शेती

                 शेती

शेती विषयी आता बोलावं काय ?
बोलण्यासारखं काही उरलंच नाही
कंठाशी आलेत प्राण तरीही
हिर्व स्वप्न पुन्हा पुन्हा पहाणं थांबलंच नाही
जुगारासारखी करतो आम्ही शेती
हुकमाचं पान कधी हाती लागलंच नाही
हाती कुणा-कुणाच्या राजे, राण्या, एक्के
सत्तेसाठी आमचं मात्र, जोकर होणं टळलंच नाही
काळ्या आईनं आमच्या , आम्हा कधी 
भीक मागायला शिकवलंच नाही
आभाळीच्या पित्यानं, मात्र आम्हाला
सुखा-सुखी नांदवायचं ठरवलंच नाही
झिजली मातीत या, बापजाद्यांच्या हाडांची काडं
चंदनी व्रत ते आम्हा कधी चुकलंच नाही
सोडू म्हटलं तरी सुटत नाही पाश हा
अरे..!! शेतीला आम्ही कधी .... धंदा... मानलंच नाही.....!!!
                                      -उद्धव कराड (मों. नं. ९८५०६८३०४५)
                                        मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.