घोणेसरकार

     गाव सोडून कितीतरी वर्षे लोटली आणि तिकडे जाण्याची ओढ असण्याचे कारणच काही उरले नाही त्यामुळे केवळ कोल्हापूरला जाताना मध्ये एक मुक्काम करता येतो व सौ.ला गाव दाखवावे म्हणून औंधाला जाण्याचे ठरवले.पुण्याहून साताऱ्याला बऱ्याच गाड्या असतात व सातारहून औंधाला जायलाही बऱ्याच गाड्या असतात. सातारला गाडीत बसले की काहीजण तरी औंधाला जाणारे भेटतीलच असा अंदाज होता.पण गाडीत चढल्यावर माझा अंदाज खोटाच ठरणार असे दिसू लागले. कारण गाडीत एकही चेहरा ओळखीचा दिसेना.अर्थात गाव सोडून २०- २२ वर्षे लोटल्यावर त्यावेळी सगळॅ गाव ओळखीचे असले तरी त्यापैकी किती माणसे शिल्लक आहेत याचीच शंका होती आणि वयात फरक पडल्यामुळे चेहरे इतके बदललेले असण्याची शक्यता होती की परिचय असला तरीही एकमेकास ओळखण्याची शक्यता कमीच होती.
    अचानक माझ्या मागील आसनावर बसलेल्या व्यक्तीने माझ्या खांद्यावर हात टाकून " काय श्याम,अरे श्यामच ना तू ?"असे मला गदागदा हलवून म्हटल्यावर मी मागे पाहिले.  मागील बाकावर एक काळी सावळी व्यक्ती बसलेली होती. आणि एकदम खप्पड ! चेहऱ्यावरची हाडे उठून दिसत होती.मलमलचा सदरा अंगात होता पण त्याला अगदी पोतेऱ्याची कळा होती.तोंडाचे बोळके झाले होते आणि त्यातून शिल्लक उरलेले दोन तीन दात डोकावत होते. मला तर त्या व्यक्तीला ओळखणे शक्य झाले नाही. "काय विसरलास ना गरिबाला,तुला तरी दोष कशाला द्यायचा म्हणा , लक्षात रहाण्यासारखं आहे तरी काय माझ्याकडे."
   आणि अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी जवळ जवळ ओरडलोच,
"घोणे ? घोणेच ना ,काय बरोबर आहे ना ?" त्याला अहो म्हणावं की अरे याचा माझ्या मनात गोंधळ उडाला होता. कारण मी त्याच्याहून बराच म्हणजे काय अगदी त्याचा मुलगा शोभावा इतका लहान होतो.पण लहानपणी त्याला सगळे "ए घोणे,ए चंदू" अश्याच हाका मारलेल्या आठवत होते. पण मी त्याला ओळखल्यामुळे तो खूष झाला होता एकदम त्याचा चेहरा उजळला
" हाय म्हणायची आठवण आमची अजून, गावाकडल्या माणसाला विसरला नाहीस तर " बाकी शुद्ध बोलला तरी 'आहे' ऐवजी 'हाय' म्हणायची त्याची सवय तशीच होती.
"खर सांगू तुमच्यात इतका फरक झालाय की ---"
"बरोबर हाय तुझं " त्याने लगेचच मान्य केलं
घोणे मला आठवत होते तसा एकदम गब्दुल म्हणावा असा होता.मध्यम उंचीचा आणि त्या वेळीही डोक्यावर दाट केस असले तरी त्यातील बरेचसे पांढरे झालेले असा.दाढी बहुधा वाढलेली त्यातील केसही थोडे बहुत पांढरे . त्यावेळी त्याचा वेष बरेच पांढरे दिसणारे धोतर व त्यावर मलमलचा अर्ध्या किंवा लांब बाह्यांचा शर्ट असा असे. सदा हसत असल्यासारखा चेहरा  आमच्या घरापासून अगदी जवळच त्याचे हॉटेल होते आणि बहुधा चहा आणि शेवचिवडा या दोनच गोष्टी त्याच्याकडे मिळायच्या. राजवाड्यासमोरून आमच्या शाळेकडे जाणाऱ्या गावातील एकमेव मोठ्या रस्त्यावर त्याचं हे हॉटेल होतं वडिलांकडे जर त्यांच्या शिक्षक मित्रांची बैठक असली आणि आईला चहा करभे शक्य बसले तर "जारे घोणेच्या हॉटेलात चहा सांगून ये " अशी ऑर्डर मला मिळायची.आणि मी पळत तेथे जाऊन आज्ञापालन करायचा.
     घोणेला माझ्या वडिलांनीही शिकवले असणार त्यामुळे "मास्तरांना सांग आणतोच पाच मिनटात "म्हणून लगेच तो भरा भरा स्टोव्हला पंप मारून चहाचं आधण चढवायचा..त्याच्या दुकानात सबकुछ तोच असे त्यामुळे चहा तोच करत असे आणि किटलीत चहा आणि कपबशा तोच घरी घेऊन येत असे.तो नसताना कदाचित एकादा पोरगा हॉटेलात असे.
    दिवसभर हॉटेलात काढून संध्याकाळी मात्र घोणे वाड्यासमोरील मैदानावर हॉलिबॉल खेळताना दिसे.त्याचे शॉट्स अगदी जोरात बसत. त्यावेळेपर्यंत घोणे ही व्यक्ती. म्हणजे चहा आणि हॉलिबॉल एवढ्यापुरतीच परिचयाची आणि आताही गाडीत गाठ पडल्यावर तीच आठवण जागी झाली. तस बघायला गेलं तर आमच्या दोघात मी गावात असताना  दोघांना जोडणाऱ्या तेवढ्या दोनच गोष्टी होत्या  त्यामुळे "मग कसे काय चाललेय ?" असा प्रश्न मी विचारला आणि "चाललय कसंतरी "एवढेच त्याचे उत्तर यापलीक्डे काही फारसा संवाद झाला नाही.अश्या वेळी सुस्थितीत असणाऱ्या माणसाला दुर्दशावस्थेतील माणूस काही मदत मागतो की काय अशी वाटणारी भीती थोडीफार माझ्याही मनात चमकून गेली.पण त्यानंतर अनेक वर्षानंतर आपल्या मनात असा विचार आल्याची मला लाग वाटली त्याला कारण असे झाले. 
   त्या गोष्टीला अनेक वर्षे लोटली आणि अगदी अलीकडे .मधुकर पाठक ("प्रपंच"चे दिग्दर्शक) लिखित "गदिमांच्या सहवासात " या पुस्तकात "घोणेसरकार "असा उल्लेख वाचून थबकलो. कारण ज्या व्यक्तीला मी हॉटेलवाला चंदू घोणे म्हणून ओळखत होतो ती व्यक्ती गदिमांच्या वर्गात शिकत होती आणि त्यावेळी घोणे अगदी श्रीमंत असामी होती इतकी की गदिमा त्याला "घोणेसरकार" अशी हाक मारायचे हे समजल्यावर दैवाच्या विचित्र लीलेचे आश्चर्य वाटले.
   गदिमा औंध सोडून गेल्यावर घोणेनेही शाळा सोडली व दुर्दैवाच्या दशावतारात सापडून लक्ष्मीने घोणेकडे पाठ फिरवली इतकी की माझ्यासारख्या त्याचा पूर्वेतिहास माहीत नसणाऱ्यांसाठी तो हॉटेलवाला चंदू म्हणुनच आठवत होता पण गदिमाच्या आठवणीतील आणखी हृद्य भाग म्हणजे गदिमा प्रख्यात व्यक्ती झाल्यावर घोणे त्यांना भेटायला गेला.घोणेच्या परिस्थितीतील बदल गदिमांना माहीत नव्हता. पण त्याचा अवतार पाहून त्याची परिस्थिती वाईट झाली होती हे दिसत होते. पण घोणेना पाहून आनंदाने उठून गदिमानी "घोणेसरकार " असे म्हणत त्याला मिठीच मारली.
    नंतर गदिमांनी त्याची चौकशी केली व घोणेनेही आपली सद्यस्थिती  त्याना सांगितली.आपला बालमित्र इतक्या दिवसांनी आला आहे आणि त्याच्या अश्या परिस्थितीत त्याची काहीतरी अपेक्षा असेल असे वाटून गदिमांनी घोणे निघताना शंभर रुपयाची नोट त्याच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला,पण ती त्यांच्याच हातात परत ठेवत घोणे त्याना म्हणाला,
"गजानन, इतक्या दिवसांनी भेटलास आणि तू एवढा मोठा झालास तरी या चंदूची ओळख ठेवलीस आणि घोणेसरकार अशी मला हाक मारलीस हेच माझ्यासाठी पुरेसे आहे " एवढे म्हणुन घोणेसरकारनी गदिमांचा निरोप घेतला.
   आता मधुकर पाठक,गदिमा  आणि घोणे तिन्हीही व्यक्ती हयात नाहीत. पण ही आठवण कोणालाही गंहिवरून टाकणारी आहे असे वाटून येथे सादर केली.