गर्वानं सांगतो

      गर्वानं सांगतो 

काळ्या पदरावरती
घामाच्या मातकट रंगाने
हिरवंकंच चित्र रेखणारा मी
अजब रंगारी आहे 
              गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे
आसमानी - सुलतानीचे तीर
छातीत या रुतुनही
ताठ कण्यानं उभा राहणारा मी
पाणीदार असा सह्यगिरी आहे
            गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे
मातीत राबताना
रक्त चेतवून
कष्टाचा धुप ओवाळणारा मी
श्रमदेवतेचा सच्चा पुजारी आहे
            गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे
दाण्या-दाण्याला 
मोताद असूनही
जगाला रसद
पुरवणारा मी
असा श्रीमंत सेवेकरी आहे
          गर्वानं सांगतो मी शेतकरी आहे...!!!
                - उद्धव कराड ( मो. नं. ९८५०६८३०४५ )
                  मु. जळगाव, ता. निफाड, जी. नाशिक.