जय हो !

    जेफरी आर्चर (Jefferey Archer) यांच्या "Clean sweep Ignatius "  या कथेचे रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे.सध्या देशात स्विस बॅंकेतील पैसा परत आणण्याविषयी मोठी चर्चा चालू आहे.त्यामुळे या कथेची निवड केलेली आहे.मूळ कथेत नायजेरिया असा देशाचा उल्लेख आहे.रूपांतर म्हणण्याचे कारण मूळ कथेत काही बदल (व नामांतरे) केलेले आहेत.
   .त्या देशाला बरीच सुंदर सुंदर नावे होती म्हणजे इतर देश त्या देशाला त्या नावांनी ओळखत.पण बराच काळ आपल्या देशाची ओळखच त्या देशातील लोकांना नव्हती.सुरवातीला ते आपला देश म्हणजेच जग असे समजत आणि पुढे काही काळ आपला प्रांत म्हणजेच देश असे त्याना वाटे आणि छोट्या छोट्या भागातले लोक आपसात लढाया करून आपणच श्रेष्ठ हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत.त्यासाठी आपल्या देशाबाहेरील लोकांनाही ते मदतीस घेत. या मदतीस येणाऱ्या लोकांच्या ताटाखालचे मांजर बनायलाही ते तयार असत अर्थातच असे आपआपसात भांडणारे लोक आपल्याला एकत्रितपणे विरोध करणार नाहीत याची कल्पना येऊन बऱ्याच परकीयांनी त्या देशावर आक्रमण केले.आणि त्यांच्या कल्पनेप्रमाणेच झाले.एकाद्या भूभागावर आक्रमण झाले की तेवढ्याच भूभागाचे लोक प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत बाकीचे आनंदाने शेजाऱ्याची कशी जिरतेय हे पहात बसत आणि एक वेळ अशी आली की सगळे भूभागच परकीय आक्रमकांनी गिळंकृत केले.आपला देश एवढा मोठा आहे ही कल्पना तेव्हां त्या देशवासीयांना आली व त्यातील काही राष्ट्राभिमानी होते त्यांनी या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करून या परकीयांना हाकून लावण्याचा प्रयत्न केला.तोवेळपर्यंत या देशाची प्रचंड लोकसंख्या सांभाळणे आक्रमकांनाही अवघड झाले होते म्हणून त्यांनी तो देश सोडून जायचे ठरवले व जातानाही धर्माच्या नावाखाली त्या देशाचे दोन तुकडे करून ते गेले.त्यातील मोठा तुकडा म्हणजे हा अनामिक देश.
  आपले मूळ नाव कायम ठेवण्यापेक्षा देशाला नवे नाव द्यावे असे नव्या राज्यकर्त्यांनी ठरवले कारण नावात बदल म्हणजे प्रगती असा त्यांचा समज होता.पण त्यांचा मूळ बाणा कायम असल्याने नाव कोणते द्यावे याविषयी एकमत होईना.प्रत्येकाला वाटे आपला भूभागच महत्त्वाचा म्हणून त्याशी संबंधितच नाव द्यायचे.काहींना आपण म्हणजेच देश असा दृढ अभिमान होता आणि त्यांचे अनुयायीही आमचा नेता म्हणजेच देश अशी गर्जना करत. शेवटी पुन्हा आप आपसात युद्ध टळावे म्हणून त्यांनी "अनामिक" हेच नाव  पसंत केले.त्यानंतर इतर देश त्यांना योग्य त्या नावाने या देशाला संबोधू लागले.नामकरण करण्याची हौस आपल्याला होणाऱ्या मुलांच्या बाबतीत देशवासी भागवून घेतच पण आपला प्रांत,आपला गाव,गावातील रेल्वे स्थाबक,विमानतळ,विद्यापीठे अश्या ज्या काही जागा किंवा संस्था असतील त्या सगळ्यांची नावे बदलण्याचा या देशवासियांनी व त्यांच्या पुढाऱ्यांनी अगदी धडाका लावला. कामात बदल म्हणजे विश्रांती त्याच पद्धतीने नावात बदल म्हणजे प्रगती असा नवीन सिद्धान्तच जणु त्यानी रूढ केला.
     परकीय आक्रमकाला जाण्यास भाग पाडले या भांडवलावर आपण फार देशभक्त आहोत असे काही पुढाऱ्यांना वाटत असे तसेच त्यांच्या गोतावळ्यालाही.त्यामुळे शेकडा दहा जणतरी स्वातंत्र्ययोद्धा ठरले आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील मुले बाळेही आपणही स्वातंत्र्यसैनिक असेच समजत व तसाच अधिकार इतरांवर गाजवत. आपण देशासाठी इतके कष्ट सोसले तर त्याचा काहीतरी मोबदला आपल्याला मिळणे हा आपला रास्त हक्क आहे असेच त्याना वाटू लागले.देशात लोकशाही आहे असे मानले गेले असले तर आपल्या पूर्वपुण्याईवर मतपेटीवर त्या निवडक लोकांचाच अधिकार राहिला आणि त्या अधिकाराचा उपयोग कसा करावा हे त्यांना कोणी शिकवण्याचे कारण नव्हते.
    अश्या पुढाऱ्यांचा आदर्श समोर असल्याने हळू हळू पूर्वी अधिकारपदे उपभोगायला न मिळालेले लोकही त्यांच्या सहवासाने अधिकार कसा मिळवावा ही गोष्ट शिकू लागले.हळू हळू देशातील लोकांमध्ये भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ही समजूत रूढ झाली.मात्र प्रत्येकजण आपण स्वत: सोडून बाकी सगळे भ्रष्टाचारी असे समजू लागले.भ्रष्टाचारातून बराच काळा पैसा निर्माण होत असे.प्रत्येक जणच काळा पैसा निर्मितीस हातभार लावत असला तरी काळा पैसा बाहेर आला पाहिजे  असा उद्घोष प्रत्येकजणच करे.
    हा काळा पैसा देशात तर आहेच पण  देशाबाहेर तर मोठ्या प्रमाणावर आहे असा शोध हळू हळू सर्वांनाच लागला व देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे हा काळा पैसा देशात आला पाहिजे याविषयीही सगळ्यांचे एकमत होते.एका देशाचा नावलौकिक त्या देशातील बंकांच्या व्यवहारातील गुप्ततेविषयी होता.त्या देशातील बॅंकेत पैसा ठेवला की अगदी ब्रह्मदेवालासुद्धा पत्ता लागत नाही अशी त्या देशाची ख्याती होती. त्या देशाचे नाव "विप्रदेश' असे होते.  या वेळी अनामिक  देशात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्या पक्षाने काळा पैश्याचा स्रोत शोधून काढू आणि तो परत आपल्या थोर "अनामिक" देशात परत आणू असा अगदी पणच केला होता त्याच पक्षाला बहुमत मिळाले
    आता आपल्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे हे पंतप्रधान विघ्नेश यांनी ओळखले.आपला विश्वासू सहकारी चतुरेश याला त्यानी अर्थमंत्रीपदाची शपथ दिली.नेहमीप्रमाणे.निवडूनही येण्याची क्षमता नसणारी व्यक्ती इतकी मोठी जबाबदारी कशी काय पेलणार अशी विरोधकांनी या नियुक्तीवर टीका करण्यास सुरवात केली. त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत नव्या अर्थमंत्र्यांनी आपले धोरण स्पष्ट करताना सार्वजनिक जीवनातील,भ्रष्टाचार,लाचखोरी यावर टीका करून त्यांचा पूर्णपणे नि:पात करण्याचे आश्वासन देशाला दिले व कार्यभार संभाळायला सुरवात करताच एक एक आर्थिक घोटाळे चतुरेश यांनी खरोखरच बाहेर काढायला सुरवात केली. पहिल्याच महिन्यात चारा घोटाळा प्रकरण बाहेर काढून ते खाते सांभाळणाऱ्या पूर्वीच्या मंत्रिमंडळातील वजनदार मंत्र्याला लक्ष्य केले व त्या खात्यातील प्रमुख अधिकाऱ्याला तुरुंगाची हवा दाखवली.त्यानंतर विनिमयाचे नियम न पाळणाऱ्या बड्या उद्योगपतीला त्याने गजाआड केले. त्यानंतर पोलिसखात्यातील भ्रष्टाचाराकडे त्याची दृष्टि वळवली व काही लाचखाऊ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या तर काहींना रंगेहात पकडले.      
     चतुरेशच्या या धडाक्याने जनता तर खूष झालीच पण भ्रष्टाचाऱ्यांच्या छातीत धडकी भरली. यापुढील आपले लक्ष्य निवडणुकीपूर्वी आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे देशांतर्गत व देशाबाहेरीलही काळा पैसा बाहेर काढणे हेच राहील.असे चतुरेश यांनी जाहीर केले.देशांतर्गत व देशाबाहेर किती काळा पैसा आहे व त्यावर देशाच्या किती पंचवार्षिक योजना पार पडतील किंवा पडल्या असत्या याचे आकडेही जाहीर झाले व त्यानुसार जर सगळा पैसा बाहेर आला तर करदात्याना बराच कर कमी भरावा लागेल असे आशादायक चित्र मात्र दिसत नव्हते.कारण पहिली गोष्ट म्हणजे अजूनतरी भ्रष्टाचाराचे फक्त आकडेच बाहेर आले होते.चलनफुगवटा वाढत होता आणि महागाई वाढतच होती.
   पंतप्रधानांनी चतुरेशला याविषयी विचारविनिमय करण्यासाठी बोलावले होते.
"आपण सत्तासूत्रे हाती घेऊन जरी फार मोठा काळ लोटला नाही तरी अजूनही जनमानसावर प्रभाव पडण्यासारखी कामगिरी आपल्याकडून झाली आहे असे दिसत नाही,चतुरेश."
" आपण म्हणता आहात तशीच परिस्थिती आहे विघ्नेश,"नव्या राजवटीत प्रत्येक सहकाऱ्याला त्याच्या नावानेच बोलावावयाचे असा प्रघात पाडण्यात आला होता.शिवाय त्या नावापुढे जी किंवा राव किंवा साहेब या प्रकारची सन्मानदर्शक पदे जोडावयाची नाहीत असेही ठरले होते.पण त्यामुळे रावसाहेब आणि साहेबराव या नावाच्या अस्सल मराठी मंत्र्यांवर नावेच बदलायची पाळी येते की काय असे वाटू लागले होते.पण त्यांच्या पक्षप्रमुखांच्या मराठी अस्मितेला धक्का बसून त्याचा सरकारलाच धक्का बसू नये म्ह्णून त्यांचा सन्माननीय अपवाद करण्यात आला होता. एकाच नावाच्या दोन व्यक्ती असतील तर मात्र त्या व्यक्तीच्या मतदारसंघाचे नाव त्यापुढे लावायचे असेही ठरले होते.त्यामुळे जातिभेदाचे थोडेफार उच्चाटण होण्यास मदत होईल अशी भाबडी समजूत करून घेण्यात आली होती.सांप्रदायिकतेवर काय तोडगा काढावा यावर विचार चालू होता कारण सिंग किंवा खान म्हटले की धर्माचा बोध नाही म्हटले तरी व्हायचाच.
"तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहेत चतुरेश आणि मुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक अहवालाचा अभ्यास केल्यावर अतिशय गंभीर बाब माझ्या लक्षात आलेली आहे अर्थात ती तुमच्याच निष्कर्षातून उघडकीस आली आहे.म्हणजेच तुमच्या नजरेतून सुटली असेल असे मला म्हणायचे नाही."
" परदेशी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या दलालीतून आपल्या देशाची कोट्यावधी किंमतीच्या चलनाची धूळदाण चालू आहे त्याविषयीच म्हणायचे आहे ना विघ्नेश आपल्याला ?"
"बरोबर अगदी तस्सेच,एवढे धन कोणाच्या खिश्यात जात आहे याविषय़ी कल्पना आहे का तुम्हाला ?त्यासाठीच बोलावले आहे तुम्हाला येथे" चतुरेश थोडा काळ विघ्नेश यांच्या नजरेस नजर देत शांत बसले.विघ्नेशनी हा प्रश्न आपल्याला विचारावा याचे जणू त्याना आश्चर्यच वाटत होते.
"त्या धनाचा मोठा भाग किंवा ९९ प्रतिशत तरी विप्रदेशातील खाजगी बॅन्कांमध्ये जमा होत असावा असा मला दाट संशय आहे."
"याविषयी आपण निवडणुकांपूर्वीच मोठा डांगोरा पिटून ते धन पुन्हा आपल्या या महान देशात परत आणण्यात येईल असे  घोषित केले होते चतुरेश"
"खरे आहे विघ्नेश, परंतु त्याविषयी ठोस पुरावा माझ्याकडे नाही.निवडणुकीपूर्वी आश्वासन द्यायला त्याची आवश्यकता नसते पण आता मात्र त्याशिवाय पुढे हालचाल करता येत नाही याची जाणीव आपणालाही असावी"
"मग त्यासाठी कोणतीही पावले उचलावी लागली तरी हरकत नाही त्यासाठी तुम्हाला पूर्ण अधिकार मी देतो कोणत्याही पद्धतीने पण या खलनायकांचा खरा चेहरा जनतेसमोर यायलाच हवा.अगदी आपल्या मंत्रिमंडळातील  आणि यापूर्वीच्या मंत्रिमंडळातील सदस्यांपासून सर्वांची पूर्ण तपासणी तुम्ही करू शकता.कोठलीही भीती बाळगू नका त्यांचा दर्जा,अधिकार,त्यांचे संबंध कश्श्याकश्श्याचा मुलाहिजा बाळगू नका---"
"अश्या प्रकारच्या कामगिरीसाठी तसे खास अधिकार बहाल करणारे आपले अधिकृत स्वाक्षरी व मुद्रांकित अधिकारपत्र त्यासाठी लागेल "
"मग ते आज संध्याकाळी तुमच्या कार्यालयात पोहोचते होईल याची खात्री बाळगा."
"आणि विप्रदेशातील प्रवेशपरवाना व तसे विप्रदेशातील बॅंकांसाठी अधिकारपत्रही लागेल"
"मान्य "
"आणि त्याचबरोबर हेही जवळ असू द्या," विघ्नेशनी एक स्वयंचलित पिस्तुल चतुरेश यांच्या हातात देत म्हटले,"मला अशी शंका नव्हे खात्रीच वाटते की माझ्याइतकेच तुम्हीही आत्तापर्यंत बरेच शत्रू निर्माण करून ठेवले आहेत."
आपल्या आजूबाजूला अनेक रक्षक असताना आपल्यावर कोणी हल्ला करेल असे त्याना वाटत नव्हते त्यामुळे जरा आचंबित होऊनच चतुरेशनी त्याचा स्वीकार केला.त्यानंतर लगेचच चतुरेशनी विघ्नेश यांचा निरोप घेतला.
    विघ्नेश यांच्या आदेशामुळे आणि त्यानी दिलेल्या अधिकारामुळे कोणत्याही सचिवाला व खुद्द अनामिक देशाच्या बॅंकेच्या प्रमुखानाही कसलाही पत्ता न लागू देता अन्वेषण कार्य मोठ्या उत्साहाने चतुरेशनी हाती घेतले आणि कार्यालयातील इतर कामे दिवसा पार पाडून अनेक रात्रींचा दिवस करत तीन महिन्याच्या कालावधीत ते त्यानी पुरे केले.
    यानंतर आपण विश्रांतीसाठी अमेरिकेला जात असल्याचे जाहीर करून आपल्या प्रमुख सचिवाला आपली पत्नी,दोन मुले  यांच्यासह विप्रदेशासाठी विमानयात्रेची तिकिटे व योग्य कागदपत्रे तयार करण्याची आज्ञा त्यानी केली.विप्रदेशाला जाण्यासाठी         
पहिला मुक्काम फ्लोरिडा येथे करून आपल्या कुटुंबियांना डिस्नेलॅंडची सफर करण्यास सांगून आपल्याला न्यूयॉर्क येथे महत्वाचे काम आहे असे सांगून कोणालाही पत्ता लागू न देता त्यानी विप्रदेशास प्रयाण केले.
   विप्रदेशात प्रवेश करताच तेथील फारसे नावाजलेल्या नसणाऱ्या विश्रामगृहात चतुरेश यांनी निवास केला.त्या रात्री त्यानी शांतपणे आपल्या आठ तासाच्या झोपेचा आस्वाद त्यानी घेतला,नाहीतरी मधल्या तीन महिन्यात इतकी शांत झोप त्यांना क्वचितच मिळाली होती.बऱ्याच काळानंतर मिळालेल्या विश्रांतीनंतर ताजेतवाने होऊन भरपेट नाश्त्याचा आस्वाद घेतच विप्रदेशातील बॅंकाची जी यादी त्यानी आपल्या तीन महिन्याच्या पूर्वतयारीत तयार केली होती त्यावर त्यांनी एकदा परत नजर टाकली.विप्रदेशातील दीर्घायु बॅंकेचे नाव त्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते व ज्या इमारतीत त्या बॅंकेचे कार्यालय होते ते त्यांच्या विश्रामगृहापासून फक्त अर्ध्या कलाकाच्या अतरावर होते.तेथील दूरध्वनीवर संपर्क साधून आपल्या आगमनाची वार्ता त्यांनी बॅंकेच्या प्रमुखाला देऊन त्या दिवशीच्या द्वितीय प्रहरात भेटीची वेळ मागून घेतली.
   अगदी टाकाऊ दिसणाऱ्या आणि जुन्यापुराण्या संदूकीसह चतुरेशनी दिलेल्या वेळेच्या अगदी काही काही क्षणच अगोदर त्यांनी बॅंकेच्या भव्य कार्यालयात प्रवेश केला. त्यांची वाट पहाणाऱ्या विप्रदेशीयाला अनामिक देशातील वेळेविषयी असणाऱ्या जागरुकतेची कल्पना असल्यामुळे त्यांचे इतके नियुक्त वेळेत येणे हे त्या अधिकाऱ्यालाही चकित करून गेले.कारण आपल्या देशात वेळ न पाळण्याविषयी प्रसिद्ध असणारे अनामिकवासी दुसऱ्या देशात मात्र तितकेच काटेकॉर असतात याची कल्पना त्या अधिकाऱ्यास प्रथमच येत होती.बॅंकेच्या तरुण अधिकाऱ्याने चतुरेशना उद्वाहकातून मुख्य कार्यालयात नेऊन प्रमुखांच्या अकराव्या मजल्यावरील कार्यकक्षात प्रवेश केला.प्रमुखांच्या द्वारावर हलक्या हाताने टक टक करताच "आपले स्वागत आहे"असा आवाज ऐकू आला व हलकेच दार उघडले.
’मी चतुरेश,अनामिक देशाचा वित्तमंत्री"
प्रमुखांनी आसनावरून उठून पुढे होत त्यांचे स्वागत "शुभप्रभात " म्हणत केले."कृपया आसन ग्रहण करावे" अशी विनंती केली. व त्याचबरोबर अतिशय सुबक मांडणीच्या काचेच्या टेबलाकडे निर्देश करत,"आपल्यासाठी कॉफी मागवली आहे अर्थात आपणास योग्य वाटत असेल तर"
   चतुरेशनी मान हलवून विनंतीचा स्वीकार केला आणि आपली संदूक आपल्या खुर्चीच्या पायालगत ठेवत त्यानी आसन ग्रहण केले.समोरच्या संपूर्ण काच बसवलेल्या गवाक्षाकडे पहात त्यातून दिसणाऱ्या सुंदर देखाव्यावर मार्मिक भाष्य करण्यात  चतुरेश आणि प्रमुखांचा काही काळ गेला.आणि चतुरेशनी मुख्य विषयाला हात घालत म्हटले,"आपल्या बॅंकेला भेट देण्याचा आमच्या अनामिक देशाच्या पंतप्रधानानी मला आधेश दिला आहे आणि त्यानी एक विशेष विनंती आपल्याला करण्यास मला सांगितले आहे." बॅंकेचे प्रमुख किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव मुळीच बदलल्यासारखे दिसले नाही."त्यानी मला असा आदेश दिला आहे की "आपले वाक्य पुढे चालू ठेवत चतुरेश यांनी म्हटले," आमच्या देशातील कोणकोणत्या नागरिकांची खाती आपल्या बॅंकेत आहेत याची संपूर्ण यादी आपण मला सुपूर्द करावी"
   "आपल्याला दिलेल्या आदेशाचा अवमान करण्याचे माझी इच्छा नाही परंतु माफ करा, तसे करण्याचे स्वातंत्र्य मला नाही"                 
"कृपया माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या."आपले वाक्य पुढे चालू ठेवीत चतुरेश म्हणाले,"प्रथम मी आपल्याला एक आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या शासनाने या बाबतीत मला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत. असे म्हणून आपल्या कोटाच्या खिश्यातून एक सीलबंद लखोटा काढून चतुरेशनी बॅंकेच्या प्रमुखांपुढे ठेवत,"यावरील मुद्रा " आमच्या देशाचीच आहे याची खात्री करून घ्या. आता त्यातील अधिकारपत्र मी आपल्याला वाचून दाखवतो."
 अधिकारपत्राचे वाचन झाल्यावरही प्रमुखांच्या मुद्रेवरील एकही रेषा हलली असल्याचे दिसले नाही.आपला घसा जरा खाकरून साफ करत त्यानी एवढेच म्हटले,"आपल्या भावनेचा मी आदर करतो परंतु मला एवढेच म्हणावेसे वाटते की या अधिकारपत्रास कोठल्याही प्रकारची प्रतिष्ठा वा  मूल्य आमच्या देशात नाही"ते अधिकारपत्र लखोट्यात परत घालून चतुरेश यांच्या हातात देत प्रमुखानी म्हटले," आपल्या देशाचे प्रतिनिधी व मंत्री म्हणून आपल्या देशप्रमुखांचा पूर्ण पाठिंबा आपणास आहे हे हा आदेश सिद्ध करतो यात शंकेला मुळीच जागा नाही हे मला मान्यच आहे.पण त्यामुळे आमच्या  खातेदारांच्या गोपनीयतेविषयीचा बॅंकेचा नियम त्यासाठी बदलण्याचे स्वातंत्र्य मला नाही.खातेदारांच्या अधिकारपत्राशिवाय कोणत्याही परिस्थितीत अशी माहिती उघड करणे शक्य नाही.बॅंकेचे नियम असेच आहेत आणि असेच रहातील हे आपल्याला नम्रतापूर्वक नमूद करावेसे वाटते." असे म्हणून आपल्या खुर्चीवरून उठत प्रमुखानी भेट संपल्याचे जणु निदर्शनास आणले परंतु चतुरेश याच्यावर त्याचा जणु काहीच परिणाम झाला नाही.आपली जागा मुळीच न सोडता त्यानी हलक्या आवाजात एवढेच म्हटले,
" आमच्या राष्ट्रप्रमुखांनी आमचा देश व आपला देश यांच्यामधील सर्व आर्थिक व्यवहार आपल्याच बॅंकेतर्फे होतील असे सांगण्याचेही अधिकारपत्र मला दिलेले आहे."
" हे सांगून आपण माझा मोठाच सन्मान केला आहे,मंत्रीजी व त्याबद्दल मी आपला अतिशय ऋणी राहीन." आपल्या जागीच उभे रहात बॅंक अध्यक्ष म्हणाले,"तरीही आपण समजून घ्याल अशी आशा आहे की त्यामुळे खातेदारांच्या गुप्ततेविषयीच्या बॅंकेच्या भूमिकेत व नियमात काही बदल घडण्याची शक्यता नाही."
"तसे असेल तर श्रीयुत प्रद्युम्न, विप्रदेशाच्या आमच्या राजदूतास असे कळवण्यात येईल की आमच्या देशवासीयांविषयी मागितलेल्या माहितीच्या विनंतीस प्रतिसाद म्हणून योग्य ते सहकार्य आपल्या बॅंकेकडून मिळत नाही."आपल्या शब्दांचा इष्ट तो परिणाम होण्यासाठी काही काळ त्यानी जाऊ दिला व पुढे म्हणाले,"ही नामुष्की केवळ आमच्या कोणत्या देशवासीयांची खाती आपल्या बॅंकेत आहेत त्यांची नावे व त्यांच्या खात्यातील रक्कम याविषयीची माहिती मला देऊन आपण टाळू शकता"
"आपण अश्या प्रकारचा आदेश आपल्या राजदूतास अवश्य देऊ शकता माननीय मंत्रीजी,आणि त्याचबरोबर मला खात्री आहे की आमचे मंत्री आपल्या राजदूतास आपल्या नम्र राजनीतिक भाषेत हे पटवून देतील की आमच्या परदेश मंत्र्याना विप्रदेशीय कायद्यानुसार अश्या प्रकारची माहिती उघड करण्याचा आदेश बॅंकेला देण्याचा अधिकार नाही."
"असे असेल तर विप्रदेशीयांबरोबर होणाऱ्या यापुढील आर्थिक व्यवहारात पन्नास प्रतिशत कपात करण्याची सूचना आमच्या वाणिज्य मंत्र्यांना मी देऊ शकतो"
"माननीय मंत्रीजी,तसे करण्याचा आपणास पूर्ण अधिकारच आहे" कोठलेही भीतीचे चिन्ह चेहऱ्यावर न दाखवत अध्यक्ष उत्तरले.
"आणि यापुढे आमच्या देशवासीयांचे कोणतेही करार असतील तर त्यांचा पुनर्विचार करावा लागेल व त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीस आमचा देश कारणीभूत रहाणार नाही."
"आपला हा निर्णय जरा अतिशयोक्त आहे असे आपणास वाटत नाही का?" चेहऱ्यावर थोडा संकोच दाखवत अध्यक्ष म्हणाले.
"श्रीयुत --- मला इतकेच सांगावे वाटते की आता याविषयाची तड लागेपर्यंत मला शांत झोप येणार नाही.आमच्या देशवासीयांची नावे असणारी यादी मिळण्यासाठी कोणत्याही टोकाचा निर्णय मला घ्यावा लागला तरी हरकत नाही.त्यासाठी विप्रदेशास आमच्या प्रचंड देशापुढे गुडघे टेकावयास लावण्याचीही माझी तयारी आहे."
"कसेही असले तरी मंत्रिमहोदय,"अध्यक्ष उत्तरले," बॅंकेच्या धोरणात आणि प्रतिसादात कोणताही बदल घडण्याची शक्यता नाही."
"असे असेल तर अध्यक्षमहाराज,आजच्या आज आमच्या राजदूतास येथील दूतावास बंद करून आमच्या देशातील आपल्या राजदूतास आम्ही देश सोडून जाण्यास भाग पाडू"
यावेळी पहिल्यांदाच अध्यक्षांच्या भुवया जरा उंचावल्या गेल्या.
"याशिवाय" चतुरेश आणखी पुढे म्हणाले,"मी लंडन येथे वार्ताहर परिषद बोलावून बॅन्केच्या आमच्या देशाबरोबरच्या अश्या व्यवहारामुळे आमच्या देशाच्या पंतप्रधानाची झालेली नाराजी त्यांच्यासमोर उघड करेन आणि त्यामुळे जगातील बऱ्याच राष्ट्रांचे नागरिक तुमच्या देशातील बॅंकांशी व्यवहार करण्याचे थांबवतील."
चतुरेशनी काहीवेळ वाट पाहून आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतो हे पाहिले.पण अध्यक्षांचा प्रतिसाद काहीच न दिसल्यावर एकदम ताडकन उठून "मग आता मात्र मला कुठलाच पर्याय दिसत नाही" असे चतुरेश म्हणाले.
   बॅंकेच्या अध्यक्षांनी चतुरेशनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला असे समजून निरोपासाठी आपला हात पुढे केला आणि एकदम त्यांच्या छातीत धडकीच भरली कारण चतुरेशनी आपला हात हस्तांदोलनासाठी पुढे केलेला नसून आपल्या कोटाच्या खिशात घातला आणि तो हात बाहेर काढला तेव्हां  स्वयंचलित पिस्तूल त्यांच्या हातात होते असे त्याना दिसले.अध्यक्ष आणि त्यांचा तरुण सहकारी जागच्या जागी गोठूनच गेले कारण चतुरेशनि पुढे होत त्या पिस्तुलाची नळी अध्यक्षांच्या कपाळावर टेकवली व ते म्हणाले,
"ती नावे मला हवी आहेत आणि कोठल्याही परिस्थितीत,आणि आता तुमच्या लक्षात आलेच असेल की मी कोठल्याही टोकाला जाऊ शकतो.आता जर ती नावे मिळाली नाहीत तर तुमच्या मेंदूच्या चिंधड्या उडतील.समजले ना?"
अध्यक्षांनी मानेला हलकासा झटका दिला,त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमल्याचे स्पष्ट दिसत होते."आणि नंतर तुझा नंबर असेल"त्याच्याकडे मान वळवून चतुरेश म्हणाले.तो बिचारा वाचा बंद पडून थर थर कापत होता.
"आटपा लवकर,आणि झटपट ज्या अनामिकावासियांची खाती तुमच्या बॅंकेत आहेत त्यांची नावे मला कळायला हवीत" आणि अधिकाऱ्याकडे वळून ते म्हणाले,"नाहीतर तुमच्या अध्यक्षांच्या मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या एका क्षणात समोरच्या गालिच्यावर पडलेल्या दिसतील,काय ऐकू येतेय ना तुम्हाला?"
   त्या तरुण अधिकाऱ्याने आपल्या अध्यक्षाकडे केविलवाणा दृष्टिक्षेप टाकला," सर काय करणार ---"
"नियम म्हणजे नियम " तशाही परिस्थितीत अध्यक्षांच्या तोंडून एवढेच शब्द बाहेर पडले.
"मी तुम्हाला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही असे नंतर म्हणू नका ’ चतुरेश म्हणाले.अध्यक्षांच्या कपाळावरून घामाच्या धारा वहात होत्या आणि आता पुढल्याच क्षणी पिस्तुलाचा आवाज ऐकण्याच्या अपेक्षेने ते दृश्य पहायलाही नको म्हणून अधिकाऱ्याने आपली मान वळवली होती.
    पण पिस्तुलाचा आवाज न होता एकदम चतुरेशचा एकदम वेगळाच आवाज त्याच्या कानावर पडला आत्तापर्यंतच्या आवाजातील दरडावणीचा अंशही त्यात नव्हता उलट एकाद्या व्यक्तीवर खूष व्हावे अश्या प्रकारचा आवाज चतुरेश यांच्या तोंडुन बाहेर आल्यासारखे त्याला वाटले,
"शाबास !" हा शब्द ऐकून अधिकाऱ्याने आपली मान वळवून पाहिले तर चतुरेश यानी पिस्तुल खाली घेतले होते,आणि ते आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होत होते.अध्यक्ष आणि अधिकारी अजूनही थरथरतच होते.
   चतुरेशनी आपली ती गबाळग्रन्थी संदूक उघडली आणि समोरच्या टेबलावर ती ठेवली.त्याव्यावरील खटके दाबल्यावर ती सताड उघडली आणि त्यातून नोटांची थप्पी दृष्टोत्पत्तीस आली.बॅंकेचे दोघे अधिकारी त्याकडे विस्मयाने पहातच राहिले.अध्यक्षांच्या सराईत नजरेला त्यांच्या एकूण आकारावरून तो कोट्ट्यावधी डॉलर्सचा ऐवज असावा एवढे मात्र लगेच लक्षात आले.
" मला तुमच्या बॅंकेत खाते उघडायचे आहे,त्यासाठी काय काय कागदपत्रे भरावी लागतील ?" चतुरेश विचारत होते.