माणसं खुळावली आहेत!

     फोनचा वापर फक्त बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी केला जातो, असा आत्ताआत्तापर्यंत माझा आणि उर्वरीत समाजाचा समज होता. खोलीच्या एका कोपऱ्यात ध्यानस्थ ऋषीप्रमाणे किंवा शुंभासारखे किंवा निर्विकारपणे (ज्याला जे आवडेल ते त्याने स्वभावधर्मानुसार घ्यावे) एका जागी मख्खपणे बसून राहणारे फोन एक दिवसइतका मोबाईल अवतार धारण करतील, याची कल्पना मोबाईल बनविणाऱ्यालाही आली नसेल. बसून राहणारा फोन हिंडू फिरू लागला एवढाच काय तो फरक, असे मला वाटत असे. हा फरक 'एवढाच' नसून 'केवढा मोठ्ठा' आहे याची कल्पना तेव्हा आली नाही पण आता चांगलीच आलेली आहे. जुन्या काळी फोन टेबलवर असायचा तेव्हा लोक जास्तीत जास्त  साडेतीन मिनिटे बोलत व ठेवून देत. जीवनातला बराच वेळ चिंतनासाठी मिळत असे. शहाणपण सोबतीला असण्याचा हा काळ होता.
     आता हा मोबाईल अक्षरशः कोठेही असतो. एखादे भाषण रंगात आलेले असते, एखादी मैफिल रंगात आलेली असते तेवढ्यात सुरुवात होते – हां, बोल रे. नाही नाही, कार्यक्रमात आहे. कार्यक्रमात. कार्यक्रमात. प्रोग्रॅम. नंतर करतो. नाही, तू नको करूस. मी करतो. मी – च – करतो... भाडेकरू जसा पोटभाडेकरू ठेवतो तसा त्या मूळच्या कार्यक्रमात या मोबाईलवाल्याचा एकपात्री पोटकार्यक्रम सुरु होतो. एखाद्या पप्पूचा वाढदिवस असतो. 'हॅपी बर्थडे...'सुरु होणार तेवढ्यात पप्पूच्या पप्पांचा मोबाईल वाजतो. मग, बोलणे होईपर्यंत केक कापायची सुरी हातात तशीच. पुन्हा 'हॅपी बर्थडे...' पुन्हा फोन. अखेर फोनची तीन आचमने झाल्यावर वाढदिवसाची संध्या पूर्ण होते. 
     सुरुवातीला लोक मोबाईल खिशात ठेवत असत. नंतर काहींनी भक्तिभावाने ते गळ्यातही धारण केले. त्यावर ‘आवडत्या देवी’चा फोटो. नंतर त्यांची कव्हर्स आल्यावर मोबाईल कंबरेला बंदुकीप्रमाणे लटकू लागले. केव्हाही बटन दाबलं की तिकडचा माणूस बोलायला हजर. कोणाचाही केव्हाही फोन येतो. रहदारीत असलो तर आपला हात बटनापर्यंत जाईपर्यंत फोन कट. दुसऱ्यांदा फोन. पुन्हा तेच. तिसऱ्यांदा फोन उचलला तर फोन करणाऱ्याचा पहिला प्रश्न ‘उचलला का नाहीस? किती वेळ करत होतो! दोनदा फोन करणे ही त्या 'किती वेळ’ ची परिसीमा असते ! 
     फोनला भौगोलिक ठिकाण प्रभावीपणे सूचित करायची सोय पाहिजे. लोकेशनची गरज फोन करणाऱ्याला आहे. तसे झाल्यास अनेकांचे अनेक त्रास वाचून समाजस्वास्थ वाढेल.
     फोटो काढण्यासाठी कॅमेरा वापरतात असा माझा समज होता पण तोही मोबाईलने खोटा ठरवला. फोटो काढल्यानंतर जो आवाज येतो तो फार विचित्र असतो. चूरर...कीरर....थूस..अशापैकी काहीही. विकसित होत जाणाऱ्या तंत्रज्ञानानुसार आता हे आवाज बंद झालेले आहेत. फोटो काढला की नाही, हे फोटो काढणाराला विचारावे लागते, कारण फ्लॅश पडत नाही. आपला फोटो काढत आहेत म्हणून एखादा छान पोझिशन वगैरे घेतो, हसणे दाखविण्यासाठी 'चीज' म्हणत बसतो. काढणारा क्षणभर फ्रेम नक्की करतो आणि दुसरीकडे जातो. ज्याचा फोटो काढायचा त्याला वाटते काही अडचण वगैरे आली म्हणून विचारायला गेला असेल. हा गेलेला माणूस एक मिनिटाने येतो. 
"अरे, काढ ना बाबा. माझे गाल दुखायला लागले."
"कधीच काढला. काढलेला फोटोच त्या तमक्याला दाखवायला गेलो होतो."
     हेडफोन-माऊथफोनच्या साथीने सगळ्यांशी बोलायची सोय झालेली आहे. हे हेडफोनवाले लोक जर गाड्या चालविणारे असतील तर जो नजारा असतो तो वेड्यांच्या इस्पितळातही पाहायला मिळणार नाही. सिग्नलला गाडी येते. हे लोक सुरु होतात -  
     " मी तेच म्हणतेय. तू सरळ सांग. म्हणावं, वाकड्यात शिरू नकोस. बाकड्यात नाही गं, वाकड्यात. या लोकांमध्ये काहीच अर्थ नाही. हो ना अगं. पुढचा सरकल्याशिवाय मागच्याला कसा चान्स मिळणार? (इथे पुढचा गाडीवान मागे पाहतो. आपल्याला उद्देशून नाही, हे लक्षात आल्यावर पुढे बघतो.)मी कालच परत आले.आता परत जाणार आहे. आधीचा  प्रोजेक्ट संपल्याशिवाय...हं...हां...हो.. हो...... 
    स्वगत आहे असे वाटायला लावणारे,  प्रत्यक्षात दोघांमधले, पन्नास सेकंदांचे, पंचवीसेक प्रेक्षकांच्या साथीने, तांबडा दिवा लागल्यावर सुरु होणारे आणि हिरवा दिवा लागल्यावर बंद होणारे, दिवसातल्या कोणत्याही वेळी रंगणारे हे एक धमाल पथनाट्य असते.
    मोबाईल फोनचे टोन्स कोणते असावेत, यासाठी एक नियमावली करण्याची गरज आहे. टोन साधारण मंजूळ असावेत, अशी अपेक्षा असते पण ते असाधारण कर्कश्य असतात. कधीही ऐकलेले नाही, अशा वाद्याचा आवाज ऐकू येण्याची शक्यता केवळ टोनमध्ये असते. हिमेश रेशमिया किंवा हल्लीच्या नव्या भारतमूर्ती गायकांच्या गाण्यांसाठी हे व्यासपीठ फारच उपयुक्त आहे. प्रसिध्दीचे आपले ‘काम’ करवून घेण्यासाठी याइतके ‘चलाऊ’ व्यासपीठ दुसरे नसेल.  शांततेने माणसे काही करत असली तर तो सगळा माहोल एखाद्या अचानक वाजणाऱ्या टोनने इतका बिघडतो की, माणसे त्रस्त होतात. दंगल पेटवायला यापुढे कुठल्याही नेत्याच्या भडकाऊ भाषणाची गरज लागणार नाही, मोबाईल पुरेसा आहे. त्यात त्या बोलणाऱ्याची उच्चीची पट्टी आणि त्यातले तपशील तर दंगल अधिकाधिक हिंसक करण्यास सक्षम आहेत. 
      गाणी पूर्वी फक्त मैफिलीत ऐकली जात किंवा विविधभारतीवर. तीही इथे आली आहेत. प्लेलिस्ट सुरु झाली की, एकामागून एक सुरुच. इतक्या वेगाने तर कुमार सानूनेही गाणी गायली नाहीत. गाणे ऐकल्यावर ते मनात रुंजी घालत रहावे, अशी मोबाईलची इच्छाच नाही. गाण्यासोबतीने येणाऱ्या निवेदनाची सोय आणि सर या मोबाईलाधारीत गाण्यांना नाही.  
      फिरायला जाणे याचा अर्थ फिरायला जाणे एवढाच होतो, हा माझ्यापुरता पक्का सिध्दांत आहे. एकच गोष्ट सोबत घेण्याच्या लायकीची - पाय. नाहीतर अपाय. पण याहीसंदर्भात बोलणी खावी लागतात…."मोबाईल का नव्हता नेलास बरोबर. अरे, भाजी आणायची होती. नेला असतास तर सांगितलं असतं."  
     नकाशे पाहण्याच्या सोईमुळे तर पृथ्वी परिक्रमेचा आनंद या मोबाईलमुळेच मिळतो, हे खरे. पक्ष्यांना उडताना खालचे जग कसे दिसत असेल, याची कल्पना या गूगल शोधामुळे येते. एकदा तर एका लग्नात पंगती बसण्यापूर्वी नर्मदा परिक्रमेबदद्ल बोलणे चालले होते. तिथे एकाने लगेच गूगल शोध सुरु करून मध्यप्रदेश, नर्मदा दाखवून इच्छुकांना तिथून फिरवून आणले. फिरवून आणल्यावर 'परिक्रमा तर झाली. आता पंगत बसतेच आहे. प्रसाद मिळेलच.' असे म्हणून हशे वसूल केले होते. श्रध्दाळूंनी हे जरा हलकेच घ्यावे.
     सातत्याचे दुसरे नाव एसएमएस. दर दिवशी कमीतकमी एकदा तो येतो. क्रिकेटचे स्कोर काय, वेगवेगळ्या स्कीम्स काय. दूधवालाही इतक्या नियमितपणे रतीब घालत नाही. इतके सगळे संदेश पाठवायचेच शिवाय मागून आणखी एक छोटा संदेश द्यायचा की, हे येणारे संदेश तुम्हाला नको असतील तर तुम्ही एक संदेश पाठवा. आधी विहिरीत ढकलायचे, मग सांगायचे -विहिरीबाहेर यायचे असेल तर 'कृपया दोरी टाका अशी हाळी खालून जोरात द्या’. संदेश पाठविल्यावर लगेच उत्तर येतेच असे नाही. एकदा मी असाच एका व्यक्तीला खोडकर संदेश  पाठवला. खूप वेळ झाला, उत्तर आले नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे मी जरा आत्मचिंतनात मग्न असताना संदेश वाजला. बघितला तर – चूप रे. 
     चूप रे? गेले आठ तास मी गप्पच होतो. नुसता गप्प नाही तर झोपेत होतो. मग लक्षात आले, शेकडो क्षणांपूर्वी जो संदेश पाठवला होता त्याचे आत्ता उत्तर मिळाले. 
     मोबाईल नावाची ब्याद काही वर्षांपासून मीही मागे लावून घेतलेली आहे. आवश्यक तेवढे फोन करतो. फोन फार कमी येतात, कदाचित् मी कोणाच्या उपयोगाचा नसेन. इंटरनेट तर मोबाईलवर आलेले आहेच. श्रीकृष्णाने तोंड उघडून विश्वरुपदर्शन घडवले होते; आता मोबाईलने नुसते 'आ' वासायचा अवकाश, विश्वातले हवे ते आणि नको ते सर्व दर्शन घडते. माणसं पंचेंद्रियांनी मोबाईलास्वाद घेण्यात दंग झालेली आहेत. हसणे, बोलणे, राग, लोभ, विकार, विचार, काम(कार्यालयीन), मनोरंजन या सगळ्या गोष्टी मोबाईल नावाच्या हलत्या यंत्रावर स्थिर झालेल्या आहेत. संडास ही एकमेव जागा अशी असावी, जिथे (अजून तरी) मोबाईल नेला जातत नाही. नादखुळा म्हणजे काय, हे कोणाला बघायचे असेल तर त्यांनी अत्याधुनिक  मोबाईल नुकताच विकत घेतलेला माणूस बघावा. हे दाब, ते दाब...
   एकूण काय तर माणसांना याड लागलंय ! माणसं मोबाईलवेडी झालेली आहेत ! माणसं खुळावली आहेत!