एकदा

एकदा रानात वारे गंधगाणी गायचे

ऐकताना शेत माझे नेहमी डोलायचे
वासरू तान्ह्या उन्हाचे उंबऱ्याशी हुंदडे
सांजवेळी सावल्यांचे प्राण गोरज व्हायचे
जोंधळ्याचे टच्च दाणे कापसाची शुभ्रता
चांदणे माझ्या मळ्याला आणखी सजवायचे
लेक जाता सासरी ये चावडीला हुंदका
पालखी येता तुक्याची गाव रिंगण व्हायचे
आटली माया अशी की मेघही बरसू नये
जाणले तेव्हा नदीने कोरडे वागायचे
प्यायला पाणी मिळे पण प्रश्न छळतो रोज हा
लेकराला द्यायचे की वासराला द्यायचे
अंगणी येता कुणीही पोटभर जेवायची
भागवाया भूक आता छावणीवर जायचे
ठार मेलेल्या मनाने जिंदगी जगवायला
हे जिवाचे घेउनी कोठे कलेवर जायचे
हेमंत राजाराम