संकोच नडे ----

    माझ्या एका मित्राला आपल्याला आलेले अनुभव अगदी छानपैकी रंगवून सांगण्याची कला अवगत आहे व हौसही आहे. याउलट माझा स्वभाव ! म्हणजे आलेले अनुभव अगोदर माझ्या लक्षात थोडेच रहातात आणि ते रंगवून सांगण्याची हातोटी तर मुळीच नाही.माझ्या बहिणींना ती हातोटी होती,म्हणजे त्या आता नाहीत त्यामुळे ती कलाही त्यांच्याबरोबरच लयास गेली, त्यांच्या रंगवून सांगितलेल्या गोष्टी ऐकून खूष होणारी माझी मायमाउली पण आता नाही. तर त्या (म्ह.माझ्या बहिणी) कोणत्याही सिनेमाला गेल्या की आल्यावर त्या सिनेमाची कथा अगदी रंगवून सांगायच्या त्यामुळे सिनेमास जाऊ न शकणाऱ्या बिचाऱ्या आईला दुधाची तहान अगदी श्रीखंडावर भागवल्याचा आनंद मिळे.उलट मी एकदा "बीस साल बाद" सिनेमा बघायला गेलो.अर्थात ही लग्नापूर्वीची गोष्ट आहे.लग्नानंतर मला एकट्याला सिनेमाला कोण जाऊ देणार.अर्थात त्या सिनेमाची कथा आईला सांगण्याचे कर्तव्य मला पार पाडावे लागले .त्यातही माझे दुर्दैव असे की मी चित्रपटगृहात प्रवेश करताच एका विघ्नसंतोषी माणसाने "खून मनमोहन कृष्णानंच केलाय हो" अशी जोरात आरोळी ठोकून सर्व प्रेक्षकांचा विश्वासघात केला ( पुण्याची खासियत, आणि आता हे सांगून कुणाला असे वाटण्याची शक्यता नाही कारण वीस साल बाद आता अगदी "पचास साल बाद" आठवून हे लिहितोय).त्याला दोघा चौघानी पकडून चार दोन थापडा दिल्या म्हणे, तरी सिनेमा पहाण्याच्या उत्सुकतेचा पचका व्हायचा तो झालाच.अश्या पार्श्वभूमीवर माझे चित्रपटकथाकथन हे चारदोन मिनिटातच मनमोहन कृष्ण कसा खुनी असतो याचा त्याच्या हाताचा साभिनय उल्लेख करून खुलासा करणे एवढ्यावरच मर्यादित झाल्यामुळे त्यानंतर कधीही आईने मला मी एकटा ज्या सिनेमाला गेलो त्याची कथा सांगण्याचा आग्रह केला नाही.मी कथा सांगतो म्हटल्यावर ती एकदम हाताचा अभिनय करून ,"काही नको तू पाच मिनिटात हात वर करून मोकळा होणार " असे म्हणून मला निरुत्साहित करत असे.  बायकोसह जाऊ लागल्यावर अर्थातच माझ्या तिच्याबरोबर जाण्याकडे आईकडून (म्ह.तिच्या सासूकडून) वक्रदृष्टीने पहाणे झाले तरी तिच्याकडून माझ्यापेक्षा कथेचा उलगडा बऱ्यापैकी होण्याचा फायदा असल्यामुळे त्याकडे ती काणाडॉळा करी.
     असो बरेच विषयांतर झाले.तर माझ्या या मित्राला त्याची मुले लहान असताना आलेला अनुभव त्याने सांगितला.तो त्याच्याच शब्दात ,
  "त्यावेळी आम्ही सोलापुरात रहात होतो.आमचा मन्या पाच वर्षाचा आणि त्याच्याहून पिंकी दोन वर्षांनी लहान होती.मंगेश पाडगावकरांचे "वात्रटिका" हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते आणि त्यातील बऱ्याच वात्रटिका त्या दोघांनाही पाठ होत्या.आणि घरात असताना ते दोघेही त्या अगदी चढाओढीने म्हणत .एकदा त्या दोघांना बरोबर घेऊन सहज आमच्या घराजवळील रस्त्यावर फिरायला बाहेर पड्लो त्याच रस्त्यावर असलेल्या गेस्टहाउस मधून एकदम मंगेश पाडगावकर व त्यांच्याबरोबर आणखी एक प्रथितयश कवी बाहेर पडले.त्यावेळी त्यांच्याशेजारून जाताना. पिंकीला "एक करवली लग्नमंडपात हरवली--- "ही वात्रटिका * मोठ्यांदा म्हणायला सांगितले जेणेकरून पाडगावकरांचे आमच्याकडे लक्ष जाईल व कौतुकाने ते आमची विचारपूस करतील.पण पिंकीला कितीही सांगितले तरी तिने जाम ती वात्रटिका म्हणायला नकार दिला आणि त्या ऐवजी ती जनमनगण म्हणू लागली. अर्थातच पाडगावकरांना "जनमनगण" हे राष्ट्रगीत असल्याचे माहीत असले तरी ते (त्यांनी नाही तर) रवींद्रनाथ ठाकूरांनी लिहिले आहे हेही माहीत असल्यामुळे आमच्याकडे (त्यानी) ढुंकूनही पाहिले नाही. 
"मग तूच सरळ त्यांची ओळख दाखवायला काय हरकत होती?" मी विचारले      
"अरे जिकडे तिकडे आमचा संकोच नडतो" हे त्याचं उत्तर ऐकल्यावर मला बरे वाटले कारण माझा स्वभावही असाच संकोची असल्यामुळे अश्या अनेक संधी मी गमावल्या आहेत.
    माझा संकोच तर इतका पराकोटीचा की एकदा वडिलांचे दोस्त घरी येऊन बसले होते आणि चहाचे आधण चुलीवर चढवल्यावर आईला घरातली साखर संपली हे ध्यानात आले आणि कधी नव्हे तो मीच कायतो घरात असल्यामुळे तिचा तावडीत सापडलो."रडतराव" असे माझे नामकरण करणारी माझी धाडसी बहीण घरात नव्हती त्यामुळे झक मारत मला पिशवी घेऊन जवळच्या म्हणजे "अब्बास अली "च्या किराणा दुकानात पायधूळ झाडावी लागली. तसा त्याच्या दुकानात गिऱ्हाइक असेल एकादे दुसरेच पण बाकी तेथे गप्पा मारणाऱ्या गावकऱ्यांचेच मोठे कोंडाळे बसलेले.आबासल्लीलाही दुकान चालवण्यापेक्षा त्यांच्या गप्पांमधेच रस असल्याने त्या एका गिऱ्हाइकाचे समाधान करून तो आपला गप्पात गुंतलेला.मला वाटले तो माझ्याकडे लक्ष देईल आणि "काय बाळ तुला काय पाहिजे"अशी प्रेमळ विचारपूस करेल पण त्या बेट्याला माझ्यापेक्षा गावगप्पांमध्येच जास्त रस त्यामुळे मी आपला विठ्ठलासारखा त्याच्या दारी उभा.बराच वेळ झाला तरी त्याने माझ्याकडे लक्ष न दिल्याचा अपमान सहन न होऊन मी भोकाड पसरले.तेव्हां कोठे त्याचे माझ्याकडे लक्ष गेले.तोवर चुलीवरले चहाचे आधण पार आटून गेले तरी आपला ’दुलारा" अजून साखर कसा घेऊन आला नाही याची काळजी वाटून आणि चहाला उशीर झाल्यामुळे वडिलांच्या रुद्रावतारास तोंड द्यावे लागेल या भीतीने बऱ्याच हाका मारून माझ्या बहिणीचा शोध लावून आईने तिला माझा शोध घेण्यास व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे साखर घेऊन घेण्यास पाठवले व माझी त्या संकटातून सुटका झाली.
    अश्या संकोची स्वभावामुळे माझीही परिस्थिती अनेक वेळा या माझ्या मित्रासारखीच झालेली ! म्हणजे  "नजर वळविता सहज कुठेतरी एकाएकी तूच पुढे "अशी संधी जरी आली नाही तरी " काही प्रसिद्ध व्यक्ती योगायोगाने भेटल्या तरी त्यांच्याशी बोलायला जाण्याच धीर न झाल्यामुळे नंतर   "निसटुनी जाई संधीचा क्षण सदा असा संकोच नडे" असे अनेक वेळा झाले हे मात्र खरे !   
        माझ्याप्रमाणेच इतरही सर्वसाधारण माणसे, प्रसिद्ध व्यक्ती आसपास असतील तर त्यांचेपाशी जाऊन बोलायला बिचकतात असे एकूण माझे निरीक्षण आहे. उलट काहींना अश्या व्यक्तींची मैत्री करण्याचा छंदच असतो. आमच्या सौ.चा थोडाफार कल त्या प्रकाराकडे ! अमेरिकेतून पहिलाच दौरा आटोपून परत येताना मात्र तिचा हा स्वभाव आमच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी निघतानाच मुलाने बजावून सांगितले होते की हिरवा संकेत (Green Signal) असणाऱ्या द्वारातूनच बाहेर पडा.पण आमच्या बरोबरच्या सर्वांनाच त्यांच्या अमेरिकेतील इष्टमित्रांनी तीच सूचना दिल्यामुळे त्या द्वारासमोर भली मोठी रांग होती.तेवढ्यात सौ.ची तीक्ष्ण नजर एका दुसऱ्याच गेटकडे गेली  व तेथूनही काही व्यक्ती बाहेर पडत आहेत व तेथे फारच कमी गर्दी आहे असे तिला दिसले व तिने आपला मोर्चा तिकडे वळवला. त्या रांगेत उभे राहिल्यावर सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर त्या द्वारापाशी उभे आहेत असे तिला दिसले व तिने लगेच त्यांच्याशी संभाषण सुरू केले.आमच्या पुढील व्यक्तीची तपासणी संपवल्यावर लगेच ते द्वार बंद करण्यात आले कारण ते म्हणे केवळ सुरेशजींच्याच नातेवाइकांसाठी खास उघडले होते.
   त्यामुळे आता आम्हाला परत त्या मोठ्या रांगेत परत जाऊन उभे रहावे लागणार असे दिसू लागले पण सौ.ने सुरेशजींशी गप्पा मारून त्याना खूष केल्यामुळे "जाऊ द्या यांनाही" असे तपासणी अधिकाऱ्यांना कदाचित त्यानी सांगितले म्हणून आमचा अपवाद करून तेथूनच आमची तपासणी करायला परवानगी मिळाली पण तेथील सुरक्षा कर्मचाऱ्याला ज्यादा काम पडल्याचा राग आला असावा त्यामुळे त्याने आमची अगदी कडक तपासणी करायचे ठरवून अगदी आमच्या बॅगा उघडायला लावण्याचा विचार केला पण मी एकाच बॅगेच्या किल्ल्या हुडकून ती बॅग उघडायला इतका वेळ घेतला की आता यांच्याबरोबर उगीचच टाइम पास करायला नको असे त्याला वाटले असावे म्हणून एकदाचे आम्हाला त्याने सोडून द्यायचे ठरवले. तरीही तोपर्यंत इतका वेळ गेला होता की हिरव्या संकेतद्वारातील सगळे प्रवासी निघूनही गेले होते.त्यातच उभे असलेले आमचे एक मित्र आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला विचारू लागले,"अहो इतका वेळ तुम्ही आत काय करत होता?" आता यावर आमच्या सौ.सुरेश वाडकरांची मुलाखत घेत होत्या असे उत्तर देणे म्हणजे "आगीतून फुफाट्यातच उडी मारण्यासारखे झाले असते त्यामुळे सुरेश वाडकर आम्हाला भेटल्यामुळे (जणु ते आम्हालाच भेटायला आले होते) उशीर झाला असे थातुरमातुर कारण सांगून त्याना गप्प बसवावे लागले.
टीप : "(पूर्ण वात्रटिका येथे उदधृत केली नाही. नाहीतर संदीप खरे(कवी)वर अरुण कोलटकरांची एक कविता आपल्या सदरात छापल्यामुळे तशी पूर्वपरवानगी न घेतल्याबद्दल कोलटकरांचे कवितासंग्रह प्रकाशित करणाऱ्या "प्रास" प्रकाशनाचे अशोक शहाणे यानी खुलासा मागितला व तो न दिल्याबद्दल स्वामित्त्व हक्कासाठी न्यायालयीन दरवाजे ठोठावले व तो लढा त्यानी जिंकला तशी पाळी पाडगावकरांचे प्रकाशक माझ्यावर आणायचे.)