नि:शब्द हो, कविते

सांगून झाले खूप, तू नि:शब्द हो, कविते

मौनात बाकी पोचवू, नि:शब्द हो, कविते

 
केलीस तितकी खूप आहे वाट दु:खांना

वाहून जाऊ देत पू, नि:शब्द हो, कविते

 
हा अक्षरांचा गोफ केवळ कागदी आहे

ना गंध त्याला, ना मधू, नि:शब्द हो, कविते

 
होईल सवयीचा पलायनवाद श्रोत्यांना 

होईल शब्दांची अफू, नि:शब्द हो, कविते

 
बोलूनही काही बदलणे ज्यांस ना जमते
त्यांचे जगी होते हसू, नि:शब्द हो, कविते

 
सेवायला बागेत नाही 'भृंग' कोणीही

वाया नको ग मोहरू, नि:शब्द हो, कविते