकला विचारलं तर त्याने नेहमीचंच कारण दिलं. प्रॉडक्शन हाऊसशी मतभेद. मग, आजपर्यंत केलेल्या कष्टांचं काय ? ती फिल्म वाया गेली त्याचं काय ?  खरं तर असे अनेक चित्रपट सुरु झाले आणि बंद पडले. माझा पहिलाच अनुभव म्हणून डोक्याला झिगझिग होत आहे. अख्खी भूमिका गेली. माझ्या हातून जग निसटत चालल्यासारखं वाटलं. एकटी पडल्यासारखं वाटलं. नेटवर्किंग साईट बघितल्यावर बरं वाटलं. खूप जणांचे स्क्रॅप,  मेसेजेस दिसले. 
वा ! आहेत, अजूनही माझ्याबरोबर खूप जण आहेत.     
२५ डिसेंबर
एकही वस्तू घेता आली नाही आज. जेमतेम काहीतरी घेऊनच मॉलच्या बाहेर पडले. मॉलमध्ये खूप वेळ मनसोक्त हिंडायचं होतं पण सगळे धावतच आले. बायका, पोरं, बाप्ये...हल्ली सही नकोशी असते. प्रत्येकाला फोटोच काढून घ्यायचे असतात. गर्दी हटवता हटवता मॅनेजरच्या नाकी दम आला. मी तरी किती जणांशी बोलणार ! किती जणांना सह्या देणार !

१५ फेब्रुवारी 
आज इंटिमेट सीन होता. खूप दिवसांपासून तयारी चालली होती. डायलॉग रायटरची, डायरेक्टरची आणि माझीही. माझी तयारी घरी चालली होती. हो म्हणायचं की नाही, या द्विधा मनःस्थितीतच खूप दिवस गेले. शेवटी हो म्हटलं. मी ठरवलं होतं - मिहीरला सांगायचं की, मिठी घट्ट मारू नकोस. पण सांगू शकले नाही. अगदी शॉटच्या सुरुवातीला सांगितलं पण अस्पष्टच. ठामपणे नाही सांगू शकले. किसचं आधी ठरलं नव्हतं. चॅनलच्या सांगण्यावरून म्हणे किस आणला. कॉलेजमध्ये मी साधी होते आणि आज तोंडात शिवी. सॉरी !     
निलिमाने डायरी बंद केली. वरच्या पंख्याकडे पाहात पडली. घरघर सुरु झाली होती.
....काय मिळवलं आपण वाचून ? कितव्यांदा वाचतोय आपण ? तेच ते वाचतोय. आपलेच शब्द आणि आपलंच वाचणं. मुळात डायरी लिहिली कोणासाठी ? स्वतःसाठी. भावना मोकळ्या करण्यासाठी. सुरुवातीला भावना भरपूर मोकळ्या झाल्या. आता मोकळ्या होत नाहीत. डायरी लिहायला वेळच मिळत नाही. अनुभवही तेच ते येऊ लागलेत. शूटिंग बंद पडणं, चाहत्यांच्या सह्या, मानधनातली फसवणूक…यापेक्षा काहीही वेगळं घडत नाहीये. यापुढेही हेच घडणार आहे आणि डायरीतही हेच लिहिलं जाणार आहे. मग, यापुढे लिहायची कशाला डायरी? आजची डायरी आणि पाच वर्षांनंतरची डायरी यात काही फरक उरणार नाही. फार फार तर आपलं लग्न होईल, एक नवरा मिळेल. इतकाच काय तो फरक पडेल. बाकी सगळे तेच. सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे. आपण ‘चलता है’ म्हणून सोडून देत आहोत. पूर्वी सोडून देत नव्हतो; हे सोडून देणं हल्लीच वाढलंय. बँक बॅलन्स वाढतोय त्यामुळे भावना मोकळ्या होण्याची गरज वाटत नाहीये. स्वतःसाठी डायरीची गरजच संपली आहे. पंचवीस वर्षांनी रिटायरमेंट घेतली आणि पब्लिकसाठी म्हणून छापली डायरी तर पब्लिक काय म्हणेल ? काय नवीन सांगितलं ? आम्हाला हे आधीच माहीत होतं. इंडस्ट्रीत असंच होतं. काही पेपरवाले स्वतःचा धंदा वाढविण्यासाठी गौप्यस्फोट म्हणून छापतील. कसला डोंबलाचा गौप्यस्फोट?  बातमी आली तर गौप्यस्फोट नाहीतर उघड गुपित. 
     ...काय उपयोग अशा डायरीचा?. शिवाय, आपण काही दिवसांपूर्वी काहीतरी लिहीत होतो म्हणून पुढेही काहीतरी लिहावं लागेल या विचाराने  दडपण येतं. जगणं महत्त्वाचं की लिहिणं?  दडपणाखाली वावरत बसण्यापेक्षा लिहिणंच बंद करू. बास झालं. हे झालं ते आपलं शेवटचं वाचन. यापुढे लिहायचं नाही. लिहिलंच नाही तर वाचायचा प्रश्नच नाही. वाचलं नाही तर भूतकाळात जाण्याचा प्रश्न नाही. पुन्हा तेच विचार मनात येण्याचाही प्रश्न नाही. विचार करून त्रास करून घेण्याचाही प्रश्न नाही.
  निलिमाने डायरी बंद केली. लिहिलेल्या पानांवर खूप रेघोट्या मारल्या. मनातल्या वेगवेगळ्या रेघोट्या कमी होत गेल्या. मॅगझीन्सच्या गठ्ठ्यात डायरी सरकवली. चौकीदाराला बोलावून ताबडतोब रद्दी विकायला सांगितलं. चौकीदार जाताक्षणी तिला खूप खूप मोकळं वाटलं. ती तिच्या आवडत्या सोशल नेटवर्किंग साईटवर गेली. लॉगीन केले. तिथे खासगी काहीही नव्हतं. चव्हाटा झालेला चालणार होता. लिहिलेले पुन्हा वाचले जाण्याची शक्यता नव्हती. मानसिक त्रास नव्हते. शांततेची खात्री होती. थोडाफार भावनांचा निचराही.  
- केदार पाटणकर