पंचम

     "पंचम" याच नावाने तो प्रसिद्ध होता.आपल्याकडे एक म्हण आहे ना ."गवयाचं पोर सुरावरच रडतं" आणि हा तर सचिनदेव बर्मन सारख्या महान संगीतकाराचा पोरगा.आणि त्याची आई मीरा हीही संगीतातील दर्दी होतीच त्यामुळे म्हणे हे पोर अगदी पंचमातच रडू लागले म्हणून त्याला "पंचम" असे नाव पडले.आणखी एका आख्यायिकेनुसार हा पाच वेगवेगळ्या सुरात रडत असे.(हे जरा अतीच झाले,कारण बहुतांश पोरे चार पदरी गळा काढून रडतात) हे पाच सुर कोणते याविषयी आख्यायिकांनी मौन बाळगले आहे.पण त्यातील एक आख्यायिका जरा सत्याच्या जवळ जाणारी वाटते आणि ती म्हणजे हा लहान असताना दादामुनी म्हणजे अशोककुमार त्याच्याघरी गेल्यावर हा सारखा "पा पा पा "असे म्हणत होता,त्यामुळे दादामुनींनी त्याला पा म्हणजे पंचम असे नाव दिले.  "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात"  यानुसार हे खरेही असेल पण  त्याची संगीतातील गति अर्थातच संगीततज्ञ बापाच्या म्हणजे सचिनदांच्या लक्षात  आली आणि  त्यामुळे याला सरोदवादनासाठी उस्ताद अली अकबर खान आणि तबल्यासाठी पंडित सामताप्रसाद अशा दिग्गजांची तालीम मिळाली,याशिवाय त्याची आवड म्हणून तो हार्मोनिका पण वाजवत असे.
    या सर्व गोष्टींचा अर्थातच परिणाम झालाच आणि ही स्वारी सचिनदांच्या कामातही लुडबुड करू लागली,त्यामुळे "ऐ मेरी टोपी पलटके जा " ह्या "फंटूश" मधील गाण्याची चाल यानेच लावली म्हणतात,तर "ऐ अपना दिल तो आवारा " या "सोलवा साल"(१९५८) मधील गाण्याचीही ! त्यातील हार्मोनिका चा तुकडा हा त्यानेच वाजवला आणि त्या गाण्याने वार्षिक बिनाकात पहिला नंबर मिळवला होता. "प्यासा"मधील जॉनी वॉकरच्या अदाकारीने व तितक्याच मजेदार चालीने गाजलेल्या "सर जो तेरा चकराये" या गाण्याचीही चाल याचीच."चलतीका नाम गाडी" व "कागजके फूल" मध्येही सचिनदांना त्यानी हातभार लावला होता व पुढे स्वतंत्रपणे संगीतकार म्ह्णून प्रसिद्धी मिळाल्यावरही सचिनदांना त्याचा लक्षणीय हातभार लागत होता."आराधना"वर तर पूर्णपणे आर.डी.चीच छाप होती. 
    आर.डी.ना स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी पुढे त्यांचा जानी दोस्त झालेल्या मेहमूदने दिली.मेहमूदने त्याच्या "छोटे नवाब " ला संगीत देण्यासाठी सचिनदांनाच विचारले होते,पण त्यावेळी त्यांच्या तारखा उपलब्ध नव्हत्या म्हणून त्याचवेळी तेथेच तबला वाजवत बसलेल्या आर.डी.ला त्याने विचारले आणि १९६१ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट बाहेर पडला."छोटे नवाब" चे संगीत जरी फार गाजले नाही तरी ते उत्तमच होते यात वाद नाही."घर आजा घिर आये" "आमचुम तामचुम " "मतवाली आंखोंवाले ""चुराके दिल बन रहे हो भोले " ही गाणी अजूनही ऐकली तर मुरलेल्या संगीतकाराचीच आहेत हे जाणवते.आश्चर्य म्हणजे त्याचा आवडता किशोरकुमार या फिल्मसाठी त्याने मुळीच वापरला नव्ह्ता.त्या अगोदर १९५८ मध्येच गुरुदत्त दिग्दर्शित "राज " या पिक्चरमधील शैलेंद्र यांच्या गीतावर साज चढवण्याची संधी त्याना मिळाली पण दुर्दैवाने तो पिक्चर प्रदर्शितच झाला नाही.
   मेहमूदच्याच "भूतबंगला" (१९६५) मध्ये त्याने संगीत दिले त्यात एका गाण्यात त्यांचा स्वरही आहे आणि किशोरदांचा प्रथम त्यांनी वापर केलेला दिसतो. त्यानंतर मात्र त्यांनी किशोरदांचा वापर जो सुरू केला की तो कित्ता इतर संगीतकारांनाही गिरवावा लागला. १९६६ मधील "तीसरी मंझिल" मुळे आर डी एकदम प्रकाशझोतात आले आणि तेथून आर.डी युगच सुरू झाले. त्यानंतर एक काळ असा होता की वर्षाला कमीतकमी दहा बारा पिक्चर तरी पंचमदांचेच निघत होते आणि इतर संगीतकार त्यांच्या पाउलवाटांवरून चालण्याचा प्रयत्न करत होते. पूर्णपणे शास्त्रीय संगीतापासून ते एकदम रॉक संगीतापर्यंत लीलया त्यांचा विहार चालत असे."परिचय" "आंधी" " किनारा ""अमर प्रेम "मधील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी तर "आओ ट्विस्ट करे ""दम मारो दम" सारखी उडत्या चालीची गाणी सर्वत्र त्याचा लीलया विहार चालत असे. किशोरकुमारबरोबरच "अभिजित""कुमार सानू""हरिहरन" "कविता कृष्णमूर्ती" अशा नव्या कलाकारांनाही त्यांनी संधी उपलब्ध करून दिली.  काही टीकाकारांच्या मते त्यानी  बऱ्याच  परकीय चालींचा वापर केला पण त्यांच्या अतिमनोहर शास्त्रीय संगीतावर आधारित चालींचे श्रेय तरी त्यांनाच द्यावे लागेल.
   त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ३३१ चित्रपटांना संगीत दिले. त्याना फिल्मफेअर ऍवॉर्डसाठी १८ वेळा नामांकन प्राप्त झाले व तीन वेळा ते प्रत्यक्ष मिळाले. अतिशय वेगळ्या चाली,विविध प्रकारचे वाद्यप्रकार,आणि वेगळ्या धाटणीचे संगीत यामुळे त्या काळातील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणूनच नव्हे तर सलील चौधरी व अनिल बिश्वास यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांच्या मते चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तो ओळखला जावा. अर्थात याबाबतीत मतभेद असू शकतील. मात्र चित्रपटसंगीतात एक नवा प्रवाह मात्र त्यानी निश्चितच निर्माण केला.आज त्याच्या ७५ व्या जन्मदिनी त्याची ही एक थोडक्यात ओळख !