आस ही मूर्त झाली

आस ही मूर्त झाली

ऋतू आगळा हा ऋतू सावळा हा
ऋतू पावसाळी कसा साजिरा हा
भले थोरले मेघ हे वर्षताती
जळा निर्मळाते बहू ओतताती

घनाकार होता असे अंतराळी
रवीने पहा त्यागिली ते झळाळी
कसा वायु तो शीत कोंडे उराशी
नवा श्वास घेते धरित्री जराशी

नवे थेंबुटे देत संजीवनी का
नवा साज लेती वनी वल्लरी का
मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली

फुलांनी उरी वाहिली आस सारी
फळांनी तिला गोमटी थोर केली
निसर्गातुनि येक आशा धुमारे
जळातूनि वाही फलद्रूप सारे