१) अरे पावसा पावसा २ ) टगेगिरी

   १) अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा
आता कोठे दडलाशी
झोडपूनीया गारांनी
कारे अजुनी उपाशी
उंदीर- मांजराचा का ?
खेळ खेळशी आम्हाशी
आम्ही जातो जीवानिशी
तुझी दिसते बत्तिशी
तुझ्या रे अवकाळीने 
आम्हा येई अवकळा
नातवांना काय सांगू
होता कसा पावसाळा ?....!!!
      २ ) टगेगिरी
रोज पावसाळी ढगांनी
आभाळ भरून येते,
उनाड वाऱ्याची टगेगिरी
त्याला उधळून लावते
पुन्हा आमची नजर
आभाळाचा वेध घेते,
तळपत्या सूर्याची धग 
आमच्या स्वप्नांची राख करते
आमची काळी माउली
तावून सुलाखून लाल होते,
काळजांना आमच्या
आर्ततेचे चटके देते
फिरून पुन्हा नजर
वर जाते,
निराशेचं जहर भरून
पुन्हा जमिनीवर येते
काळजातल्या आमच्या घरांवरती
अवकाळीची वीज कोसळते
अन् ,
कळतही नाही केव्हा ?
माउली आमची
ओघळणाऱ्या आमच्या 
मोत्यांना टिपून घेते.....!!!
                              - उद्धव कराड ( मो. नं. ९८५०६८३०४५)
                                  मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.