मराठी - मराठी शब्दकोश (आणि इतर मराठी कोश )

गेली काही वर्षे मी एखाद्या चांगल्या मराठी - मराठी शब्दकोशाच्या शोधात आहे. प्रत्येक पुस्तकप्रदर्शनात मी आवर्जून शब्दकोश पाहतो. पण अजूनपर्यंत मनासारखा शब्दकोश सापडलेला नाही. 

याचे एक प्रमुख कारण म्हणजे मराठी - मराठी शब्दकोश मूळातच फारसे नाहीत असे आटते. शब्द-रत्नाकर / त्याच्या सुधारित आवृत्त्या उपलब्ध असतात. पण मला शब्द-रत्नाकर थोडासा outdated वाटतो. पण १०० वर्षांपूर्वीचा शब्दरत्नाकर सोडला, तर मराठीत अलिकडच्या काळात कोणता सर्वंकष असा शब्दकोश निर्माणच नाही झाला की काय? काही वर्षांपूर्वी राजहंसने एक प्रचलित मराठी शब्दकोश काढला होता, पण नावातच दिल्याप्रमाने तो फक्त प्रचलित मराठीचा कोश आहे. सर्वसमावेशक आणि विस्ताराने अर्थ देणारा असा आधुनिक काळातला मराठी-मराठी शब्दकोश दुर्दैवाने अजून माझ्या नजरेत आलेला नाही. 

तरी माझे वाचकांस असे आवाहन आहे की त्यांच्या माहितीतील मराठी - मराठी शब्दकोशांचा आढावा घ्यावा, त्यांची मते व्यक्त करावीत, आणि शिफारसी कराव्यात. इंग्लिशमध्ये ऑक्स्फर्ड, वेब्स्टर, लाँगमन हे व असेच इतर जे शब्दकोश आहेत, त्या प्रकारचा शब्दकोश साधारण अभिप्रेत आहे. अर्थात एवढ दर्जेदार अस काही मराठीत अस्तित्वात आहे की नाही, या बद्दल  मात्र जरा शंकाच आहे !! 

तसेच इंग्लिश आणि अन्य पाश्चात्य भाषांमध्ये Etymological Dictionary नावाचा एक प्रकार असतो. अशा प्रकारचे काही मराठीविषयी माहिती असल्यास जरूर कळवावे. १९४६ मध्ये प्रकाशित झालेला कृ. पा. कुळकर्णींचा एक मराठी व्युत्पत्ती कोश उपलब्ध आहे, पण  तो अपुरा वाटतो, कारण व्युत्पत्तीचे पुरेसे विश्लेषण नाही. (पहा प्रिव्ह्यू... दुवा कसा द्यायचा ??) १९४६ नंतर ७० बर्षात अजून या विषयात काहीच अधिक झाले नसेल तर ही खेदाची गोष्ट आहे, पण कोणास काही माहिती असल्यास कळवावी. 

तसेच 'लगे हाथ' , शब्दकोशांवर चर्चा होतच असेल, तर मराठी ते अन्य भाषा आणि अन्य भाषा ते मराठी अशा प्रकारच्या कोणत्या विशेष इंटरेस्टिंग कोशांवरदेखील मत व्यक्त करायला हरकत नाही.