मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?

मनाप्रमाणे कधी तरी मी जगू नये का?

स्पृहा मलाही फुलावयाची असू नये का? 

 
जगात नाही, घरात नाही, मिठीत नाही

कुठेच वेड्या मनास थारा असू नये का?

 
फुटून जाईल ऊर कोंडून ठेवल्याने

किमान डोळ्यांतुनी जखम भळभळू नये का? 

 
फिकट तरी जागतेपणी लावतेच कुंकू

निदान स्वप्नी सशक्त मळवट भरू नये का?            

 
असेल वर्षा ऋतू घरातील कोरडा जर

तहानलेल्या वसुंधरेने भिजू नये का?

 
उगाच निर्माल्य फत्तरावर कशास व्हावे?

सजीव आलिंगनी फुलाने फळू नये का?   

 
किती करावे उपास-तापास मृण्मयीने?

अपूर्णतेला नियोग देखिल घडू नये का?