बाप

"तुला एक गोष्ट सांगतो, कोणत्याही दोन व्यक्तींमधील भांडणं कायमची नसावीत बघ. आपली चूक नसेल तर आपण शांत बसावं. उगाच तोंडाला तोंड देऊन प्रकरण वाढवायचं नाही. माझा अनुभव सांगतो तुला.
मला आठवतंय, मी ओगलेवाडीला काच कारखान्यात कामाला होतो. त्या दिवशी आमची रात्रपाळी होती. आमच्या गटात आम्ही पाचच जण असायचो फक्त. त्यातून आज भानुदासनी कामावर टांग मारली. मग काय.. आम्ही चौघेच.
नेमकं त्याच रात्री साहेब गस्तीवर आला. त्यानं मला विचारलं, आज रजेवर कोण आहे ?
"आज भानुदास आला नाही" मी सहजच बोलून गेलो. नंतर साहेब निघून गेला.
दुसऱ्या दिवशी ही गोष्ट कोणीतरी भानुदासला सांगितली. आता बघ हा.. इतक्या साध्या गोष्टीवरून भानुदास माझ्याशी भयंकर भांडला. म्हणाला काय गरज होती तुला मी रजेवर आहे ते सांगायची?
अरे किती साधी गोष्ट आहे, पाच मधला एक जण आला नाही, कोण आलेला नाहीये, ते मी नसतं सांगितलं तरी साहेबाला सहज ओळखता आलं असतं. आणि मी सहज बोलून गेलो..  आम्हाला तू आधी कळवायला हवं ना.. मग नसतो बोललो मी साहेबाला" मी त्याला उत्तर दिलं.
इतकं स्वच्छ स्पष्टीकरण देऊन सुद्धा त्या दिवसापासून भानुदास माझ्याशी बोलला नाही.
एकदा अचानक रात्री तो माझ्या घरी आला. खूप दारू प्यायलेला. नीट उभं राहता येत नव्हतं. मला म्हणाला आज रात्रीपुरती तुझ्या घरी झोपायला जागा दे.
इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं. स्वभावानं चांगला होता तो. मी जास्ती विचार न करता त्याला झोपायला जागा दिली. तुझ्या आजीनं त्याला जेवायला करून दिलं. तो व्यवस्थित जेवला. नंतर शांत झोपला. सकाळी लवकर उठून कधी निघून गेला ते आम्हाला समजलंच नाही.
जेव्हा कारखान्यात भेटलो, तेव्हा अगदी मस्त पूर्वीसारखाच बोलला. त्या दिवसापासून त्यानं माझ्याशी परत बोलायला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी वारला तो.. अगदी शेवट पर्यंत आम्ही चांगले मित्र होतो."
इतकं बोलून नाना क्षणभर थांबले. मी त्यांच्याकडे बघितलं आणि पुढे बोलणं चालू ठेवा असं त्यांना खुणावलं.

"सदानंदच्या मुलाचं बारसं झालं का रे ?" ते गंभीर होऊन म्हणाले.
"नाही, अजून वेळ आहे.." मी उत्तर दिलं.
"त्या बाळाचं बारसं ठरलं की सांग हा, मला यायचं आहे.
कसं आहे...  त्यांनी आपल्याशी जास्ती संबंध ठेवो अगर न ठेवो, आपण संबंध जपायचा पूर्ण प्रयत्न करायचा. ते भांडले म्हणून आपण उगाच तोंडाला तोंड कशाला द्यायचं ? आपण चुकलो नाहीये ते आपल्या मनाला माहीत आहे. त्यामुळे आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. माझं जे काही भांडण झालं ते माझ्या मुलासोबत झालं. त्यासाठी माझ्या नातवांना आणि पणतूला कशाला मध्ये आणायचं ?" हे वाक्य बोलताना नानांनी एक हुंदका दिला.
नानांच्या इतक्या वेळ बोलण्यामागचा हेतू आता स्पष्ट झाला होता. भानुदास प्रमाणे एक दिवस आपला मुलगा आपल्याकडे परत येईल हीच त्यांची अपेक्षा होती,
जो पाठीचा कणा मुलाला अंगा-खांद्यावर घेऊन मोठं करण्यासाठी झिजला. आज त्याच कण्यावर इतके वार झाले. तो किती वेळा तुटला. पण हरला कधीच नाही. सर्वांचं चांगलं करण्यासाठी सदा धडपडत राहिला.
ह्या बापाच्या मनात आपल्या मुलासाठी वाहणारा हा पाझर अडवणं साक्षात परमेश्वरास तरी शक्य आहे का ?